Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंध्रप्रदेशातल्या गुंटूर येथील येरामती मंगायम्मांचा विक्रम, 73 व्या वर्षी दिला जुळ्यांना जन्म

Yeramati Mangayamas record in Guntur
, शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 (12:46 IST)
आंध्र प्रदेशातल्या गुंटूर जिल्ह्यात 73 वर्षांच्या एका महिलेनी जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.
 
या महिलेचं नाव येरामती मंगायम्मा आहे. बुधवारी सकाळी साडे दहा वाजता सी-सेक्शन म्हणजेच सिझेरियन डिलिव्हरी झाली.
 
हे सी-सेक्शन करणाऱ्या गायनॅकोलॉजिस्ट डॉ. उमा शंकर यांनी बीबीसी तेलुगुला सांगितलं, "आई आणि जुळ्या मुली सर्वांची प्रकृती उत्तम आहे. या मुली पुढचे 21 दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील."
 
जुळ्या मुलींना जन्म देणाऱ्या येरामती सर्वांत वयोवृद्ध महिला ठरतील, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी 2006 साली स्पेनच्या मारिया डेल यांनी वयाच्या 66व्या वर्षी बाळाला जन्म दिला होता.
 
मात्र, काही लोकांच्या मते हा रेकॉर्ड भारतातल्याच ओमकारी पनवार यांच्या नावावर आहे.
 
त्यांच्याविषयी सांगितलं जातं की त्यांनी 2007 साली वयाच्या 70व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला होता.
 
जोडप्याने अनेक वर्ष केल्या हॉस्पिटलच्या वाऱ्या
जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर मंगायम्मा अतिशय आनंदात आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं, "लोक मला गोदरालु (वांझ) म्हणायचे. मी खूप दुःख सहन केलं आहे. म्हणूनच मी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. माझ्या आयुष्यातला हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे."
 
या महिलेचे पती सीताराम राजाराव यांनी सांगितलं, "मी आता आनंदी आहे. हे सगळं या डॉक्टरांमुळे शक्य झालं आहे. आम्ही अनेक हॉस्पिटल्समध्ये अनेक प्रकार करून बघितले. शेवटी आम्ही आणखी एक प्रयत्न करण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये आलो. इथे आल्यावर दोनच महिन्यात माझ्या पत्नीला दिवस गेले. आम्ही गेल्या 9 महिन्यांपासून याच हॉस्पिटलमध्ये आहोत. लोक आम्हाला वांझ म्हणायचे. आता हे सर्व संपलं आहे. आम्ही या दोन्ही मुलींचं उत्तम संगोपन करू."
 
हे जोडपं पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या नेल्लापर्तिपडू गावचे आहेत.
 
22 मार्च 1962 रोजी या दोघांचं लग्न झालं होतं. बाळासाठी या जोडप्याने अनेक हॉस्पिटलचे उंबरठे झिजवले.
 
काही दिवसांपूर्वी या जोडप्याच्याच भागात राहणाऱ्या एका 55 वर्षांच्या महिलेला आयव्हीएफ तंत्राने बाळ झालं. तेव्हा या जोडप्यानेही या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.
 
गेल्या वर्षी हे जोडपं गुंटूर जिल्ह्यातल्या या हॉस्पिटलमध्ये दाखल झालं. डॉक्टर उमा शंकर यांनी दोघांच्याही सर्व चाचण्या केल्या आणि नंतर उपचारांना सुरुवात केली.
 
आयव्हीएफ तंत्रज्ञान काय आहे?
वाढत्या वयानुसार स्त्रीच्या अंडाशयात बिजांडांची संख्या कमी कमी होत जाते. वयाच्या पस्तीशीनंतर तर ही संख्या वेगाने रोडावते.
 
मंगायम्माला मेनोपॉज येऊन गेला होता. त्यामुळे वैद्यकीय मदतीशिवाय त्यांची गर्भधारणा शक्य नव्हती.
 
गर्भधारणेसाठी या जोडप्याने एका दात्रीकडून बिजांड घेतलं आणि आयव्हीएफ प्रक्रियेद्वारे त्यांचे पती सीताराम यांच्या शुक्राणुशी त्या बिजांडाचं मिलन केलं. यातून उत्पन्न झालेलं भ्रृण मंगायम्मा यांच्या गर्भात प्रत्यारोपित करण्यात आलं.
 
वयोवृद्ध महिलांमध्ये गर्भधारणा एक क्लिष्ट प्रक्रिया असते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये अधिक सावधगिरी बाळगावी लागते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वीज कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