- सुजाता पाटील
शिक्षिका, अलिबाग (रायगड)
'शिक्षकांचं बरं आहे... त्यांना घरबसल्या पगार मिळतो' असे टोमणे व्हॉट्सअपवर वाचलेल्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना हे पत्र लिहिलं आहे.
प्रिय मुलांनो,
कसे आहात? शाळेची, शिक्षकांची आठवण येते ना? तुमची शाळा, तुमचा वर्ग, त्यातला तुमचा बाक, तुमच्यासोबत बसणारी मैत्रीण किंवा मित्र, शाळेचं ग्राउंड, शाळेतला अभ्यास आणि शाळेतली मजामस्ती, धमाल... सगळं खूप मिस करताय ना?
ऑनलाईन शाळा चालू असेलही, पण त्यात प्रत्यक्ष शाळेची मजा नाही ना? आम्ही शिक्षक आता रोज शाळेत जातोय, पण खरं सांगू, तुमच्याशिवाय, तुमच्या धावपळीशिवाय, गोंगाटाशिवाय शाळा अगदी सुन्यासुन्या आहेत. कुलूपबंद वर्ग आणि मोकळी क्रीडांगणं पाहून आम्हालाही उदास वाटतं.
मला कल्पना आहे तुमच्यापैकी अनेकांनी या काळात खूप अडचणींचा सामना केला आहे. तुम्ही आणि तुमच्या कुटुंबीयांनी करोनाच्या या संकटाला धीराने तोंड दिले असेल, कदाचित फार मोठ्या संकटांना तुम्हाला सामोरे जावे लागले असेल. तुमच्या पालकांचा, नातेवाइकांचा, आजूबाजूच्या सगळ्याच मोठ्या माणसांचा जगण्याचा, तगून राहण्याचा तणावपूर्ण संघर्ष तुम्ही अनेक जण अनुभवत असाल.
तुमच्यापैकी अनेक जण शिक्षणाच्या, करिअरच्या मोक्याच्या टप्प्यावर उभे आहेत आणि पुढे जाण्याचे मार्ग सध्या तरी बंद आहेत. या सगळ्यामुळे तुमचंही मन धास्तावलेलं आहे. आम्हा शिक्षकांना तुमच्या या मनस्थितीची पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुमच्याशी संवाद.
'…घरबसल्या पगार'
'शिक्षकांचे बरं आहे.. त्यांना घरबसल्या पगार मिळतो आहे' हे किंवा अशा अर्थाचे बोलणे तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेकदा ऐकले-वाचले असेल. व्हॉट्सअपवरच्या मेसेजमध्ये शिक्षकांची, शिक्षकी पेशाची खिल्ली उडवली जाते, हेही तुम्ही वाचले असेल. आज शिक्षक दिनानिमित्त तुमच्याशी पत्ररूप संवाद साधताना तुमचे शिक्षक खरंच काय काय कामं करतात हे तुम्हाला आधी सांगावंसं वाटतं.
लॉकडाऊनच्या काळात जेव्हा सर्वजण घरात राहून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य क्षेत्रात काम करणारे सर्वच लोक अक्षरशः स्वतःच्या जिवाची बाजी लावून काम करत होते.
त्यावेळी त्यांच्याइतकाच धोका पत्करून शिक्षक घरोघर जाऊन कोरोनाच्या केसेस नोंद करणे, लोकांच्या होम क्वारंटाईन काळात त्यांची चौकशी करणं, नोंद ठेवणे एवढेच नव्हे तर ग्रामीण भागात घरोघर रेशन पुरवण्याचं काम शिक्षकांनी केलं आहे.
हे करताना अनेक शिक्षकांना स्वतःला कोरोना झाला, बऱ्याच शिक्षकांचा मृत्यूही झाला. तुम्हाला माहिती नसेल कदाचित लॉकडाऊनच्या काळात काही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांना हायवेवरच्या टोलनाक्यांवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची नोंद करणे, त्यांचे परवाना पास तपासणी या कामावर सुद्धा नेमलेले होते.
शिक्षकाला वर्षभरात जवळपास विविध चाळीस नोंदवह्या ठेवावे लागतात. निवडणुकीविषयीचे सर्व काम करणं हा तर आमच्या सेवाशर्तीचा सहभाग असतो. मध्यंतरी ग्रामीण भागात घरोघरी शौचालय आहेत की नाही याचा ही सर्व शिक्षकांना करायला लावला होता.
या 'अशैक्षणिक कामांचा भार कमी करा' या मागणीसाठी शिक्षक, शिक्षक संघटना सातत्याने मागणी करत असतात. तसे आदेश हायकोर्टाने दिले आहेत, पण शासन मात्र त्याची दखल घेत नाही. 'आम्हाला मुलांना शिकवू द्या, वर्गात राहू द्या' अशी मागणी करत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. अशा प्रकारची आंदोलने शिक्षकांनी केलीही आहेत.
ऑनलाईनची धडपड
मागच्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार भारतात सुरू झाला आणि शाळा, कॉलेजेस बंद करावी लागली. तुम्हा मुलांपर्यंत पोहोचणं शिक्षकांना अशक्य झालं आणि ऑनलाईन शिक्षण हे आपल्यासाठी फारशी परिचित, सवयीची नसलेली गोष्ट सुरू झाली.
अनेक शिक्षकांनी चुकत-शिकत का होईना तुम्हा मुलांसाठी ऑनलाईन कंटेंट बनवायला सुरुवात केली. काही जणांनी यूट्यूब चॅनेल सुरू केली. शक्य होतं तिथे यूट्यूब, 'गूगल मीट' सारखी साधने वापरून शिक्षण सुरू केले.
वाड्या-वस्त्यांवर, खेड्यापाड्यात दुर्गम भागात जिथे मोबाईल नेटवर्क नाही अशा ठिकाणी शिक्षक आठवड्यातून एकदा-दोनदा जाऊन मुलांना कृतिपत्रिका देत होते. शासनाने मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत पुरवलेली पुस्तकं मुलांपर्यंत पोहोचावी यासाठी शिक्षकांनी धडपड केली.
ग्रामीण भागात तर बहुसंख्य मुलांचा शिकण्यासाठी स्मार्ट फोनही उपलब्ध होऊ शकत नाही. बऱ्याच शिक्षकांनी त्या मुलांना किमान इतरांनी वापरलेले मोबाईल तरी मिळावेत किंवा स्वयंसेवी संस्थांकडून त्याबाबतीत काही मदत व्हावी यासाठी प्रयत्न केले.
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, हे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे तुम्हाला या वस्तुस्थितीची जाणीव व्हावी की शिक्षणाच्या बाबतीत आपल्या देशात प्रचंड असमानता आहे. एकीकडे मेट्रो सिटीमधल्या पंचतारांकित शाळा आहेत आणि दुसरीकडे डोक्यावर फुटकी कौलं, मोडके पत्रे अशाही शाळा आहेत. बहुसंख्य शिक्षक त्या त्या परिस्थितीत आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम ते द्यावं यासाठी प्रयत्न करत असतात.
मला कल्पना आहे चांगल्या आणि वाईट, कामसू व कामचुकार, अभ्यासू व अज्ञानात सुख मानणाऱ्या - अशा प्रवृत्ती प्रत्येक क्षेत्रात असतात. शिक्षण क्षेत्रातही त्या आहेतच. पण काही ठराविक घटनांवरून, उदाहरणांवरून सगळ्या शिक्षकी पेशाला तुच्छ लेखण्याचा, बदनाम करण्याचा ट्रेंड आलेला आहे ना त्याला तुम्ही बळी पडू नका.
'शिक्षक' नव्हे, आता 'मार्गदर्शक'
तुम्हाला वाटेल की आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी ही सगळी गाऱ्हाणी सांगण्याच्या, तक्रार करण्याच्या सुरात का लिहिते आहे? शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकी पेशाबद्दल सगळे छान, उदात्त, गोडगोड लिहायला हवं पण खरंतर.
पण मुलांनो, तुम्ही या देशाचे भावी नागरिक म्हणून शिक्षकी पेशा आणि शिक्षण क्षेत्राबद्दल जास्त डोळस, जास्त जागरूक व्हायला हवं. शिक्षण क्षेत्रातल्या वास्तवाची जाण तुम्हाला हवी आणि या क्षेत्राचे भविष्य काय आहे याचाही विचार तुम्हाला करायला हवा.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातल्या नात्याचं स्वरूप बदललं आहे, काळानुसार ते बदलायला हवेच. शिक्षकांची भीती, धाक, दहशत वाटण्यापेक्षा त्यांचा आधार, सोबत वाटायला हवी. तुमच्या मनातल्या भावना, तुमची भविष्याची स्वप्नं, तुमची सुखदुःख तुम्हाला त्यांच्यासोबत शेअर करता यायला हवी.
शिक्षक हे तुमच्या शिकण्याच्या प्रवासातले जाणकार सोबती असतात. ते तुम्हाला वाट दाखवू शकतात, पण वाटचाल मात्र तुम्हालाच करायची असते. म्हणूनच शिक्षकी पेशात काम करणाऱ्यांना आता शिक्षक (Teacher) न म्हणता मार्गदर्शक (Mentor) म्हणतात.
एक इंग्लिश वाक्य मला फार आवडतं- The best teachers are those who show you where to look, but don't tell you what to see! ' खरा शिक्षक तुम्हाला कुठे बघायचं ते दाखवेल, पण काय बघायचं ते नाही सांगणार.' उत्तम शिक्षक तुम्हाला दृष्टिकोन देईल, पण दृष्टी मात्र तुम्ही तुमची वापरावी, हे सांगेल.
इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध असलेले प्रचंड भांडार तुम्हाला 'माहिती' नक्की पुरवेल, पण ते 'ज्ञान' नव्हे याचं भान मात्र तुम्हाला चांगला शिक्षकच देऊ शकतो.
शेवटी मनापासून एक सदिच्छा व्यक्त करते: हे करोनाचे संकट लवकर दूर होऊ दे आणि तुम्ही मुलं आणि शिक्षक यांची शाळेत, वर्गात भेट होऊदे! पुन्हा एकदा लवकरच शाळेची घंटा वाजू दे, तुमच्या आवाज आणि खेळण्याने शाळेची इमारत क्रीडांगण फुलून जाऊ दे! तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा!
तुमची,
सुजाता टीचर
(रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील सु. ए. सो. माध्यमिक विद्यालय, कुरूळ याा शाळेत सुजाता पाटील मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.)