भाजपचे माजी मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील कायद्याच्या विद्यार्थिनीवर लैंगिक छळ प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
कोण आहेत स्वामी चिन्मयानंद? आणि त्यांचं साम्राज्य कसं पसरलं यावर बीबीसी हिंदीचा हा वृत्तांत.
उत्तर प्रदेशात स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. काय घडलंय यावेळेस?
"स्वामी चिन्मयानंद यांनी माझ्या असहायतेचा फायदा घेत आंघोळ करताना माझा एक व्हीडिओ चोरून बनवला. त्याच्या जोरावर ब्लॅकमेल करत माझ्यावर बलात्कार केला. त्याचाही एक व्हीडिओ बनवून एक वर्ष माझं शोषण केलं. मला वाटतंय त्यांना असंच उत्तर द्यायला हवं. कारण त्यांच्याशी लढा देण्याएवढं सामर्थ्य माझ्यात नाहीये."
भाजपचे माजी मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी शाहजहांपूर लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनी तिची बाजू मांडत होती. याप्रकरणी गेलं वर्षभर ती शांत बसून नव्हती, तर स्वामी चिन्मयानंद यांच्यावर काय कारवाई करता येईल यावर मार्ग शोधण्यासाठी धडपडत होती.
बीबीसीसोबत बोलताना या मुलीनं सांगितलं, "मी लॉचं शिक्षणही त्याच कॉलेजमधून घेतलं आहे. मात्र तोपर्यंत मला काहीच माहीत नव्हतं. एलएलएममध्ये अॅडमिशन घेण्यासाठी कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या सांगण्यानुसार मी चिन्मयानंदांना भेटले. त्यानंतरच त्यांचा खरा चेहरा माझ्यासमोर आला. शहाजहांपूरमध्ये मी प्रशासन किंवा पोलिसांकडे तक्रार करू शकत नव्हते. कारण ते स्वतःच आश्रमात त्यांचा आशीर्वाद घ्यायला जायचे. माझ्या मित्रानं मला ही गोष्ट सुचवली आणि मग ऑनलाइन कॅमेरा मागवून व्हीडिओ तयार केला."
सध्या स्वामी चिन्मयानंदांवर मुलीचं अपहरण आणि तिला धमकी देण्याचा आरोप आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार SIT तपास करत आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मात्र बलात्काराचा एफआयआर दाखल झालेला नाही.
गेल्या चार दिवसात एसआयटीच्या टीमनं मुमुक्षु आश्रमात जाऊन स्वामी चिन्मयानंदांची चौकशी केली आहे. त्यांचा मोबाईल फोनही एसआयटीनं जप्त केला असल्याचं सांगितलं जात आहे. तपासाच्या पहिल्या दिवशी चिन्मयानंद यांची खोलीही सील करण्यात आली होती. मात्र काही सामान ताब्यात घेतल्यानंतर एसआयटीनं ती खोली पुन्हा उघडली.
दुसरीकडे पीडित मुलगी आणि तिच्या वडिलांना पुरावे म्हणून 43 नवीन व्हीडिओ एसआयटी टीमला दिले आहेत. स्वामी चिन्मयानंद यांनी आपल्यावर वारंवार बलात्कार केला असल्याचं सिद्ध करणारे सबळ पुरावे असल्याचा दावा पीडित मुलीनं बीबीसीशी बोलताना केला. मुलीनं दिलेल्या माहितीनुसार इतर मुलींचंही शोषण झालं असल्याचे पुरावे तिच्याकडे आहेत.
स्वामींनी भेटायला दिला नकार
स्वामी चिन्मयानंदांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी भेटायला आणि माध्यमांशी संवाद साधायला स्पष्ट नकार दिला. मात्र त्यांचे प्रवक्ते आणि वकील ओम सिंह यांनी त्यांच्यावतीनं उत्तरं दिली.
त्यांनी सांगितलं, "स्वामीजींची प्रतिमा खराब करण्याचा आणि सामाजिक पातळीवर त्यांची बदनामी करण्याचा हा कट आहे. एसआयटीच्या चौकशीमध्ये सत्य समोर येईलच."
स्वामी चिन्मयानंद माध्यमांसोबत बोलत नसले तरी ते सध्या ते मुमुक्षु आश्रमाच्या परिसरातच राहत आहेत. एसआयटीनं त्यांना शाहजहांपूरमधून बाहेर पडण्यास मनाई केली आहे. शनिवारी (14 सप्टेंबर) स्वामी चिन्मयानंद यांनी मुमुक्षु आश्रमातर्फे चालविण्यात येणाऱ्या सर्व पाच शिक्षण संस्थांना भेट दिली आणि तिथल्या कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.
दरम्यान, एसएस लॉ कॉलेज गुरुवारी (12 सप्टेंबर) बंद ठेवण्यात आलं होतं. यामागचं नेमकं कारण सांगितलं नाही. मात्र चिन्मयानंद तसंच इतर लोकांच्या चौकशीसाठी एसआयटीची टीम वारंवार कॅम्पसमध्ये येत असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जातं होतं. सोमवारी (16 सप्टेंबर) कॉलेज पुन्हा सुरू होईल अशी सूचना गेटवर लावण्यात आली होती.
कॉलेज कॅम्पसमध्ये भेटलेल्या काही विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न आम्ही केला. तेव्हा ही मुलं मोकळेपणानं बोलायला तयार नव्हती. मात्र कॅमेरा आणि रेकॉर्डर बाजूला केल्यानंतर काहीशा उदासपणेच त्यांनी भावना व्यक्त केल्या. इतिहास या विषयात एमए करणाऱ्या एका विद्यार्थ्यानं खूप उदासपणे सांगितलं, की आमच्या कॉलेजचे सर्वेसर्वा आणि सर्वांत आदरणीय व्यक्तीला आता अशा कृत्यासाठी ओळखलं जातंय. याचं वाईट वाटतंय.
कॉलेजच्या प्रतिमेवर परिणाम
एसएस पीजी कॉलेजच्या काही प्राध्यापकांनी आम्हाला सांगितलं, की विद्यार्थी या प्रकरणाबद्दल एकमेकांमध्ये चर्चा करतच आहेत.
पण आमचे विद्यार्थी जेव्हा अगदी चवीचवीनं या विषयावर आम्हाला विचारायला येतात तेव्हा खूप वाईट वाटतं, असं या प्राध्यापकांनी म्हटलं.
एसएस पीजी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अवनीश मिश्र, लॉ कॉलेजचे व्यवस्थापही आहेत. या सर्व घटनांचा मुमुक्षु आश्रमातर्फे चालविल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचं डॉक्टर मिश्र यांनीही मान्य केलं. मात्र लवकरच सर्व काही ठीक होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉक्टर अवनीश मिश्र यांनी सांगितलं, "जेव्हा असे वाद समोर येतात तेव्हा स्वाभाविकपणे आपल्या नैतिकतेला धक्का लागतो. मात्र हा ग्रहणकाळ लवकरात लवकर सरेल अशी आशा मला आहे. "
शाहजहांपूरमध्ये बरेली रोडवर असलेल्या मुमुक्षु आश्रमातील परिसरातच पाच शिक्षण संस्था चालविल्या जात आहेत. स्वामी चिन्मयानंद 1989 साली मुमुक्षु आश्रमाचे अधिष्ठाता बनले आणि त्यानंतर इथून चालविल्या जाणाऱ्या सर्व शिक्षण संस्थांचे प्रमुखही. जवळपास 21 एकर परिसरात पसरलेल्या आश्रमातच स्वामी चिन्मयानंद यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानाला 'दिव्य धाम' असं म्हटलं जातं.
या सर्व संस्थांमध्ये मिळून जवळपास दहा हजार विद्यार्थी शिकतात. समाज कल्याण विभागानं दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दोन वसतीगृह बनविली आहेत. यापैकी एका वसतीगृहातच पीडित विद्यार्थिनी राहत होती.
पीडित मुलीचे कुटुंबिय शाहजहांपूरपासून दोन किलोमीटर अंतरावरच राहतात. त्यामुळेच ती वसतीगृहात का राहात होती असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
स्वामी चिन्मयानंद यांचे प्रवक्ते ओम सिंह सांगतात, "मुलीची आईच स्वामीजींकडे आली होती. आपले पती मुलीला मारहाण करतात आणि अशा वातावरणात ती घरात अभ्यास करू शकत नाही असे सांगत आईनं आपल्या मुलीला वसतीगृहात ठेवून घेण्याची विनंती केली. त्यांनी आर्थिक हालाखीबद्दल सांगितल्यावर स्वामीजींनी या मुलीला कॉलेजमध्ये एक छोटं कामही मिळवून दिलं, जेणेकरून ती आपलं शिक्षण पूर्ण करू शकेल."
पीडित मुलीचे आरोप
पीडित मुलीनं मात्र याच्या बरोबर विरुद्ध माहिती दिली आहे. ती सांगते, "हो, मला कॉलेजमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटरचं काम देण्यात आलं होतं. मात्र कॉलेजचं काम आहे असं सांगून मला अनेकदा जाणीवपूर्वक उशीरापर्यंत थांबवलं जायचं. त्यामुळे मी वसतीगृहातच राहावं असा दबाव स्वामी चिन्मयानंद माझ्यावर आणायला लागले. म्हणून मी वसतीगृहात राहू लागले. नंतर नंतर हे लोक मला जबरदस्ती चिन्मयानंदांकडे घेऊन जायचे."
चिन्मयानंद यांच्यावर याआधीही असे आरोप झाले आहेत ज्यामुळे ते चर्चेत होते. हा स्वामीजींची प्रतिमा बदनाम करण्याचा कट असल्याचं त्यांचे शुभचिंतक आणि प्रवक्ते सांगतात. मात्र शाहजहाँपूरची सर्वसामान्य माणसं स्वामीजींही अशीही प्रतिमा जाणून आहेत.
या मुलीच्या धैर्याचं कौतुक करायला हवं. स्वामी चिन्मयानंदांची अशी वर्तणूक कोणापासूनही लपलेली नाही असं कॉलेजचे माजी विद्यार्थी रामजी अवस्थी यांनी सांगितलं. युवा वर्ग चिन्मयानंदांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे. त्यांना अटक झाल्यावरच ते शांत होतील असं अवस्थी सांगतात.
दुसरीकडे लेखक आणि पत्रकार अमित त्यागी यांना दोन्ही बाजूंपैकी कुणीच पूर्ण सत्य वाटत नाही. दोन्ही बाजूंनी जे व्हीडिओ सादर करण्यात आले आहेत त्यातून दोन्ही बाजूंचं वर्तन लक्षात येतं. याप्रकरणात कायदेशीर निकाल जो लागेल तो लागेल, सामाजिकता आणि नैतिकता लोप पावली हे नक्की.