Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आशा पारेख जन्मदिन : 'अनेकांनी मागणी घातली पण त्या अविवाहितच राहिल्या'

Webdunia
रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (17:10 IST)
जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचा वितरण सोहळा 30 सप्टेंबर रोजी पार पडला. आज म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी आशा पारेख यांनी वयाच्या 80 व्या वर्षात पदार्पण केलं. त्यांचा वाढदिवस आणि चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार हा आशा पारेख यांच्यासाठी खरं तर दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल.
 
हिंदी चित्रपटसृष्टीत एक 'दिलकश अदाकारा' आणि यशाची मोठंमोठी शिखर पादाक्रांत करणारी अभिनेत्री अशी ओळख निर्माण करणाऱ्या आशा पारेख यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस असे चित्रपट दिले.
 
जब प्यार किसी से होता है, तीसरी मंजिल, लव इन टोक्यो, दो बदन, उपकार, कन्यादान, आन मिलो सजना, कटी पतंग, समाधी आणि मैं तुलसी तेरे आँगन की अशा चित्रपटांची लांबलचक यादीच सांगता येईल.
 
भारतीय चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा समजला जाणारा हा 2022 चा पुरस्कार आशा पारेख यांना मिळणं खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. या पुरस्काराचा इतिहास जर बघायला गेलं तर आजवर या पुरस्कारावर पुरुष अभिनेत्यांचंच वर्चस्व राहिलं आहे.
 
1983 साली हा पुरस्कार अभिनेत्री दुर्गा खोटे यांना मिळाला होता आणि आज तब्बल 37 वर्षानंतर आशा पारेख यांनी या पुरस्कारावर आपली मोहोर उटवली आहे.
 
भारतीय चित्रपट सृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. 1969 मध्ये दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारत सरकारने हा पुरस्कार द्यायला सुरुवात केली.
 
पहिला पुरस्कार मिळवला होता अभिनेत्री देविका राणी यांनी. 1970 नंतर मात्र पुरुष अभिनेत्यांचीच यावर मक्तेदारी राहिली आहे.
 
आशानंतर पुन्हा आशा..
यात आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे 22 वर्षांपूर्वी म्हणजे 2000 साली जेष्ठ गायिका आशा भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आता 2022 मध्ये आशा पारेख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 
बऱ्याचदा आशा पारेख आणि मी फोनवर गप्पा मारत असतो. मी त्यांना नेहमीच म्हणायचो की त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळायला हवा. यावर त्या हसून म्हणायच्या "आता आपण यावर काय बोलणार."
 
पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्या अमेरिकेत होत्या. त्यांची चुलत बहीण अमिना यांच्याशी बोलणं झाल्यावर समजलं की, त्या 29 सप्टेंबरला मुंबईत येतील आणि 30 सप्टेंबरला पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीत उपस्थित असतील.
 
सिनेसृष्टीतला हा मानाचा पुरस्कार मिळण्याआधी 1992 मध्ये आशा पारेख यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
बाल कलाकार म्हणून केली होती सुरुवात..
2 ऑक्टोबर 1942 रोजी गुजरातमध्ये आशा पारेख यांचा जन्म झाला.
 
त्यांचे वडील बच्चूभाई पारेख हे हिंदू गुजराती तर आई सुधा उर्फ सलमा मुस्लीम कुटुंबातील होत्या. पारेख यांनी लहानपणीचं शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. 1952 मध्ये, वयाच्या 10 व्या वर्षी त्यांनी 'माँ' या हिंदी चित्रपटात बाल कलाकाराची भूमिका केली होती.
 
खरं तर हा चित्रपट त्यांना त्यांच्या नृत्य कौशल्यामुळे मिळाला होता. तेव्हाचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांनी बेबी आशा यांना एका कार्यक्रमात डान्स करताना पाहिलं आणि त्यांच्या 'माँ' या चित्रपटात पारेख यांना भूमिका देऊ केली. या चित्रपटात भारतभूषण, लीला चिटणीस आणि श्यामा यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
 
आणि इथूनच आशाजींचा चित्रपटाप्रति ओढा वाढू लागला. त्यानंतर त्यांनी आसमान, धोबी डॉक्टर, बाप बेटी, चैतन्य महाप्रभू, अयोध्यापती आणि उस्ताद या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं.
 
सुबोध मुखर्जी यांच्या चित्रपटातून पदार्पण
मुख्य अभिनेत्री म्हणून आशाजींना पहिला ब्रेक दिला तो चित्रपट निर्माते सुबोध मुखर्जी यांनी. त्यांनी त्यांच्या 'दिल देके देखो' या चित्रपटाची नायिका म्हणून आशाजींची निवड केली.
 
यावेळी त्या अवघ्या 16 वर्षांच्या होत्या. चित्रपटात लीड रोल मध्ये होते शम्मी कपूर तर चित्रपटाचे दिग्दर्शक होते नासिर हुसेन.
 
1959 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला आणि हिटही झाला. पहिलाच चित्रपट हिट गेल्यामुळे आशाजींचंही कौतुक होऊ लागलं. आशा पारेख आणि शम्मी कपूरही जोडी लोकांना सुद्धा आवडली होती.
 
पुढे 'पगला कहीं का', 'जवान मोहब्बत' आणि 'तिसरी मंझिल' या चित्रपटातही आशा पारेख आणि शम्मी कपूर यांची जोडी भाव खाऊन गेली.
 
दुसरीकडे 'दिल देके देखो' चित्रपट करता करता आशाजी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्यात प्रेम फुललं. त्यांच्यात निर्माण झालेलं हे प्रेमाचं नातं कायम टिकलं. त्यांनी कधीही ते लपवण्याचा प्रयत्नही केला नाही. मात्र नासिर हुसैन आधीच विवाहित होते त्यामुळे त्यांनी सन्मान आणि मर्यादा पाळत लग्न केलं नाही.
 
आशा पारेख यांनी नासिर हुसैन यांच्या सात चित्रपटात काम केलं. जब प्यार किसी से होता है, फिर वही दिल लाया हूँ, तिसरी मंज़िल, बहारों के सपने, प्यार का मौसम, कारवां, मंजिल मंजिल यात त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं.
 
1960 ते 70 च्या दशकात तरुणांमध्ये आशा पारेख यांची प्रचंड क्रेझ होती. त्यांची एक झलक बघायला मिळावी म्हणून लोक तरसायचे. कित्येक लोकांनी त्यांना लग्नासाठी मागणी घातली मात्र त्यांनी शेवटपर्यंत कोणालाही होकार दिला नाही आणि त्या अविवाहित राहिल्या.
 
मुलगी एकटी कशी राहील या विचाराने आशाजींच्या आई कायम चिंतेत असायच्या.
 
आशा पारेख अविवाहित राहिल्या. त्या आयुष्य मनसोक्तपणे जगल्या. त्यांना प्रवास करायला आवडायचं. त्यांनी इकडे चित्रपटात अभिनय करणं बंद केल्यावर सिरीयल मध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. आपला काही वेळ त्या समाजसेवेसाठीही द्यायच्या.
त्यांच्या आई सुधा जोपर्यंत हयात होत्या तोपर्यंत त्यांनी आशाजींची साथ कधीच सोडली नाही. पण नंतर तब्येतीने साथ देणं बंद केल्यावर मात्र त्यांना आपल्या मुलीची काळजी वाटू लागली. त्या एकट्या कशा राहतील याची चिंता सतत त्यांच्या आईला लागून राहायची. पण आशाजींच्या आईची मैत्रीण शम्मी आंटी यांनी ही कसर भरून काढली.
 
शम्मी आंटी म्हणजे चित्रपटात काम केलेली एक जुनी अभिनेत्री, पण नंतर त्या प्रसिद्ध झाल्या ते सिरियलच्या निर्माती म्हणून.
 
