Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

बाबर आझमची विराट कोहलीशी तुलना का केली जाते?

बाबर आझमची विराट कोहलीशी तुलना का केली जाते?
, मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (12:15 IST)
- पराग फाटक
रविवारी पाकिस्तान संघाने ट्वेन्टी-20 विश्वचषकात भारताला नमवण्याची किमया केली आहे. कोणत्याही स्वरुपाच्या विश्वचषकात भारताला हरवण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने 10 विकेट्सनी विजय मिळवत ऐतिहासिक विजय साकारला. या सामन्यात बाबरने 68 धावांची खेळी केली.
 
या खेळीसह सोशल मीडियावर, खेळ चाहत्यांमध्ये, माजी खेळाडूंमध्ये बाबर आझम पुढचा विराट कोहली असणार का? यानिमित्ताने चर्चा सुरू झाली. बाबर आझमची विराट कोहलीशी तुलना का केली जाते हे समजून घेणं आवश्यक आहे.
 
बाबरची विराटशी तुलना का होते?
विराट 32 वर्षांचा आहे तर बाबर 27 वर्षांचा आहे. साहजिक वय, अनुभव आणि आकडेवारीत विराट सरस आहे. विराट कोहलीप्रमाणे बाबर पाकिस्तानचा मुख्य फलंदाज आहे. दोघंही उजव्या हातानेच खेळतात. विराट कोहली ज्या सातत्यासाठी ओळखला जातो तसंच सातत्य बाबरने आपल्या खेळात राखलं आहे.
 
ज्या पद्धतीने विराट टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी20 प्रकारात धावांची टांकसाळ उघडतो त्याच धर्तीवर बाबर पाकिस्तानसाठी टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी20 अशा तिन्ही प्रकारात खोऱ्याने धावा करतो. दर्जेदार गोलंदाज, आव्हानात्मक खेळपट्या, प्रचंड उकाडा आणि आर्द्रता अशा कोणत्याही परिस्थितीचा विराट समर्थपणे सामना करतो.
 
विराट जगभर धावा करतो. अस्थिर वातावरणामुळे पाकिस्तानचे सामने युएईत होत असल्याने बाबरला होम कंडिशन्सचा फायदा मिळालेलाच नाही.
 
मात्र तरीही बाबरची कामगिरी उत्तमच झाली आहे. वेगवान गोलंदाजी आणि फिरकीचा चक्रव्यूह हे दोन्ही भेदण्यात विराट माहीर आहे. त्याचप्रमाणे बाबरही आत्मविश्वासाने वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही प्रकाराच्या गोलंदाजांना सामोरं जात धावा करतो.
 
खेळपट्टीवर स्थिरावत डावाची बांधणी करण्यावर कोहली भर देतो. काहीशा पारंपरिक दृष्टिकोनासह विराट खेळतो. बाबरही अनोखे फटके न लगावता तंत्राला चिकटून राहत डाव उभारण्यावर भर देतो.
 
दोघंही सहजी आपली विकेट देत नाहीत. तिशी ओलांडली की हे बाबरही मोठी खेळी करणार असं दोघांच्याही बाबतीत बोललं जातं. दोघांच्याही भात्यात फटक्यांची पोतडी आहे.
 
कोणत्या गोलंदाजांचा सन्मान करायचा, कोणत्या गोलंदाजावर आक्रमण करायचं, कधी गिअर बदलायचा, भागीदारी कशी रचायची याबाबतीत विराटने वस्तुपाठ सादर केला आहे.
 
बाबरही याच आदर्शवत पद्धतीने खेळतो. स्वत:च्या खेळीसह सहकाऱ्यांसमोर उदाहरण ठेवण्याचा दोघांचाही प्रयत्न असतो.
 
अनेकदा बाकी सहकारी धावांसाठी झगडत असताना हे दोघं सहजतेने धावा लूटतात. फलंदाज म्हणून जबाबदारी पार पाडत असताना खेळाडूंची मोट बांधण्याचं काम विराटने केलं.
 
महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती स्वीकारल्यानंतर कोहलीकडे कर्णधारपद आलं आणि तो ही जबाबदारी नेटाने सांभाळतो आहे. अझर अलीने कर्णधारपद सोडायचा निर्णय घेतल्यानंतर बाबरची कर्णधारपदी नियुक्ती झाली.
 
बाबरने तिन्ही प्रकारात नेतृत्वाची धुरा सुयोग्य पद्धतीने सांभाळतो आहे. मुख्य फलंदाज, कर्णधार, कामगिरीतील सातत्य, जबाबदारीचं वर्तन यामुळे बाबरची सातत्याने कोहलीशी तुलना केली जाते.
webdunia
फॅब फोर काय आहे?
एकाच कालखंडातील साधारण एकाच वयाचे आणि एकाच काळात पदार्पण करणारे चार समकालीन शिलेदार आपापल्या संघासाठी धावांच्या राशी ओतत आहेत.
 
विराट कोहली (भारत), जो रूट (इंग्लंड), स्टीव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया) आणि केन विल्यमसन (न्यूझीलंड) या चौकडीला फॅब्युलस फोर असं संबोधलं जातं. ही एक बोलण्यातली संकल्पना आहे. अधिकृतरीत्या फॅब फोर असं काही नाहीये.
 
हे चौघंही आपापल्या संघांचे प्रमुख फलंदाज आहेत. जगभरात दर्जेदार गोलंदाजांसमोर चांगल्या खेळपट्यांवर धावा करतात. ही जबाबदारी चोख सांभाळत असल्याने या चौघांकडेही आपापल्या संघांचं कर्णधारपदही सोपवण्यात आलं.
 
चौघांच्याही नावावर धावांचे, शतकांचे, भागीदाऱ्यांचे विलक्षण विक्रम आहेत. जागतिक क्रमवारीतही फॅब फोर अग्रणीच असतात. गेल्या दशकभरात देण्यात आलेल्या क्रिकेट पुरस्कारांमध्येही या चौकडीची चलती असते. या चौकडीप्रमाणे बाबर चांगली कामगिरी करत असल्याने त्याचाही फॅब फोरमध्ये समावेश करून फॅब फाईव्ह करावं अशी मागणी चाहते करत असतात.
 
आकडेवारी काय सांगते?
टेस्टमध्ये विराटने 96 सामन्यांमध्ये 51.08च्या सरासरीने 7765 धावा केल्या आहेत. टेस्टमध्ये विराटच्या नावावर 27 शतकं आणि 27 अर्धशतकं आहेत.
 
विराटपेक्षा पाच वर्षांनी लहान असणाऱ्या बाबरच्या नावावर 35 टेस्टमध्ये 42.94च्या सरासरीने 2362 धावा आहेत. बाबरने आतापर्यंत 5 शतकं आणि 18 अर्धशतकं झळकावली आहेत.
 
टेस्टमध्ये विराटचे आकडे पार करायला बाबरला अद्भुत सातत्यासह खेळावं लागेल.
 
वनडेत विराटच्या नावावर 254 सामन्यात 59.07च्या सरासरीने 12169 धावा आहेत. वनडेत विराटने 43 शतकं आणि 62 अर्धशतकं झळकावली आहेत. वनडेतल्या सार्वकालीन महान फलंदाजांमध्ये विराटचं नाव घेतलं जातं.
 
बाबरने 83 वनडे खेळल्या असून, 56.92च्या सरासरीने 3985 धावा केल्या आहेत. बाबरच्या वनडे कारकीर्दीत 14 शतकं आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. बाबर पुढची दहा वर्ष याच सातत्याने खेळत राहिला तर तो 10,000 धावांचा टप्पा ओलांडू शकतो. मात्र तोवर विराट आणखी पुढे गेलेला असेल.
 
ट्वेन्टी20 प्रकारात विराटने 91 सामन्यात 3216 धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट 138.56 आहे. विराटच्या नावावर या प्रकारात एकही शतक नाही मात्र 29 अर्धशतकं आहेत.
 
या प्रकारात बाबर विराटला मागे टाकू शकतो. बाबरने 62 सामन्यांमध्ये 130.64च्या स्ट्राईकरेटने 2272 धावा केल्या आहेत. बाबरने एक शतक आणि 21 अर्धशतक झळकावलं आहे. ट्वेन्टी20 मालिका अधिकाअधिक खेळल्या जात असल्याने तसंच याप्रकारात सलामीला येत असल्याने बाबरला धावांची पोतडी वाढवण्याची सुवर्णसंधी आहे.
webdunia
टेस्ट आणि वनडेत मात्र विराटने खेळलेल्या सामन्यांची संख्या आणि केलेल्या धावा, झळकावलेली शतकं यांचं प्रमाण प्रचंड आहे. या दोन प्रकारात विराटला मागे टाकणं बाबरसाठी अवघड आहे. मात्र ट्वेन्टी20 प्रकारात बाबर विराटला टक्कर देऊ शकतो.
 
पण मूळ मुद्दा हा की पाच वर्षांचं अंतर असलेल्या खेळाडूंची तुलना करावी का? कारण त्यांचे संघ, आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्यांच्या संघांचं स्थान, देशातलं आणि जागतिक पातळीवरचं फॅनफॉलोइंग, ब्रँडव्हॅल्यू, बोर्डाकडून मिळणारं मानधन, सामाजिक परिस्थिती हे सगळंच वेगळं आहे.
 
बाबर आणि विराट यांच्या खेळण्यात, डाव उभारण्यात साधर्म्य असलं तरी बाबरची विराटशी तुलना करणं एकप्रकारे त्याच्यावर दडपण टाकण्यासारखं आहे.
 
रविवारी झालेल्या लढतीत कोहलीने 57 धावांची सुरेख खेळी केली. पाकिस्तानला विजय मिळवून देताना बाबरने नाबाद 68 धावांची खेळी केली.
 
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार इंझमाम उल हक यांनी बाबरचं तंत्र हे कोहलीपेक्षा चांगलं असल्याचं म्हटलं होतं.
 
"बाबरची धावा करण्याची भूक प्रचंड आहे. त्याला मोठी खेळी करायला आवडते. अशा प्रकारची धावांची भूक अभावानेच दिसते. ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. त्याचं लक्ष खेळावर असतं", असं इंझमाम यांनी सांगितलं.
 
बाबर-कोहली तुलनेबाबत इंझमाम यांना विचारलं असता ते म्हणाले, "दोघांची शैली भिन्न आहे. दोघांची बलस्थानं वेगळी आहेत. कोहलीचा सुरुवातीचा काळ बघितला तर बाबर त्याच्या पुढे वाटतो"

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तरुणीची मान बिबट्याच्या जबड्यात होती, तिने बिबट्याच्या डोक्यावर कळशीने वार केले, धाडसाची कमाल