Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विश्वास नांगरे पाटील यांना ते IPS झाल्याचं कळलं आणि मग...

Webdunia
मंगळवार, 31 मे 2022 (19:24 IST)
रोहन नामजोशी
15 जुलै 1997 चा दिवस होता. विश्वास नांगरे पाटील त्यांच्या खोलीत झोपले होते. स्पर्धा परीक्षांची वारी चालूच होती. त्यांच्या रुमची बेल वाजली. त्यांचा भाऊ विकास घामाघूम होऊन पळत आला. अशा अवस्थेत त्याला पाहताच विश्वास यांच्या काळजात धस्स झालं. गावाकडून काही बरी वाईट बातमी आली की काय असंही त्यांना वाटून गेलं. विश्वास यांना पाहताच त्यांच्या भावाने घट्ट मिठी मारली आणि तो म्हणाला, "भाऊ तुझा रँक वरती आला. तू आयपीएस झालास."
 
विश्वास यांचा क्षणभर विश्वासच बसला नाही. चार वर्षांच्या तपश्चर्येचं फळ मिळालं होतं. त्यांच्यासाठी तो अत्युच्च आनंदाचा क्षण होता.
 
कधी एकदा वडिलांच्या पायाला स्पर्श करून त्यांना ही बातमी सांगतो असं विश्वास यांना झालं होतं. वडिलांना फोन केला तेव्हा ते ढसाढसा रडायला लागले. "भावड्या माझ्या वाघा" इतकेच उद्गार त्यांनी काढले.
 
देवाचे आभार मानण्यासाठी विश्वास ओळीने सगळ्या मंदिरात गेले. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. आपला 'भावड्या' जिल्ह्याचा पोलीस प्रमुख होणार या कल्पनेने त्यांच्या गावात आनंदाला उधाण आलं होतं.
 
विश्वास नांगरे पाटलांनी नंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. पौर्णिमा अमावस्यासारखं येणाऱ्या यश अपयशाचे किस्से विश्वास नांगरे पाटील यांनी अवघ्या महाराष्ट्राला अनेकदा ऐकवले आहेत. त्यातून अनेकांनी अधिकारी होण्याची प्रेरणा घेतली ते आजतागायत.
 
2006 चा एक व्हीडिओ आहे. एका शाळेत विश्वास नांगरे पाटील येतात. माईकचा ताबा घेतात. पुढचा एक तास आपल्या आयुष्याचा प्रवास सांगतात. हे सांगताना पदोपदी सुविचारांची, शेरोशायरीची पखरण करतात. हा व्हीडिओ मोहून टाकणारा आहे. समोर विद्यार्थी बसले आहेत. एक तरुण आयपीएस अधिकारी तळमळीने मुद्दे गोष्टी सांगतोय, कधी हसवतोय, कधी स्फुल्लिंग चेतवतोय. खरोखर हा व्हीडिओ प्रेरणादायी आहे.
 
प्रेरणेची ही ज्योत विश्वास नांगरे पाटलांनी आजतागायत पसरवली आहे. विविध माध्यमातून ते सनदी अधिकारी होण्याबाबत मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या प्रेरणेने अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या वाटेला लागले. काहींची वाट लागली, काहींना अधिकारीपद मिळालं, काही फक्तच त्यांचे व्हीडिओ पाहत बसले आणि त्यांच्यावरचे मीम्स शेअर करत बसले.
 
विश्वास नांगरे पाटील या अधिकाऱ्याविषयी खूप चर्चा होते. अनेकांना त्यांचं मार्गदर्शन आवडत नाही,तर अनेक विद्यार्थी आजही त्यांनी हिरो मानतात. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या काळात नांगरे पाटील माहित नसलेला किंवा त्यांची व्याख्यानं न ऐकलेले विरळेच. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं कठीण आहे.
 
करारी मिशा, सडसडीत बांधा, रुबाबदार व्यक्तिमत्त्व, खणखणीत वक्तृत्व, या गुणांवर नांगरे पाटलांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गारूड केलं आहे. त्यांच्या तोंडचे वाक्य स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना पाठ असतात. निंदा किंवा वंदा पण विश्वास नांगरे पाटलांविषयी येणारी प्रत्येक गोष्ट स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी पाहत किंवा ऐकत असतो.
 
विश्वास नांगरे पाटील सध्या मुंबईत सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) या पदावर कार्यरत आहेत. त्याआधी पुणे ग्रामीण चे अधीक्षक, दक्षिण मुंबईचे उपायुक्त, पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, कोल्हापूर आणि औरंगाबाद विभागाचे महानिरीक्षक अशा महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.
 
विश्वास नावाचा जन्म
विश्वास नांगरे पाटलांचं कुटुंब खूप मोठं आहे. त्यांचे वडील कसदार मल्ल होते. ते मल्ल व्हावेत यासाठी त्यांच्या वडिलांनी खूप प्रयत्न केले. पुढे विश्वास यांचे वडील राजकारणात गेले. विश्वास यांना मोठी बहीण आहे. त्या काळी त्यांच्या सगळ्या आत्या माहेरी बाळंतपणासाठी येत. जुन्या मातीच्या मधल्या खोलीत बाळंतपण झालं की मुलगा होतो अशी त्यावेळी त्यांच्या घरात धारणा होती.
 
मात्र विश्वास यांची आईने हट्टाने माहेरी बाळंतपणाला गेली आणि त्यांना मुलगी झाली. त्यामुळे विश्वास पोटात असताना याच खोलीत बाळंतपण व्हावं अशी साहजिकच इच्छा होती. मात्र याहीवेळी विश्वास यांची आई माहेरी बाळंतपणाला गेली. मुलगा होत नाही अशी मनाशी धारणा नांगरे पाटील कुटुंबियांनी केली. तिकडे विश्वास यांच्या वडिलांसाठी दुसऱ्या लग्नाची बोलणी सुरू झाली.
 
विश्वास यांच्या आईला हा प्रकार कळताच त्यांचं ग्रामदैवत असलेल्या निनाईच्या मंदिरात भरल्यापोटी ओटी भरली आणि साकडं घातलं, "मला नांदण्याचा विश्वास दे, माझे आई मला विश्वास दे" आणि विश्वास यांचा जन्म झाला.
 
आशा निराशेच्या लाटा
विश्वास नांगरे पाटील लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. मात्र आसपासची परिस्थिती त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करू देणारी नव्हती. त्यांचे वडील पैलवान होते. गावात प्रसिद्ध होते. त्यांच्या नावाचा दबदबा होता. त्याचाच फायदा घेऊन विश्वास यांनी अनेक टवाळ उद्योग केले आणि वेळोवेळी त्याची शिक्षा भोगली.
 
ग्रामीण भाग, आजूबाजूला वांड पोरांची संगत, पदरी असलेला अंहंगंड यामुळे विश्वास अनेकदा निसरड्या वाटेवर गेले. मात्र तिथून सावरणारे अनेक शिक्षक त्यांना भेटले आणि त्यांची गाडी रुळावर येत गेली. त्यांच्या या शिक्षकांचा अत्यंत आदरपूर्वक उल्लेख ते त्यांच्या लिखाणात आणि वाचनात करतात.
 
मात्र सध्या सेवेत असलेल्या भूषण गगराणी यांनी विश्वास नांगरे पाटलांचं आयुष्य बदललं. 1988 साली भूषण गगराणी मराठी साहित्य हा विषय घेऊन आयएएस झाले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन विश्वास यांनी बारावीत चांगले मार्क असूनसुद्धा बीए ला प्रवेश घेतला आणि सनदी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला.
 
निर्णय घेणं आणि प्रत्यक्षात अंमलबजावणीतही बराच काळ गेला. विश्वास नांगरे पाटील बीए ला असतानापासूनच त्यांनी या परीक्षेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अभ्यास सुरू केला होता. मात्र आजूबाजूचं वातावरण त्यांना अभ्यासासाठी पोषक नव्हतं. त्यातून मार्ग काढणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं.
 
विकास खारगे महाराष्ट्र शासनात मोठ्या पदावर आहेत. विश्वास कोल्हापुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. मात्र त्यांना भेटायला त्यांचे मित्र यायचे आणि खूप टवाळखोरी करायचे. एकदा विकास खारगे यांनी विश्वास यांना एक गोष्ट सांगितली.
एका राजाने दोन गरुड आणले आणि त्यांना शिकवण्यासाठी काही दिवस गेले. एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला. दुसरा मात्र उडेचना. राजा काळजीत पडला. अगदी दोन सारखे पक्षी एक भरारी घेतो, दुसरा थंड. काय करावं काही सुचत नव्हतं.
 
दुसऱ्या दिवशी पहाटे राजा बागेत आला. बघतो तो दुसरा गरूड पहिल्यापेक्षाही उंच गेला होता. हवेत गिरक्या घेत होता. हे कुणी केलं याचा माग राजाला लागला नाही. एक सामान्य शेतकरी अदबीनं म्हणाला, 'महाराज मी फक्त तो गरुड ज्या फांदीवर होता ती फांदी कापली. दुसऱ्या क्षणी तो आकाशात झेपावला.'
 
'विश्वास, आपली फांदी तोडून बघ आणि आकाशात झेप घे' असा मोलाचा सल्ला विकास खारगे यांनी दिला आणि विश्वास यांचे डोळे उघडले आणि त्यांनी बीए च्या परीक्षेवर आणि स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित केलं. बीएचा निकाल लागला आणि ते एमए करण्यासाठी मुंबईला गेले
 
स्पर्धा परीक्षेच्या समुद्रात उडी
मुंबईला आल्यावर त्यांनी एमए आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. MPSC आणि UPSC हे दोन्ही शिवधनुष्य हाती घेतले होते. रोज दहा बारा तास अभ्यास करून त्यांनी MPSC ची मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली होती. आता विश्वास अधिकारी होणार हे सगळीकडे पसरू लागलं होतं. मात्र तिथेच घात झाला. विश्वास MPSC च्या परीक्षेत अपयशी झाले होते. UPSC च्या परीक्षेतही त्यांना अपयश आलं होतं.
 
पुन्हा एकदा निराशा, वैताग आणि अनिश्चितता त्यांच्या वाट्याला आली. आता त्यांनी SIAC ची खोली ही सोडावी लागली. आता ते आंबिवलीला रहायला गेले. तिथून पुन्हा हरिश्च ओम केला. दिवसरात्र अभ्यास केला. यशाअपयशाच्या हिंदोळ्यावर बागडणं चालूच होतं.
 
शेवटी 15 जुलै 1997 चा दिवस उजाडला आणि सगळ्या मेहनतीचं चीज झालं. विश्वास यांना आभाळ ठेंगणं झालं. मात्र आता आयपीएसची आव्हानं वाट पाहत होती.
 
प्रशिक्षणाची खडतर वाट
प्रशिक्षणाचा पहिला टप्पा मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री अकादमीत होता. इतक्या वर्षांत कमवलेल्या ज्ञानाचा, परिस्थितीने आलेला शहाणपणा यांचा उपयोग या प्रशिक्षणात पदोपदी आला. त्याबद्दल त्यांनी 'कर हर मैदान फतेह' या पुस्तकात सविस्तरपणे लिहिलं आहे.
 
मसुरीनंतर हैदराबादला झालेल्या प्रशिक्षणाचे अनुभवही भन्नाट आहेत. एक आयपीएस अधिकारी उदयाला येताना त्यांना कोणत्या दिव्यातून जावं लागतं याचं सविस्तर चित्रण या पुस्तकात आहे.
 
विश्वास नांगरे पाटील सेवेत आल्यानंतरही त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे चर्चेत होते. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असताना रेव्ह पार्टीवर टाकलेली धाड असो, 26/11 च्या वेळी त्यांनी अतिरेक्यांशी दिलेला लढा असो, नांगरे पाटील कायमच चर्चेत असतात.
 
सध्या ते मुंबई पोलिसात कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त आहेत. नांगरे पाटील सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. आपल्या कामाची माहिती ते सातत्याने देत असतात.
 
सोशल मीडियावर मीम्स
विश्वास नांगरे पाटील सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यांच्या नावाने अनेकदा त्यांनी न बोललेले वाक्य सुद्धा त्यांच्या नावावर खपवले जातात आणि व्हॉट्स अपवर गुड मॉर्निंगच्या मेसेजच्या स्वरुपात येतात.
 
त्यांचे मार्गदर्शनपर सुविचारांची थट्टाही सोशल मीडियावर होते. विश्वास नांगरे पाटलांनाही याची कल्पना आहे. त्यांच्याविषयीचे मीम्स त्यांच्या फोनवरही येतात. कधी ते त्याचा आनंद घेतात. कधी त्यांना त्याचा त्रास होतो. याविषयी त्यांनी बीबीसी मराठीकडे आपलं मत व्यक्त केलं.
ते सांगतात, "मला या प्रकाराचा कधी कधी फार त्रास होतो. नाशिकला आयुक्त असताना एका मुलाने माझ्या नावाने फेसबुकवर ग्रुप उघडले आणि तिथे राजकीय पोस्ट लिहिली. मला त्यावरून फोन यायला लागले तेव्हा मी त्या मुलाला बोलावून घेतलं आणि त्याला समज दिली मात्र त्याच्यावर कारवाई केली नाही. अशा प्रकारांचा त्रास होतो हे मात्र नक्की."
 
भविष्यातील अधिकाऱ्यांना काय संदेश देतात?
आपल्या मुल्यांशी तडजोड करायची नाही हा पहिला संदेश ते देतात. आपल्या मतांवर ठाम रहायचंय. कारण सगळेच लोक काही चांगलं म्हणत नाही. आपल्या कामाचा अनेक जण विरोध करतात. त्यामुळे आपल्या भूमिकेवर कायम ठाम रहाणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याला घटनेने जे हक्क दिले आहेत. त्याचा योग्य वापर करायचा. जात पात धर्म यांच्या पलीकडे जाऊन काम करायचं असा संदेश त्यांनी भविष्यातील आयपीएस अधिकाऱ्यांशी बोलताना बीबीसी मराठीशी बोलताना दिला.
 
विश्वास नांगरे पाटील यांची युपीएससीची मुलाखत चालू असताना मुलाखतकारांनी त्यांच्या नेमबाजीच्या कौशल्यावर एक प्रश्न विचारला. "What do u have inside you to hit the bull's eye?" त्याला उत्तर देताना नांगरे पाटील म्हणाले, "सर माझ्याकडे पराकोटीचा संयम आणि मनावर कठोर नियंत्रण आहे. मला ट्रिगर व्यवस्थित खेचता येतो. अचूक आणि उत्तम नेम धरण्याचा माझा स्वभाव आहे. मी माझ्या क्षमतेविषयी साशंक नाही. माझी इच्छाशक्ती दृढ आहे. मनाची शिस्त हा माझ्या कौशल्याचा कणा आहे." असं ते म्हणाले.
 
विश्वास नांगरे पाटील यांच्या आयुष्याकडे पाहिलं तर अचूक आणि उत्तम नेम धरण्याचा त्यांचा स्वभाव वारंवार प्रतित होतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments