पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर चित्रीत होत असलेल्या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरुवातीला नरेंद्र मोदींच्या जीवनपटातील मोदींच्या भूमिकेसाठी अभिनेता परेश रावल आणि अभिनेते अनुपम खेर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यांचं नाव मागे पडत अक्षय कुमारनं नाव समोर आलं आहे.
रिपोर्टनुसार, नरेंद्र मोदींच्या जीवनावर चित्रपट बनवणा-या निर्मात्यानं मोदींची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता अक्षय कुमारला पहिली पसंती दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मोदींच्या जीवनावरील चित्रपटावर अक्षय कुमारनं भूमिका साकारल्यास हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकून घालेल. भाजपा नेते आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हांचीही याला सहमती असल्याची चर्चा आहे.
ते म्हणाले, अक्षय कुमार इंडियाचे मिस्टर क्लीन अभिनेता आहेत. त्यांची प्रतिमा ही भारताच्या नव्या प्रतिमेसोबत शोभून दिसेल. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विट करत अक्षय कुमारचा चित्रपट टॉयलटः एक प्रेम कथा करमुक्त केला पाहिजे, अशी मागणी केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारहून अधिक कोणीच चांगलं असू शकत नाही. अभिनेता अक्षय कुमार याची प्रतिमा स्वच्छ आणि आदर्शवादी आहे. टॉयलट: एक प्रेम कथा आणि पद्यन हे चित्रपट सामाजिक सुधारणेच्या दृष्टिकोनावर आधारित आहेत. अक्षय कुमार यानंही पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं शून्यातून विश्व उभं केलं आहे. त्यामुळे अक्षय कुमारलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेसाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.