Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

चार दिवस तो न जेवता, झोपता व्हीडिओ गेम खेळत राहिला; शेवटी हात-पाय बांधून हॉस्पिटलमध्ये नेलं

चार दिवस तो न जेवता, झोपता व्हीडिओ गेम खेळत राहिला; शेवटी हात-पाय बांधून हॉस्पिटलमध्ये नेलं
, गुरूवार, 19 ऑक्टोबर 2023 (14:40 IST)
-प्रमिला कृष्णन
स्वत:ला व्हर्च्युअल व्हिडिओ गेममधील (आभासी व्हिडिओ खेळ) शक्तिशाली पात्रांपैकी एक म्हणवणा-या तामिळनाडूमधील किशोरवयीन व्हिडिओ गेमरला सरकारी मानसिक आरोग्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
 
झोपेच्या गोळ्या आणि समुपदेशनासह आठवडाभर उपचार केल्यानंतर आता हळूहळू मानसिक आरोग्य अभ्यासकांच्या मदतीने तो व्यसनमुक्ती कार्यक्रमात सहभाग घेऊ लागलाय.
 
या गेमर मुलाचे पाय आणि हात दोरीने बांधून त्याला एका रूग्णवाहिकेमधून रानीपेट जिल्हा रुग्णालयातून चेन्नई शहरात आणलं जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला गेलेला.
 
किंचाळणारा आणि आपल्याकडे अलौकिक शक्ती आहे, असं सांगणा-या किशोरवयीन मुलाची ही अवस्था पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
 
चार दिवस पुरेशी झोप आणि आहार न घेता व्हर्च्युअल व्हिडिओ गेम खेळल्यानंतर आपल्या मुलाच्या वागणुकीत झालेल्या बदलाबद्दल मौन बाळगलेल्या गेमरच्या आईने शेवटी मदतीसाठी आरोग्य अधिकार्‍यांशी संपर्क साधला आणि त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं.
 
या घटनेविषयी आईने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
 
'हे व्यसन एक-दोन दिवसांचं नाही'
गेमरवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्हर्च्युअल गेम व्यसनाधिनतेच्या आहारी जाण्याबद्दल 'बीबीसी'सोबत संवाद साधला.
 
'मुलाला एक-दोन दिवसात हे व्यसन लागलं नाही. त्याला लहानपणापासून त्रास झालेला आणि घरातील लोकांकडून कायम दुर्लक्षिला गेल्यामुळे व्हर्च्युअल व्हिडिओ गेमला तो त्याचा घनिष्ठ मित्र मानत होता.
 
व्हर्च्युअल व्हिडिओ गेममधील जगाने त्याला सुरक्षिततेची भावना दिली आणि त्याला ते वापरासाठी कायमच सहज उपलब्ध होतं. वडिलांच्या निधनानंतर आईकडे कामावर जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
 
त्याचा मोठा भाऊही नोकरीनिमित्त परदेशात गेला. असं असताना, मुलगा व्हर्च्युअल व्हिडिओ गेम खेळू लागला आणि त्याच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाला’, असं डॉक्टरांनी सांगितलं.
 
व्हर्च्युअल गेमच्या दुनियेतील यश-अपयशांमुळे तो आनंदी राहू लागला, असं सांगून डॉक्टर म्हणाले, ‘‘गेममधील त्याच्या कामगिरीबद्दल त्याला बक्षीस मिळाल्यावर त्याला छान वाटायचं.
 
यावेळी, जवळपास चार दिवस मॅरेथॉनप्रमाणे गेमिंग सुरू असताना, तो विचित्रपणे वागू लागला. त्याने वस्तू फेकायला सुरुवात केली आणि एखाद्या शक्तिशाली व्यक्तीप्रमाणे वागू लागला.
 
सुरुवातीला आम्ही त्याला शांत करण्यासाठी झोपेचा डोस दिला आणि नंतर समुपदेशन सुरू केले. त्याने खूप प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्याला उपचारासाठी पटवण्यात आले''
 
डॉक्टरांनी सांगितलं की, या मुलाची अवस्था वेड लागल्यासारखी झाली होती, ज्यामध्ये त्याने वारंवार गेमिंगमध्ये स्वत:ला व्यस्त ठेवून आराम आणि आनंद मिळवलेला.
 
त्यांनी असाही इशारा दिला की, ज्या व्यक्तीला एखाद्या गोष्टींचे व्यसन आहे त्याला सक्ती केली जाऊ नये आणि त्यापासून ताबडतोब माघार घ्यायला भाग पाडू नये, परंतु व्यसनावर घालवत असलेल्या वेळेवर मर्यादा घालून उपचार केले जावेत.
 
''जर आपण त्या व्यक्तीवर जबरदस्ती केली तर त्याचे घातक परिणाम होतील. त्यापेक्षा त्यांना इतर कामांमध्ये गुंतवून त्यांना हळूहळू व्यसनातून बाहेर काढण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले पाहिजेत. हे अमली पदार्थ आणि दारूच्या व्यसनासारखे आहे,’’ असंही त्यांनी नमूद केलं.
 
ते म्हणाले की, त्यांनी यापूर्वी अशा रूग्णावर अलिकडेच उपचार केलेले. आणि ही गोष्ट केवळ लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांपुरतीच मर्यादित नाही, तर प्रेम, अटेंशन आणि काळजीसाठी आसुसलेल्या प्रौढांमध्येही पाहिली गेली आहे.
 
पहिलं उदाहरण :
एका मध्यमवयीन व्यक्तीच्या मनात असुरक्षिततेच्या विचारांनी काहूर माजले होते. त्याने शहर पोलिसांकडे जवळपास दररोज तक्रारी दाखल करायला सुरुवात केली.
 
तो पोलिसांच्या हेल्पलाइनवर फोन करायचा आणि सांगायचा की त्याच्या घराजवळ कोणीतरी बॉम्ब ठेवलाय आणि त्याला सुरक्षेच्या कारणास्तव पोलीसांना याबाबत सतर्क करायचंय.
 
प्रत्यक्षात, त्याच्या घराशेजारी असं काहीही आढळलं नाही. मात्र तो दररोज पोलिसांना फोन करायचा. असं असानाही, तो सामान्य जीवन जगत होता.
 
आम्ही त्याचं निरीक्षण केलं आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल त्याच्या असुरक्षिततेच्या विचारांबद्दल जाणून घेऊन आम्ही त्याची समस्या ओळखली.
 
त्याला फक्त त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याच्यासोबत यावं आणि तो जे काही बोलतोय ते मान्य करावं अशी त्याची इच्छा होती. सुरुवातीला त्याच्या कुटुंबीयांनी त्याला मोबाईल फोन वापरण्यापासून रोखलं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पण मग तीन महिने उपचार केले गेले.
 
आम्ही त्याच्या कुटुंबाला ज्यांच्याशी तो कधीही बोलू शकतो अशा मित्रांची यादी मागितली. आम्ही त्याचं समुपदेशन केलं आणि औषधेही दिली आणि तो बरा झाला.
 
दुसरं उदाहरण:
एका मुलाला परीक्षेत कमी गुण मिळत होते कारण तो गेमिंगमध्ये खूप वेळ घालवायचा. त्याच्या पालकांनी त्याला सक्त ताकीद दिली आणि ऑनलाइन गेम खेळण्यापासून रोखलं.
 
त्या्च्याकडून गेम हिसाकावून घेऊन तो कपाटात बंद करून ठेवला. त्याला सांगितलं की पुढच्या परीक्षेत त्याने चांगले गुण मिळवले तरच त्याला गेम परत दिला जाईल. दुर्दैवाने, त्याला मागील परीक्षेच्या तुलनेत खूपच कमी गुण मिळाले.
 
जेव्हा पालकांनी त्याला आमच्याकडे आणलं, तेव्हा आम्ही पालकांना गेमिंगवर बंदी आणण्याऐवजी स्क्रीन टाइम ब्रेक देण्याची शिफारस केली.
 
आम्ही पालकांना त्याला मैदानी खेळांमध्ये देखील व्यस्त ठेवण्याचा सल्ला दिला आणि त्याच्यासोबत वेळ घालवण्यास, त्याच्या प्रयत्नांचं, इतर गोष्टींमधील प्रगतीचं कौतुक करा आणि महत्त्वाचं म्हणजे घरातील सदस्यांनी स्वत:चाही स्क्रीन टाइम कमी करण्याचा सल्ला दिला.
 
जेव्हा त्याच्या पालकांनीही त्याच्यासोबत या गोष्टी पाळल्या, तेव्हा मुलावर दोन महिने उपचार झाले आणि तो बरा झाला.
 
गेमिंग विकाराची लक्षणे
जागतिक आरोग्य संघटनेने विविध देशांमधील गेमिंगचे व्यसन लक्षात घेऊन 'इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस' (ICD) च्या 11 व्या पुनरावृत्तीमध्ये गेमिंग विकाराचा समावेश केलाय.
 
'डब्ल्यूएचओ'चे प्रवक्ते ख्रिश्चन लिंडमेयर यांनी 'बीबीसी'ला सांगितलं की, गेमिंग डिसऑर्डरचा जानेवारी 2022 मध्ये अधिकृतपणे ICD च्या यादीत समावेश करण्यात आला.
 
''थॉट गेमिंग डिसऑर्डर 2019 मध्ये निदान करण्यायोग्य आरोग्य स्थिती मानली गेली होती. तज्ज्ञांनी उपलब्ध पुराव्यांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर याबाबत अतिशय बारकाईने विचार करून निर्णय घेण्यात आला.
 
आम्ही अनेक क्षेत्रांमध्ये संशोधन प्रकल्प सुरू केलेले आणि गेमिंग विकारावर शिक्कामोर्तब करण्याची गरज होती,’ असं ते म्हणाले.
 
गेमिंगच्या व्यसनाची धोक्याची लक्षणे
1) जेव्हा एखादी व्यक्ती इतर गोष्टींमध्ये सक्रिय राहण्याच्या वेळेच्या तुलनेत गेमिंगमध्ये जास्त वेळ घालवते.
 
2) गेम खेळायला मिळाला नाही म्हणून रागावते, हिरमुसून बसते.
 
3) इतरांपासून दूर जाणे किंवा घर, कामाच्या ठिकाणी, शाळेत दररोजच्या गोष्टींमध्ये रस न दाखवणे.
 
4) आवडते खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाच्या गोष्टी टाळणे.
 
5) शाळेत/कामाच्या ठिकाणी लक्ष न लागणे.
 
6) चिडचिड आणि तणावपूर्ण वर्तन.
 
7) मित्रमंडळींपासून दूर जाणे.
 
गेमिंग कंपन्यांची जबाबदारी
दररोज शेकडो गेम ऑनलाइन दाखल होतात. अनेक गेम खेळण्यासाठी विनामूल्य उपलब्ध असतात.
 
या गेम्सची निर्मिती जगभरातील कंपन्यांनी केली असल्याने, भारतात गेमिंगचे व्यसन रोखण्यासाठी जे काही उपाय लागू केले आहेत त्यापैकी कोणतेही उपाय प्रभावीपणे लागू करता येत नाहीत.
 
व्हर्च्युअल गेममध्ये सुरक्षिततेच्या कोणत्या उपाययोजना उपलब्ध आहेत याबाबत आम्हाला चेन्नईमधील एका गेम प्रोडक्शन कंपनीसोबत शहनिशा करायची होती.
 
एका खाजगी गेम डेव्हलपमेंट फर्मचे सीईओ श्रीधर यांनी गेम कंपन्यांची भूमिका स्पष्टपणे सांगण्याची तयारी दर्शवली.
 
गेम्स तयार करण्याचा दोन दशकांचा अनुभव असलेले श्रीधर म्हणाले, ‘‘बहुतेक गेममध्ये 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींनी तो गेम खेळण्याचा सावधानतेचा इशारा दिला जातो. मुलांसाठी डिझाइन केलेल्या काही गेमसाठी पालकांची परवानगी आणि त्यांनी देखरेख ठेवणं गरजेचं असतं.
 
