Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

उद्धव ठाकरे: मुंबईचे लचके तोडणाऱ्याचे तुकडे तुकडे केले जातील

uddhav thackeray
, शनिवार, 14 मे 2022 (20:52 IST)
"मुंबई आंदण म्हणून मिळालेली नाही, मुंबईचे लचके तोडाल तर तुकडे तुकडे केले जातील", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. वांद्रे-कुर्ला संकुलात सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत आहेत. राज्यभरातून शिवसैनिक या सभेला जमले आहेत.
 
"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिंनींनो . बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरलो आहे. मोकळा श्वास घेतो आहे. महाराष्ट्र म्हणजे काय हे महाराष्ट्रात राहून ज्यांना ओळखता आलेलं नाही त्यांच्यासाठी बोलावं लागतं.
 
खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष होता. ते देशाची दिशा भरकटवत आहेत. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. आमचं हिंदुत्व गदाधारी आहे, बाकीच्यांचं घंटाधारी आहे", असं मुख्यमंत्री म्हणाले.
 
तु पुढे म्हणाले, "मुंबई तोडण्याचा डाव सुरू आहे. तुमच्या 1760 पिढ्या आल्या तरी मुंबई तुटणार नाही. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात जनसंघ होता. बुलेट ट्रेन कोणाला हवेय? मुंबई स्वतंत्र करू, असं खरंच देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मनातलं ओठावर आलं.
 
मुंबईचा लचका तोडण्याचा मनसुबा आहे. एकदाही संघ स्वातंत्र्यलढ्यात उतरला नव्हता. पुरावे असतील तर द्या".
 
"महागाईच्या मुद्यावर बोलत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हिडसंदर्भात कॉन्फरन्स घेतली. मी आयपीएल बघितल्यासारखं बघत होतो. युद्ध कसं सुरू आहे, महागाई सुरू आहे असं बोलले. डिझेल-पेट्रोल दर कमी करा असं बोलले. जीएसटीचं देणं देत नाहीत", असं मुख्यमंत्री म्हणाले.
 
मुंबई ओरबाडण्यासाठी नकोय. आमची युतीची 25 वर्ष सडली. हिंदुत्वाचा भेसूर आणि बेसूर चेहरा समोर येतो आहे. भीषण पद्धतीने अंगावर येत आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत हे शिकवलं जातं का? कधी चिंतन कधी कुंथत बसतात.
 
खोटंनाटं बोललं जातं. आपण खोटं बोलू शकत नाही. खोटं बोलणं हे त्यांच्या हिंदुत्वात बसतं, आपल्या हिंदुत्वात बसत नाही.
 
राहुल भट सरकारी कर्मचारी काश्मिरी पंडित होता. त्याला कार्यालयात येऊन मारलं. नंतर अतिरेक्यांना मारलं. पण आधीच मारायला हवं होतं. काश्मिर फाईल्सचं पुढचं पान आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
 
"संभाजीनगर आहेच, नामांतराची गरजच काय. कोणाला हनुमान चालिसा द्यायची, कोणाला भोंगा द्यायचा, कोणाला औरंगजेबाच्या कबरीवर पाठवायचं. हे काय करणार- टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. काश्मिरी पंडितांना सुरक्षा नाही". किरीट सोमय्यांचा उल्लेख गळकं टमरेल असा केला.
 
"हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का? हिंदुत्व नेसण्याची, सोडण्याची गोष्ट नाही. आम्ही काँग्रेससोबत उघडपणे गेलो. तुम्ही सकाळचा शपथविधी केला. तुम्ही पवित्र, आम्ही अपवित्र. तुमचा शपथविधी यशस्वी झाला असता तर अनिल देशमुख, नवाब मलिक तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते का"? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
 
"नितीश कुमारांनी बिहारमध्ये भोंग्यात पाणी ओतलं. काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद सईदबरोबर सरकार स्थापन केलं होतं", शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे असं बाळासाहेब म्हणाले होते.
 
"काम केल्यानंतर जबाबदारी झटकतो तो नेता नाही. मी होतो असं सांगत का नाही. येण्याची शाश्वती नाही.
 
"बाबरीवेळी होतो असं फडणवीस म्हणाले. तुमचं काय वय होतं. ती काय शाळेची सहल होती. चला चला जाऊया बाबरी पाडायला. तुम्ही तिथे खरंच गेला असता तर तुमच्या वजनाने बाबरी पडली असती", असं
 
वांद्रेत सभा आहे, गर्दी कुर्ल्यापर्यंत आहे. समोरच्या प्रचंड गर्दीत गर्दीत पंचमुखी हनुमान दिसले, भगवान राम, सीता दिसले. भगवान शंकर दिसले. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि आजी दिसली असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
 
डब्ल्यूएचओला धारावी पॅटर्नची दखल घ्यायला लागली असं त्यांनी सांगितलं.
 
"मुंबईचा बाप फक्त शिवसेना. आजची सभा शंभर सभांची बाप असेल. महाराष्ट्र कोणासमोर झुकणार नाही, वाकणार नाही. संघर्षाच्या पुढे जीत आहे. संघर्षाशिवाय कोणताही विजय कुचकामी आहे. आम्हाला संघर्षाची सवय आहे. हिंदुत्वाची लाट, हिंदू महासागराने महाआरती सुरू केली, हनुमान चालिसा म्हणायला सुरूवात केली तर लडाखमधलं सैन्यही माघारी जाईल", असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
 
ते पुढे म्हणाले, "हिंदुत्वाचा पराभव होऊ देणार नाही. संभाजीनगरला तो ओवेसी आला. औरंगजेबाच्या कबरीपुढे नमाज केला. औरंगजेबाला महाराष्ट्राने गाडला. ओवेसी महाराष्ट्रात का येतो? काश्मिरी पंडित हा सरकारी कर्मचारी होता. त्याच्या कार्यालयात अतिरेकी घुसले. त्यांनी त्याचं नाव विचारलं. गोळ्या घालून निघून गेले. काश्मिरी पंडीत हत्येचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला".
 
"याआधी औरंगजेबच्या कबरीपुढे ओवेसी झुकला आहे. ओवेसी 2014 पासून महाराष्ट्रात येतो आहे. यांना आता महाराष्ट्राच्या हिंदुत्वाची आठवण झाली. ओवेसींकडून महाराष्ट्राच्या स्वाभिनाचा अपमान. महाराष्ट्राचा सह्याद्री तेजाने तळपून निघेल. महाराष्ट्राचा सह्याद्री हा हिमालयाच्या बरोबरीने उभा राहील. उध्दवजी आपल्याला भविष्यात देशाचं नेतृत्व करायचं आहे अयोध्येचा दौरा 10 जूनला ठरला होता. पण राज्यसभेची निवडणूक आहे. आता 15 जूनला चलो अयोध्या", असं राऊत म्हणाले.
 
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (14 मे) मुंबई येथे जाहीर सभा सुरू आहे. मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्पेक्स मैदानावर ही सभा सुरू आहे.
 
शिवसेनेकडून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून सभेच्या माध्यमातून पक्ष कार्यकर्त्यांना भावनिक सादही घातली जात आहे.
 
हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, अशा स्वरुपाचं ब्रँडिंग शिवसेनेकडून केलं जात आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचे भाऊ राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापवल्याचं पाहायला मिळालं.
 
त्यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेऊन आक्रमक भूमिका मांडली. दरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनीही उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला.
 
दुसरीकडे, विरोधी पक्ष भाजपकडूनही सातत्याने सत्ताधारी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असतो. दरम्यान, राज्यातील प्रलंबित महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम तातडीने जाहीर करण्याची सूचनाही सुप्रीम कोर्टाने केली आहे.
 
या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
 
हिंदुत्वाचा हुंकार
शिवसेनेतर्फे गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसंपर्क अभियानाला सुरुवात करण्यात आली होती.
 
या अभियाना अंतर्गत राज्याच्या विविध जिल्ह्यांत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्यानंतर शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचं नियोजन करण्यात आलं.
 
बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर ठिकठिकाणी या सभेचे टीजर आणि पोस्टर लावण्यात आले आहेत.
 
दरम्यान, या सभेचा टिझर शिवसेनेने रविवारी टि्वटवरून जाहीर केला आहे. अवघ्या १५ सेकंदाच्या या टिझरच्या सुरुवातीलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण दिसते.
 
मी शिवसेनाप्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे. म्हणूनच मी शिवसेनाप्रमुख आहे, असे बाळासाहेब ठाकरे बोलताना दिसत आहेत.
 
तर बाळासाहेबांवर श्रध्दा असणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्त्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, असं आवाहन या टिझरच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
 
अडीच वर्षांत प्रथमच जाहीर सभा
 
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर चार महिन्यांतच कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरू झालं होतं.
 
यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासह इतर राजकीय जाहीर सभा त्या वर्षात होऊ शकल्या नाहीत. गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेची कोणतीही जाहीर सभा खुल्या मैदानावर झाली नाही.
 
कोव्हिड निर्बंधांमुळे गेल्या वर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावाही नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कवर न होता षण्मुखानंद सभागृहात झाला होता.
 
त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर शिवसेनेची अशा प्रकारची खुल्या मैदानातील जाहीर सभा होणार असल्याने याबाबत उत्सुकता आहे. या सभेला मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहावं, असं आवाहनही पक्षाकडून करण्यात आलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चालत्या ट्रेनमधून आईने मुलांना फेकले आणि नंतर स्वतःने उडी मारली