Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोष्ट 30 वर्षांपूर्वी पुरात वाहून गेलेल्या जांभुळपाड्याची

story of Blackberry tree
- जान्हवी मुळे
"पाणी खोलीत शिरून गाद्या तरंगायला लागल्या, तेव्हा आम्हाला जाग आली. घरात एकदम नऊ दहा फूट पाणी वाढलं, तेव्हा पत्नीचा हात माझ्या हातातून सुटला."
 
तीस वर्षांनंतरही ती काळरात्र जनार्दन पाटील यांना अगदी स्पष्ट आठवते. 24 जुलै 1989 पहाटे महाराष्ट्राला पावसानं झोडपलं. तेव्हा रायगड जिल्ह्यातल्या अंबा नदीला पूर आला होता आणि सुधागड तालुक्यातलं जांभूळपाडा हे गाव जवळपास वाहून गेलं होतं.
 
रायगडच नाही तर महाराष्ट्रातल्या चौदा जिल्ह्यांना तेव्हा वादळी पावसाचा फटका बसला आणि दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला, असं सरकारी आकडेवारी सांगते. एकट्या जांभूळपाड्यातच त्या रात्री शंभरहून अधिक जणांनी जीव गमावला.
 
जनार्दन पाटील त्यावेळी जांभूळपाड्यातल्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करायचे. ते सांगतात, "1977 पासून मी जांभूळपाड्यात राहायला आहे. त्याआधी असा पाऊस कधी पाहिला नव्हता. 23 तारखेला रविवार होता. आम्ही मुंबईच्या नातेवाईकांकडे गेलो होतो, तिथून संध्याकाळी साडेसात वाजता जांभूळपाड्याला परतलो. त्यावेळी फारसा पाऊस नव्हता. नदीपात्रातले खडकही आम्हाला दिसत होते."
 
तीस वर्षांपूर्वीची काळरात्र
रात्र पडू लागली तसा पावसाचा जोर वाढला. गाव गाढ झोपेत असतानाच, दोन अडीचच्या सुमारास पाणी एकदम गावात शिरलं आणि पाहता-पाहता गाव पाण्याखाली गेलं. काही भागांत तर नऊ-दहा फुटांवर पाणी वाहात होतं.
 
"मी पत्नीला शोधत होतो, पाठीवर माझा मुलगा होता. ती काही आम्हाला सापडली नाही. पण अडसर म्हणून मला एक झाड सापडलं. त्या झाडावर आम्ही साधारण सहा-सात तास पाण्यात होतो. सकाळी नऊ वाजता आम्हाला तिथून बाहेर काढण्यात आलं. अकराच्या सुमारास मला माझ्या पत्नीचं प्रेत सापडलं," ते सांगतात.
 
पाटील यांची आई आणि भाचीही भिंतीच्या आधारानं वाचल्या. पण त्यांचं राहतं घर पूर्णपणे वाहून गेलं होतं. गावातल्या बहुतांश घरी अशीच अवस्था होती.
 
वासुदेव अभ्यंकर त्यावेळी गावचे उपसरपंच होते. उंचावर असलेल्या त्यांच्या घरातही गळ्यापर्यंत पाणी शिरलं होतं. "लाईट गेलेले होते, वीज चमकली, तर सगळीकडे फक्त पाणीच पाणी, दुसरं काही दिसत नव्हतं. सकाळी सहा वाजता पाणी थोडं कमी व्हायला लागलं. उजाडल्यावर आणि पाणी ओसरल्यावर कळलं, गावातली बरीचशी घरं, माणसं वाहून गेलेली. गावात यायला रस्ताही राहिला नव्हता."
 
मूळचे जांभूळपाड्याचे पण तेव्हा डोंबिवलीला राहणारे गंगाधर केळकर त्या दिवशी गावात नव्हते. पण त्यांनी नुकतंच बांधलेलं घर त्या पुरात वाहून गेलं. "सकाळी दूरदर्शनवर बातमी कळली की, जांभूळपाडा वाहून गेलं. मी लगेच माझ्या मुलाबरोबर निघालो. इथे आलो, तर गाव संपूर्ण उद्ध्वस्त झाला होतो. माझ्या घराचं जेमतेम जोतं शिल्लक राहिलं होतं, त्याचाही वरचा थर वाहून गेला होता. सगळीकडे चिखल झाला होता".
 
परिस्थिती किती बिकट होती ते जनार्दन पाटील सांगतात. "संपूर्ण गावात पूर आला होता. कुंभार आळी, बाजारपेठ, असा गावाचा मधला पट्टा सगळाच वाहून गेला होता. वीजेचे खांब कोलमडून पडले होते. प्यायला पाणी नव्हतं. गुरं मरून पडली होती. गावात सगळीकडे दुर्गंधी पसरली होती."
story of Blackberry tree
पुन्हा उभं राहिलं गाव
पण पुरानंतरही खचून न जाता, जांभूळपाड्यातले लोक एकत्र जमा झाले आणि त्यांनी एकमेकांना मदत करण्यास सुरुवात केली. शासन, प्रशासन आणि सामाजिक संस्थांनीही जांभूळपाड्याकडे धाव घेतली आणि मदतीचा ओघ सुरू झाला.
 