परंतु वयाची संमत्ती ही पालकांना गंभीर समस्या वाटत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे, गेम खेळणार्‍या व्यक्तीने गेमिंगवर किती वेळ घालवायचा याबाबत स्वत:ने स्वत:वर बंधनं आणायला हवीत, ज्या कंपनीने नफा कमवण्यासाठी पैसे गुंतवले आहेत त्या कंपनीवर ही बंधनं नसावीत. कोणत्याही कंपनीला ग्राहकाने त्यांचं उत्पादन वापरावं असं वाटतं आणि आम्हीही तेच करतो.’’
 
वापराच्या वेळेवर मर्यादा घालण्यासाठी कोणतेही अंतर्भूत पर्याय का नाहीत असं विचारलं असता ते म्हणाले, ‘‘गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल प्ले स्टोअरने गेममधील हिंसाचारावर निर्बंध आणले आहेत. परंतु आतापर्यंत कोणत्याही गेममध्ये स्क्री टाईमबाबत कोणताही प्रतिबंधाचा पर्याय देण्यात आलेला नाही.
 
कदाचित वापरकर्ते स्क्रीन टाईमचे नियोजन करण्यासाठी ऑनलाइन अलार्म लावू शकतात. बहुतेक गेम विनामूल्य आहेत आणि काही गेममध्ये, खेळाडू काही फेऱ्या विनामूल्य खेळू शकतो आणि गेम सुरू ठेवण्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतात. स्क्रीन टाइम मर्यादित करण्यासाठी आता हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे,’’ असं ते म्हणाले.
 
भारतीय कायद्याची भूमिका
पेशान वकील असलेले कार्तिकेयन हे सायबर क्राइम आणि माहिती तंत्रज्ञानाचे चांगले जाणकार आहेत. त्यांनी देखील याला दुजोरा दिला की गेमिंगच्या व्यसनासाठी कोणत्याही कंपनीवर दावा केला जाऊ शकत नाही.
 
‘‘फारफार तर आम्ही गेमिंग साइटवर बँकेचे तपशील, ओळखपत्रे यांसारखे कुणाचेही गोपनीय तपशील ऑनलाइन हॅक झाल्यास सायबर गुन्हे विभागाला सूचित करू शकतो.
 
गेमिंग प्लॅटफॉर्म प्रतिबंधित करण्यासाठी इतर कोणतेही पर्याय नाहीत. तसंच अनेक कंपन्या त्यांची उत्पादनं ऑनलाइन बाजारात आणतात आणि त्यांच्या ऑनलाइन कंपन्या क्लाउड प्लॅटफॉर्मवर आहेत,’ असं ते म्हणाले.
 
अलीकडेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शिक्षक आणि पालकांसाठी गेमिंग विकाराबद्दल एक मार्गदर्शिका जाहिर केली होती आणि गेमिंग कंपन्यांना गेममधील अॅप-पर्याय खरेदी करण्यास भाग पाडल्याबद्दल दोषी ठरण्यात आलेलं.
 
मार्गदर्शिका म्हणते की गेमची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की प्रत्येक स्तर आधीच्यापेक्षा अधिक क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा आहे आणि यामुळे गेममध्ये प्रगती करण्यासाठी खेळाडू स्वत:ची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतो.
 
‘‘कोणतंही बंधन आणि स्व-मर्यादेशिवाय ऑनलाइन गेम खेळल्याने अनेक खेळाडू व्यसनाधीन होतात आणि शेवटी त्यांच्यात गेमिंग विकाराचे निदान होते.
 
गेमिंग कंपन्या भावनिकरित्या मुलांना अधिकाधिक वरचे स्तर खरेदी करण्यास आणि त्यातही अॅप खरेदी करण्यास जवळपास भागच पाडतात,’’ असंही मार्गदर्शिकेतील नोटमध्ये म्हटलं आहे.
 
ऑनलाइन गेमशी संबंधित कोणत्याही चुकीच्या घटनेची तक्रार करण्यासाठी:
 
नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलची हेल्पलाइन: 1930

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप हमासपेक्षा कमी नाही: संजय राऊत