नोबेल शांतता पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या मलाला युसूफझई यांनी मंगळवारी तालिबानबाबतच्या भयावह आठवणीं सांगताना अफगाणिस्तानातील महिलांबाबत चिंता व्यक्त केली आहे.
अफगाणिस्तानात जे काही घडत आहे, त्यावर अमेरिकेतील बोस्टनमधून नजर ठेवून असल्याचं मलाला यांनी एका ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.
बोस्टनमध्ये मलाला चेहऱ्याच्या अर्धांगवायूवर उपचार म्हणून एका शस्त्रक्रियेसाठी गेल्या आहेत. त्यांना ही शस्त्रक्रिया पाकिस्तान तालिबाननं त्यांच्यावर केलेल्या गोळीबारामुळं करावी लागली. ऑक्टोबर 2012 मध्ये पाकिस्तानातील तालिबानच्या एका कट्टरतावाद्यानं मलाला यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी त्या शाळेत चालल्या होत्या.
अफगाणिस्तानात तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर आता महिलांना त्याची किंमत मोजावी लागू शकते, असं मलालानं म्हटलं आहे.
''नऊ वर्षांनंतरही मी त्या एका गोळीच्या हल्ल्यातून सावरू शकलेले नाही. अफगाणिस्तानच्या नागरिकांनी तर गेल्या चार दशकांमध्ये लाखो गोळ्या झेलल्या आहेत. अनेकांनी मदतीसाठी आवाज दिला, मात्र काहीही उत्तर मिळू शकलं नाही. अशा लोकांसाठी जीव कासावीस होतो. त्या लोकांची नावं आपण कधीही विसरू शकणार नाहीत, किंवा आपल्याला कधी कळणारही नाहीत, असं मलाला म्हणाल्या.
"मी जगभरातील देशाच्या प्रमुखांना पत्र लिहित आहे. त्यांच्याशी फोनवरून बोलत आहे. अफगाणिस्तानात अजूनही महिलांसाठी लढणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या संपर्कात आहेत. गेल्या दोन आठवड्यांत आम्ही अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात मदत केली आहे. पण सर्वांनाच मदत करता येणार नाही, हे मला माहिती आहे."
कट्टरतावाद्यांनी डोक्यात गोळी मारली त्या हल्ल्याच्या वेळी सोबत असलेल्या मित्र-मैत्रिणींबरोबरही बोलल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
अजूनही तो क्षण एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे मनात घर करून असल्याचं मलाला यांना त्यांच्या मित्रांनी सांगितलं आहे.
अफगाणिस्तानात तालिबाननं नियंत्रण मिळवल्यानंतर महिलांबाबत प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे. 1996 पासून 2001 पर्यंत अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती, त्यावेळी महिलांची स्थिती अत्यंत दयनीय होती.
मलाला यांची चिंता
"मी बोस्टनमध्ये रुग्णालयाच्या बेडवर आहे. ही माझी सहावी शस्त्रक्रिया आहे. तालिबाननं माझ्या शरिराचं जे नुकसान केलं आहे, ते भरून काढण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरुच आहेत. ऑक्टोबर 2012 मध्ये पाकिस्तानातील तालिबानच्या एका सदस्यानं मी शाळेत जाताना रस्त्यात माझ्या डोक्यात डाव्या बाजूला गोळी मारली होती," असं मलाला यांनी लिहिलं आहे.
या गोळीचा परिणाम माझा डावा डोळा, कवटी आणि मेंदूपर्यंत झाला. त्याशिवाय माझ्या चेहऱ्याच्या नसांवरही परिणाम झाला आहे. माझ्या जबड्याचा सांधा तुटला आणि कानाचा पडदाही फाटला.
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आपत्कालीन शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी माझ्या कानाचं हाड काढलं होतं. जखमी झाल्यानं माझ्या मेंदूवर आलेली सूज पसरण्यासाठी जागा मिळावी म्हणून तसं करण्यात आलं होतं.
तेव्हा डॉक्टरांनी तत्काळ पावलं उचलल्यामुळं मी बचावले, पण काही दिवसांतच माझ्या शरिराचे अवयव काम करणं बंद होऊ लागलं. त्यानंतर मला इस्लामाबादला एअरलिफ्ट करण्यात आलं.
आठवडाभरानंतर डॉक्टरला असं वाटलं की मला अधिक चांगल्या उपचारांची गरज आहे. त्यामुळं मला विदेशात उपचारासाठी पाठवण्यात आलं.''
''मी त्यावेळी कोमामध्ये होते. ब्रिटनच्या बकिंघम येथील क्वीन एलिझाबेथ रुग्णालयात माझा डोळा उघडला तेव्हा मला मी जिवंत असल्याची जाणीव झाली. त्याआधीचं मला काहीही आठवत नव्हतं. पण मी कुठं आहे हे मला माहिती नव्हतं,'' असं मलालांनी लिहिलं आहे.
''माझ्या चारही बाजूंना अनोळखी आणि इंग्रजीत बोलणारे लोक का आहेत, हे माझ्या लक्षात येत नव्हतं. माझं डोकं फार दुखत होतं. मला अंधुक दिसत होतं.
गळ्यात लावलेल्या ट्युबमुळं मी बोलू शकत नव्हते. त्यानंतरही काही दिवस मी बोलू शकले नव्हते. मी वहीवर लिहायला सुरूवात केली.
माझ्या खोलीत कोणीही आलं तर मी त्याला लिहून दाखवायचे. मला काय झालं आहे? असं मी विचारायचे. माझे वडील कुठं आहेत? या उपचाराचे पैसे कोण देत आहे? आमच्याकडे पैसे नाहीत,'' असं मी म्हणायचे.
आरसा पाहणं सोडलं
मलालानं सांगितलं, ''मी 'मिरर' लिहिलं आणि नर्सनं मला आरसा दाखवला. मला स्वतःला पाहायचं होतं. पण मी स्वतःचा अर्धाच चेहरा ओळखू शकले. उर्वरित अर्धा चेहरा अनोळखी वाटत होता. काळे डोळे, चेहऱ्यावर पसरलेली गन पावडर सोबतच हसू नाही, हावभाव नाही किंवा हालचालही नव्हती.''
''माझ्या डोक्यावरचे अर्धे केस काढलेले होते. मला वाटलं तालिबाननं माझे केस काढले असावेत. पण डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी माझे केस काढले आहेत असं नर्सनं मला सांगितलं. मी शांत राहण्याचा प्रयत्न करत होते. मी स्वतः सांगितलं, मी जेव्हा रुग्णालयातून घरी जाईन तेव्हा एक नोकरी शोधेन. पैसे कमावेल आणि एक फोन खरेदी करेन. कुटुंबीयांना फोन करेन आणि रुग्णालयाचे बिल भरण्याचेही सर्व पैसे कमावेन.''
''माझ्यामध्ये दृढनिश्चय होता. मी रुग्णालयातून निघाल्यानंतर गरूडझेप घेईल आणि वेगानं धावेल, असं मला वाटायचं. पण मला लवकरच जाणीव झाली की, माझ्या शरिराचा बहुतांश भागच हलू शकत नव्हता. मात्र ते तात्पुरतं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं,'' असं मलाला यांनी लिहिलं आहे.
''मी पोटाला स्पर्श केला. माझं पोट कडक होतं. माझ्या पोटाला काही त्रास आहे का असं मी विचारलं. जेव्हा पाकिस्तानच्या डॉक्टरांनी जेव्हा हाड काढलं होतं, तेव्हा ते माझ्या पोटात गेलं होतं आणि त्यामुळं माझं पोट कडक होतं, असं नर्सनं सांगितलं.
अनेक शस्त्रक्रिया
''ते हाड माझ्या डोक्यात परत बसवण्यासाठी मला आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागली. पण ब्रिटनच्या डॉक्टरांनी त्याऐवजी टायटेनियमची प्लेट लावण्याचा निर्णय घेतला. इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी तसं करण्यात आलं होतं.
