ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपट आणि बायोपिकचा ट्रेण्ड सध्या बॉलिवूडध्ये सुरू असून प्रेरणादायी सत्यकथा आणि इतिहासातील काही लक्षवेधी व्यक्तिरेखा या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा प्रयत्न असतो. प्रेक्षकांनादेखील असे चित्रपट आवडत असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे पानिपत- द ग्रेट बेट्रेयल आणि मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांची चर्चा सुरू असतानाच आता आणखी एकाची भर यात पडणार आहे. लवकरच बाराव्या शतकातील राजपूत राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अक्षयकुमार यामध्ये पृथ्वीराज यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती 'यशराज फिल्म्स' बॅनरअंतर्गत होणार असून याचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत. याबाबत डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार चित्रपटाच्या कथेविषयी आदित्य चोप्रा आणि चंद्रप्रकाश यांच्यातचर्चा झाली असून पटकथेवर एक रिसर्च टीम काम करणार आहे. चंद्रप्रकाश यांच्या मनात पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेसाठी सुरुवातीपासूनच अक्षयचा विचार होता. अक्षयकडूनही त्यासाठी अखेर होकार मिळाल्याचे वृत्त आहे. पृथ्वीराज यांच्या कारकिर्दीसोबतच संयोगिता आणि त्यांची प्रेम कहाणीसुद्धा या चित्रपटात अधोरेखित करण्यात येणार आहे.