शारदा व्ही.
कुठल्याही जत्रेत किंवा बाजारात जा, बुढ्ढी के बाल किंवा आजकाल जसं म्हटलं जातं 'कॉटन कॅंडी' दिसली नाही असं होणार नाही. चमकदार रंग आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारा साखरेचा पदार्थ पाहून बुढ्ढी के बाल कुणाला खावं वाटणार नाही?
आणि त्यात लहान मुलं सोबत असतील तर त्यांचा हट्ट तर असतोच. तेव्हा लहान मुलांसोबत मोठ्यांनाही खाण्याचा मोह आवरत नाही. पण बुढ्ढी के बाल, म्हातारीचे केस किंवा कॉटन कँडी ही खाण्यासाठी सुरक्षित असते का?
तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये अन्न सुरक्षा विभागानं सार्वजनिक ठिकाणी विक्री होणाऱ्या कॉटन कँडीची (मुलांच्या भाषेत बुढ्ढी के बाल) चाचणी केली. तेव्हा या कॉटन कँडीमध्ये 'ऱ्होडामिन बी' नावाचा घटक असल्याचं चाचणीत आढळून आलं.
त्यामुळं या गुलाबी रंगाच्या गोड पदार्थावर आता तामिळनाडू सरकारनं बंदी घातली आहे. 90 च्या दशकापासून अगदी आजही ही कँडी चिमुकल्यांची अत्यंत आवडीची असल्याचं दिसून येतं.
पुदुचेरीमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या कॉटन कँडीची चाचणी करण्यात आली तेव्हा त्यात ऱ्होडामिन बी आढळलं, त्यामुळं सरकारनं पुदुचेरीमध्ये या कॉटन कँडीच्या विक्रीवर बंदी घातली.
पण कॉटन कँडीमध्ये आढळणारा ऱ्होडामिन बी हा घटक नेमका काय आहे? इतर पदार्थांमध्येही हा विषारी घटक आढळतो का? तो शरिरात गेल्यास काय दुष्परिणाम होतो?
ऱ्होडामिन बी काय आहे?
ऱ्होडामिन बी हा एक प्रकारचा कृत्रिम रंग आहे. त्यामुळं पदार्थाला चमकदार लाल किंवा गुलाबी रंग मिळतो.
हा रासायनिक घटक पाण्यात अगदी सहज मिसळला जातो आणि त्यामुळं उत्पादन खर्चही कमी होतो. म्हणून याचा वापर प्रामुख्यानं कापड, पेपर आणि चामड्याच्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो.
ऱ्होडामिन बी वर बंदी आहे का?
ऱ्होडामिन बी ला उद्योगांमध्ये आणि प्रामुख्यानं कापड उद्योगांत रासायनिक घटक म्हणून वापरण्यास परवानगी आहे. पण खाद्य पदार्थांमध्ये त्याच्या वापरावर बंदी आहे.
खाद्य पदार्थांमध्ये काही कृत्रिम रंग वापरण्यासाठी परवानगी दिलेली आहे. पण तसं असलं तरी FSSAI (Food Safety and Standards Authority of India)नं कशाचा किती प्रमाणात वापर करावा यासंदर्भात दिशानिर्देश ठरवून दिलेले आहेत.
ऱ्होडामिन बी च्या दुष्परिणामांमुळं त्याचा खाद्य पदार्थांमध्ये वापर करण्यास FSSAI नं बंदी घातली आहे. खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी किंवा वितरणासाठी ऱ्होडामिन बी चा वापर करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाते.
कोणत्या पदार्थांमध्ये ऱ्होडामिन बी आढळतं?
ऱ्होडामिन हे प्रामुख्यानं पदार्थांना लाल किंवा गुलाबी रंग देण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळं ते प्रामुख्यानं गुलाबी रंगाच्या पदार्थांमध्ये आढळतं.
विशेषतः रोझ मिल्क सारख्या पदार्थांमध्ये ते आढळतं. हा पदार्थ संपूर्ण तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे असं चेन्नईचे अन्न सुरक्षा अधिकारी सतीश कुमार यांनी सांगितलं.
सतीश कुमार यांनी याबाबत बीबीसी तामिळशी बोलताना माहिती दिली.
"कॉटन कँडीमध्ये जे ऱ्होडामिन बी आढळतं तेच रोझ मिल्क, सुपारी आणि रेड रॅडीश (लाल मुळा) सारख्या पदार्थांमध्येही वापरलं जातं. तसंच दुधापासून तयार केलेल्या पेढ्यावरील सजावटीच्या घटकांतही ते आढळतं," असं ते म्हणाले.
"खाद्य पदार्थांमध्ये काही विशिष्ट रंगद्रव्य वापरण्यासाठी परवानगी दिलेली असते. उदाहरण द्यायचं झाल्यास लाल रंगासाठी अलुरा रेड, हिरव्या रंगासाठी अॅपल ग्रीन याचा वापर करता येतो.
पण त्याचाही खाद्य पदार्थांमध्ये एका ठराविक मर्यादेतच वापर करावा लागतो. मात्र, सध्या खाद्य पदार्थांमध्ये या ऱ्होडामिन बीच्या वापराला परवानगी देण्यात आलेली नाही," असंही त्यांनी सांगितलं.
रताळ्याचा लाल रंग वाढवण्यासाठीही या ऱ्होडामिन बी चा वापर केला जातो. त्याचप्रमाणे मिरची पावडर, विविध प्रकारचे सॉस, नाचणी यातही लाल रंगासाठी याचा वापर केला जातो.
ऱ्होडामिन बीचा वापर ग्राहक ओळखू शकतात का?
