अभिनेता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षेतेचा हा चिंतेचा विषय आहे. सलमानचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून आता सलमान खानच्या ताफ्यात एका अज्ञात बाइकस्वाराने शिरण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
21 वर्षीय मोटारसायकलस्वाराविरुद्ध रॅश आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. हा बाईकस्वार बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास सलमानच्या ताफ्यातील पोलिसांच्या मध्ये शिरण्याचा प्रयत्नात होता.
सलमान खानच्या सुरक्षा रक्षकाने त्या तरुणाला पकडून वांद्रे पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी त्या व्यक्तीची चौकशी केली. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अनेक धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला 'वाय-प्लस' सुरक्षा कवच दिले आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मेहबूब स्टुडिओजवळून रात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलस्वार उझैर फैज मोहिउद्दीन (21) याने सलमान खानच्या कारजवळ जाण्याचा प्रयत्न केला.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला इशारा करण्याचा प्रयत्न केला, पण तो सलमान खानच्या गाडीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत राहिला. अभिनेत्याच्या घरी पोहोचल्यानंतर पोलिसांच्या दोन वाहनांनी मोटरसायकलस्वाराचा पाठलाग केला आणि त्याला अडवले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
चौकशीत तरुणाने तो वांद्रे पश्चिम येथे राहत असल्याचे सांगितले. मोहिउद्दीन असे त्याचे नाव असून तो महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्याच्या विरोधात वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर पोलिसांनी खटला मागे घेत त्याला सोडले.