Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'आमच्या तान्हुलीला दयामरण द्या,' 1 वर्षाच्या मुलीच्या पालकांची आर्त मागणी

Webdunia
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019 (10:31 IST)
बाला सतीश
हायपोथर्मिया नावाचा दुर्धर आजार झालेल्या तान्हुलीला दया मरण द्यावं या मागणीसह आंध्र प्रदेशातील पालकांनी न्यायालयात धाव घातली आहे.
 
"इंजेक्शन दिलं की रडायची थांबते. दिवसातून 7 ते 8 इंजेक्शन्स द्यावे लागतात. मध्यरात्री 12 वाजता डायबिटीजचं इंजेक्शन देताना झोपेत असलेली ती जरा चुळबुळ करते... मुंगी चावल्यासारखी." अजून वर्षाचीही न झालेल्या रेड्डी शबानाविषयी बोलताना तिच्या आजोबांचा कंठ दाटून आला होता.
 
आंध्र प्रदेशातल्या चित्तूर जिल्ह्यातल्या मदनपल्लीजवळच्या बी. कोताकोटा गावात पठाण बावाजान आणि पठाण शबाना हे जोडपं राहतं. त्यांची यापूर्वी दोन अपत्य जन्मताज दगावली. रेड्डी शबाना त्यांचं तिसरं अपत्य. ती जगली. मात्र, तिच्या वाट्याला जिवंतपणी मरणयातना आल्या आहेत. आधीची दोन अपत्य गमावल्याने कुणीतरी सांगितलं की गावदेवी असलेल्या रेड्डेम्माचं नाव तुमच्या मुलीला लावा. त्यामुळे शबानाच्या नावाआधी त्यांनी रेड्डी लावलं. रेड्डी शबाना या महिन्यात एक वर्षाची होईल.
 
शबाना या जगात आली तेच हायपोथर्मिया घेऊन. त्यामुळे तिची ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी तिला दिवसातून किमान 4 इंजेक्शन्स घ्यावे लागतात. शिवाय दिवसातून 4 चार वेळा ब्लड शुगर तपासावी लागते. डॉक्टर सांगतात शबानाला जगवायचं असेल तर हाच एकमेव पर्याय आहे.
 
शबानाच्या आतापर्यंतच्या उपचारासाठी तिच्या आई-वडिलांनी त्यांच्याकडे होतं नव्हतं ते सर्व पणाला लावलं. मात्र, आता उपचारासाठी त्यांच्याकडे पैसा नाहीत. त्यामुळे मरणयातना भोगणाऱ्या आपल्या मुलीला दयामरण द्यावं, अशी याचिका त्यांनी कोर्टात केली. कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.
शबानाची आई सांगत होती, "जन्म झाल्यावर काही वेळातच तिला दरदरून घाम फुटला. तिला झटके येत होते. आम्ही तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन गेलो. तिथून बंगळुरूच्या इंदिरा गांधी बाल रुग्णालयात गेलो. पण, तिथल्या डॉक्टरांनाही नेमकं काय झालं आहे, हे कळण्यासाठी 10 दिवस लागले. तिची शुगर लेव्हल कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. तिला जगवायचं असेल तर रोज इंजेक्शन्स द्यावे लागतील, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन इंजेक्शन्स घेणं, ग्लुकोज चढवणं, हे रोजचंच झालं. जन्माला आल्यापासून ती नरकयातना भोगत आहे. तिच्या वेदना बघून मला वाटतं या जगण्याला काय अर्थ आहे? नर्क म्हणजे काय, हे हॉस्पिटलमध्ये आम्हाला कळलं."
 
शबानाचे वडील पठाण बावाजान म्हणाले,"ती जसजशी मोठी होईल, तिच्यात सुधारणा होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मात्र, तोवर रोज इंजेक्शन्स द्यावीच लागणार आहेत."
 
पठाण दांपत्य खेड्यात राहतं. तिथे औषधांची पुरेशी सोय नाही. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वीपर्यंत ते बंगळुरूला जाऊन इंजेक्शन्स आणायचे.
 
