Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

दाऊद आणि अंडरवर्ल्डच्या मागे इतकं का धावतं बॉलिवुड?

दाऊद आणि अंडरवर्ल्डच्या मागे इतकं का धावतं बॉलिवुड?
, मंगळवार, 30 मार्च 2021 (16:42 IST)
मधू पाल
अंडरवर्ल्डची दुनिया बॉलिवुड नेहमीच मोठ्या पडद्यावर दाखवत आलं आहे.
 
गेल्या काही वर्षांत मोठ्या पडद्यावर झळकलेल्या अनेक कथांच्या मध्यवर्ती स्थानी एकतर अंडरवर्ल्डचे डॉन होते नाहीतर त्यांनी केलेल्या हल्ल्यांचा उल्लेख होता.
 
अंडरवर्ल्डशी संबंधित जेवढी कुप्रसिद्ध नावं होती, त्या सगळ्यांच्या कहाण्या मोठ्या पडद्यावर आल्या आणि त्यांना प्रेक्षकांनी चवीचवनीने पाहिल्या. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम असेल किंवा गँगस्टर छोटा राजन, माया डोळस, मन्या सुर्वे सगळ्यांच्या कहाण्या प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावर पाहिल्या आहेत.
पण दाऊद इब्राहिमविषयी जे आकर्षण आहे, तितकं इतर कोणाचं नाही. असं म्हटलं जातं की 80 आणि 90 च्या दशकात मुंबई आणि आसपासच्या बंदरावर अंडरवर्ल्डची सत्ता होती.
 
मुंबईच्या अंडरवर्ल्डचा शेवटाची सुरुवात 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतर झाली.
 
बॉलिवुडच्या अनुराग कश्यपपासून राम गोपाल वर्मापर्यंत अनेक दिग्दर्शकांनी दाऊद इब्राहिमचं पात्र या ना त्या प्रकारे सिनेमात दाखवायचा प्रयत्न केला आहे.
 
दाऊद इब्राहिमवर बनले हे चित्रपट
दाऊद इब्राहिमवर बनलेल्या सिनेमांपैकी अनुराग कश्यप यांचा 'ब्लॅक फ्रायडे', राम गोपाल वर्मांचा 'कंपनी' आणि निखिल अडवाणीचा 'डी डे' असे काही चित्रपट आहेत.
मिलन लुथरिया यांनी आपल्या 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' या चित्रपटात दाऊद इब्राहिमचा उदय दाखवला आहे. याशिवाय 'हसीना पारकर' आणि वेबसिरीज 'एक थी बेगम' या सिनेमात दाऊद आणि त्याची बहीण हसीना पारकर यांचा संदर्भ आहे.
 
सन 2002 मध्ये आलेल्या 'कंपनी'ची कथा दाऊद इब्राहिमच्या आयुष्यावर आधारित होती. या सिनेमात अजय देवगणनी मुख्य भूमिका केली होती. याच चित्रपटापासून अभिनेता विवेक ओबेरॉयने आपल्या करियरची सुरुवात केली होती.
 
आता 2021 मध्ये राम गोपाल वर्मा पुन्हा दाऊदच्या आयुष्यावर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत. त्याचं नाव आहे 'डी कंपनी'. दाऊदच्या सुरुवातीच्या आयुष्याची ही कहाणी आहे.
बीबीसीशी बोलताना राम गोपाल वर्मा म्हणतात की, "मी पुन्हा 'डी कंपनी' घेऊन प्रेक्षकांसमोर येतोय. या चित्रपटात मी पुन्हा दाऊद इब्राहिमला दाखवतोय. सन 2002 साली आलेला माझा सिनेमा दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या भांडणावर आधारित होता. माझ्या नव्या चित्रपटात दाऊदच्या आधीच्या आयुष्याची कथा आहे. यात दाखवलं आहे की दाऊद मुंबईचा डॉन कसा बनला आणि त्याने आपली डी कंपनी कशी सुरू केली."
 
बॉलिवुडला दाऊदच्या आयुष्याचं इतकं आकर्षण का?
या प्रश्नाचं उत्तर देताना राम गोपाल वर्मा म्हणतात, "गुन्हेगारी जगताचं लोकांना आकर्षण आहे. बातम्या पहा किंवा पेपर वाचा, किंवा टीव्ही पहा, तुमच्या लक्षात येईल ती गँगवॉर किंवा मर्डर मिस्ट्रीसारख्या गोष्टी लोकांना जास्त आकर्षित करतात."
 
वर्मा म्हणतात, "आज जगात इटालियन माफियावर आधारित 'गॉडफादर' सगळ्यांत लोकप्रिय चित्रपट असेल. लोकांना कंटाळवाण्या कथा आवडत नाहीत. त्यांना डार्क फँटसीवाले चित्रपट आवडतात."
 
'गँगस्टर्सला हिरो म्हणून दाखवायचा हेतू नाही'
बॉलिवुडमध्ये गुन्हेगारी जगताचं उदात्तीकरण केलं जातं का? या प्रश्नाचं उत्तर देताना राम गोपाल वर्मा म्हणतात की, "जर तुम्ही कोणत्या चित्रपटात हिरोच्या हातात वाईन ग्लास पाहिलात किंवा त्याला मारामारी करताना पाहिलं तर त्या गोष्टींला खूप गंभीरपणे घ्यायची गरज नाही. तो फक्त मनोरंजनासाठी बनवलेला चित्रपट आहे."
 
ते म्हणतात, "जर तुम्हाला रिअलिस्टिक सिनेमा पाहायचा असेल तर त्यात तुम्हाला पात्रांच्या नकारात्मक बाजूही दाखवाव्या लागतील. माझ्या चित्रपटात सगळी पात्र 'ग्रे शेड' मध्ये रंगवलेली आहेत मग भले तो सत्या असो किंवा डी कंपनी."
 
राम गोपाल वर्मा यांचं म्हणणं आहे की त्यांचा हेतू कोणत्या गँगस्टर किंवा गुन्हेगाराचं उदात्तीकरण करायचं नाहीये किंवा कोणाला हिरो म्हणून दाखवायचं नाहीये.
ते म्हणतात, "कोणत्याही दिग्दर्शकाचा हेतू गुन्हेगाराला हिरो म्हणून दाखवायचा नसतो. तो दिग्दर्शक गँगस्टरचं खरं आयुष्य दाखवत असतात. मी माझ्या सगळ्या चित्रपटात हेच करतो. 'डी कंपनी'मध्येही हेच करतोय.
 
दाऊदला मोठ्या पडद्यावर का पहायचं असतं लोकांना?
गँगस्टर सिनेमांमध्ये दाऊदच्या भूमिकांची चर्चा करताना वरिष्ठ सिनेपत्रकार अजय ब्रह्मात्मज म्हणतात की दाऊदच्या नावाभोवती एक रहस्यात्मक वलय आहे.
 
"कोणी दाऊदचा फोटो पाहिला नाहीये किंवा त्याचा व्हीडिओ पाहिला नाहीये. एकच फोटो आहे जो अनेक वर्षांपूर्वी शारजा स्टेडियममधे काढला होतो. एक-दोन पार्टीमध्ये काढलेले फोटो आहेत. तेच फोटो फिरत आहेत. त्यामुळे दाऊद नक्की कसा दिसतो हे कोणाला माहिती नाहीये."
 
अजय बह्मात्मज यांच्या मते दाऊदच्या गुन्हेगारी कारवायांमुळे लोकांच्या मनात एक कुतुहल असतं. याच कारणामुळे दाऊदची कहाणी वारंवार मोठ्या पडद्यावर दाखवली जाते.
अजय ब्रह्मात्मज यांचं म्हणणं आहे की "राम गोपाल वर्मा गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्डच्या जगाला कॉर्पोरेट जगासारखं दाखवतात. यामुळे लोकांना त्यात फार इंटरेस्ट येतो."
 
'गँगस्टर-ग्लॅमरचा जुना फॉर्म्युला'
अर्थात सिनेमा व्यवसायाचा अभ्यास करणाऱ्या काही तज्ज्ञांच्या मते आता या कथा बॉक्स ऑफिसवर फारशा चालत नाहीत.
 
फिल्म ट्रेड अॅनालिस्ट अमोद मेहरा म्हणतात की, "अशा सिनेमांमध्ये आता काही ताजेपणा राहिला नाहीये. दाऊद किंवा गँगस्टर्सच्या बाबतीत नवीन काही सांगायला किंवा दाखवायला नाही. आपल्याकडे चांगल्या लेखकांची कमतरता आहे, त्याहीपेक्षा चांगल्या आयडियांची कमतरता आहे ही खरी अडचण आहे."
ते म्हणतात, "सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉनची कल्पना चालली. पण आता लोकांना आता काहीतरी नवीन हवंय. काही दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा एखादा सिनेमा चालतो मग ते तशाच प्रकारचे सिनेमे करायला लागतात. होतं काय, ते इतके सिनेमे बनवतात त्यामुळे हा फॉर्म्युला जुना होतो."
 
असं असतानाही प्रसिद्ध सिनेस्टार कुख्यात गँगस्टर आणि गुन्हेगारांची भूमिका करण्यासाठी इच्छूक असतात मग तो शाहरूख खान असो किंवा अजून कोणी.
 
अमोद मेहरा म्हणतात, "जर तुम्ही नाला किंवा चाळ दाखवाल तर कोणी पाहाणार नाही. म्हणूनच गँगस्टर फिल्म्समध्ये ग्लॅमर दाखवावं लागतं. पण प्रत्यक्षात असं नसतं."
 
त्यांच्यामते गँगस्टर आणि ग्लॅमरचं कॉकटेल लोकांना आता पूर्वीसारखं भावत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ममता बॅनर्जी: नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारी 'बंगालची कन्या'