अनघा पाठक
बीबीसी मराठी
आधी टिकटॉक आणि नंतर इंस्टाग्रामवर आपल्या व्हीडिओमुळे प्रसिद्ध असलेल्या सोशल मीडिया स्टार समीर गायकवाडने 21 फेब्रुवारीला पुण्यातल्या आपल्या राहात्या घरी आत्महत्या केली. त्याचं वय 22 वर्षं होतं.
सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या, किंवा टिकटॉकवर स्टार असलेल्या तरूण मुलांनी आत्महत्या करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
या आधी याच महिन्यात अमेरिकेतल्या डाझारिया नावाच्या 18 वर्षांच्या टिकटॉक स्टारने आपलं आयुष्य संपवलं. तिचे टिकटॉकवर 10 लाख आणि इंस्टाग्रामवर 1 लाखाहून जास्त फॉलोअर्स होते. 8 फेब्रुवारीला तिने आत्महत्या केली. आपल्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये एक स्वतःचा नाचताना, गाताना एक व्हीडिओ शेअर केला आणि त्यात लिहिलं, "मी तुम्हा सगळ्यांना वैताग देतेय पण ही माझी शेवटची पोस्ट आहे."
एका महिन्यापूर्वी आंध्र प्रदेशमधला टिकटॉक स्टार रफी शेख यानेही आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या होत्या. पोलिसांनी या बाबतीत संशयास्पद मृत्यूची केस नोंदवली होती.
गेल्या वर्षी अवघ्या 16 वर्षांची टिकटॉक स्टार सिया कक्करने गेल्या वर्षी जून महिन्यात आत्महत्या केली होती. सिया तिच्या डान्स व्हीडिओसाठी खूप प्रसिद्ध होती. तिचे टिकटॉकवर 14 लाख तर इंस्टाग्रामवर 1 लाखाहून अधिक फॉलोअर होते.
या सततच्या घटनांमधून काही पॅटर्न समोर येतोय का? टिकटॉक किंवा ते बॅन झाल्यानंतर इंस्टाग्रावर आपले व्हीडिओ टाकणारे स्टार एकापाठोपाठ एक आत्महत्या का करत आहेत? हीच गोष्ट शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.
व्हर्च्युअल आणि खऱ्या आयुष्यातली सीमा पुसट
नाशिकमधले मानसोपचार तज्ज्ञ डॉ उमेश नागपूरकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "मुळात किशोरवयीन किंवा विशीच्या आतल्या मुलांचा प्री फ्रंटल कोर्टेक्स, मेंदूचा तो भाग जो तुम्हाला समंजस आणि प्रौढ बनवतो, तो विकसित झालेला नसतो. त्यामुळे ही मुलं कुठल्यातरी आवेगात निर्णय घेऊन मोकळी होतात.
अनेकदा या मुलांची व्हर्चुअल आणि खऱ्या आयुष्याची गल्लत झालेली असते. त्यातली सीमारेषा पुसट झालेली असते. त्यामुळे जे ऑनलाईन घडेल त्यापलिकडे आपल्याला आयुष्य नाही. तिथे मनासारखं घडलं नाही तर आपलं आयुष्य संपलं अशा भावना त्यांच्या मनात बळावते."
दुसरा मुद्दा थ्रिलचा आहे. अनेकदा काहीतरी करून बघण्याच्या किंवा मिळवण्याच्या नादात सोशल मीडियावर स्टार असणारी पर्यायाने सतत ऑनलाईन असणारी मुलं चुकीच्या गोष्टी करतात. याचं उदाहरण देताना डॉ. नागपूरकर ब्लू व्हेल गेमचं उदाहरण देतात.
"यात जसेजसे पुढे जालं तसं तसं स्वतःला इजा करण्याच्या स्टेप्स होत्या. पण तरीही मुलं तसं करत होती, यात एकतर थ्रिल होतं आणि दुसरं म्हणजे त्या स्टेप्स केल्या नाही तर गेममध्य पुढे जाता येत नव्हतं. त्यामुळे फक्त पुढची लेव्हल अनलॉक करण्यासाठी मुलं चुकीच्या गोष्टी करत होती. काही मुलं आत्महत्येपर्यंतही पोहचले होते."
लंडनमध्ये लेखक आणि प्राध्यापक असणाऱ्या लॉरेन्स स्कॉट यांनी मागच्या वर्षी बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं की सोशल मीडिया फक्त आपल्या भावनांशी खेळतच नाहीये, तर आपल्या भावना आणि व्यक्त करण्याची पद्धतच बदलत आहे.
"उदाहरणार्थ, आपली न्यूज फीड. मग ती फेसबुकची असो, किंवा इंस्टाग्रामची. एकापाठोपाठ एक पोस्ट स्क्रोल करत असताना वरची एखाद्या गोंडस बाळाचा फोटो असतो तर खाली लगेच एखाद्या भुकंपात सातशे लोक मेल्याचा अपडेट. या टाईमलाईन्सवर भावनांचं कोणतंही सातत्य नसतं. त्यामुळे एखादी भावना पूर्णपणे अनुभवण्याच्या आधीच आपण दुसऱ्या भावनेकडे फेकलो जातो."
आणि आधी म्हटल्याप्रमाणे अगदी तरूण मुलं भावनांचा हा आवेग किंवा वेगवेगळ्या भावनांचं फार कमी वेळात होणार मिश्रण योग्य रितीने हाताळू शकत नाहीत.
लाईक, शेअर, व्ह्यूजचा खेळ
मुंबईस्थित डॉ. राजेंद्र बर्वे (सुगत आचार्य) सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणाऱ्या मुलांची मानसिकता उलगडून सांगतात. "या वयातली मुलं सतत एक्साईंटमेंट मोडवर असतात. म्हणजे कोणत्याही गोष्टीने उत्तेजित होऊ शकतात. ही उत्तेजना कशी हाताळायची याचं मात्र त्यांना ज्ञान नसतं."
कोणाला किती लाईक, किती व्ह्यू, किती शेअर यात तरूण मुलं गुरफटत जातात. जरा जरी कमी लाईक मिळाले तर या मुलांना नैराश्य येऊ शकतं.
तरूण वयात आसपास स्पर्धा असतेच. त्यांचे जवळचे मित्र मैत्रिणी स्पर्धक होतात आणि सोशल मीडियावर ही स्पर्धा अधिकच तीव्र असते. ही स्पर्धा नवी नाही. वयात येणाऱ्या प्रत्येकाला हा अनुभव कधी ना कधी आलेला असतो. त्या वयात आईवडिलांपेक्षा, घरच्यांपेक्षा मित्रमैत्रिणी जास्त जवळचे वाटतात.
"मी त्या वयात असताना असाच होतो. पण आता मुलांना एक्सपोजर जास्त मिळालं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमांतून असंख्य अनोखळी लोकांशी त्यांचा संबंध येतो, अनोळखी लोकांशी स्पर्धा केली जाते. सोशल मीडियाच्या परिघात ही मुलं एकटी असतात. त्यांना कोणतंही कुशन उदाहरणार्थ आईवडील, नसतं. त्यामुळे ही मुलं हरवून जातात आणि टोकाची पावलं उचलतात."
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात दर 40 सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करत असते. यामागे मुख्य कारण मानसिक आजार असतात. यातलाच एक मानसिक आजार आहे नार्सिसिझम म्हणजेच स्वतःच्याच प्रेमात असणं. सोशल मीडियाचा उगम झाल्यापासून या आजारात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.
बीबीसी स्टोरीजने 2019 मध्ये केलेल्या एका रिपोर्टमध्ये एका ग्रीक लोककथेचं उदाहरण दिली आहे. या कथेनुसार एक तरूण मुलगा नार्सिसस तलावात आपलं प्रतिबिंब पाहतो. त्या प्रतिबिंबात इतकं हरवून जातो की आसपासचं सगळं विसरतो आणि स्वतःच्या प्रेमात पडतो. आपली प्रतिमा हाती धरण्याच्या नादात तो मुलगा सरतेशेवटी त्याच पाण्यात पडून बुडून मरतो.
याच कथेवरून पुढे नार्सिसिझम म्हणजेच स्वतःच्या प्रतिमेत गुरफटणे हा शब्द आला. आधूनिक मानसशास्त्राचा जनक समजल्या जाणाऱ्या सिग्मंड फ्रॉईड यांनी पहिल्यांदा या शब्दाचा वापर केला.
इंस्टाग्राम किंवा टिकटॉकवर जे व्हीडिओ अपलोड केले जातात त्यामागे हीच प्रेरणा असते. आपल्या व्हीडिओजला लाखोने व्ह्यूज किंवा लाईक्स मिळावे. पण सोशल मीडियावर आज असलेला ट्रेंड उद्या असेलच असं नाही, किंवा आज लोकप्रिय असणारी व्यक्ती उद्या असेलच असं नाही. त्यामुळे जर लाईक शेअरच्या स्पर्धेत मागे पडले तर मुलं टोकाचा निर्णय घेऊ शकतात.
आतापर्यंत असं समजलं जात होतं की नार्सिसिस्ट किंवा स्वतःच्या प्रेमात असलेले लोक आत्महत्या करत नाहीत. पण 2017 साली डॅनियल कोलमन आणि सहकाऱ्यांनी जर्नल ऑफ सायकॅट्रिक रिसर्चमध्ये लिहिलेल्या शोधनिबंधात असं म्हटलं की नार्सिसिस्ट लोकांनी आत्महत्येचे प्रयत्न केले तर ते जीवघेणे ठरतात. म्हणजेच असे लोकांनी आत्महत्या करण्याचं ठरवलं तर ते मागे हटत नाहीत.
म्हणूनच कदाचित जगभरात इंफ्लुएन्सर्स म्हणजेच ज्यांना सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत अशाच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे. वर उल्लेखलेल्या घटनांमागे काही इतरही कारणं असतील, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, पण तरूण मुलांच्या अशा आत्महत्यांकडे गंभीरतेने पाहावं लागेल.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980