- प्राजक्ता पोळ
माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बीबीसी मराठीशी बातचीत केली. यावेळी बोलताना, त्यांनी ओबीसी आरक्षण, महाविकास आघाडी सरकारची अस्थिरता, उद्धव ठाकरे सरकारचं काम, देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ताधारी पक्षाच्या भेटीगाठी, धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप यावर भाष्य केलं.
देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामधल्या संघर्षाबाबत अनेकदा बोललं जातं. त्यावर बोलताना 'आमच्यात कट्टी नाही, असंही त्या म्हणाल्या. पुढे रस्त्यावर उतरून काम करणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडे यांची बीबीसी मराठीने घेतलेली मुलाखत जशीच्या तशी -
प्रश्न: गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त केलेल्या भाषणात तुम्ही एक वक्तव्य केलं ते म्हणजे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही. तुम्ही नक्की काय करणार आहात?
पंकजा मुंडे: ही माझी नाही तर ही समस्त वर्गाची भावना आहे. ओबीसी आरक्षण हे कोर्टात टिकवण्यासाठी सरकार आपली बाजू मांडताना अपयशी ठरलं. जर निवडणुकांवेळी ओबीसी वर्गाला मुख्य प्रवाहात येता येणार नसेल तरी अन्यायकारक आहे मग निवडणुका घ्यायच्याच कशाला?
यातून मार्ग काढला पाहिजे. आम्ही सरकारला काही दिवस वेळ देऊ चांगल्या चर्चेने याची सुरुवात करू. पण जर काही झालं नाही तर लोकांचा आक्रोश थांबवता येणार नाही. रस्त्यावर उतरून जर न्याय मिळणार असेल तर निश्चितपणे आम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरून न्याय मागू.
प्रश्न - सगळे नेते फिरताना दिसतायेत पण तुम्ही कुठेही दिसत नाही. तुम्ही म्हणता रस्त्यावर उतरणार पण कधी उतरणार?
पंकजा मुंडे: मला स्वतःला कोव्हिड झाला होता. सध्या दिल्लीच्या आणि मध्यप्रदेशच्या बैठका वाढल्या आहेत. बीड जिल्ह्यातील कोव्हिड परिस्थिती गंभीर होती. माझे जवळचे अनेक जण दगावले. मला काही झालं तर मला लगेच उपचार मिळत मिळू शकतात. पण माझ्या कार्यकर्ते यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मी अतिशय गंभीरपणे या परिस्थितीकडे बघते आहे. मी लवकरच तुम्हाला दिसेन.
प्रश्न - तुम्ही या संदर्भात मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांच्याशी चर्चा केली आहे का?
पंकजा मुंडे: मी मुख्यमंत्र्यांशी नक्कीच बोलणार आहे. हा विषय राज्य पातळीवरचा आहे. राज्याने जे सर्वेक्षण कोर्टात प्रभावीपणे कोर्टात मांडणं अपेक्षित होतं. जे मांडलं गेलं नाही. राज्यातले जे नेते हा विषय हाताळत होते त्यांची इच्छा दिसत नाहीये. 50 टक्यांवरच आरक्षण गेलं ठीक आहे पण 50 टक्यांखालचं देखील आरक्षण गेलं हे हे राज्याचं खूप मोठं अपयश आहे.
प्रश्न - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मंत्रिगट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आरक्षणाबरोबरच इतर गोष्टींची चर्चा झाली. तुम्हाला काय वाटतं याबाबत. पंतप्रधान तोडगा काढतील का? तुम्ही या संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहात का?
पंकजा मुंडे: ओबीसी आरक्षणाबाबत आम्ही निश्चितपणे पंतप्रधानांशी बोलू. पण सध्यातरी हा विषय राज्य पातळीवरचा आहे. पंतप्रधानांनी सर्व बाबतीत एक समिती तयार केली आहे. भाजपचे नेते हे त्यांच्याशी बोलतच असतात. पंतप्रधान चांगलं मार्गदर्शन करू शकतील पण त्यांचा या विषयात तितकासा 'रोल' राहणार नाही.
प्रश्न - भाजपच्या नेत्यांशी पंतप्रधान चर्चा करतात का? तुमचं बोलणं होतं का?
पंकजा मुंडे: पंतप्रधान हे फक्त भाजपच्या नेत्यांसाठी नाही तर सर्वांसाठीच उपलब्ध असतात. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा 'मन की बात' हा कार्यक्रम आता मीसुद्धा अधिक बारकाईने बघायला लागले. ते लोकांशी बोलतात. त्यांच्या संकल्पना समजून घेतात.
प्रश्न - संभाजी राजे हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले आहेत पण भाजपचेच नेते हे त्यांच्यावर टीका करताना दिसले, तुम्हाला याबाबत काय वाटतं?
पंकजा मुंडे: संभाजी राजे हे भाजपशी जोडण्याआधीपासून त्यांच्या कामाची दिशा ही मराठा आरक्षणाची होती. त्यांची जी भूमिका आहे, तीच भूमिका भाजपची सुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचं काही कारण नाही.
प्रश्न - कोरोना काळात राज्य सरकार आणि केंद्र सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं असं चित्र होतं. तुम्हाला याबाबत काय वाटत? त्यांना कामासाठी तुम्ही किती मार्क द्यालं?
पंकजा मुंडे: कोरोनाच्या परिस्थितीत मला राजकारण करायचं नाही जिथे चुका झाल्या त्या दुरुस्त करण्यासाठी त्याकडे बोट दाखवायचं पण हे काम झालं तर त्याचं कौतुक करायचं. काही चुका झाल्या जसं रेमडेसीवीरचा काळा बाजार, हॉस्पिटलमध्ये बेडची उपलब्धता, ऑक्सिजनची टंचाई हे त्या त्या यंत्रणांचं अपयश आहे. पण आपल्या देशाची लोकसंख्या, गरिबी बघता जे काम झालं त्याचं कौतुक झालं पाहिजे.
प्रश्न - देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना भेटले ते एकनाथ खडसे यांच्याही घरी गेले. त्यावेळी अनेक चर्चा झाल्या. देवेंद्र फडणवीस यांचा राजकारण हे सर्वसमावेशक होत आहे. तुम्हाला त्यांचा राजकारण बदलतय असं वाटतं?
पंकजा मुंडे: मला याबाबत काही वाटत नाही. ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते विरोधी पक्षांना भेटायचे आता ते विरोधी पक्षनेते आहेत. ते सत्ताधाऱ्यांना भेटत आहे. त्यामुळे अशा भेटीगाठी होत असतात यातून वेगळे अर्थ काढण्याची मला तरी गरज वाटत नाही.
प्रश्न - देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुमचं बोलणं होतं का? ते अनेकांच्या घरी जातायेत. तुमच्याही घरी आले तर स्वागत करणार का?
पंकजा मुंडे: हा काय प्रश्न हा मला कळला नाही. हा खूपच विनोदी प्रश्न आहे. ते घरी आले तर निश्चितपणे स्वागत करणार. मी काय दाराला कडी लावणार नाही. पण आमची कट्टी नाही.
प्रश्न - धनंजय मुंडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका महिलेने आरोप केले होते त्यावेळी त्यांचं मंत्रिपदही धोक्यात आलं होतं. आजही ती महिला विविध माध्यमातून त्यांच्यावर आरोप करत असते तुमचे प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता?
पंकजा मुंडे: - ते माझे प्रतिस्पर्धी नाहीत. आमच्यामध्ये कोणतचं साम्य नाही. आमची विचारधारा सारखी नाही. आमचे पक्ष सारखे नाहीत. आमचे कार्यकर्ते सारखे नाहीत. ते माझ्याविरोधात निवडणूक लढले. कोणाच्याही वैयक्तिक बाबींचं राजकारण करण्याच्या संस्कारात मी वाढलेली नाही. पण मी या गोष्टींचा समर्थनही करणार नाही. समोर कोणीही असो, अशा कुठल्याही गोष्टीचं समर्थन करता येणार नाही.
प्रश्न - हे सरकार येऊन आता दीड वर्षं झालं आहे यामध्ये वारंवार चर्चा होते की हे सरकार टिकणार की नाही? तुम्हाला काय वाटतं हे सरकार अस्थिर आहे?
पंकजा मुंडे: या सरकार मधल्या तीन पक्षाची विचारधारा पाहिली तर ती वेगवेगळी आहे. त्यामुळे हे सरकार विचित्र वाटतं. लोकांची कामे रखडलेली आहेत. आरक्षणाचा मुद्दा असेल, विद्यार्थ्यांचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांचा मुद्दा असेल काम होत नाहीयेत. त्यातून अस्थिरता दिसत आहे. पण सरकार पडावं याची वाट बघणं हा माझा पिंड नाही. सध्या विरोधी पक्षात आहोत तर सक्षमपणे विरोधी पक्षाचे काम करायचे.
प्रश्न - देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपूर्वी ते म्हणाले कोरोना परिस्थितीत आम्ही सरकार पाडण्याच्या दृष्टीने कुठलेही प्रयत्न करणार नाही. पण त्या नंतर ते प्रयत्न करतील असे संकेत त्यांनी दिले पडद्यामागे काय घडामोडी सुरू आहेत?
पंकजा मुंडे: कदाचित त्या घडामोडींमध्ये मी नसेल त्यामुळे मला माहिती नाही पण जर देवेंद्रजी असं म्हणाले असतील तर मी त्यांना शुभेच्छा देते. महाराष्ट्र वाट पाहतोय.
प्रश्न - तुमच्या पक्षातल्या अनेक नेत्यांनी हे काही महिन्यात सरकार पडेल, काही दिवसात सरकार पडेल असं म्हटलं होतं. तुम्हाला असा कुठला कालावधी दिसतोय का?
पंकजा मुंडे: मला अशी कुठलीच भविष्यवाणी करता येत नाही सरकार अस्थिर आहे त्यामुळे अशा चर्चा सुरू राहणार सरकार स्थिर ठेवणं हे त्या तीन पक्षांचे काम आहे.