भारतातील आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असणाऱ्या मिंत्राने (Myntra) 'ब्रँड लोगो' बदलण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर महिन्यात सामाजिक कार्यकर्त्या नाज एकता पटेल यांनी या लोगोविरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर कंपनीने लोगोमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाज एकता पटेल मुंबईत एवेस्ता फाऊंडेशन (Avesta Foundation) ही वृद्धांसाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था चालवतात. मिंत्रा कंपनीचा लोगो महिलांचा अपमान करणारा आणि आक्षेपार्ह आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हा विषय मांडत होत्या. अखेर त्यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबई सायबर सेलकडे या विषयाची तक्रार नोंदवली.
बीबीसी मराठीशी बोलताना नाज पटेल म्हणाल्या, "मी दत्तक घेतलेल्या एका ज्येष्ठ नागरिकांचा माझ्या घरी वाढदिवस होता. त्या वाढदिवसाला इतरही काही पाहुणे आले होते. तेवढ्यात टिव्हीवर मिंत्राची जाहिरात लागली आणि दोन ज्येष्ठ नागरिक ती जाहिरात बघून हसले. मी याविषयी विचारल्यावर त्यांनी या लोगोमधला मधला भाग अश्लील असल्याचं सांगितलं."
त्या पुढे म्हणाल्या, "यानंतर मी गुगलवर सर्च केलं. तिथेही काहींनी या लोगोवर आक्षेप घेतल्याचं मला दिसलं. मी अनेक महिलांशी बोलले. त्यांनाही मिंत्राचा लोगो महिलांचा अपमान करणारा वाटला. त्यामुळे याविषयी काहीतरी करायला हवं, असं मला वाटलं. मी कंपनीला मेल केला. पण त्यांचं उत्तर मिळालं नाही. मग वकिलांमार्फेत कायदेशीर नोटीसही पाठवली. मात्र, त्या नोटिशीलाही कंपनीने उत्तर दिलं नाही."
असा जवळपास तीन वर्ष लढा दिल्यानंतर नाज पटेल यांनी डीसीप डॉ. रश्मी करंदीकर यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली. पटेल यांच्या तक्रारीनंतर पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी 4 जानेवारी रोजी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली.
याविषयी सांगताना डॉ. रश्मी करंदीकर म्हणाल्या, "सदर लोगोविषयीची तक्रार घेऊन तक्रारदार महिला मुंबई सायबर पोलिसांकडे आल्या. ती तक्रार पाहिली गेली आणि संबंधित लोगो महिलांसाठी अपमानकारक वाटत असल्याने मिंत्राला बोलवण्यात आलं आणि याविषयी विचारणा केली."
रश्मी करंदीकर म्हणाल्या, "नाज एकता पटेल यांनी महिलांसाठी या लोगोविरोधात गेल्या तीन वर्षात जो लढा दिला तो एक प्रतिक म्हणून मला वेगळा वाटतो. त्यांनी या मुद्द्याचा सातत्याने पाठपुरावा केला आणि आज त्याला यश आलं आहे."
पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर मिंत्राने लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ई-मेलद्वारे पोलिसांना याविषयीची माहिती दिली. वेबसाईट आणि अॅपवरील लोगो लवकरात लवकर बदलण्यात येईल, असं आश्वासन या ई-मेलमध्ये देण्यात आलं आहे. मात्र, कंपनीच्या पॅकेजिंग आणि मार्केटिंग मटेरियलवर जुना लोगो आहे. हे मटेरियल संपल्यानंतर नवं मटेरियल नव्या लोगोसह प्रिंट करू, असं कंपनीचं म्हणणं आहे.
मात्र, हे मटेरियल पुढची काही वर्षं संपलं नाही तर काय?, असा सवाल नाज पटेल विचारतात. कंपनीने पॅकेजिंग आणि मार्केटिंग मटेरियलही नव्या लोगोसह प्रिंट करावं आणि जुनं कुठलंही मटेरियल बाजारात आणू नये, अशी त्यांची मागणी आहे.
नाज एकता पटेल गेली 12 वर्ष रस्त्यावर भीक मागणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करतात. काहींना त्यांनी आपल्या घरी आसरा दिला आहे. त्यांच्या घरी आज 12 ज्येष्ठ नागरिक राहतात.