श्रीलंकेत रविवारी झालेल्या बाँबस्फोटात जीव गमावणाऱ्यांची संख्या 349 झालीय. पीडित कुटुंबीयांनी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या आप्तेष्टांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली आहे. दुःखाच्या या वातावरणात एका चर्चचे पादरी फादर स्टेनली यांनी हल्ल्याच्या आधी संशयित हल्लेखोराशी त्यांचं जे बोलणं झालं त्याविषयी बीबीसीशी बातचित केली.
फादर स्टेनली आणि कथित हल्लेखोर यांचा श्रीलंकेतल्या मट्टकाल्लापू भागातील सियोन चर्चमध्ये सामना झाला. या चर्चमध्ये झालेल्या बाँबस्फोटात 26 जणांचा मृत्यू झाला. यात बहुतांश मुलं होती.
'मी त्याच्याशी बोललो होतो'
फादर स्टेनली सांगतात, "आमचे पेस्टर (पादरी) परदेशात आहेत. असिस्टंट पेस्टरही नव्हते. त्यामुळे त्यांनी माझी अनेकांशी भेट घालून दिली. कदाचित त्या हल्लेखोराशीदेखील ज्याने तो स्फोट घडवला."
"मी त्याच्याशी बोललो होतो. मी त्याला चर्चच्या आत बोलावलं. त्याने नकार दिला आणि म्हणाला त्याला एक फोनकॉल येणार आहे. कॉल आल्यावर त्याला बोलायचं आहे."
'त्याने सर्विस सुरू होण्याची वेळ विचारली'
फादर स्टेनली सांगतात, "आमचं ऑफिस चर्चच्या समोर आहे. तो तिथेच उभा होता. त्याने मला विचारलं की सर्विस कधी सुरू होणार. मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि त्याला पुन्हा चर्चमध्ये बोलावलं. आम्ही नेहमीच सर्वांचं स्वागत करतो."
"त्याच्या खांद्यावर एक बॅग होती. समोर कॅमेरा बॅगेसारखी दुसरी बॅग होती. त्यावेळी मला त्याच्या हेतूची कल्पना नव्हती. हे काम त्यानेच केलं आहे, असं अनेक मुलं म्हणत आहेत."
"सर्विस सुरू झाल्यावर मी आत गेलो. त्यानंतर दोन-तीन मिनिटातच त्याने बाहेर स्फोट घडवला. चर्चच्या आत बाँम्बस्फोट झाला नाही. अनेक मुलं संडे क्लासनंतर चर्चबाहेर पाणी पिऊन नंतरच चर्चमध्ये येतात. ती मुलं आणि इतर अनेक माणसं चर्चच्या आत येत होती. त्याचवेळी बाँबस्फोट झाला."
स्फोटांनंतर काय?
फादर स्टेनली सांगतात की चर्चबाहेर बाँबस्फोट झाल्यानंतर सगळीकडे कोलाहल सुरू झाला.
ते सांगतात, "स्फोटानंतर गाड्या आणि जनरेटरला आग लागली. आगीमुळे स्फोटात जखमी झालेल्या अनेकांना आम्हाला मदत करता आली नाही. केवळ काही मुलांना बाहेर काढलं."
'पुन्हा एक स्फोट झाला'
फादर स्टेनली यांच्या मते त्यांच्या चर्चमध्ये दोन बाँबस्फोट झाले.
ते सांगतात, "आम्ही लोकांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आम्हाला स्फोटाचा आवाज ऐकू आला आणि सगळं आगीच्या भक्षस्थानी पडलं. कोण जिवंत आहे, कोण ठार झालं, याकडे आमचं लक्षच नव्हतं. आम्ही फक्त पळत होतो. या धावपळीत माझी पत्नी आणि मुलगाही हरवला. मी त्यांना शोधू लागलो. ते एका हॉस्पिटलमध्ये सापडले. या हल्ल्यात अनेक निर्दोष आणि लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. एवढंच आम्हाला ठाऊक आहे."
इस्लामिक स्टेटने त्यांच्या 'अमाक' या पोर्टलवर हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. मात्र, अशा एखाद्या अतिरेकी हल्ल्यानंतर आयसिस हल्लेखोरांचे फोटो प्रकाशित करून ताबडतोब हल्ल्याची जबाबदारी स्वीकारतो. त्यामुळे त्यांच्या या दाव्याची सत्यता पडताळली जाऊ शकत नाही.
श्रीलंकेत झालेल्या आत्मघातकी साखळी बाँबस्फोटानंतर जबाबदारी स्वीकारण्याचा जो दावा करण्यात आला आहे, तो खरा असल्याचा कोणताच पुरावा नाही. श्रीलंका सरकारने स्थानिक कट्टरतावादी गट असलेल्या नॅशनल तौहिद जमात या संघटनेचं नाव घेतलं आहे. तर या स्फोटांसाठी आंतरराष्ट्रीय नेटवर्कची मदत घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आतापर्यंत 38 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यातल्या 26 जणांना सीआयडीने, तिघांना दहशतवादविरोधी पथकाने आणि 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी फक्त 9 जणांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. हे 9 जण वेल्लमपट्टीतल्या एका फॅक्ट्रीमध्ये काम करतात.