“त्यादिवशी आई- बाबांनी मला फोन केला आणि ते रडायला लागले. त्यांनी मला सांगितलं की, गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी माझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती.”
“हे ऐकून मला धक्का बसला. पण जेव्हा त्यांनी माझ्यापासून दडवलेलं गुपित कळलं, तेव्हा मी खूश झाले,” आर्या पार्वती सांगत होती. केरळमधील आर्या ही मोहिनीअट्टम नृत्यांगना आहे.
केरळमध्येच जन्मलेली आणि लहानाची मोठी झालेली 23 वर्षांची आर्या तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी. पण आता ती मोठी बहीण झालीये. वयाच्या 48 व्या वर्षी तिच्या आईने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे.
“23 वर्षांनी माझ्या कुटुंबात एक भावंड येत आहे. या बातमीमुळे झालेला आनंद मोजता येणार नाही. थोरल्या बहिणीची ही जबाबदारी घेण्यासाठी, प्रेम आणि खंबीर आधार म्हणून उभं राहाण्यासाठी मी तयार आहे,” असं आर्या यांनी तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे.
माझ्या आईने का लाजावं?
आर्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आर्या आणि तिची आई यांच्याबद्दल केरळमधे माध्यमांमधून, सोशल मीडियावरून बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या.
घरात नवीन पाहुण्याच्या आगमनाबद्दल अनेकांनी आर्या आणि तिच्या पालकांचं अभिनंदन केलं, तर दुसरीकडे लग्नाच्या जवळपास पंचवीस वर्षांनी पुन्हा गरोदर राहिल्याबद्दल काहींनी आर्याच्या आईवर टीकाही केली.
पण आर्या म्हणते, की माझ्या आईने का लाजावं? कोण काय म्हणतंय याने काही फरक पडत नाही, आम्ही या गोंडस भेटीचं आमच्या आयुष्यात प्रेमाने स्वागत करत आहोत.
याबद्दल बोलताना आर्याची आई म्हणते, “ मी प्रेग्नंट आहे याची कल्पना मला नव्हती. त्यामुळे मी खूप प्रवास करत होते. माझ्या मुलीला पुरस्कार मिळालेला. त्यासाठी मी चेन्नईला गेलेले. नंतर मी गुरूवायुर मंदिरात गेलेले. सुरूवातीला गरोदरपणाची काहीच चिन्हं दिसत नव्हती.”
आर्याने मल्याळम भाषेतील काही मालिकांमध्येही काम केलं आहे. सध्या ती बंगळुरूमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये शिकत आहे.
आर्या पाच महिन्यांहून अधिक काळ तिच्या घरी गेलीच नव्हती, कारण तिचे मोहिनीअट्टमच्या कार्यक्रमाचे दौरे सुरू होते. ते संपल्यावर आपल्या पालकांकडे जाण्यासाठी ती खूप उत्सुक होती.
तिने जेव्हा हे सांगायला फोन केला, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला म्हटलं, “आर्या, गेले काही महिने आम्ही तुझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली आहे. ती ऐकून तू आमच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस.”
हे ऐकल्यावर तिला धक्का बसला. नंतर तिला तिच्या वडिलांनी, शंकर यांनी सांगितलं की, तिची आई दीप्ती 8 महिन्यांची गरोदर आहे.
“ही गोष्ट अनपेक्षित होती. पण आनंददायक होती.”
लहान असताना आपल्याला भावंड नाही याचं मला वाईट वाटायचं. आपल्याला भाऊ किंवा बहीण असती तर असं वाटायचं. इतक्या वर्षांनी ती इच्छा पूर्ण होईल, असं मला वाटलं नव्हतं. मला त्यामुळे आनंदच झाला.
मी आईला म्हटलं, “मॉम, याबद्दल तुला इतकं का वाईट वाटतंय? मी खूश आहे. मी लगेचच घरी यायला निघतीये.”
आईला हे सांगून ती एर्नाकुलमला जायला निघाली.
आईचा मानसिक संघर्ष
आर्या तिच्या घरी पोहोचली. आईला मिठी मारून तिनं तिचा आनंद व्यक्त केला. त्यानंतर तिने लिहिलेली सोशल मीडिया पोस्ट ट्रेंड व्हायला लागली.
पण आर्याची आई दीप्ती यांनी सांगितलं की, पाचव्या महिन्यापर्यंत आपण गरोदर आहोत, हे त्यांच्या लक्षातच आलं नव्हतं.
आईने आपलं पोट अधूनमधून दुखत असल्याचं आणि गेल्या काही महिन्यात पाळी आली नसल्याचं सांगितलं होतं, असं आर्यानेही म्हटलं.
दीप्ती सांगतात, “मी आणि आर्याचे वडील गुरूवायूर मंदिरात गेलो होतो. तेव्हा मला अगदीच बरं वाटेना झालं, म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो.”
त्यावेळी दीप्ती यांना कळलं की त्या पाच महिन्यांच्या गरोदर आहेत.
“माझ्या मनात अशी शंका येऊन गेली होती, पण या वयात असं कसं होईल असा विचार मी केला.”
दीप्ती पुढे सांगतात, “जेव्हा मला खरंच गरोदर असल्याचं कळलं, तेव्हा मात्र मनात पहिल्यांदा मुलीचा विचार आला. पण आर्याने ही गोष्ट आनंदाने आणि पॉझिटिव्हली स्वीकारली. त्यामुळे मला खूप हायसं वाटलं.”
“आर्याच्या वेळेस मला बाळंतपणात खूप त्रास झाला होता. बाळंतपणानंतर मला दहा महिने विश्रांती घ्यावी लागली होती. त्यामुळे आम्ही दुसरं मूल नको असाच निर्णय घेतला.”
पण या वयात दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यानंतर डॉक्टरांनी वय आणि समाजाची मानसिकता विचारात घेऊन ही गोष्ट फार कोणाला न सांगण्याचा सल्ला दिला.
“आम्हाला खरंतर घरकामासाठी कोणाला तरी मदतीला ठेवायचं होतं. पण त्या व्यक्तीला माझ्या गरोदरपणाबद्दल कळलं तर काय असं म्हणून आम्ही तो विचारही रद्द केला,” दीप्ती त्यांच्या सगळ्या मानसिक संघर्षाबद्दल सांगत होत्या.
पण आर्याने ज्यापद्धतीने ही गोष्ट स्वीकारली, आमचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला असंही त्या सांगतात.
“आर्या माझं विश्व होती. तिच्यासाठी मी माझी नोकरी सोडली होती. माझं सगळं जग तिच्या अवतीभोवती फिरायचं. अगदी तिला कपडे घ्यायचे झाले, तरी ती बंगळुरूवरून घरी आली की मग आम्ही दोघी खरेदीला जायचो.”
ती माझ्यावर खूप अवलंबून होती. त्यामुळेच ही बातमी कळल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल याचा विचार करून मी घाबरले होते. आमच्यासाठी तो तणावाचा मुद्दा होता.
“आर्याचे वडील कामावर निघून जायचे. त्यांना निदान इतर विचार तरी होते. पण मला दिवसभर एकटी असताना हा ताण जास्तच जाणवायचा. तिला ही गोष्ट सांगण्याआधी आम्हाला खूप मानसिक संघर्ष करावा लागला,” असंही दीप्ती सांगतात.
“पण आर्याची प्रतिक्रिया आली आणि माझ्या मनावरचं मोठ्ठं ओझं उतरलं.”
दीप्ती यांनी एका मुलीला जन्म दिला आहे. आर्या तिच्या धाकट्या बहिणीचा जन्म मनापासून सेलिब्रेट करत आहे. पण काही लोक अजूनही टीका करतच आहेत.
आर्या त्याबद्दल म्हणते, “माझ्या आई-वडिलांनी या वयात हे काय केलं असं म्हणून अनेक जण चर्चा करत आहेत. पण आम्हाला काही फरक पडत नाही. माझी आई गरोदर राहिली. हे तिचं आयुष्य आहे. शिवाय, इतक्या वर्षांनी मला धाकटी बहीण मिळाली आहे. कोण काय म्हणतंय याने काही फरक पडत नाही, आम्ही आमचा आनंद साजरा करणार.”
Published By -Smita Joshi