Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

शिवसेना वर्धापन दिनः शिवसेनेबद्दल या 9 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

शिवसेना वर्धापन दिनः शिवसेनेबद्दल या 9 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
, शुक्रवार, 19 जून 2020 (13:47 IST)
19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली होती हे तुम्हाला माहिती आहेच. गेल्या साडेपाच दशकांमध्ये शिवसेनेने एक प्रादेशिक पक्ष म्हणून राजकारणात ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहेच परंतु आता राज्यात मुख्यमंत्रीही शिवसेनेचे असल्यामुळे पक्षाला एक वेगळे स्थान मिळाले आहे. शिवसेनेच्या जडणघडणीतील महत्त्वाचे टप्पे आपण इथं जाणून घेणार आहोत.
 
1)मार्मिकची स्थापना आणि शिवसेना- शिवसेनेच्या जन्माची बीजं मार्मिक साप्ताहिकामध्ये रुजली होती असं म्हणता येईल. 1960 साली मार्मिक या साप्ताहिकाची स्थापना झाली होती. त्याच्या पहिल्या अंकाचे उद्घाटन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले होते. मराठी माणसाचे प्रश्न आणि त्याला व्यवस्थेतून डावललं जाणं हे विषय मार्मिकमधून सतत अधोरेखित केले गेले.
 
2)शिवसेनेची स्थापना आणि दसरा मेळावा- 19 जून 1966 रोजी शिवसेना पक्षाची स्थापना झाली. मराठी लोकांनी या 'संघटना' म्हणून उदयाला आलेल्या संस्थेचं सदस्यत्व मिळावं यासाठी धडपड सुरू केली. सुरुवातीच्या काळात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देण्याची घोषणा करण्यात आली.
 
30 ऑक्टोबर 1960 रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. शिवाजी पार्कवर झालेल्या या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रबोधनकार ठाकरे यांनी 'हा बाळ मी आज तुम्हाला दिला' असे उद्गार काढले.
 
3) राजकारण प्रवेश- शिवसेनेने 1967 साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. तसेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचारही केला. त्याच्या पुढच्याच वर्षी प्रजा समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक लढवून मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेच्या शाखा सर्वत्र दिसू लागल्या.
 
शिवसेना शाखांकडे आपले प्रश्न सोडवण्याचं एक व्यासपीठ म्हणून लोक पाहू लागले. 1969 साली सीमावादावरुन निर्माण झालेल्या पेचप्रसंगात बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली.
 
4) कृष्णा देसाई हत्या आणि सेनेचे पहिले आमदार- कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांची बरोबर 50 वर्षांपुर्वी म्हणजे 1970 साली 5 जून या दिवशी हत्या झाली. त्यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचे वामनराव महाडिक विजयी झाले. शिवसेनेचे ते पहिले आमदार.
 
5) पालिकेचं राजकारण आणि महापौर- 1968 साली मुंबई पालिकेत प्रवेश मिळाला असला तरी सेनेचे पहिले महापौर खुर्चीत बसायला 1971 साल उजाडलं. दादरचे डॉ. हेमचंद्र गुप्ते शिवसेनेचे पहिले महापौर झाले. 1972 साली प्रमोद नवलकर विधानसभेत गेले. तर त्याच्या पुढच्या वर्षी सतीश प्रधान ठाण्याचे महापौर झाले. शिवसेनेने 1975 साली आणीबाणीला पाठिंबा जाहीर केला.
 
शिवसेनेच्या गुप्ते यांच्यानंतर अनेक महापौर मुंबईत झाले. त्यामध्ये सुधीर जोशी, मनोहर जोशी, वामनराव महाडीक, (काँग्रेसला पाठिंबा देऊन मुरली देवरा), छगन भुजबळ, दत्ता नलावडे, रमेश प्रभू, सी. एस. पडवळ, शरद आचार्य, दिवाकर रावते, मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, नंदू साटम, हरेश्वर पाटील, महादेव देवळे, दत्ता दळवी, शुभा राऊळ, श्रद्धा जाधव, सुनील प्रभू, स्नेहल आंबेकर, विश्वनाथ महाडेश्वर, किशोरी पेडणेकर असे महापौर झाले आहेत.
 
काही महापौरांना काँग्रेसचा तर काही महापौरांना भाजपाचा पाठिंबा मिळाला. सध्या 1996 पासून शिवसेनेचे महापौर मुंबईत आहेत.
 
6) युती आणि मैत्री- शिवसेनेनं सुरुवातीच्या काळात काँग्रेसशी अनेक निवडणुकांत मैत्री ठेवली होती. 1980 साली काँग्रेसला मदत केल्याबद्दल शिवसेनेला विधान परिषदेवर दोन जागा देण्यात आल्या. 1984 साली शिवसेनेने भाजपबरोबर युती केली. परंतु भाजप पुलोदमध्ये सहभागी झाल्यानंतर ही युती तुटली.
 
1989 साली भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा युती झाली ती 25 वर्षे टिकली. 2014 साली भाजप आणि शिवसेनेने विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या. त्यानंतर ते पुन्हा एकत्र आले. 2019 साली शिवसेना आणि भाजप यांची युती निवडणुकीनंतर तुटली.
 
7) शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि विधानसभेवर भगवा- 1995 साली शिवसेना आणि भाजपा युतीची पहिल्यांदाच महाराष्ट्रात सत्ता आली. शिवसेनेचे मनोहर जोशी या पक्षाचे आणि या युतीचे पहिले मुख्यमंत्री झाले. मनोहर जोशी यांच्यानंतर अल्पकाळासाठी नारायण राणे मुख्यमंत्री झाले.
 
2014 साली भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस या युतीचे तिसरे मुख्यमंत्री झाले. मात्र 2019 साली शिवसेना आणि भाजपा युती तुटल्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले.
 
निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश न करता कोणतेही पद घेणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या ठाकरे घराण्यातील दोन नेते विधिमंडळात आहेत. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडून आले ते राज्याचे पर्यटनमंत्री आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषदेत निवडले गेले.
 
8) शिवसेनेला सोडचिठ्ठी देणारे नेते - शिवसेनेत अनेक नेत्यांनी आपली कारकिर्द खर्च केली असली तरी अनेक नेत्यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'! ही केला आहे. त्यात छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, राम जेठमलानी, चंद्रिका केनिया यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून वेगळा मार्ग धरला.
 
9) बाळासाहेबांचे निधन आणि उद्धव यांच्याकडे पक्षसूत्रे- 2003 साली महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनात शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पुढच्याच वर्षी नारायण राणे यांनी तर 2005 साली राज ठाकरे यांनी पक्ष सोडला. त्यानंतर होत गेलेल्या अनेक मुंबई पालिका निवडणुकांमधून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होत गेले.
 
17 नोव्हेंबर 2012 रोजी शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यांनंतर उद्धव यांच्याकडे सर्व सूत्रे आली. शिवसेनापक्षप्रमुख म्हणून तसेच सामनाचे संपादक म्हणून त्यांनी कामास सुरूवात केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर रश्मी ठाकरे यांच्याकडे सामनाची सूत्रे आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना औषध : डेक्सामेथासोन किती गुणकारी? भारतात उपलब्ध आहे का?