- अमृता कदम
''ब्रा खरेदी करण्यासाठी महिला पुरुष असलेल्याच दुकानात जातात. त्यावेळी त्यांना कोणतीही लाज किंवा संकोच वाटत नाही. त्यावेळी अगदी मोकळेपणानं ब्राची साईज, आकाराबाबत त्या पुरुषाशी बोलतात. पण त्याच महिला दुसऱ्या एखाद्या महिलेचे कपडे किंवा इतर गोष्टींवर आक्षेप घेतात, हे प्रचंड त्रासदायक आहे.''
अभिनेत्री हेमांगी कवीनं बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं. हेमांगीनं फेसबुकवर 'बाई, बुब्स आणि ब्रा' अशा मथळ्याखाली एक पोस्ट लिहिली. ती पोस्ट प्रचंड व्हायरलही झाली.
कपडे कसे घालायचे हे इतर सगळे महिलांना का सांगणार? या संपूर्ण विषयाबाबत असलेला संकोच आणि महिलांकडूनच महिलांवर उपस्थित केले जाणारे आक्षेप यासंबंधीचा हेमांगीने या पोस्टमधून तिची भूमिका मांडली.
हेमांगीने या पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?
''बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो!'' असं हेमांगीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुरुष तर स्त्रियांचे अवयव किंवा इतर बाबींची मजा घेतातच. पण महिलाच महिलांना अशा मुद्द्यांवरून ट्रोल करत असतील तर ते अत्यंत चुकीचं असल्याचं हेमांगी म्हणाली.
''सर्वांत आधी स्त्रियांनीच आपल्या मनावर बिंबवून घ्यायला हवं! स्वइच्छे ने Without ब्रा वावरणे, दिसणारे nipples बघण्याची सवय करून घ्यायली हवी आणि तेवढीच ती द्यायला ही हवी!'' असंही तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अभिनेत्री हेमांगी कवी हिच्याशी या संपूर्ण मुद्द्यावर बीबीसीच्या प्रतिनिधी अमृता कदम यांनी संवाद साधला. या मुलाखतीचा संपादित अंश याठिकाणी देत आहोत.
महिलाच करतात ट्रोल
हेमांगीला हे मत आताच का मांडावं वाटलं? या प्रश्नाचं उत्तर देताना तिनं सांगितलं की, "मी पोळ्या करतानाचा एक व्हीडिओ दोन दिवसांपूर्वी पोस्ट केला. त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स येऊ लागल्या. तुझे बूब्स हलत आहेत, टिट्स दिसत आहे, तू ब्रा घातली नाहीस का? अशा अनेक कमेंट्स त्यात होत्या.
पण या कमेंट्समध्ये 10 पैकी 8 महिलाच होत्या. त्याचा संताप होण्यापेक्षा मला जास्त वाईट वाटलं. कारण महिलाच मला हे सर्व सांगत होत्या."
अनेकदा सोशल मीडियावर महिलाच या मुद्द्यावरून ट्रोल करत असतात. तू अभिनेत्री आहेस. सोशल मीडियावर व्हीडिओमध्ये तुझे निप्पल्स दिसतात, ते तुला कळत नाही का? असं महिला बोलत असल्याचं हेमांगीनं सांगितलं.
''असं नेहमी होत असतं. अगदी खालच्या पातळीवर जाऊन कमेंट्स येतात. आजवर मी त्याकडं दुर्लक्ष केलं. पण याचं प्रमाण खूप वाढलं,'' असं ती म्हणाली.
"महिलांचं शरीर हे पुरुषांच्या आकर्षणाचा विषय असतं. त्यामुळं ते मजा घेतात आणि निघून जातात. पण महिला म्हणून जगताना तुम्ही स्वतः हे सर्व भोगत असताना, तुम्हीच अशा प्रतिक्रिया कशा देऊ शकतात, याचं हेमांगीला अधिक वाईट वाटलं.
अशा प्रतिक्रिया तर आल्याच. पण याच गोष्टींवरून लोकांनी जजमेंटल (एखाद्याबद्दल मत तयार करणं) होण्याबाबतही हेमांगीनं आक्षेप व्यक्त केला.
''मी किती कमवते? मला काम मिळतं की नाही? काम मिळत नाही म्हणून अशा गोष्टी दाखवून मी काम मिळवते, अशा गोष्टी त्याला जोडल्या गेल्या. याचा मात्र राग आला,'' असं हेमांगी म्हणाली.
'बदलाची सुरुवात घरातून व्हावी'
मुळात तुमच्या विचारांमध्ये बदल हा घरातूनच व्हायला हवी, असं हेमांगीनं म्हटलं.
"घरातले पुरुष अनेकदा मित्रांसमोर किंवा इतरांसमोर जाताना आपल्याला नीट बस, नीट कपडे घाल असं सांगत असतात. पण ही बंधनं कशाला? महिलांना हवं तसं वावरू द्यायला हवंआणि त्याची सुरुवात घरातील पुरुषांनी आधी करावी."
''चार लोक काय म्हणतील या भीतीनं घरातूनच मुली किंवा महिलांमध्ये स्वतःचं शरीर, कपडे किंवा वागणूक याबाबतचा संकोच निर्माण केला जातो. कारण समाजातले ते चार लोक आपल्या घरातही असतात. पण त्या चार लोकांचा विचार आपण का करायचा?'' असं स्पष्ट मत हेमांगीनं मांडलं आहे.
"महिलांचंही वागणं अनेकदा विरोधाभासी असतं. म्हणजे ब्रा घेण्यासाठी पुरुष असलेल्याच दुकानात जातात तेव्हा लाज किंवा तसा संकोच नसतो. त्यावेळी पुरुषासमोर साईज वगैरे विषयावर महिला बिनधास्त बोलतात. मग इतर वेळी असा संकोच का निर्माण करायचा," असंही ती म्हणाली.
तिची चॉईस आणि पुरुषी मानसिकता
''सोशल मीडियावरच्या पोस्टवर काही अत्यंत टोकाच्या प्रतिक्रिया आल्या. 'मग तू उघडीच फीर' असंही काही जण म्हणाले. पण तोही बाईच्याच चॉईसचा मुद्दा आहे,'' असं हेमांगीनं म्हटलं.
''आतापर्यंत झालेल्या बलात्काराच्या प्रकरणांमध्ये सगळ्याच मुली या झाकलेल्या होत्या, तरीही त्यांच्यावर तशी वेळ आली.''
"मला घरात कधीही असे कपडे घालून वावर हे सांगण्यात आलं नाही. माझ्या भावाची बायको आणि माझं शरीर सारखंच आहे. पण दोघींकडे पाहण्याची त्याची नजर वेगळी आहे. हा नजरेतला फरक महत्त्वाचा आहे. तो फरक जोपर्यंत आहे, तो पर्यंत सगळं ठीक आहे. तो फरक एकदा मिटला की मग गडबड आहे. मग तुम्ही काय घालता, काय घालत नाही यानं फरक पडत नाही. "
या सोशल मीडिया पोस्टवर काही सकारात्मक प्रतिक्रिया येत असल्याचंही हेमांगीनं म्हटलं. त्यामुळे बदल घडू शकतो. पण त्यासाठी बोलणं गरजेचं आहे, असं हेमांगीनं म्हटलं.