Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Cultural India : नागालँड

nagaland
, सोमवार, 12 डिसेंबर 2022 (10:47 IST)
नागालँडचे भौगोलिक क्षेत्रफळ 16,579 चौरस किमी आहे. राज्याची राजधानी कोहीमा आहे. सर्वात मोठे शहर दिमापूर असून राज्यात 11 जिल्हे आहेत. राज्याची अधिकृत भाषा ही इंग्रजी आहे. अँगमी, आवो, चँग, कोन्याक, लोबा, संगतम, सेमा, सखेसंग आदी राज्यातील इतर प्रमुख भाषा आहेत. नागालँड हे सुद्धा उत्तरपूर्व राज्य आहे. राज्यातील साक्षरता 80.11 टक्के आहे.
 
ईशान्य प्रदेशातील इतर रहिवाश्यांप्रमाणे नागांच्याही उत्क्रांती व उत्पत्ती याबाबतच्या अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. नागा ही मूलत: आदिवासी जमात असून प्रत्येक टोळीची स्वयंशासनाची प्रभावी पद्धत प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. बाराव्या आणि तेराव्या शतकात सध्याच्या आसाम राज्यातील अहोम लोकांशी या लोकांचा संपर्क आला. परंतु नागांच्या जीवनशैलीवर कोणताही लक्षणीय असा परिणाम झाला नाही. तथापि पंधराव्या शतकात या प्रदेशात ब्रिटीशांचा शिरकाव झाला. शेवटी हा प्रदेशही ब्रिटीशांच्या अमलाखाली आला. स्वातंत्र्यानंतर हा प्रदेश 1957 मध्ये केंद्र शासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आला. आसामच्या राज्यपालांकडे राज्याचे शासन सोपविण्यात आले. हे क्षेत्र नागा बिल्स तुएनसंग क्षेत्र म्हणून ओळखले जात असे. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यास शासन अपयशी ठरत होते. असंतोषाला सुरूवात म्हणून 1961 मध्ये या प्रदेशाचे नागालँड असे नामकरण झाले आणि त्याला संघराज्याचे घटक राज्य म्हणून दर्जा देण्यात आला. त्याचे औपचारिक उद्‍घाटन 1 डिसेंबर 1969 ला करण्यात आले. देशाच्या ईशान्य टोकाला असलेले नागालँड या राज्याच्या सीमा उत्तरेला अरूणाचल प्रदेश, पश्चिमेला आसाम, दक्षिणेला मणिपूर आणि पूर्वेला म्यानमार असा हा भूप्रदेश.
 
नागांचा इतिहास धुसर आहे. काही मानववंश अभ्यासकांच्या मते नागा लोक हे मंगोलियन वंशाचे असावेत. मात्र या मतांना दुजोरा मिळत नाहीत म्हणून काही अभ्यासक त्यांच्या वंशाबाबत साशंक आहेत. मात्र हे लोक भारतीय आहेत हे नक्की.
 
नागालँड मध्ये काही मोजक्याच भाषा प्रमुख मानल्या जात असल्या तरी राज्यात अनेक आदिवासी भाषा वा घटकबोली बोलल्या जातात. त्यापैकी काही खाली दिल्या आहेत : 
 
भाषा – कोण बोलतं ते पुढीलप्रमाणे - 
 
अंगामी - नागा (अंगामी); अओ - नागा-अओ; चाकेसंग - नागा-चाकेसंग; चाँग - नागा-चाँग; काबुई - नागा-काबुई; कचारी - कचारी; कर्बी - कर्बी; खियाम्गन - नागा- खियाम्गन; कोन्याक - नागा-कोन्याक; कुकी - कुकी; लोथा - नागा-लोथा; फोम - नागा-फोम; पोचूरी - नागा-पोचूरी; रेंग्मा - नागा-रेंग्मा; सांगताम - नागा-सांगताम; सेमा - नागा-सेमा; यीमचुंगरे - नागा-यीमचुंगरे; झेलियांग - नागा-झेलियांग.
 
या व्यतिरिक्‍त नागालँडमध्ये गारो, कचारी, कुकी, मिकीर, नागा असे काही आदिवासी जमाती वास्तव्य करतात. राज्यात सोळा प्रकारचे आदिवासी असून अवो, अंगामी, च्यांग, कोनयाक, लोथा, सुमी, चाखेसंग, खैमानीयुयांग, दिमासा, फोम, रेंगमा, संगताम, यीमचूंगर, झेमे-लियांगमाइ, पोचूरयास असे त्यांचे काही उपवर्ग आहेत. त्यांच्या स्वत:च्या काही घटकबोली असून स्वत:चे विशेष कपडे आहेत. नागालँड मधील बहुतांश लोक ख्रिश्चन धर्मीय आहेत.
 
शेती हा या लोकांचा प्रमुख व्यवसाय असून राज्यात मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन होत असते. राज्यात उद्योगाने शिरकाव केला असून कागद बनविण्याचे कारखाने सुरू झाले आहेत. एंब्रॉयडरी, लाकडाच्या अनेक वस्तू, बांबूपासून तयार केलेले बास्केट आदींमध्ये नागालँड प्रगती करीत आहे.
 
पारंपरिक वेशभूषा परिधान करणे, कपड्यांना रंग देणे, बांबूपासून अनेक वस्तू तयार करणे, चटया तयार करणे, ऊसांपासून विविध वस्तू तयार करणे, धातू पासून वस्तू तयार करणे अशा विविध हस्तकला नागालँड मध्ये तयार होत असतात.
 
सेक्रेंसी, मोआत्सु, तुलुनी व तोखु इमॉग हे काही महत्त्वाचे सण नागालँडमध्ये साजरे केले जातात. सगळ्या जाती- जमाती रंगीबेरंगी कपडे परिधान करून मोसमी सण संगीतासोबत साजरे करतात. 
 
आलूयाट्टू (कोन्याक आदिवासी नृत्य), अगुरशिकुकुला (युद्ध नृत्य), फुलपाखरू नृत्य (झेलियांग ‍आदिवासी नृत्य), चांगाई नृत्य (चाँग आदिवासी नृत्य), खांबा लीम (हे नृत्य महिला आणि पुरूष अशा दोन गटात होते. हे दोन गट दोन रांगात उभे राहून करतात याला अखू असे म्हणतात.), कुकी नृत्य (हे नृत्य बांबूच्या काठ्या घेऊन केले जाते.), लेशालापटू (हे नृत्य फक्‍त महिला करतात), मयूर नृत्य हे प्राणी नृत्य आहे. मोडसे (हे नृत्य ओ आदिवासी करतात. मोनयोशो, सदाल केकाई, सिछा, शंकाई, रेंग्मा हे इतर नृत्यही नागालँड मध्ये प्रचलित आहेत.
 
कोहीमातले प्राणीसंग्रहालय आणि वस्तुसंग्रहालय, दिमापूर हे औद्यागिक केंद्र, इंटकीतले वन्य प्राणी अभयारण्य, मोकोकचाँग, ओखा, मेदजीफेमा, चूमुकेदिमा ही पर्यटन स्थळे राज्यात लोकप्रिय आहेत.
 
दोयांग, दीखू, धनसीरी, तिझू, त्सुरोंग, नानुंग, त्सुरांग अथवा दीसाइ, त्सुमोक, मेनूंग, डझू, लांगलोंग, झुनकी, लिकीमरो, लानये, दझुझा आणि मंगलू आदी नद्या नागालँड मधून वाहतात तर नागा रांगा आणि दोईंग हे पर्वत आहेत. दिमापूर येथे विमानतळ आहे.
 
 - डॉ. सुधीर राजाराम देवरे 
Published By -Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

HBD: रजनीकांतने 10 वर्षात 100 चित्रपट करण्याचा विक्रम केला, एकेकाळी बस कंडक्टर म्हणून काम करायचे