समिरात्मज मिश्र
बीबीसीसाठी, उन्नावहून
उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यातल्या बबुरहा गावात एका शेतात संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळलेल्या दोन बहिणींच्या पार्थिवावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. तर तिसरी मुलगी अजूनही कानपूरमधल्या रिजेंसी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.
मात्र, दरम्यानच्या काळात गेल्या तीन दिवसांपाासून बबुरहा गावाला पोलीस छावणीचं रूप आलं आहे.
उन्नाव जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 50 किमी अंतरावर असोहा पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्यापासून जवळपास 3 किमी अंतरावर बबुरहा गाव आहे. याच गावातल्या तीन किशोरवयीन मुली बुधवारी संध्याकाळी एका शेतात बेशुद्धावस्थेत आढळल्या होत्या. यातल्या दोघींचा मृत्यू झाला आहे तर तिसऱ्या मुलीवर उपचार सुरू आहेत. मुलींच्या घरापासून घटनास्थळ जवळपास दीड किमी. अंतरावर आहे.
गुरुवारी उन्नावमधल्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये दोन्ही मुलींचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. मात्र, पोस्ट मॉर्टममध्ये मृत्यूचं नेमकं कारण उघड झालेलं नाही. दुसरीकडे आपण अजून पोस्ट मॉर्टम अहवाल बघितलेला नाही, असं उन्नावचे उप मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तन्मय कक्कड यांचं म्हणणं आहे.
मात्र, गुरुवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक हितेश चंद्र अवस्थी यांनी एका व्हीडिओ संदेशाच्या माध्यमातून अहवालाची माहिती दिली. ते म्हणाले, "दोन्ही मुलींच्या शरीरावर बाह्य किंवा अंतर्गत कुठलंही जखम आढळलेली नाही. मृत्यूचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे पुढील तपासणीसाठी व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे."
या मुलींचा मृत्यू विषामुळे झाला की नाही, हे रासायनिक चाचणीनंतरच कळू शकेल, असं उन्नावचे डेप्युटी सीएमओ डॉ. तन्मय कक्कड यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. याविषयी सांगताना उन्नावचे पोलीस अधीक्षक सुरेश कुलकर्णी यांनी घटनास्थळी फेस आढळून आल्याचं सांगितलं होतं. या फेसमुळेच मुलींचा मृत्यू विष प्राशन केल्याने झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी मृत मुलींपैकी एकीच्या वडिलांनी असोहा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. मुलींच्या गळ्याभोवती दुपट्टा गुंडाळला होता आणि त्यांच्या तोंडातून फेस येत होता, असं या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं होतं. कानपूरमध्ये उपचार सुरू असलेली तिसरी मुलगीही याच अवस्थेत आढळली होती.
पोस्टमॉर्टमनंतर गुरुवारी संध्याकाळी उशिरा मुलींचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले. शुक्रवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी मुलींचे पार्थिव दफन करण्यासाठी प्रशासनाने जेसीबी मशीनही मागवलं होतं. मात्र, काही गावकरी आणि राजकीय पक्षांच्या काही कार्यकर्त्यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे मशीन माघारी पाठवण्यात आलं.
एकाच कुटुंबातल्या मुली
गुरुवारी दिवसभर बबुहरा गावाला पोलीस छावणीचं रुप आलं होतं. गावाकडे जाणाऱ्या रस्त्यात तीन ठिकाणी बॅरियर लावण्यात आले होते. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात आली. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही ओळखपत्राशिवाय गावात प्रवेश दिला जात नव्हता. उन्नावचे डीएम रविंद्र कुमार आणि आनंद कुलकर्णी यांच्याव्यतिरिक्त लखनौ परिमंडळाचे पोलीस महासंचालक लक्ष्मी सिंह यादेखील दिवसभर तिथे हजर होत्या.
संध्याकाळी बीबीसीशी बोलताना लक्ष्मी सिंह म्हणाल्या, "अंत्यसंस्कारासाठी कुठल्याच प्रकारचा दबाव टाकण्यात आलेला नाही. आम्ही त्यांना संपूर्ण सुरक्षा दिली आहे. अंत्यसंस्कार कधी करायचे, हे कुटुंबावर आहे."
या तिन्ही मुली एकाच कुटुंबातल्या आहेत. यातल्या दोघी चुलत बहिणी होत्या. त्यांचं वय 13 आणि 16 वर्ष होतं. तर तिसरी मुलगी या दोघींची आत्या होती. यातली 16 वर्षांची मुलगी जिवंत आहे. मात्र, तिची परिस्थिती गंभीर आहे.
आयजी लक्ष्मी सिंह यांनी तिसऱ्या मुलीची परिस्थिती गंभीर असली तरी प्रकृतीत सुधारणा दिसत असल्याचं सांगितलं. मात्र, तिला कानपूरमधून दिल्लीतल्या एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी लावून धऱली आहे. दुसरीकडे मुलीच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करेल, असं पत्र उन्नावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला दिलं आहे.
या मुलींची नातेवाईक असलेल्या एका महिलेने संतप्त प्रतिक्रिया देत, "ती जिवंत आहे की नाही, हेसुद्धा आम्हाला कळत नाहीय. इथेच तिची प्रकृती गंभीर होती. तिला चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती करा, म्हणून आम्ही किती विनवण्या केल्या. पण पोलिसांनी आमचं ऐकलं नाही. नेमकं काय घडलं, हे तिलाच ठावुक आहे. तिचं काही बरंवाईट झालं तर आमच्या इतर दोन मुलींसोबत काय झालं, कुणी हे केलं, हे आम्हाला कधीच कळणार नाही."
पोलिसांचा ताफा
सध्या पोलिसांनी 6 तपासा पथकं नेमली आहेत. संपूर्ण गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. गुरुवारी दिवसभर राजकीय नेत्यांचीही ये-जा सुरू होती.
घटनेविषयी गावकऱ्यांमध्ये रागही आहे आणि कुतूहलही आहे. या गावात दलितांची मोजून 5 ते 6 घरं आहेत. त्यातलंच एक घर या मृत मुलींचंही आहे.
गावातेलच एक वडिलधारी व्यक्ती असलेले दयाराम सांगतात, "या मुली गवत कापण्यासाठी नेहमीच शेतात जायच्या. गावातल्या इतर मुलीही जातात. मात्र, कधीच असं काहीच घडलं नाही. गावात या लोकांचं इतर कुणाशीच भांडण नव्हतं."
मृत मुलींपैकी एकीच्या भावाने सांगितलं, "तिन्ही मुली पूर्वी एकत्र शाळेत जायच्या. पण, लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या तेव्हापासून तिघी घरीच होत्या."
तो पुढे म्हणतो, "माझी बहीण दहावीत शिकत होती. मृत्यू झालेली दुसरी मुलगी माझी पुतणी होती. तिची आई ती लहान असतानाच वारली. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंही मजुरी करतो. हे सगळं कसं घडलं, कुणी केलं, काहीच कळत नाहीय."
मृत्यूच्या कारणाबाबत पोलीसही आश्चर्य व्यक्त करत आहेत. मात्र, पोलीस मुलींच्या कुटुंबीयांना त्रास देत असून हत्येची जबाबदारी त्यांच्यावर ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचं कुटुंबीयांचं आणि काही गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
कुटुंबीयांचं काय म्हणणं आहे?
आम्ही घरात खाटेवर बसून रडत असलेल्या मृत मुलींपैकी एकीच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात गणवेशावर नेमप्लेट नसलेल्या एका महिला पोलीस शिपायाने त्यांचा हात धरून त्यांना न बोलण्याचा इशारा केला.
आमच्या कॅमेरामनलाही गणवेशावर नेमप्लेट नसलेल्या एका पोलिसांनी काहीही रेकॉर्ड करायला मनाई केली. मात्र, आम्ही मृत मुलीची आई आणि तिच्या वहिनीचं म्हणणं ऐकून घेतलं.
मृत मुलीच्या आईने बीबीसीला सांगितलं, "तिघी कायम सोबत असायच्या. काय झालं, काय सांगावं. आमच्या मुलींबरोबर चुकीचं काम करण्यात आलंय. माझ्या घरातली माणसं, मुलं सगळ्यांना पोलीस घेऊन गेलेत. माझ्या संपूर्ण घराची झडती घेण्यात आली. आमच्या घरचे लोक कुठे आहेत, हेसुद्धा आम्हाला माहिती नाही."
मृत मुलीच्या आईला धीर देणाऱ्या दुसऱ्या एका महिलेने सांगितलं, "घरातले सगळे पुरुष पोलीस ठाण्यात आहेत. पोलिसांनी घरातलं सगळं सामान उचलून नेलं आहे. मुलांची औषधंही ते घेऊन गेलेत. मुलींना विष घेऊन आत्महत्या केली असावी, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण, त्या असं का करतील? आणि आत्महत्या केली असेल तर त्यांचे हात का बांधले होते?"
आमच्याशी बोलत असताना महिला पोलीस शिपायी त्यांना सतत बोलू नका, आत व्हा, म्हणत होत्या.
दरम्यान, कुटुंबीयांनी उन्नावच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात यावा, कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि कानपूरमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या मुलीला दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावं, अशा मागण्या केल्या आहेत.