प्रतीक्षा आता संपली. बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (ISWOTY) पुरस्काराच्या तिसर्या अध्यायासाठी नामांकनं जाहीर झाली असून आजपासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
नावाजलेले क्रीडापत्रकार, तज्ञ आणि लेखकांच्या समावेश असलेल्या जयुरींनी निश्चित केल्यानुसार BBC ISWOTY साठी पाच खेळांडूना नामांकन मिळालं आहे:
अदिती अशोक, गोल्फपटू
अवनी लेखरा, पॅरा-नेमबाज
लवलिना बोरगोहाईं, बॉक्सर
पी. व्ही. सिंधू, बॅडमिंटनपटू
सायखोम मिराबाई चानू, वेटलिफ्टर
ऑनलाइन मतदान भारतीय वेळेनुसार 28 फेब्रुवारी, 11.30 (1800 GMT) वाजेपर्यंत सुरु राहील आणि विजेत्यांचं नाव 28 मार्च 2022 रोजी दिल्लीतील एका पुरस्कार सोहळ्यात जाहीर केलं जाईल.
बीबीसीच्या आंतरराष्ट्रीय सेवांच्या वरिष्ठ कंट्रोलर आणि बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या संचालक लिलियन लँडोर सांगतात. “बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्काराच्या माध्यमातून भारतातील क्रीडा महिला खेळाडूंच्या असामान्य यशाचा गौरव होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. या वर्षी नामांकन मिळालेल्या खेळाडू या असाधारण महिला असून त्यांच्या त्यांच्या खेळातल्या नायिका आहेत. सगळ्याचजणी जिंकू शकतात, पण विजेती कोण ठरवणार, हे आमचे वाचक- प्रेक्षक ठरवतील.”
बीबीसी न्यूजच्या भारताच्या प्रमुख रूपा झा सांगतात: “मला खेळाडूंची नामांकन जाहीर करताना आनंद वाटत आहे. BBC ISWOTY नामांकनाच्या प्रत्येक आवृत्तीत काही नवीन नावे समोर आल आहेत. यंदा नामांकन मिळालेल्या पाचहीजणी वेगवेगळ्या खेळांचं प्रतिनिधित्व करतात. गोल्फपासून ते पॅरालिंपिकपर्यंत, भारतीय खेळांच्या लखलखत्या तारकांचं यश साजरं व्हायला हवं.”
या पुरस्कार सोहळ्यात एका दिग्गज खेळाडूचा बीबीसी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान केला जाईल, आणि एका युवा महिला खेळाडूला बीबीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कारानं गौरवण्यात येईल.
नामांकनं जाहीर झाली तेव्हा गेल्या वर्षी जीवनगौरव पुरस्कार मिळवणार्या अंजू बॉबी जॉर्जनं आपलं मत व्यक्त केलं. तिनं भारतीय खेळांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी आशा व्यक्त करताना म्हटलं आहे, “भारत गुणवान महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुरेसे प्रयत्न सुरु आहेत, आता परिस्थिती बदलत आहे. खेळांसाठी नव्या सुविधा तयार होतायत, पण आपल्याला चांगल्या प्रशिक्षकांची गरज आहे. पालकांनाही वाटतं की आपल्या पाल्यांनी खेळात यश मिळवावं, पण कधीकधी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो.”
नामांकित व्यक्तींनी शॉर्टलिस्ट झाल्याबद्दल पुढील प्रतिक्रिया दिल्या:
अदिती अशोक, 2020 टोकियो समर ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावणारी: “मी कृतज्ञ आणि आभारी आहे कारण हे वर्ष माझ्यासाठी चांगले होते आणि मी काही उत्कृष्ट कामगिरी केली. मला आनंद आहे की भारतात गोल्फ अधिक लोकप्रिय होत आहे.”
अवनी लेखरा, पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला: “मागील सहा वर्षात केलेल्या सर्व परिश्रमांना मान्यता मिळत आहे याचा मला खरोखर आनंद आहे. 2024 च्या पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे माझे दीर्घकालीन ध्येय आहे.”
लोव्हलिना बोर्गोहेन, टोकियो 2020 मध्ये कांस्यपदक मिळवणारी: “आम्ही महिला किंवा मुली आहोत म्हणून आपण काही करू शकत नाही असा विचार आपण कधीही करू नये. आम्ही महिला सर्व काही करू शकतो, आम्ही सर्व समान आहोत.
पी.व्ही. सिंधू, सलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला: “यश हे सहजासहजी मिळत नाही, हे केवळ काही महिन्यांचे परिश्रम नसते, तर अनेक वर्षांचे कठोर परिश्रम असते. प्रत्येक दिवस ही एक प्रक्रिया असते, अशा प्रकारे तुम्ही एका विशिष्ट स्तरापर्यंत पोहोचता.
सायखोम मीराबाई चानू, 2017 मध्ये जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी आणि टोकियो 2020 मध्ये रौप्य पदक जिंकणारी: “मी लोकांच्या मते मुलींना जास्त वजन उचलता येत नाही आणि त्यामुळे महिलांच्या शरीराचे नुकसान होते असे ऐकले आहे. पण ते खरे नाही, मला काहीही झाले नाही.”
यंदाच्या वर्षी पुरस्कारासाठी शर्यतीत असलेल्या प्रेरणादायी क्रीडापटूंच्या वाटचालीच्या कहाण्या तुम्ही पाहू आणि वाचू शकता. बीबीसी वर्ल्ड न्यूज पुरस्कारासाठी यंदा रिंगणात असलेल्या क्रीडापटूंच्या कारकीर्दीचा वेध घेणारे माहितीपट शनिवार, 19 फेब्रुवारी रोजी 23:00 IST (17:30 GMT), रविवार 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:00 IST (04:30 GMT) आणि 16:00 IST (10:30 GMT) वाजता नामांकित व्यक्ती दर्शविणारा माहितीपट प्रसारित करेल. बीबीसी स्पोर्ट भारतातील महिला पॅरा-अॅथलीट्सच्या वाढीती संख्या यावर एक विशेष लेख प्रकाशित करेल.