Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मासिक पाळी स्वच्छता दिन : कमी वयातल्या मुलींना मासिक पाळीविषयीची माहिती देणारं कॉमिक बुक

Webdunia
- गणेश पोळ
मैत्रिणीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर 10 वर्षांच्या राणीच्या पोटात दुखू लागतं. राणी बाथरूमध्ये जाते. तिथं तिच्या अंडरविअरवर रक्ताचे डाग दिसतात. पहिल्यांदाच असं काही दिसल्यामुळं राणी खूप घाबरते. हे काय आणि कसं झालं? असे प्रश्न तिला पडतात...
 
10 ते 12 वर्षं वय असलेल्या मुलींनाही मासिक पाळीविषयी समजून घेता यावं, यासाठी पुण्यात 'मून टाइम' कॉमिक बुक तयार करण्यात आलं आहे. त्यातला हा प्रसंग आहे.
 
मासिक पाळीबाबत अनेक गैरसमजुती असतात. त्याविषयी घरात किंवा शाळेत सविस्तर चर्चा केली जात नाही. या बद्दल सतत कुजबुज ऐकायला मिळते. अशा वातावरणाला छेद देण्यासाठी 'मून टाइम' या कॉमिक बुकची सुरुवात केल्याचं डॉ. गिता बोरा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितंल. त्यासाठी त्यांनी स्फेरूल फाउंडेशनची स्थापना केली आहे.
 
"कुणालाही अवघडल्यासारखं वाटणार नाही, पाळीविषयी वाचताना किंवा बोलताना लाज वाटणार नाही, हा विचार करून चित्रांच्या स्वरुपात 'मून टाइम' हे कॉमिक बुक लिहिण्यात आलं आहे. या पुस्तकातली सगळी माहिती डॉक्टरांनी लिहिली आहे," त्या सांगतात.
 
मासिक पाळी किंवा ऋतुस्राव ही श्वसनाइतकीच नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे अगदी सोप्या भाषेत मुला-मुलींच्या मनावर बिंबवण्याचा उपक्रम या पुस्तकातून केला जात आहे.
 
डॉ. गिता बोरा यांनी स्थापन केलेली स्फेरुल फाउंडेशन ही संस्था मासिक पाळीची स्वच्छता, स्त्री-पुरुष समानता, कामाच्या ठिकाणी होणारी लैगिक छळवणूक रोखणं या उपक्रमांवर काम करते.
 
काय आहे या पुस्तकात?
मासिक पाळीच्या किंवा ऋतुस्रावाच्या काळाला अमेरिकेत 'मून टाइम' असंही म्हटलं जातं. त्यावरून या पुस्तकाचं नाव ठेवण्यात आलं आहे.
 
'मून टाइम' कॉमिक बुकमध्ये चित्रांच्या स्वरुपात मासिक पाळीविषयी माहिती देण्यात आली आहे. यात 6 पात्रं आहेत. दिया (9 वर्षं), दियाची आई (35 वर्षं), गार्गी (9 वर्षं), राणी (10 वर्षं), समिना (11 वर्षं) आणि नील (1 वर्ष).
 
पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात दियाच्या वाढदिवसाचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. तो साजरा करण्यासाठी तिच्या दोन मैत्रिणी गार्गी आणि राणी दियाच्या घरी येतात.
 
दियाच्या वाढदिवसाचा केक कापल्यानंतर बच्चेकंपनी जेवायला बसतात. त्यावेळी अचानक राणीच्या पोटात दुखू लागतं. राणी बाथरूमध्ये जाते. तिथं तिच्या अंडरविअरवर रक्ताचे डाग दिसतात. पहिल्यांदाच असं काही दिसल्यामुळं राणी खूप घाबरते. हे काय आणि कसं झालं? असे प्रश्न तिला पडतात.
 
घाबरलेल्या राणीला आधी तिला काहीतरी आजार झाल्याचं वाटतं. राणीनं ही गोष्ट दियाच्या कानावर घातल्यावर. दिया तिला धीर देते आणि तिची आई डॉक्टर असल्यानं ती राणीला मदत करेल असं सांगते.
 
या प्रसंगानंतर दियाची आई आणि या मुलींचा मासिक पाळीच्या धड्यांचा प्रवास सुरू होतो. अगदी सोप्या आणि चित्रांच्या भाषेत मासिक पाळीविषयी माहिती दिल्यामुळे हे कॉमिक बुक वाचकाला खिळवून ठेवतं.
 
कॉमिक बुकची कल्पना कशी सुचली?
"देशातल्या विशेषत: खेड्यातल्या प्रत्येक मुलीला मासिक पाळीची माहिती सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत कशी देता येईल याविषयी आम्ही विचार करत होतो," असं गिता बोरा सांगतात.
 
मासिक पाळीची सुरुवात झाल्यावर मुलींना कुटुंबातून, मैत्रिणींकडून आणि नातेवाईकांकडून बहुतांश वेळा नकारात्मक आणि कालबाह्य माहिती मिळत असल्याचं, बोरा यांना आढळून आलं.
 
मासिक पाळी ही एक जैविक आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे, याची जाणिव अनेकजणांना नाहीये. पिढ्यानपिढ्या पाळी आलेल्या मुलींना अशुद्ध आणि अस्वच्छ मानलं जातं. ऋतुस्राव हा कलंक, आजार, पाप, शाप अजिबात नाही तसंच ही गोष्ट गोपनीय ठेवण्याची गरज नाही, हे मुलींना सांगणं गरजेचं आहे.
 
"संस्थेच्या माध्यमातून आम्ही देशभरातल्या शाळेत मासिक पाळीवषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळा घ्यायचो. त्यावेळी वयात येणाऱ्या मुलींच्या शंका एकसारख्याच असल्याचं आमच्या लक्षात आलं. मुलगी बिहारमधली असो वा पुण्यातल्या एका खेड्यातली. त्यांचे प्रश्न, शंका, भीती एकच होती.
 
"या मुलींचे सगळे प्रश्न आम्ही एकत्र केले. ते प्रश्न स्त्रीरोग तज्ज्ञांसमोर मांडले. भारत, इंग्लड आणि अमेरिकेतल्या 12 डॉक्टरांशी सल्लामसलत करून वयात येणाऱ्या मुलींच्या प्रश्नांची उत्तरं शोधली. कॉमिक बुकमधली सगळी माहिती ही 'वैद्यकीय माहिती' (medical content) आहे. पण ही माहिती प्रत्येक शाळेत जाऊन सांगणं शक्य नाही. एकट्या पुणे जिल्ह्याचा विचार केला तर इथं जवळजवळ 700 शाळा आहेत.
 
"दुसऱ्या बाजुला कार्यशाळा घेताना मुलींचा attention span कमी असल्याचं आमच्या ध्यानात आलं. मुलींना विषयासोबत खिळवून ठेवणं आमच्यासाठी आव्हानात्मक होतं. त्यावेळी कॉमिक बुकची कल्पना सुचली," असं बोरा सांगतात.
 
कॉमिक बुक लिहिणाऱ्या डॉक्टरांच्या टीमपैकी डॉ. निधी अगरवाल सांगतात, "देशातल्या अनेक मुली आणि स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता ठेवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी मिळत नाहीत, त्या महाग असतात किंवा त्या खूप कमी प्रमाणात त्यांच्यापर्यंत पोहोचतात. अशावेळी 'मून टाइम' कॉमिक बुकची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. या पुस्तकात मासिक पाळीची मुलभूत माहिती सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न केला आहे. मुलींचं वागणं, मासिक पाळी सुरु झाल्यावर शरिरात होणारे बदल याविषयी माहिती दिली आहे.
 
तसंच चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी काय आहार खावा, मासिक पाळीच्यावेळी घरगुती उपाय काय असू शकतात हेही सांगण्यात आलं आहे. मासिक पाळीविषयी जागरुकता निर्माण करणं हीच सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट आहे, असं डॉ. निधी यांना वाटतं.
 
अजूनही मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेचा अभाव दिसतो. मुलींना पुरेसं स्वच्छतेचं सामान मिळत नाही. त्यांना 4 ते 5 दिवस शाळेत जाता येत नाही. हे प्रकार कमी करण्यासाठी मुलींना योग्य वयात अचूक माहिती मिळाली पाहिजे.
 
या पुस्तकाविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी वाचक http://spherule.org/contact/ याठिकाणी संपर्क साधू शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments