महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी 23 जानेवारीला मनसेचं पहिलं अधिवेशन मुंबईत होणार असल्याचं जाहीर केलं.
महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलच मत अधिवेशनात मांडू असं त्यांनी स्पष्ट केलं.
NRC आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "भारत देश काही धर्मशाळा नाही, माणुसकीचा ठेका फक्त भारतानं घेतलेला नाही. बाहेरुन आलेल्या लोकांना या देशात स्थान नाही. आधीच 135 कोटी लोक या देशात राहात आहेत. त्यामुळे बाहेरून नव्या लोकांना घेण्याची गरजच नाही."
NRC आणि CAA
आज देशात जी दंगलसदृश परिस्थिती आहे. त्या करणाऱ्या किती लोकांनी ही स्थिती माहिती आहे. देशातल्या आर्थिक मंदीवरून लोकांचं लक्ष उडवण्यासाठी अमित शाह यांनी केलेल्या प्रयत्नासाठी त्यांचं अभिनंदन करतो, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
आपल्या देशाला अजून माणसांची गरज आहे का? सध्या निघणाऱ्या मोर्चांमध्ये स्थानिक नागरिक किती आहेत हे पाहाण्याची गरजही राज यांनी बोलून दाखवली आहे.
जे सध्या भारतात राहात आहेत त्यांची सोय झालेली नाही. बाहेरून लोक घेण्याची गरजच काय, असा प्रश्नही त्यांनी विचारला. जे इथं पिढ्यानपिढ्या राहात आहेत. त्यांना असुरक्षित वाटण्याची गरज काय? असा प्रश्न राज ठाकरे यांनी मांडला.
"नागरिकत्व सुधारणा कायद्यात गोंधळ आहे. त्याच्या अंमलबजावणीबद्दल शंका आहे. अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी या कायद्याबद्दल आपली मतं मांडली. खरी गोष्ट लोकांसमोर कोणीही आणत नाहीये, केवळ तर्कावर सुरू आहे. ते होऊ नये याची खबरदारी केंद्र सरकारने घ्यायला हवी होती," असं राज म्हणाले.
जर आधार कार्डामुळे राष्ट्रीयत्व सिद्ध होत नसेल तर लोकांना रांगेत कशाला उभं केलं असंही राज ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडी
सत्तेसाठी महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी केलेले प्रयत्न दुर्दैवी आहेत. या सर्व घडामोडींवर लोक नाराज आहेत. त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येईल. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं लोकांना मान्य नाही, ही जनतेनं दिलेल्या मताधिक्याशी केलेली प्रतारणा आहे असंही त्यांनी म्हटलं.