Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

हिवाळी अधिवेशन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कुठे आहेत?

हिवाळी अधिवेशन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कुठे आहेत?
, गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (14:01 IST)
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली. मात्र अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिल्यामुळं मुख्यमंत्री सध्या कुठे आहेत? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.
 
विधानसभेचं हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये घेण्याची परंपरा आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईलाच घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
मुंबईत होणाऱ्या या अधिवेशनातही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत शंकांचं वातावरण असल्यामुळं राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे.
 
विरोधकांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार इतर नेते अथवा मंत्र्याकडे सोपवला नसल्याच्या कारणावरूनही मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
 
हे सर्व सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कुठे आहेत? याची चर्चा सुरू आहे.
 
मुख्यमंत्र्यांना नेमकं काय झालं?
मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया झाली त्यापूर्वी त्यांनी एक निवेदन सादर केलं होतं. त्यात त्यांनी त्यांच्या मानेच्या दुखण्याचा उल्लेख केला होता.
 
"कोव्हिड काळात कामं करताना मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच!" असं त्यात उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
 
मुख्यमंत्र्यांच्या आजाराबाबत मिळालेल्या माहितीनुसार त्यांना मानेच्या दुखण्याचा प्रचंड त्रास सुरू झाला होता. पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूचा त्रास वाढला होता.
 
तपासणी केली असता डॉक्टरांनी उद्धव ठाकरे यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी उद्धव ठाकरे हे 10 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाले होते.
webdunia
कधी-कोणती शस्त्रक्रिया झाली?
डॉक्टरांच्या सल्ल्यावरून उद्धव ठाकरे 10 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं.
 
त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच.एन. रिलायन्स रुग्णालयामध्ये यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. शेखर भोजराज आणि डॉ. अजित देसाई यांनी यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया केली.
 
शस्त्रक्रियेनंतर जवळपास आठवडाभर उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना फिजिओथेरपी सुरू करण्यात आली होती.
 
त्यानंतर 2 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि उद्धव ठाकरे हे 22 दिवसांनंतर रुग्णालयातून घरी परतले.
 
सध्याचा मुक्काम कुठे?
डिस्चार्जनंतर डॉक्टरांनी उद्धव ठाकरे यांना आरामाचा सल्ला दिला होता. तसंच त्यांनी घरुनच काम करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला होता.
 
त्यानुसार उद्धव ठाकरे हे सध्या आराम करत आहेत. उद्धव ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानी म्हणजे मातोश्रीवरच आराम करत असल्याची माहिती मिळाली आहे.
 
डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार घरुनच काम करत उद्धव ठाकरे राज्याचा कारभार सांभाळत आहेत, असं शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जवळपास दोन आठवड्यांपूर्वी झूम मीटिंगद्वारे एक बैठक घेतली होती. मात्र सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग गेल्या दोन महिन्यांत ऑफलाईन किंवा ऑनलाईनही आढळलेला नाही.
 
विरोधकांच्या टीकेचं कारण?
विधानसभेचं हिवाळी अधिवेशन हे प्रामुख्यानं दरवर्षी नागपूरला होत असतं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं यावेळी ते मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
उद्धव ठाकरे यांना विमानाने, हेलिकॉप्टरने किंवा कोणत्याही पद्धतीनं प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळं अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
मात्र, असं असतानाही अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळं विरोधकांकडून यावर टीका केली जात आहे. तसंच यावर चर्चा सुरू आहे.
 
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तर विरोधकांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. 'हाऊस मे आओ, हाऊस मे आओ, उद्धव ठाकरे हाऊस मे आओ' अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली.
webdunia
चंद्रकांत पाटील यांची टीका
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार दुसऱ्या कुणाकडे सोपवावा अशी मागणी विरोधक करत आहेत.
 
उद्धव ठाकरे यांना शिवसेनेतील कोणावरही विश्वास नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे. यापूर्वीही त्यांनी उद्धव ठाकरेंना इतर कोणावर विश्वास नसेल तर रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवावं असं म्हटलं होतं.
 
त्याच बरोबर उद्धव ठाकरे यांना अजित पवार किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर विश्वास का नाही. इतर कोणाकडे ते मंत्रिपद का सोपवत नाही, असाही प्रश्न चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे.
 
चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उदाहरण देत ठाकरेंच्या कारभारावर टीक केली. फडणवीस परदेशात होते तेव्हाही काही घटना घडल्या होत्या. त्यावेळी ते सर्व घटनेची सातत्यानं माहिती घेत असायचे.
 
फडणवीस परदेशातून येताच अनेकदा घटनास्थळी जाऊन त्या विषयाला महत्त्वं द्यायचे. मात्र उद्धव ठाकरे तसं करत नसल्याची टीका चंद्रकांत पाटलांनी गुरुवारी केली आहे.
 
शिवसेना आणि सरकारचं म्हणणं काय?
सत्ताधारी पक्ष आणि शिवसेनेच्या वतीनं मात्र वारंवार उद्धव ठाकरे अधिवेशनात येणार असं सांगितलं जात आहे. पण ते नेमके कधी येणार किंवा कार्यक्रम कसा असेल हे सांगण्यात आलेलं नाही.
 
आदित्य ठाकरे यांना बुधवारी यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्यांनीही याबाबत सविस्तर काही सांगितलं नाही. केवळ मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळं येऊ शकले नाहीत, एवढंच आदित्य ठाकरे म्हणाले होते.
 
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री अधिवेशनात येणार असं ठामपणे सांगितलं होतं. हवं तर मी तसं लिहून देतो, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली होती.
 
मात्र, असं असलं तरी गुरुवारी दुपारपर्यंत अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली नव्हती. त्यामुळं हा मुद्दा आणि त्यावरील चर्चा आणखी वाढत चालल्या आहेत.
 
रंगीत तालीम, अद्याप प्रयोग नाही!
उद्धव ठाकरे विधानसभेत अधिवेशनासाठी हजर राहणार हे अगदी ठामपणे सांगण्यात आलं होतं. विशेष म्हणजे अधिवेशनापूर्वी त्याची रंगीत तालीमही झाली होती, असं काही अधिकाऱ्यांना नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं.
 
उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात विधानभवन परिसरात भेट दिली होती. त्यावेळी शिवसेनेचे काही नेते, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे डॉक्टरही त्यांच्याबरोबर होते.
 
उद्धव ठाकरे यांनी यावेळी विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. तसंच यावेळी उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने विधीमंडळ परिसरात चालण्याचा सरावही केला.
 
उद्धव ठाकरे यांना चालताना काही त्रास होतो का? ते किती वेळ चालू शकतात? किती पायऱ्या चढउतार करणं त्यांना शक्य होतं? या सर्वाचा विचार यावेळी डॉक्टरांच्या समोर करण्यात आला, अशी माहिती मिळाली आहे.
 
या सर्वामुळं उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनात नक्की येणार अशा चर्चांना सुरुवात झाली होती. मात्र पहिला दिवस पूर्ण संपला. तसंच दुसऱ्या दिवशीही दुपारपर्यंत मुख्यंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळं या चर्चांना अद्याप विराम मिळालेला नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आदित्य ठाकरे यांना धमकी देणारा जयसिंग राजपूत कोण आहे?