बाहेरून येणारे लोक आणि मदत गावापर्यंत पोहोचावी यासाठी आधी रस्ता नीट करण्यात आला. गावांत तेव्हा अठराशे माणसं राहायची, 117 जण वाहून गेले. त्यातल्या 115 जणांचे मृतदेह सापडले, अशी माहिती वासुदेव अभ्यंकर देतात. "प्रवीण परदेशी यांची तेव्हा फ्लड कलेक्टर म्हणून जांभूळपाड्याला नेमणूक झाली होती. तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे चाळीस विद्यार्थीही मदतीसाठी महिनाभर जांभूळपाड्यात राहिले होते."
 
शाळेत मदतकेंद्र स्थापन करण्यात आलं. तिथेच मदत स्वीकारली जायची आणि तिचं वाटपही तिथूनच व्हायचं. अभ्यंकर सांगतात, "मदत द्यायला यायचे त्यांना आम्ही सांगायचो, पैसे नाही, वस्तूंच्या स्वरूपात मदत द्या. पैसे घेऊन काही आणायचं तर कुठून आणणार? मुंबई-पुण्यात राहणारे गावाकडचे लोक, गावकरी सर्वजण एकत्र आले. आपसातले हेवेदावे विसरून गावाचं पुनर्वसन कसं होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. नाना बोडस, दत्तूअण्णा दांडेकर, अनंतराव शिंत्रे अशा गावातल्या ज्येष्ठांनी पुढाकार घेतला."
 
आज तीस वर्षांनंतर जांभूळपाड्यात फिरताना त्या आपत्तीच्या खुणाही फारशा दिसत नाहीत. गावात अनेक नवी घरं बांधली आहेत, इमारतीही उभ्या राहिल्या आहेत. इथं तीन वृद्धाश्रम, गुरुकुलसारखी निराधार मुलांना आश्रय देणारी संस्था उभी राहिली आहे. पण गावावर ओढवलेल्या त्या संकटाला गावकरी विसरलेले नाहीत.
 
पुरात वाहून गेलेल्यांच्या स्मरणार्थ इथं एक स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे आणि दरवर्षी 24 जुलैला गावकरी तिथं श्रद्धांजली देण्यासाठी जमा होतात.
 
'ती नैसर्गिक आपत्तीच होती'
खोपोली-पाली रस्त्यावर अंबा नदीवरच्या पुलाजवळ जांभूळपाडा वसलं आहे. लोणावळ्याच्या डोंगररांगेतून उगम पावणारी ही नदी जांभूळपाड्यावरून पुढे पाली, नागोठणेमार्गे वाहात जाते आणि धरमतरच्या खाडीला जाऊन मिळते. 1989 साली पूर आला, तेव्हा या बाकीच्या गावांत आणि मुखाजवळच्या भागातही मोठं नुकसान झालं.
 
हवामानखात्याच्या रेकॉर्ड्सनुसार महाराष्ट्रात आणि विशेषतः रायगड ते मुंबई परिसरात सगळीकडेच त्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाला होता. जांभूळपाड्यापासून चाळीसएक किलोमीटवर भिरा इथं त्यावेळी 710 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तुलनाच करायची असेल तर, 26 जुलै 2005 साली मुंबईत 944 मिलिमीटर पाऊस पडला होता, हे लक्षात घ्यायला हवं.
 
अभ्यंकर सांगतात, "अनेकांना वाटलं की धरणाचं पाणी नदीत सोडल्यानं पूर आला. पण तसं काही नव्हतं. फ्लड कलेक्टर परदेशींसह आम्ही गावातले काहीजण नंतरच्या काळात नदीच्या उगमापर्यंत जाऊन तपासूनही आलो. ढगफुटी होऊन पूर आला, त्याच वेळी भरती होती, त्यामुळं खाडीनं ते पाणी घेतलं नाही. ही नैसर्गिक आपत्तीच होती."
 
जांभूळपाड्यात त्याआधीही पूर आले होते, आणि तेव्हा गावाच्या काही भागांत नदीचं पाणी शिरायचं. पण अंबा नदीचा पूर किती घातक ठरू शकतो, हे 1989 साली पाहायला मिळालं. पण त्या पुरानंतर गावातले लोक आणखी जागरूक झाले.
 
पुराच्या छायेतलं गाव
1989च्या पुरानंतर अंबा नदीचं पाणी गावात शिरू नये यासाठी संपूर्ण गावाच्या काठाला संरक्षक भिंत उभारण्यात आली. त्यामुळं पाणी एकदम गावात शिरण्याचा धोका कमी झाला.
 
नदीतला गाळ काढण्यात आला आणि पात्रातले मोठे खडक फोडून पात्र रुंद करण्यात आलं. त्यामुळं पाणी लवकर पुढे वाहून जाऊ लागलं.
 
जांभूळपाड्यात अजूनही नदीला पूर येतो, कधीकधी पूल ओलांडून पाणी वाहू लागतं. पण ते गावात फारसं शिरत नाही. शिरलं तरी फार नुकसान होत नही.
 
2005 साली 26 जुलैला पूर आला, तेव्हाही पाणी गावात शिरलं होतं, पण काही वेळातच त्याचा निचरा झाला असं गावकरी सांगतात.
 
संपर्काच्या सुविधाही वाढल्यानं गावातले लोक आता निर्धास्त झाले आहेत. पण पावसाच्या दिवसांत पाण्याच्या पातळीवर ते नजर ठेवून असतात. जनार्दन पाटील सांगतात, "पुराच्या वेळेस लोकांनी सावध राहायला हवं, जागं राहायला हवं. शेजारी-पाजारी समूहानं एकत्र राहायला हवं म्हणजे एकमेकांची मदत करता येऊ शकते."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्नाटक: कुमारस्वामी सरकार कोसळलं, भाजपच्या हालचालींना वेग