या प्रक्रियेला क्रिनिओप्लास्टीही म्हटलं जातं. डॉक्टरांनी माझ्या पोटातलं हाड बाहेर काढलं. सध्या ते माझ्या बुकशेल्फमध्ये ठेवलेलं असतं. टायटेनियम क्रिमिओप्लास्टीदरम्यान कोक्लिअरही इम्प्लांट करण्यात आलं कारण गोळी लागल्यामुळं माझ्या कानाचे पडदेही फाटले होते.''
''माझं कुटुंब इंग्लंडला आलं त्यावेळी मी फिजिकल थेरपी सुरू केली. हळू हळू चालायचा प्रयत्न करायचे. मुलांसारखी अगदी जपून पावलं टाकायचे.
मी बोलतही मुलांसारखीच होते. मला जणू नव्या जीवनाची सुरुवात झाली असं वाटू लागलं.''
''इंग्लंडला आल्यानंतर सहा आठवड्यांनी डॉक्टरांनी फेशियल पॅरालिसिसचा उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी माझा चेहरा पुन्हा कापण्यात आला. त्यानंतर माझ्या तुटलेल्या फेशियल नर्व्हला पुन्हा टाके देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळं हालचाली सोप्या होतील, असं डॉक्टरांना वाटू लागलं होतं.''
''या शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी माझा चेहरा बराच सुधारला. ओठ बंद ठेवून हसले तर मला संपूर्ण चेहरा पाहणं शक्य होतं.
मी हसायचे तेव्हा दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेत होते. माझा चेहरा दोन्ही बाजूंनी सारखा नाही, असे लोकांना कळू नये म्हणून मी तसं करायचे. पुढं मी स्वतःला पाहणंच बंद केलं होतं.''
''मी आरशाचा सामना करू शकत नव्हते. पण नंतर मी गोष्टी स्वीकारायला शिकले. तसंच परिस्थितीपासून फार दिवस पळता येणार नाही, हेही मला समजलं.
मी जे काही गमावलं आहे, ते उपचारांद्वारे परत मिळावं असं माझ्या आई वडिलांना वाटत होतं. त्यासाठी आम्ही बोस्टनमध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटीगाठी घेतल्या आणि फेशियल पॅरालिसिसचा उपचार अत्यंत गुंतागुंतीचा असल्याचं आम्हाला चर्चेतून समजलं.''
महिलांची काळजी
''मला दोन मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागणार होत्या. 2018 मध्ये माझ्या शरिरातीच एक नस काढून चेहऱ्यावर लावण्यात आली. जानेवारी 2019 मध्ये माझ्या मांडीतील टिश्यू काढून चेहऱ्याच्या डाव्या बाजुला इम्प्लांट करण्यात आला. नस टिशूला जोडली जाईल आणि स्नायूमध्ये फिट होईल अशी डॉक्टरांना आशा होती.
तसंच झालंही आणि चेहऱ्याची हालचाल सुरू होऊ शकली. पण त्यामुळं माझा गाल आणि जबड्यात अतिरिक्त फॅट वाढले. त्यासाठी आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागेल,'' असं डॉक्टरांनी सांगितल्याचं मलाला यांनी लिहिलं आहे.
''नऊ ऑगस्टला मी बोस्टनमध्ये सकाळी पाच वाजता हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी उठले त्यावेळी तालिबाननं कुंदुज शहर ताब्यात घेतल्याची बातमी आली. तालिबानच्या ताब्यात आलेलं अफगाणिस्तानचं हे पहिलं मोठं शहर होतं.''
''त्यानंतर काही आठवड्यांत माझ्या चेहऱ्याच्या चारही बाजुंना आईसपॅक आणि बँडेज लावलेले होते. बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानचा प्रत्येक प्रांत तालिबानच्या ताब्यात गेल्याचं मी पाहत राहिले.
अगदी जशी मला गोळी मारली तसंच हे घडलं होतं. मला गोळी मारण्यात आली तेव्हा मी अतिरेक आणि मुलींवर लावलेल्या निर्बंधांच्या विरोधात बोलत होते. आता पुन्हा तीच काळजी सतावत आहे.''