Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय राऊत : क्राइम रिपोर्टरपासून शिवसेनेचे नेते होण्यापर्यंतचा प्रवास

Webdunia
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019 (11:06 IST)
- हर्षल आकुडे
"आमची समजूत काढण्याची गरज नाही. आम्ही हट्टाला पेटलेलो नाही. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर फणा काढून बोलण्याची गरज नाही. मी फणा काढून बोलत नाहीये. मी पक्षाची भूमिका मांडत आहे. सामनासुद्धा तेच करत आहे. ज्या मागण्या मान्य केल्या होत्या, तेवढ्याच तर मागत आहोत," असं शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी (29 ऑक्टोबर) माध्यमांशी बोलताना म्हटलं.
 
"5 वर्ष मुख्यमंत्रिपद मिळावं, असं शिवसेनेला वाटू शकतं. पण वाटणं आणि होणं यात फरक आहे. शिवसेनेला अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता," या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी एक वेगळीच पद्धत वापरली.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'लाव रे तो व्हीडिओ' सभांप्रमाणेच राऊत यांनी माध्यमांना लोकसभा निवडणुकांआधीच्या पत्रकार परिषदेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वक्तव्यं दाखवली.
 
माध्यमांशी बोलताना राऊत यांनी म्हटलं, "सत्ता, पदं आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप होईल, असं मुख्यमंत्री स्वतः सांगत आहेत, याचा अर्थ समजून घ्या. डिक्शनरीमध्ये ज्या व्याख्या आहेत त्या अजून बदलल्या नाहीत."
 
एकूणच सरकार स्थापनेसंदर्भातील शिवसेनेच्या सर्व अपेक्षा आणि खदखद ही संजय राऊतांच्या माध्यमातूनच व्यक्त होत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या चित्रात कुठेच नाहीत. मग संजय राऊत यांना यासंदर्भातले सर्व अधिकार देण्यात आलेत का, असा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय.
 
युतीचं भविष्य ठरविण्याचा अधिकार शिवसेनेत राऊतांना आहे का आणि असेल तर शिवसेनेसारख्या व्यक्तिकेंद्रित पक्षातला संजय राऊतांचा हा प्रवास नेमका कसा झाला, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला आहे.
 
पत्रकार ते नेता
संजय राऊत हे शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. शिवसेनेच्या अधिकृत संकेतस्थळावरच्या माहितीनुसार संजय राऊत शिवसेनेच्या 17 प्रमुख नेत्यांच्या यादीत आहेत. शिवसेनेचे राज्यसभा खासदार तसंच दिल्लीत पक्षाची भूमिका मांडणारा एक चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे.
 
पण संजय राऊत यांच्या करिअरची सुरूवात राजकारणातून नाही तर पत्रकारितेतून झाली होती. लोकप्रभा साप्ताहिक ते सामनाचे कार्यकारी संपादक असा त्यांचा पत्रकारितेतला प्रवास आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर संजय राऊत यांच्या एकूण प्रवासाबाबत सांगतात, "पहिल्यांदा राऊत हे 'लोकप्रभा' या साप्ताहिकात काम करायचे. तिथं ते क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहत असत. तिथं त्यांनी अनेक सनसनाटी बातम्या केल्या होत्या. त्यावेळी आपल्या लेखांमधून ते शिवसेनेच्या भूमिकेशी मिळतीजुळती भूमिका घेत असल्याचं बाळासाहेब ठाकरेंना वाटत होतं. 1989 ला सामना सुरू झाला तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते. त्यांच्यानंतर संजय राऊत 1993 ला कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले."
 
"सुरुवातीला 'इंडियन एक्स्प्रेस'च्या पुरवठा विभागात काम करणारे संजय राऊत पुढे मार्केटिंग विभागात काम करू लागले. नंतर लोकप्रभात क्राईम रिपोर्टर म्हणून रूजू झाले. त्यांची गुन्हेगारी विश्वातील पत्रकारितेवर चांगली पकड होती. सूत्रांकडून योग्य प्रकारे माहिती काढणं, बातमीचा माग काढणं आदी कामांमुळे त्यांचा समावेश उत्कृष्ट क्राईम रिपोर्टरमध्ये व्हायचा," असं ठाकरे विरुद्ध ठाकरे या पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात.
 
"संजय राऊत एक उत्तम पत्रकार आहेत. क्राईम रिपोर्टर ते संपादक असा प्रवास खूप कमी लोकांनी केला आहे. राजकीय पत्रकार ते संपादक असा प्रवास केलेले अनेक संपादक आहेत. पण क्राईम रिपोर्टींगपासून सुरूवात करणारे खूप कमी पत्रकार संपादक झालेले आहेत. सध्या ते कुठेही असले तरी तिथून ते अग्रलेख पाठवत असतात. सामनाची ताकद त्यांच्या मथळ्यांमध्ये आहे. ते कसे असावेत याची शैली त्यांनी ठरवून ठेवली आहे," असं धवल यांनी सांगितलं.
'बाळासाहेबांची शैली अवगत'
'सामना'मधले अग्रलेख हे नेहमी चर्चेचा विषय असतात. त्यामधली भाषाशैली बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरी शैलीशी मिळतीजुळती आहे. बाळासाहेब नसतानाही त्याच पद्धतीचं लेखन सामनामध्ये होत असल्याचं अनेकांना आश्चर्य वाटतं.
 
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर याबाबत सांगतात, "सामनामध्ये आल्यानंतर संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलने लिहू लागले. बाळासाहेबांचं म्हणणं कळल्यानंतर किंवा त्याच्याशी बोलल्यानंतर त्यावरून ते लेख लिहित असत. एखाद्या विषयावर बाळासाहेब काय भूमिका घेतील ते लक्षात घेऊन त्यांच्यासारखंच लिखाण ते करू लागले.
 
बाळासाहेब ठाकरेंची फटकेबाजी मारणारी आणि त्याचवेळा बोचकारे काढणारी अशी मार्मिक शैली होती. ती राऊत यांनी तंतोतंत आत्मसात केली. राऊत त्यांच्या शैलीशी इतके एकरूप झाले, की बाळासाहेब बोलतात तसं संजय राऊत लिहितात की राऊत लिहितात तसं बाळासाहेब बोलतात असा प्रश्न वाचकांना पडायचा. संजय राऊत यांनी बाळासाहेबांवर चांगली छाप पाडली होती. त्यांच्या कामामुळे अर्थातच बाळासाहेबांना ते आवडायचे."
 
लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार वैभव पुरंदरे सांगतात, "आपल्या कामामुळे ते बाळासाहेबांच्या अत्यंत जवळचे होते. त्यांनी त्यांची भाषा अवगत केली होती. त्यामुळे त्या शैलीत ते अजूनही लिहितात. तीच शैली शिवसैनिकांच्या परिचयाची आहे. लोकप्रभा आणि इतर ठिकाणी ते चांगलं लिहायचे. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या काही धोरणांवर टीकाही केली होती. नव्वदीच्या दशकात शिवसेनेचे भुजबळ सोडून गेल्यानंतर त्यांनी एकदा बाळासाहेबांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत बाळासाहेबांना खूपच आवडली होती."
 
त्याचवेळी राऊत यांच्याकडून सामनामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेबाबत आणि शब्दांवरून अनेकदा आक्षेपही नोंदवण्यात आले आहेत.
 
पगारी नेते म्हणून टीका
संजया राऊत यांनी त्यांच्या अग्रलेखांमधून नारायण राणे यांना वेळोवेळी लक्ष्य केलं आहे. राणेंनी पक्ष सोडल्यानंतर त्यांचा खरपूस समाचार सामनातून घेतला जात होता. त्यावेळी संजय राऊत यांच्यावर टीका करताना राणे यांनी त्यांचा उल्लेख 'शिवसेनेचे पगारी नेते' असा केला होता. त्यानंतर संजय राऊत यांच्या टीकांना आपण फारसं गाभिर्यानं घेत नसल्याचं राणेंनी अनेकदा सांगितलं आहे.
 
सामनाच्या वाढीत महत्त्वाची भूमिका
सामना वृत्तपत्राला उभारी देण्याचं काम संजय राऊत यांनीच केल्याचं वैभव पुरंदरे यांना वाटतं.
 
ते म्हणतात, "सामनाची स्थापना झाली तेव्हा त्याचा वाचकवर्ग मर्यादित होता. अयोध्या प्रकरण, दंगल यांच्यानंतर शिवसेना मोठी होऊ लागली होती. बाळासाहेबांचा आवाज आणि शिवसेनेचं मुखपत्र म्हणूनच सामनाची ओळख होती. त्याला एक वृत्तपत्र म्हणून समोर आणून मोठा वाचकवर्ग मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं."
 
"संजय राऊतांनी 'सामना' वृत्तपत्र चर्चेत कसं राहील याची काळज घेतली. आज तरूण भारत, पांचजन्य, ऑर्गनायझर किंवा पिपल्स डेमोक्रसी या इतर मुखपत्रांपेक्षाही जास्त चर्चा सामनाची होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडिया सामनाची दखल घेते. मराठी न येणारे हिंदीभाषक नेतेही तुम्ही आमच्या विरोधात का लिहिता, असं संजय राऊत यांना विचारत असतात, " असं ज्येष्ठ राजकीय अभ्यास व्यंकटेश केसरी सांगतात.
 
राज ठाकरेंचं राजीनामापत्र लिहिलं
धवल कुलकर्णींनी बीबीसीशी बोलताना त्यांच्या पुस्तकात लिहिलेला संजय राऊत यांचा एक किस्सा सांगितला. "राज ठाकरे यांनी 2005 मध्ये शिवसेनेतील पदांचा राजीनामा देत असताना त्यांचं पत्र संजय राऊत यांनी लिहिलं होतं. बाळासाहेबांना राऊत यांची शैली माहीत होती. राज यांचं राजीनामापत्र बाळासाहेबांच्या हातात पडताच त्यांनी ते संजय राऊत यांनी लिहिल्याचं ओळखलं. संजय, हे तुझंच काम दिसतंय असं ते म्हणाले होते. नंतर राज ठाकरेंना समजवण्यासाठी मनोहर जोशी आणि संजय राऊत गेले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली होती."
 
हा किस्सा बऱ्याच शिवसैनिकांना माहिती असल्याचं कुलकर्णी सांगतात.
 
सुरूवातीपासूनच भाजपविरोधी
धवल कुलकर्णी यांच्यामते, भाजप शिवसेनेला संपवू शकते असं मानणारा शिवसेनेतील नेत्यांचा एक गट आहे. त्यामध्ये संजय राऊतांचा समावेश होतो.
 
ते सांगतात, "भाजपची राजकारणाची शैली पाहिल्यास आपले स्पर्धक तेच आहे, असं राऊत यांचं मत आहे. 23 जानेवारी 2017 ला वरळीमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात पुढच्या सगळ्या निवडणुका स्वबळावर लढवू असा ठराव मांडण्यात आला होता. हा ठराव संजय राऊत यांनीच मांडला होता. लोकसभेतही युती करु नये अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली होती. लोकसभेपेक्षा राज्यात लक्ष केंद्रीत करू. आपण लोकसभेत जिंकलो नाही तरी चालेल, पण आपण भाजपचं नुकसान करू शकतो अशी भूमिका त्यांनी घेतली होती. पण असं झालं नाही. पण नंतर राजकीय परिस्थिती पाहून युती करण्यात आली."
 
"बाळासाहेब असल्यापासूनच भाजप आणि शिवसेना यांच्यात सुप्त संघर्ष होता. 2014 लोकसभेनंतर ते विधानसभेला वेगवेगळे लढले. त्यानंतर दोघांच्याही लक्षात आले की आपण हिंदुत्व म्हणत असलो तरी आपण सत्तेचं राजकारण करतो भाजपला पॅन इंडिया पार्टी व्हयाच आहे. शिवसेनेला तसं होऊ द्यायचं नाही. तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या भूमिकेमध्ये मध्ये बेसिक फरक आहे. त्यामुले संजय राऊत यांच्या माध्यमामार्फत हे फरक बाहेर येतात," असं व्यंकटेश केसरी यांना वाटतं.
 
वैभव पुरंदरे यांच्या मते, "संजय राऊत यांनी सुरूवातीपासूनच भाजपविरोधी भूमिका घेतली होती. त्यांची तीच भूमिका अजूनपर्यंत कायम आहे."
 
राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सौम्य भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेसबाबत संजय राऊतांच्या सौम्य भूमिकेबाबत धवल कुलकर्णींनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे, "2008 मध्ये एक प्रयत्न झाला होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून हा प्रयत्न करण्याद आला होता. शिवसेनेने भाजपची साथ सोडायची आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसची साथ सोडून एकत्र यायचं, असा प्रयोग करता येईल का, याची चाचपणी त्यांनी केली. हा प्रयोग करण्यामागचा विचार संजय राऊत यांचाच होता. पण त्या प्रयोगाचं पुढे काही होऊ शकलं नाही."
 
