Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिमला करार: बेनझीर भुट्टोंना पाकिजा सिनेमा का पाहावा लागला?

Webdunia
गुरूवार, 2 जुलै 2020 (15:12 IST)
रेहान फझल
बरोबर 41 वर्षांपूर्वी भारत आणि पाकिस्तान या सख्ख्या शेजाऱ्यांमध्ये 'सिमला करार' झाला होता. त्यावेळी या करारापेक्षा चर्चा बेनझीर भुत्तो यांचीच होती. बेनझीर आपल्या वडिलांबरोबर त्यावेळी आल्या होत्या.
 
1972 साली भारत-पाकिस्तान शिखर बैठकीला बेगम भुत्तो या झुल्फिकार अली भुत्तो यांच्याबरोबर सिमल्याला येणार होत्या. मात्र ऐनवेळी त्यांची तब्येत बिघडली. म्हणून झुल्फिकार यांनी अमेरिकेहून सुट्टीसाठी आलेल्या 19वर्षीय बेनझीरला म्हणजेच लेकीला घेऊन आले.
 
बेनझीर यांनी आत्मचरित्रात 'डॉटर ऑफ ईस्ट' लिहिलं आहे की, विमानात बाजूला बसलेलं असताना वडिलांनी भारतात जाताना काय काय सांगितलं ते सविस्तरपणे लिहिलं आहे. 'भारत दौऱ्यावर तुला जराही हसायचं नाहीये' असं वडिलांनी निक्षून सांगितल्याचं बेनझीर यांनी म्हटलं आहे.
 
बाबा म्हणाले, पाकिस्तानचे 93,000 युद्धकैदी असूनही बेनझीर खूश आहे, आनंदी आहे, असं भारतीयांना वाटायला नको.
 
पण तू दु:खीही दिसायला नकोस. कारण नाहीतर पाकिस्तान गटात औदासीन्य असल्याचा संकेत भारतीयांना मिळेल.
 
बेनझीर यांनी वडिलांना विचारलं की मी नेमकी कशी दिसायला हवी? झुल्फिकार म्हणाले- तू आनंदी दिसायला नकोस आणि दु:खीही दिसायला नकोस. बेनझीर म्हणाल्या हे तर खूप कठीण आहे. झुल्फिकार म्हणाले- अजिबातच नाही.
 
इंदिरा गांधींना आला राग
सिमल्याला हिमाचल भवनमध्ये भुत्तो आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं आदरातिथ्य कसं होणार आहे? सगळं नीट जागेवर आहे ना... त्याचा आढावा घेण्यासाठी म्हणून इंदिरा गांधी एक दिवस आधीच सिमल्याला पोहोचल्या.
 
इंदिरा गांधी यांचे सचिव पी.एन. धर लिहितात, भुत्तो यांच्या खोलीत स्वत:चा फोटो पाहून इंदिराजींची आग मस्तकात गेली. त्यांनी तातडीने तो फोटो काढून टाकायला लावला. पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षावर माझी सदैव नजर आहे असा संदेश जाऊ शकतो असं त्या म्हणाल्या.
 
भुत्तो यांच्यासाठीच्या टॉयलेटचीही त्यांनी पाहणी केली. टॉयलेटमधील सर्व वस्तू भारतीय असल्याचं पाहून त्यांना बरं वाटलं. धर आपल्या 'इंदिरा गांधी, द इमर्जन्सी अँड इंडियन डेमोक्रसी' या पुस्तकात लिहितात, इंदिराजी असं म्हणाल्या की भुत्तो यांना भारतीय अर्थव्यवस्था सक्षम आणि नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वावलंबी असल्याचं कळायला हवं.
 
बेनझीर यांनी लिहिलं आहे की सिमल्याला हेलिपॅडवर उतरताच इंदिरा गांधी यांची कुडी लहानशी आहे या गोष्टीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. एकमेकांची भेट झाल्यावर बेनझीर म्हणाल्या, अस्सलामवालेकुम. इंदिराजी हसल्या आणि म्हणाल्या- नमस्ते.
 
बेनझीर यांच्या सौंदर्याचा परिणाम
बेनझीर यांचे स्वीय सचिव खालीद हसन लिहितात, सिमल्यामध्ये बेनझीर यांच्याविषयी प्रचंड लोकप्रियता अनुभवायला मिळाली, तेवढी झुल्फिकार यांच्यासाठीही नव्हती. बेनझीर जिथे जात तिथे लोक त्यांना गराडा घालत.
 
बेनझीर एक दिवस सिमल्याच्या मॉल रोडवर खरेदीसाठी बाहेर पडल्या. चहूबाजूंनी लोकांनी त्यांना घेरलं. प्रत्येकाला त्यांना भेटायचं होतं, बोलायचं होतं. पण बेनझीर यांनी खालीद यांना कोणालाही भेटीची परवानगी न देण्याविषयी सांगितलं होतं.
 
अपवाद फक्त भारतीय पत्रकार दिलीप मुखर्जी यांचा. कारण मुखर्जी यांनी झुल्फिकार यांचं चरित्र लिहिलं होतं.
 
मुखर्जी खालीद यांना म्हणाले, बेनझीर यांच्याच वयाच्या माझ्या मुलीला त्यांना भेटायचं आहे. खालीद यांनी यासंदर्भात बेनझीर यांना विचारलं. बेनझीर खालीद यांना म्हणाल्या, तुम्ही स्वत: तिथे उपस्थित राहणार असाल तर मुखर्जी यांच्या मुलीला भेटण्याची परवानगी द्या.
 
मुखर्जी त्यांच्या मुलीला घेऊन आले. मात्र बेनझीर यांनी त्यांच्या मुलीकडे ढुंकूनही लक्ष दिलं नाही. वडिलांच्या चरित्रात काही गोष्टी चुकीच्या लिहिल्याप्रकरणी त्यांनी मुखर्जी यांना सुनावलं.
 
बेनझीर यांनी उसने आणले होते कपडे
खालीद लिहितात, भारतीयांना असं वाटत होतं की बेनझीर यांनी त्या काळचा हिट चित्रपट पाकीजा पाहावा. बेनझीर यांना हा चित्रपट पाहण्यात काहीही स्वारस्य नव्हतं. मात्र चित्रपट पाहायला नकाराचा अर्थ शिष्टाचाराचा अनादर केल्यासारखा होईल हे लक्षात आल्यावर बेनझीर यांनी खालीद यांच्याबरोबर मॉल रोडवरच्या सिनेमागृहात हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी झुल्फिकार यांच्यासाठी प्रसिद्ध अशा पुस्तकांच्या दुकानातून काही पुस्तकं खरेदी केली.
 
भारतीय प्रसारमाध्यमांचं आपल्या कपड्यांवरच लक्ष आहे याचा बेनझीर यांना आश्चर्य आणि अस्वस्थ वाटत होतं. मात्र कोणालाही माहिती नव्हतं की बेनझीर यांनी या दौऱ्यासाठी सगळे कपडे सामिया नावाच्या मैत्रिणीच्या बहिणीकडून उसने आणले होते.
 
बेनझीर यांच्याकडे अमेरिकेतले टी शर्ट्स आणि जीन्स हे कपडे होते. हॉवर्ड विद्यापीठात शिकत असताना त्या याच पेहरावात असत. दुसरीकडे झुल्फिकार आणि त्यांच्या शिष्टमंडळाला भारतीय प्रसारमाध्यमांचं लक्ष बेनझीरकडे का आहे याचं कोडं उलगडेना.
 
इंदिराजींनी झाली स्वत:ची आठवण
भुत्तो यांनी स्वत:च त्याचं उत्तर दिलं. बेनझीरवर लक्ष केंद्रित करून भारताला गंभीर मुद्यांवरून लक्ष वळवायचं होतं.
 
बेनझीर यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, एका गोष्ट मला अस्वस्थ करत होती ती म्हणजे भोजनादरम्यान इंदिरा गांधी सगळा वेळ मलाच पाहत होत्या.
 
तणाव दूर करण्यासाठी बेनझीर यांनी इंदिरा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी हो- नाही मध्येच उत्तर दिलं. त्यांना कदाचित लहानपणीची इंदिरा आठवत असेल, जेव्हा त्या वडील जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर शिखर संमेलनांना जात असत. कदाचित इंदिरा यांना बेनझीरमध्ये स्वत:ला पाहिलं असेल.
 
अचानक 2 जुलैला भुत्तो यांनी पॅकिंग करायला घ्या असं सांगितलं. उद्या आपण पाकिस्तानला परत जाणार आहोत असं झुल्फिकार यांनी सांगितलं. बेनझीर यांनी विचारलं, करार न होताच परत जायचं?
 
झुल्फिकार म्हणाले, हो, करार न करताच जायचं.
 
भुत्तो यांची शेवटची खेळी
संध्याकाळी भुत्तो आणि इंदिरा गांधी यांची औपचारिक भेट होणार होती. रात्री पाकिस्तानच्या शिष्टमंडळातर्फे भारतीय प्रतिनिधींकरता भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं.
 
झुल्फिकार यांनी बेनझीरला सांगितलं, कोणाला काही सांगू नकोस. या बैठकीत मी इंदिरा गांधी यांच्यासमोर शेवटची चाल खेळणार आहे.
 
थोड्या वेळात झुल्फिकार परत आले, त्यांचा चेहरा उजळला होता. ते म्हणाले, आता असं वाटू लागलं आहे की करार होईल (अब लगने लगा है की इंशाअल्लाह समझौता हो जाएगा)
 
झुल्फिकार यांनी बेनझीरला सांगितलं की तणावादरम्यान इंदिरा आपल्या हँडबॅगशी खेळत होत्या. गरम चहाचा घोट त्यांच्या जिभेला आवडलेला नाही हेही त्यांनी दाखवून दिलं. त्यावेळी त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. अर्धा तास बोलणी सुरू राहिली. रात्रीच्या जेवणानंतरही दोन्ही नेत्यांदरम्यान बोलणी सुरूच राहिली.
 
मुलगा झाला, मुलगा
पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने सांकेतिक भाषा ठरवली होती. करार झाला तर मुलगा झाला असं सांगण्यात येईल आणि करार होऊ शकला नाही तर मुलगी झाली असं बोललं जाईल.
 
रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी बेनझीर त्यांच्या खोलीत होत्या. तेवढ्यात त्यांच्या कानावर आवाज आला, मुलगा झाला.
 
त्या खालच्या दिशेने धावत निघाल्या. तिथे पत्रकार आणि कॅमेरामनची झुंबड उडाली होती. त्या पुन्हा खोलीत येईपर्यंत झुल्फिकार अली भुत्तो आणि इंदिरा यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्यादेखील केल्या होत्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments