खंडप्राय पंखांसह हवेत पल्लेदार मुशाफिरी करणारा गरुड आपण कथा-कवितांमधून ऐकलेला असतो. पण गरुडाची पंखभरारी, आपला वेध घेणारे त्याचे तीक्ष्ण डोळे आणि एकूणच त्याचं गरुडपण जवळून न्याहाळता येत नाही.
परंतु कॅनडियन फोटोग्राफर स्टीव्ह बिरो यांनी टिपलेल्या एका फोटोने गरुडाचं अख्खं भावविश्व तंतोतंत बघणाऱ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं.
कॅनडातील रॅप्टोर संवर्धन केंद्रात तलावाच्या काठी 180 डिग्री पंखसंभार विस्तारून आणि तीक्ष्ण डोळे वटारलेल्या गरुडाचा स्टीव्ह यांनी काढलेला फोटो जगभर व्हायरल होतो आहे. बाल्ड इगल असं या गरुडाचं शास्त्रीय नाव आहे.
फोटो काढल्यानंतर स्टीव्ह यांनी हा फोटो सुरुवातीला फेसबुक ग्रुप्सवर अपलोड केला. भेदक नजरेसह फोटोग्राफरला रोखून बघणाऱ्या गरुडाने आणि पर्यायाने फोटोग्राफरने जगभरातल्या असंख्य चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
स्टीव्ह यांनी त्यादिवशी शेकड्याने फोटो घेतले. या फोटोत गरुडाचे भाव अचूकपणे प्रतीत झाले.
"गरुडाने जणू माझ्यासाठीच पोझ दिली. त्याने पंख विस्तारले. पंखांचा विस्तार पाण्यापर्यंत जाऊन पोहोचला होता. तो गरुड माझ्याकडेच रोखून बघत होता. हा फोटो मला अधिक भावला. पण तो जगभरातल्या माणसांना आपला वाटेल असं वाटलं नव्हतं", असं स्टीव्ह यांनी सांगितलं.
हा फोटो रेडीट या प्रसिद्ध वेबसाईटच्या होमपेजवर झळकला. तेव्हापासून जगभरात या फोटोची स्तुती होत आहे, तो शेअर केला जात आहे.
"पक्ष्यांसाठीच्या केंद्रातल्या या गरुडाला फोटोंची आणि फोटोग्राफरची सवय असते. मात्र हा फोटो काढण्यासाठी मी ज्या ठिकाणी आणि ज्या पद्धतीने कॅमेरा बसवला होता ते गरुडाला पसंत नव्हतं. फोटोसाठी मी ज्याठिकाणी तळ ठोकला होता तिथून मला हटवण्याचा गरुडाचा प्रयत्न होता. त्याच्या विस्तीर्ण पंखांनी आपण भेलकांडू शकतो याची जाणीव गरुडाने हवेत झेप घेतल्यावर झाली. गरुड माझ्या डोक्यावर आला तेव्हा आजूबाजूच्या माणसांनी श्वास रोखून धरले. तो अनुभव थरारक आणि विलक्षण असा होता."
ज्या दगडावर तो गरुड बसला होता तिथून त्यानं झेप घेताच मी त्याचा हा फोटो टिपला, स्टीव्ह सांगतात.
स्टीव्ह छंद म्हणून गेल्या दहाहून अधिक वर्षं फोटोग्राफी करत आहेत. निसर्ग, वन्यजीव, भूभाग अशा विविध क्षेत्रातील फोटो काढण्यात ते प्रवीण आहेत.
मात्र पक्ष्यांचे फोटो काढणं हा हळवा कोपरा असल्याचं स्टीव्ह सांगतात.
"पक्ष्यांमध्ये काहीतरी जादू असते. या जादूचं मला आकर्षण वाटतं. पक्षी ज्या पद्धतीने जगतात, खाणंपिणं मिळवतात, लहान मुलांसारखे वागतात. पक्ष्यांना पाहणं हा अनोखा अनुभव आहे.
फोटो काढताना मला पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटतं. पक्ष्यांचं जगणं अनुभवताना मी अचंबित होतो."
उत्तर अमेरिकेत बाल्ड इगल मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.
अमेरिकेच्या राष्ट्रीय चिन्हामध्ये बाल्ड इगल पाहायला मिळतो. निम्म्याहून अधिक अमेरिकेत या गरुडांचा मुक्तसंचार पाहायला मिळतो.
कॅनडात ब्रिटिश कोलंबिया, प्रेअरीज तसंच ओटँरिओ भागांमध्ये गरुडाचा अधिवास आहे.