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांची मैत्री आणि त्यांचे वैयक्तिक संबंध यांच्याबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. पण व्यंकटेश केसरींना शिवसेनेचं पक्षीय राजकारण आणि संजय राऊत यांचे वैयक्तिक संबंध यांचा संबंध जोडण्यात येऊ नये, असं वाटतं.
 
केसरी सांगतात, "बाळासाहेब ठाकरे यांचे शरद पवार, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्याशी चांगले संबंध होते. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असला तरी त्यांचे काँग्रेसशी चांगले संबंध राहिले. त्यांचं राजकारण विरोधी असलं तरी ते कधीकधी एकमेकांना पूरकही राहिले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता पक्षाची भूमिका सोडून संजय राऊत वेगळं काहीतरी करतात असं नाहीत. त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. दोन्ही पक्षांचं राजकीय वैर असलं तरी वैयक्तिक संबंध वेगळे असतात."
 
'परिस्थितीशी जुळवून घेणारे नेते'
संजय राऊत परिस्थितीशी जुळवून घेणारे नेते असल्याचं रायकर सांगतात. त्यांच्या मते, "शिवसेनेला हवं ते राऊत देऊ लागले. सामनाची शैली अवगत केली. संपादकांना मालकांच्या म्हणण्यानुसार सगळं ऐकावं लागतं. पक्षातही त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना, पुढे उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्याशी मिळतीजुळती भूमिका घेतली. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयानंतरही त्यांनी त्याला अनुकूल अशी भूमिका घेतली आहे. शिवसेनेत याला महत्त्व आहे."
 
व्यंकटेश केसरी सांगतात, शिवसेनेने सामनाचे संपूर्ण अधिकार त्यांच्या हातात दिलेले आहेत. कोणत्याही पक्षात कुणी काय बोलायचं याचा एक सिद्धांत असतो. त्यामुळे परिस्थिती ओळखून त्यानुसार संजय राऊत त्यांची भूमिका वठवतात.
पक्षात विशेष स्थान
अनेकवेळा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यात विरोधाभास दिसून आला आहे. तरीसुद्धा त्यांचं पक्षातलं स्थान कधी ढळलं नाही. याबाबत शिवसेनेत संजय राऊत यांचं विशेष स्थान असल्यामुळेच त्यांना झिडकारणं शक्य नाही, असं धवल कुलकर्णी यांना वाटतं.
 
प्रकाश अकोलकर यांच्या मते, सुभाष देसाई, मनोहर जोशी यांच्यासारख्या नेत्यांप्रमाणेच त्यांनी आजच्या शिवसेनेशी अडजेस्ट करून घेतलं. उद्धव ठाकरेंनीही त्यांना एक विशेष स्थान दिलं आहे, जे उद्धव ठाकरे बोलत नाहीत ते संजय राऊत बोलू शकतात.
 
वैभव पुरंदरे याविषयी बोलताना सांगतात, "राजकारणाच्या दृष्टीकोनातून उद्धव ठाकरेंना जे बोलायचं नसतं ते त्यांच्याकडून बोलून घेतात असंही असू शकतं. त्यामुळे संजय राऊत बोलततात ती सामनाची भूमिका आहे. त्याच्याशी शिवसेनेचा संबंध नाही असंही उद्धव ठाकरे म्हणू शकतात.
 
ते पुढे सांगतात, "जी गोष्ट बाळासाहेबांनी केली नव्हती ती गोष्ट उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपच्या विरोधात लिहिलेल्या अग्रलेखावरून वाद झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ते सामनाचं मत असल्याचं सांगितलं होतं. दीर्घकाळापर्यंत अशी भूमिका पक्षाचा पाठिंबा असल्याशिवाय घेणं अवघड असतं. त्यामुळे परिस्थितीची, काळाची गरज ओळखून ते पक्षासाठी भूमिका घेतात, हे पक्षाला माहीत आहे. सध्या प्रमुख नेत्यांच्या फळीत त्यांचा समावेश होतो. संजय राऊत यांची सामनातील भूमिका काहीही असली तरी पक्ष त्यांच्या विरोधात काही बोलल्याचं आठवत नाही."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments