Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

संजय राऊत-विखे पाटलांमध्ये रंगलाय ‘सामना’, बाळासाहेब थोरात राहिले बाजूला

संजय राऊत-विखे पाटलांमध्ये रंगलाय ‘सामना’, बाळासाहेब थोरात राहिले बाजूला
, मंगळवार, 23 जून 2020 (21:59 IST)
'थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर' या 'सामना'तील 22 जूनच्या अग्रलेखाला भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी उत्तर दिलंय.
 
शिवसेनेचे खासदार आणि 'सामना'चे संपादक संजय राऊत यांना उद्देशून दोन पानी पत्र लिहून विखे पाटलांनी बोचरी टीका केलीय.
 
विखे-राऊत टीका-प्रतिटीकेचं कारण आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात.
 
विखे, थोरात आणि राऊत यांच्यातील टीका, प्रत्युत्तरं हे सर्व नेमकं कुठून सुरू झालं, हे पाहू. मात्र, तत्पूर्वी आज विखेंनी संजय राऊत यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय ते पाहूया.
 
"फार पूर्वी 'थोरातांची कमळा' हा चित्रपट गाजला होता. आता 'विखे पाटलांची कमळा' असा चित्रपट आला अन् पडला. काँग्रेसची खाट कुरकुरते की नाही ते पाहू, पण विखेंची 'टूर अँड ट्रॅव्हल' कंपनी बंद पडली आहे. मात्र त्यांची टूरटूर सुरु आहे," अशा शब्दात 'सामना'च्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी विखेंवर टीका केली होती.
 
टाळेबंदीत काँग्रेसचं प्रवक्तेपद स्वीकारलं का? - विखे
या टीकेला उत्तर म्हणून विखेंनी राऊतांना धाडलेल्या पत्रात म्हटलंय, "काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले का? आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे निष्ठेने काम केले. आमची छाती फाडून पाहिली तर एका वेळी एकच नेता दिसेल. तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील."
 
अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा कोण करतेय ते ही लपून राहिलेले नाही, असं विखेंनी राऊतांना म्हटलंय.
 
विखे पुढे म्हणतात, "मी भाजपमध्ये आनंदी आहे, पण महाविकास आघाडी सरकारचा एक शिल्पकार असल्याच्या अविर्भावात राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या भावास मंत्रीदेखील करू न शकल्याचे दुःख असेल आणि त्यातून आलेली कमालीची अस्वस्थता दाबून ठेवण्याचा नाहक त्रास होत असेल तर त्यात माझा काय दोष?"
 
सामनाचा पारदर्शक कारभार पाहता, आपण माझं उत्तर छापाल, ही अपेक्षा, असंही विखेंनी हे पत्र सोशल मीडियावरून शेअर करताना म्हटलंय.
 
विखेंनी एवढी बोचरी टीका करण्याचं कारण काय?
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, सरकारमध्ये आमचंही ऐकलं पाहिजे. त्यानंतर संजय राऊत यांनी काँग्रेसमधील नेत्यांना उद्देशून 16 जून रोजी 'खाट का कुरकुरतेय?' असा अग्रलेख लिहिला.
 
त्यानंतर बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर झाल्याचं थोरातांच्या प्रतिक्रियावरून कळून येतं.
 
थोरातांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा संपल्यानंतर म्हटलं, "मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली, आमची काही नाराजी नाही, वादाचा कोणताही विषय नाही. आमच्या काही प्रशासकीय मागण्या होत्या. कोणत्याही व्यक्तीगत मुद्दा नव्हता."
 
मात्र, यानंतर भाजप नेते आणि थोरातांचे परंपरागत प्रतिस्पर्धी राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना थोरातांचा उल्लेख 'लाचार नेता' असा केला.
 
विखे पाटील म्हणाले, "मी काँग्रेस पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना पद मिळालं. या बाळासाहेब थोरातांचं स्वतःचं कर्तृत्व काय? गांधी-नेहरुंचे विचार सोडून ते 'मातोश्री'चे उंबरठे झिजवत आहेत."
 
जनतेचे प्रश्नांसाठी पुढाकार घेण्याऐवजी सत्तेत वाटा मिळवण्यासाठी लाचारी करत असल्याची टीका विखेंनी थोरातांवर केली.
 
थोरातांकडून सौम्य प्रतिक्रिया, पण राऊतांची जहरी टीका
या टीकेला थोरातांनी अत्यंत सौम्य भाषेत उत्तर दिलं. "काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या पाच वर्षात कसे वागले हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे त्यांनी वापरलेला लाचार शब्द हा त्यांच्यासाठीच योग्य आहे."
 
बाळासाहेब थोरातांनी विखेंना मवाळ भाषेत उत्तर दिलं असलं, तरी शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या लेखणीतून विखे सुटले नाहीत.
 
राऊतांनी आज (23 जून) 'सामना'त 'थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर' या मथळ्याचा अग्रलेख लिहिला आणि त्यातून बाळासाहेब थोरातांची पाठराखण करत, विखेंवर जहरी टीका केली.
 
याच अग्रलेखाला उत्तर म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी बोचरी टीका करणारं पत्र संजय राऊत यांना पाठवलं. ज्याचा उल्लेख आपण बातमीच्या सुरुवातीलाच केला आहे.
 
विखे पाटील राऊतांवर एवढे संतापले आहेत?
खरंतर हे सर्व सुरू झालं, काँग्रेसमधल्या कुरबुर आणि त्यावरील राऊतांनी लिहिलेल्या लेखापासून. मात्र, काँग्रेस बाजूला राहिली आणि आता खरा 'सामना' रंगू लागलाय, संजय राऊत आणि विखे पाटलांमध्येच.
 
