Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय राऊत - उदयनराजे भोसले यांच्या वादात साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा पणाला?

Webdunia
गुरूवार, 16 जानेवारी 2020 (16:18 IST)
'आज के शिवाजी-नरेन्द्र मोदी' पुस्तकावरून झालेल्या टीकेनंतर आणि राजकीय वादानंतर शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी (14 जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
 
मात्र या पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजे भोसलेंनी पुस्तकावर थेट भाष्य न करता शिवसेनेवरच कठोर टीका केली. यावेळी उदयनराजेंनी नाव न घेता शिवसेना नेते संजय राऊतांवरही टीका केली.
 
"आजपर्यंत प्रत्येक वेळेस लुडबूड करणारे जे बिनपट्ट्याचे असतात. त्यांचं नाव घेऊन मला मोठं करायचं नाहीये. त्यांची लायकी त्यांनी ओळखून घ्यावी. काहीही झालं तरी छत्रपतींच्या वंशजांना विचारा. शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारलं होतं का," असं उदयनराजे यांनी म्हटलं.
 
संजय राऊत यांनीही उदयनराजे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. पुण्यामध्ये दैनिक लोकमतच्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी उदयनराजेंना थेट छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावेच मागितले. छत्रपतींच्या गादीबद्दल आदर असल्याचं संजय राऊत यांनी आवर्जून सांगितलं. पण उदयनराजे हे भाजपचे नेते आहेत, विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत, असंही राऊत यांनी म्हटलं.
 
संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर उदयनराजे भोसले यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्यांचे चुलत भाऊ आणि भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी संजय राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, की अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये आम्ही कोणत्या घरात जन्मलो ते. त्यापलीकडे संजय राऊतांना कोणता पुरावा हवा आहे, हे त्यांनी सांगावं.
 
"हा सगळा वाद संजय राऊतांनी सुरू केला आहे. याबाबत ना आम्ही काही बोललो होतो, ना संभाजीराजे काही बोलले होते, ना उदयनराजे. त्यामुळे हा वाद मिटवायचा कसा हे संजय राऊतांनीच पाहावं. ते खासदार आहेत, पत्रकार आहेत, त्यांनी जरा जपून भाषा वापरावी एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे," असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं.
 
उदयनराजेंवर आतापर्यंत अनेकदा टीका झाली आहे. पण छत्रपतींचे थेट वंशज असल्यानं या टीकेनं मर्यादा ओलांडली नव्हती. पण आता संजय राऊतांनी त्यांच्याकडे वंशज असल्याचे पुरावेच मागितले आहेत. त्यामुळे या वादात साताऱ्याच्या गादीचं वलय कमी होत आहे की उदयनराजे भोसले गादीची प्रतिष्ठा राखण्यात कमी पडत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
'मान गादीला, मत राष्ट्रवादीला'
संजय राऊत आणि उदयनराजे यांच्यातील शाब्दिक चकमक ही आताची आहे. पण उदयनराजेंचा प्रभाव कमी होण्याची सुरूवात ही कदाचित त्यांच्या भाजप प्रवेशापासूनच झाली. 2014 साली मोदी लाटेतही उदयनराजे भोसले साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले.
 
2019 लाही राष्ट्रवादीच्याच तिकिटावर ते पुन्हा खासदार झाले. मात्र महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.
 
"छत्रपतींनी मागणी करायची नाही तर आदेश द्यायचा असतो," असं म्हणत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंचं पक्षात स्वागत केलं होतं. थेट छत्रपतींचे वंशज आपल्यासोबत असणं हे देवेंद्र फडणवीस यांना प्रतीकात्मकदृष्ट्या महत्त्वाचं वाटलं असावं.
 
छत्रपतींच्या गादीचा सातारकर मान ठेवतील, असाही त्यांचा कयास असावा. पण उदयनराजे भोसले यांच्याविरोधात उभे राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी प्रचारादरम्यान 'मान गादीला, मत राष्ट्रवादीला' अशी घोषणा दिली होती. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही प्रचारात हा मुद्दा वापरला.
 
श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसलेंचा पराभव केला. उदयनराजे भोसलेंच्या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं, की उदयनराजेंच्या पराभवाबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं, की लोकसभेची एकच जागा महाराष्ट्रात होती. स्वाभाविक सगळ्यांचं लक्ष या जागेकडं होतं. साताऱ्याच्या गादीबद्दल सर्वांनाच आदर आहे. पण त्या गादीची प्रतिष्ठा न ठेवल्यास काय होतं, ते दिसून आलं. श्रीनिवास पाटलांसारख्या नेत्याला निवडून दिल्याबद्दल मी साताऱ्याच्या जनतेचे आभार मानतो.
 
त्यामुळे गादीला मान देताना उदयनराजेंना मात्र विरोध झाल्याचे पहायला मिळालं.
 
'मानासोबतच वलयाचंही ओझं येतं'
सध्याच्या वादाच्या अनुषंगानं या मुद्द्याबद्दल बोलताना लोकमत कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक वसंत भोसले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, "उदयनराजे ज्या पद्धतीचे राजकारण करत आहेत, राजकीयदृष्ट्या त्यांनी जितका भाग घ्यायला हवा तितका ते घेताना दिसत नाहीत. खासदार म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली असंही नाहीये.
 
"छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय-धोरण, स्वराज्य स्थापनेची कल्पना, त्यामागचा त्यांचा विचार, त्यांची कृती हे सगळं अद्भुत होतं. रयतेच्या हिताचं होतं. त्यामागे वेगळा विचार होता, वेगळी कृती होती. त्यामुळे जेव्हा अशा वंशाची परंपरा असते तेव्हा त्यांच्या विचारांची तुलना करताना तुम्ही वंशज म्हणून कसं वागता, तुम्हाला आदर्श का म्हणायचं हा प्रश्न येतो," असं भोसले सांगतात.
 
"छत्रपती शिवरायांचा विचार चिरंतन टिकला आहे. त्यामुळे त्यांचे वंशज म्हणून 'मला मान द्या' असं ज्यावेळी तुम्ही म्हणता त्यावेळी वलयाचं ओझंही येतं. तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा अधिक असतात. शब्दाला मान असतो. तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. इतरांच्या आणि तुमच्या कामामध्ये फरक असतो. जेव्हा राजघराण्याचा प्रतिनिधी असूनही या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा स्वाभाविकच गादीचं वलय कमी होतं, असंही भोसले यांनी म्हटलं.
 
'रोजच्या जगण्यात गादीच्या वारशाला किती महत्त्व?'
"सध्या देशात राजेशाही नाही. लोकशाही आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये अशा विशिष्ट गादीला ती कितीही महत्त्वाची असली तरी खास स्थान असण्याचे कारण नाही. रोजच्या जगण्यामध्ये गादीच्या वारशाला किती महत्त्व द्यायचं याला मर्यादा आहेत. जेव्हा तुम्ही अस्मितेचं राजकारण करता तेव्हा थांबता येत नाही, असं सकाळच्या उत्तर महाराष्ट्राचे संपादक श्रीमंत माने यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.
 
उदयनराजे असतील किंवा शिवेंद्रराजे असतील ते लोकांमधून निवडून आलेत त्यामुळे त्यांची चर्चा अधिक होते. इतर राजघराणी ही लोकशाही प्रक्रियेमध्ये नसल्यानं त्यांची चर्चा होत नाही. या राजघराण्यांना लोकांनीच लोकशाही प्रक्रियेमध्ये आणल्याचंही श्रीमंत माने यांनी म्हटलं.
 
याबाबत श्रीमंत माने यांनी यशवंतराव चव्हाण यांची एक आठवण सांगितली. "यशवंतराव चव्हाणांनी 'गादी' नावाच्या प्रकरणाला लोकशाहीमध्ये आणू नका, असा इशारा दिला होता. त्यांनी दिलेला इशारा आज खरा होताना दिसतोय. त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळेजण आपल्या रोजीरोटीच्या प्रश्नापासून वेगळे होऊन अस्मिता, गादीचा वारसा यावरच चर्चा करताना दिसत आहेत."
 
"या राजघराण्यांना जे महत्त्व मिळत आहे ते केवळ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कर्तबगारीमुळे मिळत आहे. उदयनराजे किंवा शिवेंद्रसिंहराजे यांची स्वतःची कर्तबगारी नाही. उदयनराजे खासदार झाले यापेक्षा त्यांनी वेगळं काही केलेले नाही. आज उदयनराजे नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. पण शरद पवार यांच्यामुळेच ते खासदार झाले. पवार सोबत नसताना ते पडले. त्यामुळे पवारांवर त्यांची टीका किती गांभीर्याने घ्यायची हे पण पहायला पाहिजे. मुळात पुस्तकाचा वाद हा शिवाजी महाराजांच्या गादीपर्यंत यायचं कारण नव्हतं. पण भाजपला जे हवंय तेच घडतंय. यामागचं कारण असं आहे की, भाजपला एकाच वेळेला शिवसेनेवर टीका करायची होती आणि त्याच वेळेला शरद पवारांवरही टीका करायची होती. मराठा समाज हा शिवसेना आणि पवारांच्या मागे का उभा आहे, यावर भाजपला प्रश्न निर्माण करायचे आहेत. अशा वेळी उदयनराजेंना पुढं करत हे सगळं भाजपनं केलं आहे."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments