Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

प्रल्हाद मोदींचा सवाल, 'अमित शहांचे पुत्र जय शहा कुठल्या आधारांवर BCCI चे सचिव झाले?

प्रल्हाद मोदींचा सवाल, 'अमित शहांचे पुत्र जय शहा कुठल्या आधारांवर BCCI चे सचिव झाले?
, गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (18:18 IST)
गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. 21 आणि 28 फेब्रुवारी अशा दोन टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, भाजपमध्ये उमेदवारांच्या नावावर अजूनही खल सुरू आहे.
 
भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी नुकतेच उमेदवारीसाठीचे निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार 60 वर्षांहून अधिक वय असलेले, नेत्यांचे नातेवाईक आणि महापालिकेत तीन वेळा कार्यकाळ पूर्ण केलेल्यांना तिकीट मिळणार नाही. मात्र, या अटींमुळे गुजरात भाजप ढवळून निघालं आहे. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थोरले बंधू प्रल्हाद मोदी यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
 
त्यांची मुलगी सोनल मोदी यांना बोडकदेव, अहमदाबादमधून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. मात्र, नव्या निकषांनुसार त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. कारण त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नातलग आहेत.
 
बीबीसी गुजरातीचे प्रतिनिधी तेजस वैद्य यांनी प्रल्हाद मोदींची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, पंतप्रधान मोदींशी असलेले संबंध आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्याविषयी मत व्यक्त केलं.
 
प्रश्न : तुमच्या कन्या निवडणूक लढवू इच्छितात का?
 
प्रल्हाद मोदी : होय. माझी मुलगी ओबीसींसाठी राखीव अहमदाबादमधल्या बोडकदेवमधून निवडणूक लढवू इच्छिते.
 
प्रश्न : पण, भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी नेत्यांचे नातलग निवडणूक लढवू शकणार नाही, असं म्हटलं आहे.
 
प्रल्हाद मोदी : असं काही होईल, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरून आपला उदरनिर्वाह करत नाही. आम्ही सगळे मेहनत करून कमावतो आणि त्यावरच आमचा उदरनिर्वाह चालतो. माझं किराणा मालाचं दुकान आहे.
 
आमच्या कुटुंबात नेपोटिझम नाही. नरेंद्र भाईंनी 1970 सालीच घर सोडलं आणि त्यानंतर देशच त्यांचं घर बनलं. त्यामुळे त्या अर्थाने सगळे भारतीयच त्यांचे नातलग आहेत. हे ते स्वतः म्हणतात. त्यांचा जन्म आमच्या कुटुंबात झाला असला तरी भारतमातेच पुत्र म्हणूनच त्यांनी वाटचाल केली आहे. त्यामुळे असं बघितलं तर कुणीच निवडणूक लढवू शकणार नाही. मी कोणत्या एका कुटुंबाचा नाही. सारे भारतीयच माझे बंधू आणि भगिणी आहेत, असं नरेंद्र भाई स्वतः म्हणाले होते. त्यामुळे हा नियम आम्हाला कसा काय लागू होणार?
 
प्रश्न : नरेंद्र मोदी तुमच्या कुटुंबाचा भाग नाहीत, असं तुमचं म्हणणं आहे का?
 
प्रल्हाद मोदी : कुटुंब कशाला म्हणतात, याची केंद्र सरकारने व्याख्या केली आहे. ज्यांची नावं एका रेशन कार्डवर आहे ते सगळे एक कुटुंब आहेत. आमच्या रेशन कार्डवर नरेंद्र दामोदरदास मोदी हे नाव नाही. तर मग ते माझ्या कुटुंबाचा भाग आहेत, असं म्हणता येईल का? मला तुम्हाला आणि जनतेला हा प्रश्न विचारायचा आहे. नरेंद्र मोदींचं नाव ज्या रेशन कार्डवर आहे ते अहमदाबादजवळच्या रानीचं आहे. त्यामुळे तेच त्यांचं कुटुंब आहे. त्यांनी स्वतःच तसं सांगितलं आहे.
 
 
प्रश्न : रेशन कार्डवर त्यांचं नाव नाही. याचा तुमच्या लेखी काय अर्थ होतो?
 
प्रल्हाद मोदी : मला वाटतं रेशन कार्डसाठीचे नियम केंद्र सरकारने बनवले आहेत आणि ते पाळले जातात. पक्षानेही त्यांचं पालन करायला हवं.
 
प्रश्न : सोनल मोदी यांनी निवडणूक लढवली तर लोक हेच म्हणतील की त्या नरेंद्र मोदी यांच्या पुतणी आहेत.
 
प्रल्हाद मोदी : अनेक लोक म्हणतात की आम्ही रामाचे वंशज आहोत, आम्ही त्यांना थांबवू शकतो का? हे नातं वास्तव आहे. ते मिटवलं जाऊ शकत नाही. पण, सोनल मोदीने कधी पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी भेट दिली आहे का, हे जर तुम्ही तपासलं तर हे नातं किती घट्ट आहे, याची तुम्हालाच कल्पना येईल.
 
प्रश्न : सोनल मोदी नरेंद्र मोदींना कधी भेटल्या होत्या?
 
प्रल्हाद मोदी : नरेंद्र भाई पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्या घराचं दार कसं आहे, हे मला स्वतःला माहिती नाही. माझ्या मुलांना कसं माहिती असेल?
 
प्रश्न : त्यांना भेटायची कधी इच्छा झाली नाही का?
 
प्रल्हाद मोदी : मला वाटतं नरेंद्र भाईंनी घर सोडलं आणि देशालाच घर बनवलं. त्यामुळे आम्ही जरी एकाच कुटुंबातले असलो तरी ते बोलवतील तेव्हाच आम्ही त्यांना भेटू शकतो.
 
प्रश्न : पंतप्रधान मोदी अहमदाबाद किंवा गांधीनगरला आले की आई हिराबाला भेटतात.
 
प्रल्हाद मोदी : ते आईला भेटतात. पण इतर कुटुंबीयांना दूर ठेवण्यात यावं, असे स्पष्ट निर्देश असतात. आईशी त्यांचे नातेसंबंध आहेत. इतर कुटुंबीयांशी नाही. तुम्ही जुन्या फोटोंमध्ये बघितलं तर त्यात छोट्या भावाचं कुटुंब दिसतं. पण, गेल्या काही वर्षातले फोटो बघितले तर तुमच्या लक्षात येईल की त्यात आईव्यतिरिक्त कुणीच नसतं. जर पक्षाला असं वाटत असेल की आम्ही नरेंद्र मोदी यांचे कुटुंबीय आहोत आणि म्हणून आम्हाला तिकीट मिळत नसेल तर ही पक्षाची भूमिका आहे.
 
प्रश्न : हा तुमच्यावर अन्याय आहे, असं तुम्हाला वाटतं का?
 
प्रल्हाद मोदी : नरेंद्र भाई येतात आणि आईला भेटतात तेव्हा तिथे कुटुंबातलं छोटं मुलही नसतं. हा तुम्हाला अन्याय वाटत नाही का? ते पंकज निवासमध्ये जातात कारण तिथे आई आहे. पण, ते येतात तेव्हा तिथे कुटुंबातलं इतर कुणीच नसतं, असं का?
 
आईसोबत बसायची परवानगी फक्त नरेंद्र भाईंना आहे. मला वाटतं की फोटोत गर्दी होऊ नये, यासाठी ते असावं. किंवा मग मी घर सोडलं आहे. त्यामुळे आता कुटुंबीयांची गरज नाही, असं नरेंद्र भाईंना वाटत असावं आणि त्यामुळे फोटोंमध्ये इतर कुटुंबीय दिसत नसावे.
 
हे सगळं नरेंद्र भाई काय विचार करतात, यावर आहे. आम्ही कामगार वर्गातले लोक आहोत. आमचा भाऊ आज देशाचा पंतप्रधान झालाय, ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. मात्र, आम्ही कधीची काही मिळवण्यासाठी त्यांच्या फोटोचा वापर केलेला नाही आणि भविष्यातही तसं करणार नाही.
 
प्रश्न : एका वृत्तपत्राने तुमची प्रतिक्रिया छापली होती. त्यात तुम्ही म्हटलंय - 'माझ्या मुलीला ज्या पद्धतीची वागणूक मिळतेय त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की पक्षाचं संसदीय मंडळ नरेंद्र मोदींचा किती आदर करतं.'
 
प्रल्हाद मोदी : ही प्रतिक्रिया देण्यामागे कारण आहे. पक्ष जे काही नियम बनवतं ते पक्षाचे देशभरातले नेते आणि कार्यकर्ते यांच्यासाठी सारखे असतात.
 
राजनाथ सिंह यांचे चिरंजीव संसदेचे सदस्य बनू शकतात, मध्य प्रदेशातील वर्गीयजी यांचे चिरंजीव आमदार होऊ शकतात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांचं माझ्या आकलनानुसार क्रिकेटमध्ये कसलंही योगदान नसताना आणि त्यांनी क्रीडा क्षेत्रात काही कामगिरी बजावल्याचं कुठेही छापून आलेलं नसताना त्यांना क्रिकेट कंट्रोल बोर्डाची जबाबदारी देता येते. ते सरकारसाठी उपयोगी आहेत, यासाठी त्यांच्याकडे कोणती पात्रता आहे? आणि तरीही त्यांना भाजपमधून किंवा इतर कुणाकडून सातत्याने पाठिंबा मिळतो आहे. ते जर बीसीसीआयचे (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) सचिव होऊ शकतात तर याचा अर्थ पक्षाचं वागणं दुटप्पी आहे.
 
अमित शहांचे चिरंजीव जय शहा बीबीसीआयचे सचिव आहेत आणि नुकतीच त्यांची एशियन क्रिकेट काउंसिलच्या प्रमुखपदी वर्णी लागली आहे.
 
पक्षपातीपणाचा मुद्दा पुढे करून ते तरुण कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवू इच्छितात. त्यांना फक्त 'होयबा' हवे आहेत. हे अगदी स्पष्ट आहे.
 
माझी मुलगी नरेंद्र मोदी यांची पुतणी आहे, म्हणून नव्हे तर एक आश्वासक नेता होण्याची तिची पात्रता असेल आणि विजयाची आशा असेल तर पक्षाने तिला तिकीट द्यायला हवं, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. नरेंद्र मोदी यांचे नातवाईक असल्याचा फायदा तिलाही घ्यायचा नाही आणि मलाही नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा