Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या मदतीला भारतीय नौदलाची 2 विमानं

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या मदतीला भारतीय नौदलाची 2 विमानं
कोल्हापूरमध्ये गेले काही दिवस सतत कोसळत असलेल्या पावसामुळं पूरस्थिती उद्भवली आहे.
 
अनेक गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचं काम सुरू आहे. कोस्ट गार्ड, NDRF ची पथकं पोहोचली असून बचावकार्याला सुरूवात झाली आहे. पाऊस थांबला असून राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. पावसानंही काही प्रमाणात उघडीप घेतलीये.
 
जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बुधवारी (7 ऑगस्ट) सकाळपासूनच नौसेनेची दोन विमानं आणि एका बोटीसह 22 जणांचं पथक दाखल झालं आहे. गोवा कोस्टगार्डचं एका हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येणार आहे.
 
NDRF आणि लष्कराच्या बोटींनी पूरग्रस्तांना हलविण्यास सुरुवात केल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाईंनी दिली.
 
मंगळवारपासून (6 ऑगस्ट) 204 गावातील 51 हजार 785 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आल्याचंही देसाईंनी सांगितलं. 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे.
webdunia
महामार्गावरील पाण्यामुळे बचावामध्ये अडथळे
मंगळवारी रात्री लष्कराचं एक पथक दोन बोटींसह तसंच NDRFचे आणखी एक पथक चार बोटींसह शहरात दाखल झाले. परंतु महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे अडचण निर्माण झाली.
 
बुधवारी (7 ऑगस्ट) पहाटेपासूनच प्रयाग चिखलीकडे चार बोटींसह बचाव पथक रवाना झालं तर शहरासाठी दोन बोटींची मदत घ्यायला सुरुवात झाली. सकाळी नौदलाच्या दोन विमानांमधून एका बोटीसह 22 जणांचे पथक शहरात दाखल झालं. नौदलाकडून आणखी 14 बोटीही देण्यात येतील.
 
प्राधान्याने प्रयाग-चिखलीकडे मदत पाठविली गेली आहे. आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टिंग सुरू करण्यात येणार आहे.
 
"आवश्यकतेनुसार पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू विशेषत: अन्नाची पाकीटे देण्यात येणार आहेत. प्रशासन पूर्णपणे सतर्क आणि सज्ज आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये," असं आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलं आहे.
 
पंचगंगा नदीची पाणी पातळी 55.1 फूट आहे तर सध्या 111 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कलम 370 : संजय राऊतांचे बॅनर इस्लामाबादमध्ये, जिल्हाधिकाऱ्यांची महापालिकेला नोटीस