शबानाच्या मावशीने सांगितलं, "पैसे नाहीत म्हणून वेळेत इंजेक्शन दिलं नाही तर तिला झटके येतात. एकदा असंच झालं. तिला झटके येऊ लागले. मग बंगळुरूहून एका माणसाला इंजेक्शन घेऊन बोलावलं आणि आम्ही तिला घेऊन इथून निघालो. आंध्र प्रदेश-कर्नाटक बॉर्डरवरच्या श्रीनिवासपुरम गावात आम्ही रस्त्याच्या कडेला थांबून तिला इंजेक्शन दिलं."
 
या कुटुंबाची ही फरफट बघून एका स्थानिक मेडिकल स्टोअरच्या मालकाने बंगळुरूहून इंजेक्शन्स मागवायला सुरुवात केली आहे.
रोज सकाळी 6 वाजत, दुपारी 12 वाजता, त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 6 वाजता आणि मध्यरात्री 12 वाजता तिची ब्लड शुगर तपासावी लागते. त्याच्या नोंदी ठेवाव्या लागतात. शुगर लेव्हल बघून इंजेक्शन द्यावं लागतं.
 
शबानाची आई सांगते, "75-80 च्या घरातली शुगर सामान्य मानली जाते. मात्र, तिची शुगर लेव्हल 20 पर्यंत खाली येते. अशावेळी तिची तब्येत ढासळते. ती डोळे पांढरे करते. कुणाच्याही बोलण्याला प्रतिसाद देत नाही. तिच्या सर्वांगाला घाम फुटतो. ती कुडकुडते. तिच्या हृदयाचे ठोके तेवढे सुरू असतात. देवाने आम्हाला बाळ दिलं. पण, बाळ असूनही आमच्या आयुष्यात आनंद नाही. आमच्या मनात अनेकदा आत्महत्येचा विचार येऊन गेला आहे. असं जगणं आमच्यासाठी नरकापेक्षा कमी नाही. बाळाला किती त्रास सहन करावा लागतो. आमच्या मनात मृत्यूचे विचार येतात. ती अशी तडफडत असताना आम्ही शांत राहू शकत नाही. आमच्या सगळ्या आशा तिच्यावर आहेत. घरातल्या सगळ्यांना मुलगी आवडते."
 
आर्थिक चणचण
शबानाचे वडील सांगतात, "आम्हाला दर महिन्याला तिला बंगळुरूच्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. पैसे नव्हते म्हणून गेल्या महिन्यात गेलोच नाही. ते सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे पहिले तीन महिने मोफत उपचार मिळाले. तिथल्या डॉक्टरांनीही तिची चांगली काळजी घेतली. पण, औषधं तर विकतच घ्यावी लागतात. सुरुवातीला इंजेक्शन्सचा रोजचा खर्च 3000 रुपये होता. त्यानंतर 600 रुपयाचं एक अशी 4 इंजेक्शन्स रोज द्यावी लागायची. म्हणजे रोज 2400 रुपये इंजेक्शन्ससाठी लागायचे. राहतं घर, दागिने, होतं नव्हतं ते विकून आणि कर्ज काढून माझे मोठे भाऊ, वडील आणि मी आम्ही आतापर्यंत 12 लाख रुपये खर्च केले आहेत. उसनवारीवर घेतलेल्या पैशातून सध्या इंजेक्शन्सचा खर्च भागवत आहोत. व्याज फेडण्यासाठीही आमच्याकडे पैसे नाहीत."
 
बावाजान चिकन-मटन दुकानात कामाला आहेत. दिवसाला 300 रुपये मिळतात. त्यांचे वडील आणि भाऊदेखील असाच छोटा-मोठा व्यवसाय करतात. त्यांनीही आतापर्यंत बरीच मदत केली आहे. मात्र, आता मदत करण्याची त्यांचीही परिस्थिती नाही.
 
बावाजान म्हणतात, "इंजेक्शन्सवर रोज 2400 रुपये खर्च करण्याची आमची ऐपत नाही. त्यामुळे आम्ही आता औषधांचे डोस कमी केले आहेत. दोन ऐवजी एकच इंजेक्शन देतो."
 
दयामरण
"आपण मोठे असूनही एक इंजेक्शन घेताना आपल्याला किती त्रास होतो. विचार करा रोज 7-8 इंजेक्शन्स घेताना त्या तान्हुल्या बाळाला किती वेदना होत असतील? मला वाटतं जणू मी स्वतःलाच संपवतो आहे. आमच्यामुळे आमच्या वडीलधाऱ्यांच्या वाट्याला नरकातलं जिणं आलं आहे. आमच्यामुळे माझे वडील आणि मोठे भाऊ कर्जबाजारी झाले आहेत. आम्ही त्यांची जबाबदारी बनलो आहोत," हे सांगताना पठाण बावाजान यांचा हुंदका अनावर झाला होता.
 
शबानाच्या आईने सांगितलं, "मागे कुणीतरी अशीच एक याचिका दाखल केल्याचं आम्हाला माहिती होतं. आम्ही ओळखीच्या लोकांकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी कोर्टात याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला. एका व्यक्तीने याचिका लिहून दिली. ज्यांना वकील परवडत नाही त्यांना कोर्टात सकाळी बोलवलं जातं. आम्ही या महिन्याच्या 9 तारखेला कोर्टात गेलो होतो.
 
न्यायमूर्ती म्हणाले ही कागदपत्र चित्तूरच्या कोर्टात सादर करावी लागतील. ही कागदपत्रं स्वीकारण्याचा अधिकार त्यांना नाही. आमच्याकडे चित्तूरला जाण्याचेही पैसे नव्हते. आम्ही घरी तीन वेळचं जेवणही बंद केलं आहे. फक्त दोन वेळेलाच जेवतो. उपाशीच राहतो. उद्देश केवळ एकच थोडे पैसे वाचवायचे. त्यातून बाळासाठी दूध आणायचं. न्यायमूर्तींनी तसं म्हटल्यावर आम्ही कोर्टातून बाहेर आलो. बाहेर पडताना काही पत्रकारांनी आम्हाला बघितलं आणि त्यांनी आमची विचारपूस केली."
 
शबानाचे आजोबा पठाण अय्यूब खान म्हणाले, "मेडिकल स्टोअरचा मालक खूप चांगला माणूस आहे. आम्हाला बंगळुरूला जावं लागू नये म्हणून तो इंजेक्शन मागवतो. आम्हाला अनेकांनी मदत केली आहे. आमची परिस्थिती बघून काहींनी आम्हाला बिनव्याजी पैसे दिले. माझा लहान मुलगा (पठाण बावाजान) इकडून-तिकडून पैशांची व्यवस्था करतोय."
 
शबानाची आई इंटरमिजिएटपर्यंत शिकली आहे आणि काही खाजगी हॉस्पिटलमध्ये तिने कामही केलं आहे. त्यामुळे बंगळुरूच्या डॉक्टरांनी तिला इंजेक्शन कसं द्यायचं ते शिकवलं.
 
बावाजान सांगत होते, "यापूर्वी याच आजाराने माझी दोन मुलं जन्म होताच दगावली. शक्य होतं ते सगळं मी केलं आहे. माझ्या ओळखीतल्या सर्वांकडे मी मदतीची याचना केली आहे. अजूनही करतोय. तंबालापल्ली आणि मदनपल्लीच्या आमदारांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे. बी. कोताकोटाच्या मंडल अधिकाऱ्यांनी आमचं म्हणणं ऐकलं आहे. ही सर्व मंडळी मदत करतील, अशी आशा आम्हाला आहे."
 
"आम्हाला दुसरं काही नको. घर नको, पैसा नको. तिला एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करता आलं आणि तिला चांगले औषधोपचार मिळाले, हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. आम्हाला आमच्या आयुष्यापेक्षा हे बाळ प्रिय आहे. ती सुदृढ असावी, हेच खूप आहे. आम्ही झाडाखालीही जगू," हे सांगताना शबानाच्या आईच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते.
 
दरम्यान, मदनपल्लीचे आमदार मोहम्मद नवाझ बाशा यांनी तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी 11 हजार 875 रुपयांचा चेक दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments