गोवा हे प्रसिद्ध टूरिस्ट टेस्टिनेशन. इथल्या समुद्रकिनार्यांवरनिवांत भटकंती करता येते. समुद्रात मनसोक्त डुंबता येतं. फुल टू धम्माल' करण्यासाठी गोव्यासारखं उत्तम ठिकाण नाही. गोव्यात सगळं काही आहे. इथल्या नागमोडी रस्त्यांवरून बाईक चालवण्याचा आनंद वेगळाच. गोव्यातले शांत आणि रम्य समुद्रकिनारे मन मोहवून टाकतात. इथे काही काळ घालवल्यानंतर मन कसं प्रसन्न होऊन जातं. आपण नव्या उत्साहाने कामाला लागतो. गोव्यातले अनेक समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत. विविध बीचवर पर्यटकांचा गजबजाट पाहायला मिळतो. मात्र याच गोव्याच्या कुशीत दडलेली काही रत्नं या गजबजाटापासून, कोलाहलापाहून दूर आहेत. असंच एक रत्न म्हणजे कोला बीच.
कोलाची गणना गोव्यातल सुंदर आणि आकर्षक बीचमध्ये होते. विशेष म्हणजे इथे शांतता असते. तुम्हालाही गजबजाटापासून काही काळ लांब राहायचं असेल तर गोव्याला या आणि कोला बीचला भेट द्या. या बीचलगत महागडी रिसॉर्टस् किंवा हॉटेल्स नाहीत मात्र तुमच्यासाठी तंबूची सोय होऊ शकते. साधं पण चविष्ट जेवण मिळू शकतं. कोला हा स्वच्छ आणि सुंदर बीच आहे. इथल्या निळ्याशार समुद्रात पोहण्याची हौस भागवता येईल. या बीचवर कयाकिंगची सुविधा आहे. कयाकिंगची गणना धाडसीखेळांमध्ये केली जाते. वेगळा अनुभव म्हणून कयाकिंग करता येईल. या बीचवर सूर्यास्ताचं मनोहारी दर्शन घडतं.
कोला हा गोव्यातला सर्वोत्तम बीच असल्याचं म्हटलं जातं. हा समुद्रकिनारा छोटेखानी टेकड्यांनी वेढलेला आहे. भरपूर झाडी असणार्या या टेकड्यांमुळे समुद्रकिनार्याच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. गोव्यातल्या विविध समुद्रकिनार्यांवरून सूर्यास्ताचं दर्शन घडत असलं तरी कोलाचा सूर्यास्त वेगळाच आहे. निसर्गरम्य वातावरणामुळे इथला सूर्यास्त खास ठरतो. या बीचवरची सोनेरी वाळू आपल्याला आकर्षित करते. या वाळूवर नुसतं बसून राहिलं तरी खूप छान वाटतं. पणजीहून कोला बीचला जायला दोन तास लागतात. या प्रवासादरम्यान वेगळाच निसर्ग तुम्हाला खुणावत असतो.
सुहास साळुंख