Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन शिवेंद्रराजे भोसलेही कडाडले

On comparison with Shivaji Maharaj
, सोमवार, 13 जानेवारी 2020 (14:10 IST)
भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेलं 'आज के शिवाजी-नरेन्द्र मोदी' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आल्याने विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
 
दिल्लीतील भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. भाजपच्या दिल्ली कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाला भाजप दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी उपस्थित होते.
 
याप्रकरणी शिवेंद्रराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अतिउत्साही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आवर घाला अशी विनंती शिवेंद्रराजे यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना केली आहे.
 
"छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्याशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही. पक्षात काही अतिउत्साही कार्यकर्ते आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे पक्ष नेतृत्वावर चिखलफेक केली जाते. त्यामुळे त्यांना आवर घालण्याची गरज आहे." असं शिवेंद्रराजे म्हणाले.
 
"माझी अमिताभशी तुलना केली तर चालेल का? मोदी साहेबांनी स्वत:ला आरशात पाहायला हवं होतं. आपली तुलना शिवाजी महाराजांशी होते आहे हे पाहायला हवं होतं," अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
 
"आज मोदीभक्तांनी कहरच केला. बेशरमपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. शिवाजी महाराज हे एकमेव अद्वितीय असं रसायन होतं, ते जगाच्या अंतापर्यंत परत निर्माण होऊ शकणार नाही," अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
 
भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, "उपाधी देणारे खुशमस्करे खूप असतात. पण आपण शिवाजी महाराजांच्या तुलनेत कोठे बसतो हे मोदींना माहिती असेल. त्यामुळे हे पुस्तक कळताच मोदींनी माघार घ्यायला हवी होती. मीच शिवाजी, मीच सिकंदर यापुढे त्यांचा विचार जात नाही. या पुस्तकात सांगण्यासारखं काहीच नाही. स्वतः मोदींनी प्रतिक्रिया द्यायला हवी. महाराष्ट्राच्या अपमानाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी क्षमा मागावी."
 
"दरम्यान शिवाजी महाराजांचा पराक्रम, निर्णय प्रक्रिया हे गुण नरेंद्र मोदींमध्ये पाहतो. बोलणाऱ्याच्या भावनेचं स्पिरीट लक्षात घ्यायला हवं. महापुरुषांना विनाकारण चर्चेत आणणं योग्य नाही," असं भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू म्हणाले.
 
"छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचं दैवत आहे. काल, आज, उद्या शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. त्यांच्या काळात शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ शकलं नाही. त्यांनी राजकारणासाठी वापर केला. आमच्या दैवताचा अपमान करण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो. शिवाजी महाराजांची तुलना होऊच शकत नाही. भाजपने हे पुस्तक मागे घ्यायला हवं आणि माफी मागायला हवी. भाजपची बौद्धिक दिवाळखोरी आहे. शिवाजी महाराज तुम्हाला कळलेच नाहीत. रयतेसाठी झटणारा राजा अशी शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. मोदींमध्ये शिवाजी महाराजांचा एकही गुण नाही", असं काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनी म्हटलं आहे.
 
पुस्तकावर बंदी घातलीच पाहिजे- छगन भुजबळ
छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची कधीच तुलना होणार नाही. ज्या पद्धतीचे कायदे नरेंद्र मोदी आज आणत आहेत ते पाहाता ते एका धर्माच्या विरोधात कायदे करत आहेत. हे पाहाता आज त्यांची तुलना कदापीही शक्य नाही. शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याचा राग येणं अगदी साहजिक आहे. या पुस्तकावर बंदी घातलीच पाहिजे. ज्या प्रकारे शिवाजी महाराज आग्र्याला गेल्यावर त्यांच्यावर परिस्थिती ओढावली, तशी नरेंद्र मोदी यांच्यावर ओढावली असती तर त्यांचं काय झालं असतं याचा विचार केला पाहिजे. असं मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.
 
दरम्यान खासदार संजय राऊत यांनी या मुद्यावरून भाजप नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी काही ट्वीट करत त्यांचा मुद्दा मांडला आहे.
 
"आज के शिवाजी नरेंद्र मोदी. - असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोयल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!!"
 
"जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवाजी महाराजांचा एकेरीत ऊललेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली हे भाजपात शिरलेलया छत्रपतीच्या वंशजांना मान्य आहे का?"
 
संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत गेलेले उदयनराजे भोसले यांना व्यक्त होण्याचं आवाहन केलं आहे. ते लिहितात, "सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयनराजे श्रीमंत शिवेंद्रराजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला.. काहीतरी बोला.."
 
शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही हे सांगताना राऊत म्हणतात, "निदान महाराष्ट्र भाजपाने तरी यावर भुमिका स्पष्ट करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही.. एक सूर्य... एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज...छत्रपती शिवाजी महाराज...", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
संजय राऊत यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत संभाजीराजे छत्रपती यांनी शिवाजी महाराजांची कुणाशीही तुलना खपवून घेतली जाणार नाही असं ट्वीट केलं आहे.
 
"छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही. नरेंद्र मोदी हे स्वकर्तृत्वाने पंतप्रधान झाले आहेत, पण त्यांची शिवाजी महाराजांशी तुलना करणं माझ्यासाहित सर्वच शिवभक्तांना अजिबात आवडलेलं नाही. ज्या पक्षाच्या कार्यालयात ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक तात्काळ मागे घ्यावे. नाहीतर त्याचे वेगळे परिणाम होतील," असं ट्वीट संभाजी छत्रपती यांनी केला आहे.
 
तसंच त्यांनी संजय राऊत यांच्यावरसुद्धा टीका केली आहे.
 
"उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेड राजा मध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही," असं सुद्धा त्यांनी ट्वीट केलं आहे.
 
जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी सुद्धा ट्वीट करून याला विरोध केला आहे.
 
"छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मियांना स्वराज्यात सामावून घेतले,शेतकऱ्यांच्या पिकालाही धक्का लागू दिला नाही, गोरगरिबांना आधार दिला,जनतेसाठी आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही. सह्याद्रीऐवढ्या माझ्या राजाची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा, नाहीतर गाठ महाराष्ट्राशी आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.
 
सात पिढ्या झिजलात तरी तुलना होणार नाही- बच्चू कडू
सात पिढ्या, पूर्ण आयुष्य झिजले तरी शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदींशी तुलना होऊ शकणार नाही अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. अशा प्रकारचे पुस्तक प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अशी तुलना करणं अत्यंत चुकीची आहे. ही प्रथा मोडीत काढायला हवी. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं होतं. नरेंद्र मोदी यांना स्वराज्याचे पाईक म्हणू शकतो परंतु तुलना करणं शक्य नाही. असेही कडू म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बुमराहची पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड