Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संध्या रंगनाथन : अडथळ्यांना 'किक' मारत फुटबॉलचं मैदान गाजवणारी खेळाडू

Webdunia
शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (18:13 IST)
आघाडीची फुटबॉल खेळाडू संध्या रंगनाथन हिला कुटुंबाची ऊब कधी मिळालीच नाही. पण भूतकाळातल्या सर्व आव्हानांना फुटबॉल प्रमाणे किक मारत ती क्रीडा विश्वात दिमाखदार कामगिरी बजावत आहे.
 
खेळ म्हणजे केवळ मनोरंजनाचं साधन नव्हे. तर हे करियरही असू शकतं आणि अभिव्यक्तीचं माध्यमही. तामिळनाडूच्या संध्या रंगनाथनला एक सामान्य बालपण कधी मिळालंच नाही.
 
एका सरकारी हॉस्टेलमध्ये ती लहानाची मोठी झाली. पण फुटबॉलच्या रूपाने तिला स्वतःचं कुटुंब मिळालं आणि तिने देशासाठी बहुमानही मिळवले.
 
फुटबॉल जगात पहिलं पाऊल
तामिळनाडूमधल्या कड्डालोर जिल्ह्यात 20 मे 1998 रोजी संध्या रंगनाथनचा जन्म झाला. पण आई-वडील विभक्त झाल्याने अगदी बालवयातच तिची रवानगी सरकारी हॉस्टेलमध्ये झाली. वडिलांच्या अनुपस्थितीमध्ये संध्याचा सांभाळ करणं आईला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं.
 
हॉस्टेलमध्ये असताना संध्याचे काही सीनिअर्स फुटबॉल खेळायचे. या खेळाचा तिच्यावर प्रभाव पडला. ते खेळाडू स्पर्धांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायचे. संध्यालाही त्यांच्यासोबत राहून वेगवेगळी ठिकाणं बघायची होती. फुटबॉलच्या विश्वात पदार्पण करण्यासाठी ही प्रेरणा पुरेशी होती. सहावीत असताना तिने फुटबॉल खेळायला सुरुवात केली.
 
सुरुवात अवघड होती आणि साधनंही अपुरी होती. कड्डलोरमध्ये फुटबॉल प्रॅक्टिससाठी चांगलं गवताळ मैदानही नव्हतं. मात्र, खबडबडीत मैदानावरच्या हिरव्या गवताची उणीव संध्याच्या प्रेमळ प्रशिक्षकांनी भरून काढली. त्यांनी तिचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला. पण तरीही स्वतःच्या आई-वडिलांच्या मायेच्या उबेची उणीव तिला जाणवतच राहिली.
 
अधून-मधून तिची आई हॉस्टेलमध्ये तिला भेटायला येई. मात्र, चारचौघींचं असतं तसं हे नातं नव्हतं. दुसरं म्हणजे तिच्या समवयस्कांना ज्या छोट्या-छोट्या गोष्टी मिळायच्या त्याही तिला मिळाल्या नाही. तिचं मनोरंजनाचं साधन एकच होतं - फुटबॉल. उरलेला सगळा वेळ अभ्यासासाठी असायचा. तिने तिलुवल्लूवर विद्यापीठातून कॉमर्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. सध्या ती कड्डलोरच्याच सेंट जोसेफ कॉलेजमधून समाजकार्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
 
ध्येयाकडे वाटचाल
बालपणापासूनच स्वतःच्या कुटुंबाला मुकलेल्या संध्यासमोर अनेक आव्हानं आली. असं असलं तरी फुटबॉलपटू म्हणून हॉस्टेलमधलं आयुष्य तिच्यासाठी वरदानच ठरलं. कुणाच्याही आडकाठीशिवाय ती मुक्तपणे खेळू शकली. स्वतःचं पॅशन जपण्यापासून आईने कधीही रोखलं नाही, असंही संध्या सांगते.
 
थिरुवल्लूवर विद्यापीठातल्या प्रशिक्षकांनी तिला उत्तम प्रशिक्षण दिलं. तर कड्डलोरमधल्या इंदिरा गांधी अॅकॅडमी ऑफ स्पोर्ट्स अँड एज्‌युकेशन या संस्थेनेही संध्याला फुटबॉलच्या मैदानावरची एक आक्रमक 'फॉरवर्ड प्लेयर' म्हणून घडवण्यात मोलाची भूमिका बजावली.
 
खेळावर फोकस आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे संध्याच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. 2019 साली फुटबॉलपटू म्हणून तिच्या आयुष्यात एक महत्त्वाचा क्षण आला. इंडियन विमेन्स लीगच्या (IWL) तिसऱ्या सीझनमध्ये तिची 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर' म्हणून निवड करण्यात आली. उत्तम कामगिरी आणि त्याची लगेचच घेण्यात आलेली दखल, यामुळे या तरुण फुटबॉलपटूच्या आत्मविश्वासात मोलाची भर पडली.
 
उत्साहाने आणि जोशाने भारावलेल्या संध्याने नेपाळमधल्या काठमांडूमध्ये आयोजित SAFF स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. भारतीय संघाने ही विमेन्स चॅम्पियनशिप तर जिंकलीच, शिवाय कड्डलोरच्या संध्याने भारतासाठी गोलही केले. नेपाळने तिला आणखी एक संधी दिली आणि तिने त्याचंही सोनं केलं.
 
नेपाळमधल्या पोखारामध्ये आयोजित तेराव्या साऊथ एशियन गेम्समध्ये तिने दोन गोल करत भारताला जेतेपद मिळवून दिलं. 2019 मध्ये देशासाठी विजयाची चव चाखल्यानंतर संध्याने 2020 ची सुरुवातही धडाक्यात केली आणि IWL च्या चौथ्या हंगामात सर्वाधिक गोल करणारी ती दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू होती.
 
संध्याचं संपूर्ण लक्ष फुटबॉलमधली आपली कामगिरी उंचावण्याकडे आहे. मात्र, एका महिला खेळाडूसाठी आर्थिक सुरक्षा एक महत्त्वाचा घटक असल्याचं ती म्हणते. उदरनिर्वाहाच्या चिंतेमुळे अनेक महिला खेळाडूंना खेळावर लक्ष केंद्रित करता येत नाही. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन द्यायचं असेल तर सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात नोकरीची हमी असायला हवी, असं संध्याला वाटतं.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments