Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार टिकणारं नाही - गडकरी

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार टिकणारं नाही - गडकरी
, शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (18:10 IST)
मुंबईत आत्ता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांट्य़ा महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह मातब्बर नेते उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये आज अनेक मुद्द्यावर चर्चा होऊन सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल होण्याची शक्यता आहे. बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर तिथे उपस्थित आहेत. त्यांनी तिथे काय चालू आहे याबाबत अधिक माहिती दिली.
 
"या बैठकीला तिन्ही पक्षांचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. त्यात काँग्रेसचे मल्लिकार्जून खरगे, अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत हे नेते उपस्थित आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री, मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ, किमान समान कार्यक्रमाचा मसुदा या गोष्टींवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचं समजतं."
 
आज सकाळी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक झाली. सगळ्या आमदारांना मुंबईत राहाण्याच्या सुचना दिल्या आहेत, उद्धव ठाकरेंनी आमदारांना सुचना दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंचा निर्णय अंतिम असेल असं शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी यांनी माध्यमांशी बोलतान सांगितलं.
 
या बैठकी आधी काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक झाली. दोन्ही पक्षातील चर्चा संपली असून आता आम्ही शिवसेनेशी मुंबईत चर्चा करणार आहेत. त्यानंतर हा संपूर्ण मसुदा आणि युतीच्या रचनेविषयी माहिती देणार असल्याचं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
 
ते म्हणाले, "काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी संपूर्ण विषयांवर चर्चा केली आहे आणि आमचं पूर्ण एकमत झालं आहे. आम्ही उद्या मुंबईला जाऊन ज्यांच्याबरोबर निवडणूक लढवली त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करू. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करू. सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली की युतीच्या एकूणच रचनेविषयी आम्ही माहिती देऊ."
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीपूर्वी आज सकाळी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. तत्पूर्वी काल या दोन पक्षांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. सहा तास झालेल्या या चर्चेनंतर अनेक मुद्द्यांवर चर्चा सहमती झाली असल्याची माहिती काल पृथ्वीराज चव्हाणांनी प्रसारमाध्यमांना दिली.
 
दरम्यान, तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये होणार आहे. तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी दाखल झाले आहेत.
 
मात्र भाजप नेते नितीन गडकरी यांनी या तिन्ही पक्षांनी स्थापन केलेलं सरकार टिकणार नाही असं वक्तव्य केलं आहे.
 
भाजपबरोबर जाऊन शिवसेना बिघडली होती - मलिक
"शिवसेनेची निर्मिती धर्माच्या नावावर झाली नव्हती, भाजप बरोबर जाऊन हा पक्ष बिघडला होता," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.
 
अजूनपर्यंत मुख्यमंत्री आणि इतर पदांवर कुठलाही निर्णय झालेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
 
तसंच शिवसेना स्वाभिमान गहाण ठेवून भाजपबरोबर आता जाणार नाही, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काही बातम्या पेरल्या जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
 
आम्ही जनमताचा अनादर केलेला नाही - भाजप
भविष्यात शिवसेना आणि भाजप एकत्र येतील की नाही हे येणारा काळच ठरवेल, असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.
 
"मतदारांनी शिवसेना आणि भाजपला एकत्र कौल दिला होता, भाजप-शिवसेनेचंच सरकार व्हावं असंच लोकांना वाटतं. पण तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार बनतंय त्याची विचारधारा वेगवेगळी आहे, पुढे पाहूया लोक काय प्रतिक्रिया देतात ते. आम्ही जनादेशाचा अनादर केलेला नाही," असं दानवे यांनी म्हटलं आहे.
 
पाच वर्षं शिवसेनेचाच मुख्यमंत्री - संजय राऊत
पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, त्यावर तिन्ही पक्षांची सहमती आहे. कुणी वेगळी ऑफर दिली असेल तर त्यांचा सेल संपलेला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
 
आता कुणी इंद्राचं आसन दिलं तर ते आम्हाला नको, असं त्यांनी भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफरच्या चर्चेच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलंय.
 
"मी शिवसैनिक म्हणून काम केलं आहे, सर्वांची इच्छा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटतं," असं राऊत यांनी त्यांच्या नावाच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेबाबत उत्तर देताना म्हटलंय.
 
शिवसेना आमदारांची बैठक
शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सहमती झाल्यानंतर आज अधिकृत घोषणा करतील अशी शक्यता आहे. तिन्ही पक्षांनी एकत्रित पाऊल टाकलं तर सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.
 
रात्री उशीरा शरद पवार यांची त्यांच्या मुंबईच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सकाळी 10 वाजता शिवससेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे.
 
गेल्या आठवड्यात मंगळवारी काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तासभर चर्चा झाल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातम्यांमध्ये शिवसेनेने स्वतःसाठी मुख्यमंत्रिपद आणि दोन्ही काँग्रेससाठी उपमुख्यमंत्रिपदं देण्याचा फॉर्म्युला सुचवल्याचं प्रसिद्ध झालं होतं.
 
तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये दोनच जागांचे अंतर असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपदही हवे असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सुरुवातीची अडीच वर्षं शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यात यावं असा प्रस्ताव दोन्ही काँग्रेसने दिल्याचं सांगण्यात येतं होतं. त्यावर शिवसेनेने आतापर्यंत स्पष्ट प्रतिसाद दिलेला नव्हता.
 
गुरुवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मागणी होत असल्याचं आपल्याला माहिती नाही असं सांगितलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फर्टाडोज स्कूल ऑफ म्युझिक ने आयएएन फंडच्या साह्याने केली २० करोड रुपयांची गुंतवणूक