Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राहुल गांधीः काँग्रेसच्या अध्यक्षपदाची विनंती पुन्हा फेटाळली

Rahul Gandhi rejects the request of Congress President
, शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (15:39 IST)
काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक सुरू आहे.
 
पक्षाध्यक्षांची निवड सुरू असताना आपण तेथे उपस्थित योग्य नाही असे कारण देत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी बैठकीतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणी समिती सदस्यांची व नेत्यांची आज बैठक सुरू आहे.
 
या बैठकीबद्दल बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले, "राहुल गांधीच अध्यक्षपदी हवेत अशी विनंती काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी केली.
 
भाजपा भारतीय लोकांचा आवाज दाबून टाकत आहे, लोकशाही मार्गाला फाटा देऊन कारभार करत आहे. त्यामुळे आताच्या काळात भक्कम विरोधी पक्षाची गरज आहे, त्यासाठी राहुल गांधी यांनी अध्यक्ष होणं आवश्यक आहे. असे या नेत्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी या सर्व नेत्यांचे आभार मानले आणि आपल्या निर्णयावर आपण ठाम आहोत असं राहुल गांधी यांनी सांगितले."
 
रणदीप सुरजेवाला पुढे म्हणाले, "काँग्रेसच्या कार्यसमितीनं पाच गट तयार करून देशभरातील नेत्यांशी चर्चा केली. अजूनही त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. आज रात्री आठ वाजता ते अहवाल देतील. गोंधळाचं वातावरण आज संपावं अशी सर्वांचीच इच्छा आहे. त्या बैठकीमध्ये अध्यक्षपदाबाबत चर्चा होईल. अजूनही राहुल गांधी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही.
 
दरम्यान, गेले काही दिवस या पदावरती मुकुल वासनिक यांची निवड होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळांमध्ये आहे.
 
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुकुल वासनिक यांची निवड होण्याची शक्यता आहे. वासनिक हे सध्या महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते असून, राष्ट्रीय सरचिटणसपदाचीही त्यांच्याकडे जबाबदारी होती.
 
राहुल गांधी यांनी 3 जुलै 2019 रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल अध्यक्षपदावरून पायऊतार झाले होते. त्यानंतर महिन्याहून अधिक काळ काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्तच होतं.
 
दरम्यानच्या काळात विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, तसेच राष्ट्रीय स्तरावरही पदाधिकाऱ्यांमध्ये फेर बदल झाले. महाराष्ट्रातही अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. मात्र, हे निर्णय कुणाच्या अध्यक्षतेत झाले, हे कळू शकले नाही.
Rahul Gandhi rejects the request of Congress President
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या काही दिवसातच राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, वेगवेगळ्या राज्यांच्या प्रदेश कार्यकारिणी, तसेच वरिष्ठ काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधींनी अध्यक्षपदावर कायम राहावं, अशी भूमिका मांडली होती. मात्र, राहुल गांधी हे राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिले होते.
 
कुणीतरी अनुभवी नेता आणि बिगर-गांधी कुटुंबीतील चेहऱ्याचा काँग्रेस अध्यक्षपदासाठी विचार केला जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती.
 
विशेषत: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी, ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट यांच्या नावांची चर्चा होती.
 
काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या आजच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खर्गे आणि मुकुल वासनिक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. खर्गे आणि वासनिक दोघेही गांधी कुटुंबाच्या अत्यंत जवळचे नेते मानले जातात.
 
खर्गे हे केंद्रीय मंत्री होते, तसंच काँग्रेसच्या संसदीय दलाचे नेतेही होते. दुसरीकडे, वासनिक यांच्याकडेही अनुभवाचं गाठोडं मोठं आहे.
 
मात्र, यात मुकुल वासनिक बाजी मारून अध्यक्ष होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी सुनील चावके सांगतात की, " काँग्रेस पक्ष कसा चालतो यांची मुकुल वासनिकांना अगदी नीट माहिती आहे. दिल्लीचे राजकारण जवळून पाहिलेले ते नेते आहेत. दीर्घ काळ सरचिटणीस राहिलेले आहेत. पक्ष संघटनेवर त्यांची चांगली पकड आहे. केवळ गांधी कुटुंबच नाही तर पक्षातले ज्येष्ठ नेत्यांबरोबर त्यांचे अतिशय चांगले संबंध आहे.
 
दैनिक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक गजानन जानभोर यांचे म्हणणे आहे की, "मुकुल वासनिकांसाठी निष्ठावंत असणे ही जमेची बाजू आहे. त्यांचा मीतभाषी स्वभाव ही सुद्धा त्यांची जमेची बाजू आहे."
Rahul Gandhi rejects the request of Congress President
कोण आहेत मुकुल वासनिक?
गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय असणाऱ्या मुकुल वासनिक यांची राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून (NSUI) झाली. त्यांचे वडील बाळकृष्ण वासनिक हे महाराष्ट्रातील वरिष्ठ काँग्रेस नेते होते.
 
बाळकृष्ण वासनिक हे बुलडाण्यातून वयाच्या 28 व्या वर्षी खासदार म्हणून निवडून दिल्लीत गेले होते, तर मुकुल वासनिक हे बुलडाण्यातूनच वयाच्या 25 व्या वर्षी खासदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी मुकुल वासनिक हे संसदेत सर्वात कमी वयाचे खासदार होते.
 
वडील बाळकृष्ण वासनिक हे बुलडाण्यातून तीनवेळा खासदार होते. वडिलांनंतर मुकुल वासनिक सुद्धा बुलडाण्यातूनच तीनवेळा (1984, 1991 आणि 1998) खासदार म्हणून निवडून आले.
 
मुकुल वासनिक हे 1984 पासून 1986 पर्यंत एनएसयूईचे अध्यक्ष, तर 1988 ते 1990 या काळात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
 
2008 साली ब्रेन हॅमरेजशी यशस्वी लढा देत मुकुल वासनिक पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आणि 2009 ची लोकसभा निवडणूकही लढले.
 
मात्र, 2009 साली बुलडाण्याचा आपला पारंपरिक लोकसभा मतदारसंघ सोडून मुकुल वासनिक नागपुरातील रामटे लोकसभा मतदारसंघून लढले आणि जिंकलेही. 2009 साली केंद्रात वासनिक यांच्याकडे सामाजिक न्यायमंत्रिपद देण्यात आलं.
 
मुकुल वासनिक यांच्याकडे सध्या काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुमचं डोकं ठिकाण्यावर तरच तुमचं आरोग्य ठिकाण्यावर