थोरात आणि विखे हे दोघेही एकाच पक्षात असतानाही स्पर्धक राहिलेत. मात्र, आता विखेंनी शिवसेना आणि त्याही राऊतांवर इतकी जहरी टीका करण्याचं कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडलाय.
 
याबाबत आम्ही अहमदनगरच्या राजकारणाचा अनेक वर्षांपासून अभ्यास करणारे आणि महाराष्ट्र टाइम्सचे अहमदनगरमधील ब्युरो चीफ असलेल्या विजय होळम यांच्याशी चर्चा केली.
 
विजय होळम म्हणतात, "महाविकास आघाडीची बांधणी करण्यासाठी संजय राऊत यांनी पुढाकार घेतला होता. पुढे महाविकास आघाडी स्थापन झाली आणि त्यांचं सरकारही आलं. दुसरीकडे, निवडणुकी विखे पाटील भाजपची सत्ता येईल, या आशेनेच तिकडे गेले होते. मात्र, महाविकास आघाडीच्या स्थापनेनं त्यांना धक्का बसला. त्यामुळे राऊतांवर त्यांचा राग असू शकतो, हे नाकारता येत नाही."
 
मात्र, शिवसेनेवर विखेंचा राग नसल्याचं ते म्हणतात. थोरातांनी 'मातोश्री'वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. या बैठकीवर प्रतिक्रिया देताना विखेंनी थोरातांना 'लाचार' म्हटलं, पण उद्धव ठाकरेंवर टीका केली नव्हती.
 
उलट विखे म्हणाले की, "शिवसेनेची प्रचंड फरफट झाली आहे. सत्तेचा हव्यास असणाऱ्या लोकांबरोबर काम करताना उद्धव ठाकरेंना तडजोड करावी लागत आहे. विचारधारेमुळे अनेक वर्ष शिवसेना भाजपाची युती अभेद्य होती. शिवसेनेने पुन्हा भाजपसोबत येण्याची भूमिका स्वीकारायला हवी. हिंदुत्वाची कास धरताना सेना भाजपने पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे."
 
त्यामुळे विखेंचा राग राऊतांवर आहे, सेनेवर नाही. शिवाय, युतीच्या आधीच्या सत्ताकाळात विखे शिवसेनेतच होते. त्यावेळी ते सत्तेसाठीच काँग्रेसमध्य गेले होते. कुठलाही वाद झाल्यानंतर त्यांनी सेना सोडली नव्हती, असंही होळम सांगतात.
 
विखे-थोरात वादाचा पुढचा भाग?
लोकमतचे अहमदनगरचे आवृत्ती संपादक सुधीर लंके यांना या सर्व टीका-प्रतिटीकांच्या फैरी 'विखे विरुद्ध थोरात' या परंपरागत वादाचा पुढचा भाग असल्याचंच वाटतं.
 
सुधीर लंके म्हणतात, "राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात हे एकाच पक्षात म्हणजे काँग्रेसमध्ये असतानाही एकमेकांना स्पर्धक म्हणून पाहत. आता तर दोघेही एकमेकांच्या विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे मुद्दा मिळाल्यावर टीका करणार, हे ओघाने आलेच. सध्याचे प्रकरणाही तसेच आहे."
 
विजय होळम हेही लंकेंच्या या मुद्द्याशी सहमत होतात. ते पुढे जाऊन सांगतात की, "थोरातांचे परंपरागत विरोधक असल्यानेच भाजपलाही ते अधिक जवळचे आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर नगरमधील अनेक भाजप नेत्यांनी विखेंविरोधात तक्रारी करूनही भाजपनं कुठलीच कारवाई केली नाही. कारण विखे त्यांना महत्त्वाचे नेते आहेत."
 
"शेतीचे प्रश्न असो, साखर कारखानदारांचे प्रश्न असो किंवा पीएम केअर फंडात मोठी रक्कम दान करणं असो, अशा बऱ्याच गोष्टींमुळे विखे भाजपचे महत्त्वाचे नेते बनलेत," असं विजय होळम सांगतात.
 
नितेश राणेही संजय राऊतांवर भडकले
हे सर्व एकीकडे सुरू असताना, दुसरीकडे आमदार नितेश राणे यांनीही संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.
 
"भाजपाच्या गोधडीत शिरुन ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या बाटग्यांचे आम्हाला आश्चर्य वाटते. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत. मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले आहे," अशी टीका संजय राऊत यांनी 'थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर!' या अग्रलेखातू केली होती.
 
या टीकेला आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करून उत्तर दिलं. ते म्हणाले, "'सामना'च्या राऊत सारखे बाजारात खूप लोक आहेत. पवारांना भेटले कि फडणवीसांबद्दल उलट बोलायच.. राणेंना भेटले कि ठाकरेंबद्दल उलट बोलायच..
 
ठाकरेंना राणें बद्दल उलट बोलायच.. राज्यपाल भेटले कि पवारांबद्दल उलट बोलायच.. अस करून स्वतःची किंमत संपवली! ना भावाला मंत्री,ना स्वतः संपादक!"
 
'प्रहार' वृत्तपत्रातून काही पत्र छापणार आहोत, मग बघू कशी कुरकुर होते, असा इशाराही नितेश राणे यांनी राऊतांना दिलाय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारत चीन संघर्ष : गलवानमध्ये नेमकं काय घडलं? तुम्हाला पडलेल्या 6 प्रश्नांची उत्तरं वाचा