बॉलिवुडचे ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया या आजारामुळे झाल्याचं निदान झालं आहे. त्यानंतर झोपेचा हा विकार कुठला असा प्रश्न सगळीकडे विचारला जातोय.
Sleep Apnea म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर झोपेत श्वसनाला होणारा अडथळा. आणि झोपेत घोरणं किंवा मोठा आवाज करणं… शरीराच्या वरच्या भागाच्या विचित्र हालचाली आपोआप होणं हे ही याच आजारामुळे होतं.
स्लीप अॅप्निया म्हणजे काय?
ॲप्निया (Apnea) या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे श्वास लागणं किंवा श्वासावरोध. आणि झोपेत जीभ आणि जीभेमागचे काही स्नायू शिथील झाल्यामुळे अशी स्थिती तयार होत असेल तर त्याला स्लीप ॲप्निया असं म्हणतात.
झोपेत घोरणं, विचित्र आवाज करणं ही याची सौम्य लक्षणं आहेत. पण, हाच आजार वाढला तर त्याचे परिणाम आपल्याला जागं असतानाही सतावू शकतात.
युकेमध्ये 47 वर्षीय एका महिलेचा अनुभव असा होता की, रात्री चांगली झोप लागूनही त्यांना भर दिवसा गुडघ्यातले त्राण संपल्यासारखं वाटायचं. आणि गाडी चालवताना मानही स्थिर राहायची नाही. चेहरा सतत ओढलेला आणि त्रस्त दिसायचा. एरवी झोप चांगली होती. पण, कधी कधी त्यांना झोपेतही ह्रदयाची प्रचंड धडधड होऊन जाग यायची.
हा ह्रदयविकाराचा प्रकार असेल असं समजून डॉक्टरांनी तपासण्या सुरू केल्या. पण, एका तपासणीत त्यांना आढळलं की, या महिलेचा श्वास चक्क 120 सेकंद थांबलेला होता. म्हणजे इतका वेळ ती श्वासच घेत नव्हती. महिला अर्थातच तेव्हा भूल दिलेल्या अवस्थेत होती. डॉक्टरांनी निदान केलं OSO म्हणजेच ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्नियाचं.
स्लीप ॲप्निया जीवघेणा आहे का?
तुमची जीभ आणि घशातले स्नायू प्रमाणाबाहेर शिथील झाले तर श्वासनलिका कोंडते. ऑक्सिजन मेंदूपर्यंत पोहोचू शकत नाही.
त्यामुळे अचानक तुमच्या रक्तातली ऑक्सिजनची पातळीही कमी होऊ शकते. परिणामी, तुम्ही जोरजोराने श्वास घेऊ लागता, त्याचा घोरल्यासारखा आवाजही येऊ शकतो किंवा ह्रदयापर्यंत ऑक्सिजन पोहोचायला त्रास झाला तर झटका दिल्यासारखं तुमचं शरीर उडूही शकतं. यापैकी घोरणं हा परिणाम सौम्यच म्हणायला हवा. कारण, त्यामुळे फक्त तुमची इतर लोकांमध्ये चेष्टा होते फार तर.
पण, स्लीप अॅप्नियाचा कालावधी वाढला आणि तुमचं वयही जास्त असेल तर तुमचं ह्रदय, रक्तदाब आणि मधुमेह यावरही परिणाम होऊ शकतो.
990 च्या दशकात दरवर्षी ह्रदयविकाराला बळी पडणाऱ्या अमेरिकन नागरिकांपैकी सुमारे 38,000 लोक हे स्लीप ॲप्नियाने आजारी होते. म्हणजेच हा आजार दुर्लक्ष करण्यासारखा मुळीच नाही.
हा आजार अनुवंशिक आहे किंवा पर्यावरणातील बदल जसं की प्रदूषण यामुळे तो होतो का, याबद्दल संशोधकांना अजून निश्चित माहिती नाही. पण, अमेरिकेतील फिलाडेल्फियातले एक संशोधक डॉ. रिचर्ड श्वाब यांच्या मते, "ज्या व्यक्ती स्थूल, वजनाने जास्त किंवा ज्यांचा गळा तसंच टॉनसिल्स लांब असतील तर त्या व्यक्तींना स्लीप ॲप्निया होण्याची शक्यता जास्त असते."
स्लीप ॲप्नियाचा सामना कसा करायचा?
हा आजार झालेल्या लोकांचा आहार कसा असावा यावर संशोधन सध्या सुरू आहे. कारण, जीभेवर अतिरिक्त चरबी साठल्यामुळेही झोपेत अडथळा येऊ शकतो असा निष्कर्ष अलीकडेच संशोधकांनी काढला आहे. त्यामुळे शरीरातली अतिरिक्त चरबी घटवणारा आणि कमी चरबी असलेला आहार निश्चित करण्यावर त्यांचा भर आहे. त्याव्यतिरिक्त स्लीप ॲप्निया असलेल्यांसाठी डॉक्टरांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.
2019 मध्ये अमेरिकेत झालेल्या एका संशोधनानुसार, जगभरात काही अब्ज लोकांना सौम्य ते गंभीर स्वरुपाचा स्लीप ॲप्निया असतो. अमेरिकेतही 12% प्रौढ लोकांना हा आजार होतो. पण, यातले 80% लोक त्यावर उपचारही घेत नाहीत.