ऱ्होडामिन बीचा वापर केलेले सगळेच खाद्य पदार्थ ग्राहकांना लगेचच समजू शकतील असं काही नाही. पण काही अगदी सोप्या पद्धती आहेत ज्याद्वारे तुम्ही घरीही काही पदार्थांमध्ये ऱ्होडामिन बी आहे का? हे ओळखू शकता.
ऱ्होडामिन बी हे पाणी आणि तेल या दोन्हीतही सहज मिसळलं जातं. त्यामुळं खाद्य पदार्थांमधील ऱ्होडामिन शोधण्यासाठी FSSAI नं काही दिशानिर्देश ठरवून दिलेले आहेत.
म्हणजे रताळ्याच्या पृष्ठभागावरील लाल रंग हा तुम्ही घरीच ओळखू शकता. त्यासाठी थोडा कापूस पाणि आणि तेलामध्ये भिजवून घ्या.
तेव्हा हा कापूस तुम्ही रताळ्यावर घासाल तेव्हा कापसाचा रंग गुलाबी झाला तर समजून जावं की त्यावर ऱ्होडामिन बीचा वापर करण्यात आला आहे. तर कापूस पांढराच राहिला तर त्यावर ऱ्होडामिन बी वापरलेलं नाही असं तुम्ही म्हणू शकता. अशाच चाचणीद्वारे नाचणीवरही ऱ्होडामिन बी आहे की नाही हे तपासता येऊ शकतं.
ऱ्होडामिन बी आणि इतर हानिकारक रसायनांना खाद्य पदार्थांमध्ये वापर झालेला आहे किंवा नाही हे कसं ओळखावं याचं प्रात्याक्षिक आणि इतर अनेक व्हिडिओ FSSAI च्या यू ट्यूब पेजवर तुम्ही पाहू शकता.
कॉटन कँडीमधील ऱ्होडामिन बी ग्राहकांनी कसे ओळखावे?
कॉटन कँडीमध्ये ऱ्होडामिन बी आहे किंवा नाही हे ओळखणं ग्राहकांना शक्य नाही. त्याची प्रयोग शाळेत चाचणी झाल्यानंतरच त्यात ऱ्होडामिन बी आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकते.
FSSAI नं तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये कॉटन कँडीच्या सँपलची प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतरच ते हानिकारक असल्याचं जाहीर केलं होतं.
"एखाद्या खाद्य पदार्थांमध्ये बंदी असलेल्या रंगद्रव्याचा वापर केलेला आहे किंवा नाही हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. पण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे एखाद्या पदार्थाच्या चमकदार रंगाकडं जर तुम्ही आकर्षित होत असाल तर ती गोष्ट टाळलेलीच बरी. मग त्यात भाज्या, फळं, गोड पदार्थ, चॉकलेट्स, केक यापैकी कशाचाही समावेश असू शकतो. यामागचं कारण म्हणजे, कोणत्याही पदार्थाचे नैसर्गिक रंग कधीही प्रचंड चमकदार आकर्षक नसतात," असं सतीश कुमार म्हणाले.
ऱ्होडामिन बी वर बंदी का आहे?
काही अभ्यासांमध्ये ऱ्होडामिन बी हे कार्सिनोजेनिक आणि म्युटाजेनिक असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळं त्वचारोग, श्वसनासंबंधीचे आजार, यकृत आणि मूत्रपिंड खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळं मानवानं त्याचं सेवन करणं हानिकारक असल्यानं खाद्य पदार्थांमध्ये त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर कारखान्यांमध्ये बाहेर पडणाऱ्या ऱ्होडामिन बी मुळं हवामान आणि जमिनीतील पाणीही प्रदूषित होतं.
ऱ्होडामिन बी कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतं?
चेन्नईच्या स्टॅनली सरकारी रुग्णालयाचे फार्माकोलॉजी विभागाचे प्रमुख एस.चंद्रशेखर यांच्या मते, ऱ्होडामिन बीच्या सेवनामुळं यकृताला (लिव्हर) हानी पोहोचू शकते.
"ऱ्होडामिनचं सातत्यानं सेवन केल्यामुळं यकृताचा कॅन्सर होण्याचा धोकाही उद्भवू शकतो. ऱ्होडामिन बी आणि त्यामुळं यकृताची होणारी हानी याचा संबंध अभ्यासांमधून सिद्ध झालेला आहे."
ऱ्होडामिन बीमुळं कोणत्या अवयवांवर परिणाम होतो?
ऱ्होडामिन बीच्या सेवनामुळं यकृताबरोबरच मज्जासंस्थेवरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
त्यामुळं आपल्या लहान मेंदूच्या कामात अडथळा येतो. या विषारी घटकाच्या सेवनामुळं नैराश्य आणि पाठीच्या कण्याचंही नुकसान होऊ शकतं, असंही डॉ.चंद्रशेखर म्हणाले.
ऱ्होडामिन बी चे एखाद्या वेळी सेवन करणं धोकादायक ठरू शकतं का?
साधारणपणे एका वेळी सेवन केल्यानं लगेचच त्याचे कोणतेही दुष्परिणाम पाहायला मिळत नाही. कोणताही घटक असला तरी त्याचं सातत्यानं सेवन केलं तरच त्याचे दुष्परिणाम आढळून येऊ शकतात.
"पण, काही वेळा एकदा सेवन केल्यामुळंही शरिरावर गंभीर परिणाम दिसून येऊ शकतात. सबंधित पदार्थामध्ये ऱ्होडामिनचं किती प्रमाण आहे, यावर ते अवलंबून असतं. जर लगेचच अशा प्रकारचा त्रास झाला तर त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो," असं डॉ.चंद्रशेखर यांनी बीबीसीला माहिती देताना सांगितलं.