Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

‘हिटमॅन’ रोहित शर्माला नेमका कशामुळे गवसलाय सूर?

‘हिटमॅन’ रोहित शर्माला नेमका कशामुळे गवसलाय सूर?
- प्रदीप कुमार
स्वतःमध्ये बदल घडवणं अतिशय कठीण असतं. अनेकदा लोकांना स्वतःचा कमकुवतपणा लक्षात येत नाही किंवा अनेक प्रयत्न करूनही काहीजण स्वतःमध्ये बदल घडवू शकत नाहीत.
 
पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण कधी ना कधी येतोच जेव्हा असं वाटत, की स्वतःमध्ये बदल घडवून आणला नाही तर आपलं अस्तित्त्वंच धोक्यात येईल.
 
2011मध्ये रोहित शर्माच्या बाबत असंच झालं होतं. कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्या नेतृत्त्वाखालील निवड समितीने भारतीय उपखंडामध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप क्रिकेट टीममध्ये मुंबईच्या या बॅट्समनची निवड केली नव्हती.
 
वर्ल्डकप 2011च्या आधीच्या चार वर्षांच्या करिअरमध्ये रोहित शर्मा 61 वन डे मॅचेस खेळला होता. आणि यामध्ये त्याची सरासरी होती इनिंग्स 27 रन्स. शिवाय त्यानं 2 शतकंही केली होती. त्याच्या नावावर एकूण 1248 धावा जमा होत्या. पण या कामगिरीने त्याला टीममध्ये स्थान मिळणार नव्हतं.
 
खरंतर रोहितकडे भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रतिभावंत बॅट्समन म्हणून पाहिलं जात असतानाच्या काळात त्याची ही सरासरी होती. कोणत्याही गोलंदाजाचा चेंडू मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये सीमापार करण्याची क्षमता त्याच्याकडे होती.
 
पुल, फ्लिक, कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह असे सगळे फटके रोहितच्या भात्यात होते. त्याचं टायमिंग चांगलं होतं. त्याच्यावर टीका करणारेही त्याच्याकडे या खेळाची दैवी देणगी असल्याचं मानत. पण असं सगळं असूनही रोहित शर्माच्या खेळात सातत्य नव्हतं.
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी जी मानसिकता आणि शिस्त असणं गरजेचं असतं त्याला रोहित फारसं महत्त्वं देत नव्हता. क्रिकेटचं मैदान आणि नेटमधला सराव यापेक्षा रोहितचा जास्त वेळ रात्री उशीरापर्यंत पार्टी करण्यात जायचा. परिणामी हळूहळू तो अनफिट झाला.
 
विनोद कांबळीप्रमाणेच आणखी एका प्रतिभावंताचं करिअर संपुष्टात येतंय की काय असं वाटू लागलं होतं. तेव्हा पहिल्यांदा वर्ल्ड कप टीममध्ये स्वतःचं नसणं खुपलं. टीम इंडिया सचिन तेंडुलकरला वर्ल्डकपची भेट देत असताना रोहितच्या मनात त्याचा सल नक्कीच असणार.
 
आत्मपरीक्षणाचा काळ
आत्मचिंतनाच्या याच काळात रोहितनं स्वतःला बदलायचं ठरवलं. जून 2011मध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये रोहितनं सहा वनडे मॅचेसमध्ये तीन अर्ध शतकं केली. यानंतर वेस्ट इंडिजची टीम भारत दौऱ्यावर आली असताना त्याने पाच वन डे सामन्यांमध्ये तीन अर्ध शतकं ठोकली. रोहित पुन्हा मार्गावर आला आहे असं वाटत असतानाच त्याच्या करिअरमधल्या सर्वात वाईट काळाला सुरुवात झाली.
 
2012मध्ये रोहित 14 वन डे सामने खेळला आणि 12च्या सरासरीने त्याने फक्त 168 धावा केल्या. त्याच्यापेक्षा एक वर्ष लहान असणारा विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारतीय टीममध्ये आपलं स्थान नक्की केलं होतं. पण रोहित शर्माला मात्र अजूनपर्यंत टेस्ट मॅच खेळायचीही संधी मिळाली नव्हती आणि वनडे टीममधून त्याचा पत्ता कट होणार होता.
 
अशात 2013 वर्ष त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं. मिळालेल्या या संधीचा फायदा रोहितने घेतला नसता, तर हे त्याच्या करियरचं शेवटचं वर्षं ठरलं असतं. हे आव्हान स्वीकारत रोहित कामाला लागला. नेट्समध्ये तो इतर फलंदाजांपेक्षा एक तास जास्त सराव करू लागला.
 
नेटमध्ये सराव करताना रोहितला कोणाच्याही सल्ल्याची गरज लागत नसे, असं मुंबईचे कोच प्रवीण आमरे सांगतात. स्वतःला फिट ठेवण्यासाठी त्याने तास न् तास सराव करायला सुरुवात केली. रोहितने प्रयत्न करायला सुरुवात केल्यावर नियतीनेही त्याला साथ दिली. टीमने त्याला गरजेनुसार ओपनिंगची जबाबदारी दिली. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून काम करताना तो समंजस झाला.
 
2013मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ओपनर म्हणून रोहित यशस्वी झाला. शिखर धवनसोबतची त्याची जोडी, गौतम गंभीर - विरेंद्र सहवाग जोडी इतकीच यशस्वी झाली.
 
गुणवत्तेला मेहनतीची जोड
यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतातच झालेल्या सीरिजमध्ये जयपुरमध्ये त्याने नाबात 141 धावा केल्या. नंतर बंगलोरमध्ये 209 धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये 16 षटकार होते. त्याचा फॉर्म पाहता त्याला टेस्ट मॅचममध्ये खेळायची संधी मिळाली. कोलकात्याच्या ईडन गार्डनमधील पहिल्याच मॅचमध्ये त्याने 176 धावा केल्या.
 
आपल्याकडे असलेल्या गुणवत्तेला मेहनत घेत पैलू पाडण्याचं रोहितने मनावर घेतल्याने त्याला यश मिळालं. फक्त गुणवत्ता असून भागत नाही हे उशीरा का होईना पण त्याच्या लक्षात आलं.
 
दुखापतीनंतर पुन्हा वन डेमध्ये कमबॅक करताना श्रीलंकेविरुद्ध ईडन गार्डनमध्ये खेळताना त्याने हेच मनात ठेवत विकेटवर टिकून राहणं आपलं उद्दिष्टं ठरवलं. एकदा जम बसल्यानंतर त्याला थांबवणं, कोणालाही शक्य नव्हतं.
 
याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली 13 नोव्हेंबर 2014 रोजी. ईडन गार्डनच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध वनडे मॅच खेळताना त्याने 264 धावा केल्या.
 
या ऐतिहासिक खेळीमध्ये तो इनिंगच्या शेवटच्या बॉलवर आऊट झाला. पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याला तू दमला होतास का, असं विचारण्यात आलं. त्यावर तो उत्तरला, नाही मी पुढच्या पन्नास ओव्हर्सही खेळू शकलो असतो. खेळासाठीचा त्याचा दृष्टीकोन बदलला होता. त्याला त्याच्या गुणवत्तेची जाण होती.
 
आता रोहित करियरच्या अशा टप्प्यावर होता जिथून मागे वळणं शक्यच नव्हतं. तोपर्यंत 124 वनडे मॅचेसमध्ये रोहित शर्माने 3479 रन्स केले होते. यामध्ये फक्त तीन शतकांचा समावेश होता.
 
पण त्या तुफानी खेळीपासून रोहितने सुरू केलेला धावांचा ओघ अगदी श्रीलंकेविरुद्धच्या मॅचपर्यंत कायम आहे. या कालावधीतल्या 90 मॅचेसमध्ये त्याने 5178 धावा केल्या आहेत. यामध्ये एकूण 23 शतकं आहेत. म्हणजे रोहितने दर चौथ्या सामन्यात शतक केलं आहे.
 
वर्ल्ड कपमधला झंझावात
2011मध्ये वर्ल्ड कप टीमच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या रोहितचा समावेश 2015च्या वर्ल्ड कप टीममध्ये झाला आणि बांगलादेश विरुद्ध शतक ठोकत त्याने टीमला सेमीफायनलमध्ये नेलं. पण तो स्वतःला 'एक्स-फॅक्टर' सिद्ध करू शकला नाही. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत पराभूत झाला.
 
याच वर्षी रोहितने रितीका सजदेह सोबत लग्न केलं. रितीकाच्या सोबतीने त्याला त्याच्या खेळात स्थैर्य दिलं. आपण मनात आणलं तर मोठी खेळी करू शकतो हे त्याला उमजलं होतं.
 
मग 2017मध्ये त्याने पुन्हा एकदा मोहालीमध्ये श्रीलंकेच्या टीमचा समाचार घेत वन डे क्रिकेटमधलं तिसरं द्विशतक ठोकलं. अशी कामगिरी करणारा रोहित हा जगातला एकमेव फलंदाज आहे.
 
त्याच्या षटकारांमागचं रहस्य या खेळीनंतर त्याला विचारण्यात आल्यावर रोहित उत्तरला, "विश्वास ठेवा, षटकार मारणं सोपं नसतं. हे भरपूर सराव आणि मेहनतीनंतर जमतं. टीव्हीवर पाहताना जरी सोपं वाटत असलं तरी क्रिकेटमध्ये काहीच सोपं नसतं."
 
रोहितला खेळातलं मर्म समजलं होतं. आता कोणतीही अडचण सोपी करणं त्याला शक्य होतं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये तो ज्या प्रकारे बॅटिंग करतोय त्यावर असं वाटतंय की याआधी 2011 आणि 2015च्या वर्ल्डकपमध्ये चांगली खेळी करता न आल्याचं तो उट्टं काढतोय.
 
दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि इंग्लंडसारख्या प्रबळ टीम्सच्या विरुद्धच्या शतकांसकट रोहितने या वर्ल्ड कपमध्ये पाच शतकं केली आहेत. एकाच विश्वचषकामध्ये इतकी शतकं याआधी कोणत्याही फलंदाजाने केलेली नाहीत. यातली तीन शतकं लागोपाठ करण्यात आली आहेत.
 
2015मधील बांगलादेश विरुद्धचं शतकही मोजलं तर रोहितने विश्वचषकांमध्ये सहा शतकं केली आहेत. सचिन तेंडुलकरनेही इतकीच शतकं केली आहेत. आणि त्यासाठी सचिनला 44 सामने खेळावे लागले होते. पण रोहित शर्माने फक्त 16 वर्ल्ड कप मॅचेसमध्ये ही कामगिरी केली आहे.
 
पण विश्वचषकामध्ये शतक करणाऱ्या रोहितचा एक वेगळा अंदाजही पाहयला मिळतोय. आपल्या शतकाचं रूपांतर मोठ्या खेळीमध्ये करण्यासाठी रोहित ओळखला जातो. पण शेवटच्या तीन मॅचेसमध्ये एकापाठोपाठ एक शतक केल्यानंतर रोहित लवकरच आऊट झाला. शतक झाल्यानंतर त्याने आपल्या खेळीवर जास्त लक्ष केंद्रित करायला हवं असं जाणकारांचं म्हणणं आहे.
 
रोहित शतक झाल्यानंतर ज्या वेगानं गोलंदाजांना चोपतो, त्याची खरी गरज टीम इंडियाला सेमीफायनल आणि फायनलमध्ये असणार आहे.
 
जर उर्वरित दोन सामन्यांमध्येही जर रोहितची बॅट अशीच तळपली तर त्याने आतापर्यंत घडवलेल्या इतिहासाला आणखी झळाळी येईल. 2019च्या विश्वचषकामध्ये आतापर्यंत रोहित शर्माने 8 सामन्यांमध्ये 647 धावा केलेल्या आहेत. एका विश्वचषकामध्ये सर्वात जास्त 673 धावा करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डापासून तो फक्त 26 धावांनी दूर आहे. जर त्याने आणखी एक शतक केलं तर वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त शतकं करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे होईलच, पण इंग्लिश मैदानांवर सगळ्यात जास्त शतकं करणारा तो परदेशी फलंदाज ठरेल.
 
रोहित शर्माने सेमी फायनलमध्ये शतक केलं तर तो 2015 वर्ल्डकपमधील लागोपाठ चार शतकांच्या कुमार संगाकाराच्या रेकॉर्डची बरोबरी करेल. रोहित शर्मा ज्या प्रकारे आता खेळतोय त्यावरून तो काहीही चमत्कार करू शकतो असं वाटतंय. पण त्यासाठी त्याने खेळपट्टीवर टिकून रहायला हवं.
 
गेल्या दोन सामन्यात लोकेश राहुलच्या सोबतीने रोहित शर्माने ज्याप्रकारे 180 आणि 189 रन्सची भागीदारी केली आहे त्यामुळे त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहे. आणि भारतीय टीमचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न यावरच अवलंबून आहे.
 
स्वतःला स्टार खेळाडूवरून एक लिजंड बनवण्याचं स्वप्न साध्य करण्यासाठी आठ वर्षांनंतर रोहित शर्माला संधी मिळाली आहे. तो असं करू शकला नाही तर त्याची बोचणी काय असेल, हे इतर कोणापेक्षाही तोच चांगलं जाणतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशाच्या राजकारणात मोठी घडामोड राज ठाकरे सोनिया गांधी यांची भेट