औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना म्हटलं, "व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी. आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो."
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप युतीच्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना या वक्तव्याचा अर्थ विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, "याचा अर्थ तोच आहे. व्यासपीठावर सगळे माझे आजी, माझी सहकारी उपस्थित होते आणि उद्या सगळे एकत्र आले तर भावीपण होऊ शकतात."
सगळे कोण असं विचारल्यावर ते म्हणाले, सगळे येतील तेव्हा कळेल. येणारा काळच ते ठरवेल.
या कार्यक्रमावेळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले,"मुख्यमंत्री आज म्हटले की जमलंस तर भावी सहकारी. याचा अर्थ सरकार चालवताना त्यांना काही अनुभव आले असतील. आम्ही सोबत असताना सगळे निर्णय एकत्र बसून करायचो. जागा वाटप असू द्या की इतर निर्णय. आम्ही जुने सहकारी आहोत आणि प्रसंग आला तर पुन्हा एकत्र येऊ शकतो हे त्यांनी नाकारलेलं नाही. आम्ही एकत्र आलो तर आमच्या दोघांच्या मतदाराला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही."
"ते माझ्या कानात म्हणाले, तुम्ही मुंबईला येत नाही. येत जा. काँग्रेसचा कुणी माणूस मला त्रास द्यायला लागला की भाजपच्या कुणालातरी बोलवत असतो. सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात राजकारणात," असंही दानवे यांनी म्हटलं.
'मुख्यमंत्र्यांनी मनातली भावना बोलून दाखवली'
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, "राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं. मात्र भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही आहोत. आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहोत. हे जे काही अनैसर्गिक गठबंधन तयार झालंय, ते फार काळ चालू शकत नाही. कदाचित मुख्यमंत्र्यांच्याही हे लक्षात आलं असेल. त्यामुळे त्यांनी मनातली भावना बोलून दाखवली असेल."
तर मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं,"त्यांच्या मनात काय आहे हे जाणण्याइतका मी मनकवडा नाही.माहित नाही ते का म्हणाले."
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी याविषयी बोलताना म्हटलं, "मुख्यमंत्री त्या नंतर काय बोलले ते तुम्ही ऐकलं नाही. त्यांना असा कळलं आहे भाजपचे मोठे नेते तिन्ही पक्षापैकी एका पक्षात जाणार आहेत. त्यांची जास्त चिंता तुम्ही करावीत."