शम्मी आंटी बोलता बोलता मला म्हणाल्या होत्या की, "सुधा आजारी होती. तिच्या शेवटच्या दिवसात तिला आशाची काळजी लागून राहिली होती. ती मला म्हणाली की, आशाने लग्न केलेलं नाहीये. तिची काळजी कोण घेईल, यावर मी सुधाला म्हटलं होतं की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आशाची काळजी मी घेईन."
 
शम्मी आंटीने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हे वचन निभावलं. 6 मार्च 2018 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आशाजी शम्मी आंटीपेक्षा फक्त 16 वर्षांनी लहान होत्या. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीचं नात होतं. नंतर त्या दोघींनी काही सिरियल्स प्रोड्युस केल्या.
 
वहिदा रहमान आणि हेलन आहेत खास मैत्रिणी
तसं बघायला गेलं तर आशाजींच्या फिल्मी दुनियेत खूप साऱ्या मैत्रिणी होत्या. मात्र वहिदा रहमान आणि हेलन यांच्याशी त्यांची अगदी घट्ट मैत्री आहे. या तिघी बऱ्याचदा एकत्र फिरताना दिसतात.
 
आशा पारेख सांगतात, "आमच्या तिघींमध्ये आजही खूप घट्ट मैत्री आहे. कधीतरी संडे बघून आम्ही लंचसाठी एखादीच्या घरी जातो, गप्पा मारतो, मजा करतो."
 
याआधी त्यांच्या ग्रुपमध्ये शम्मी आंटी, साधना आणि शशीकला यासुद्धा होत्या. पण या तिघींच्या निधनानंतर त्यांचा हा ग्रुप छोटा झाला आहे.
 
आता गंमत म्हणजे फाळके पुरस्कारासाठी ज्या अभिनेत्रींच्या नावाची चर्चा व्हायची त्यात वहिदा रहमान आणि हेलन यांचही नाव होतं. मात्र आशा पारेख यांनी बाजी मारली आहे.
 
राजेश, धर्मेंद्र, शशी, जितेंद्रसोबत सोबतची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली.
 
आशा पारेख यांनी शम्मी कपूर, मनोज कुमार, राजेश खन्ना, शशी कपूर, धर्मेंद्र आणि जितेंद्र यांसारख्या नावांजलेल्या अभिनेत्यांसोबतही काम केलं आहे.
 
त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत 'मेरा गांव मेरा देश', 'आया सावन झूम के', 'शिकार', 'आये दिन बहार के' आणि 'समाधी' या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं. त्यांची ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीला तर उतरलीचं पण सोबत या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला.
 
त्यानंतर मनोज कुमारसोबत 'अपना बनाके देखो' आणि 'साजन', 'दो बदन' आणि 'उपकार' हे चित्रपट केले. पण गाजले ते 'दो बदन' आणि 'उपकार' हे चित्रपट.
तर दुसरीकडे त्यांनी शशी कपूर यांच्यासोबत 'कन्यादान', 'प्यार का मौसम' हे चित्रपट केले. हे दोन्ही चित्रपट चांगलेच गाजले. पुढे 'पाखंडी', 'रायजादे' आणि 'हम तो चले परदेस' या चित्रपटातही त्यांनी सोबत काम केलं.
 
आशा पारेख यांनी जॉय मुखर्जीसोबत 'लव्ह अॅंड टोकियो' आणि 'फिर वही दिल लाया हूं' हे दोन चित्रपट केले. जॉय मुखर्जीसोबत त्यांची जोडी हिट ठरली होती.
 
जितेंद्र आणि आशा पारेख यांच्या जोडीबद्दल बोलायचं झालंच तर त्यांच्या 'कारवां' या चित्रपटाने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. यासोबतच या जोडीने 'नया रास्ता' आणि 'उधार का सिंदूर' हे हिट चित्रपटही दिले.
आशा पारेख आणि राजेश खन्ना यांनी 'बहारों के सपने', 'आन मिलो सजना' आणि 'कटी पतंग' हे तिन्ही हिट चित्रपट दिले. पण या चित्रपटातील गाणी त्याकाळी भलतीच गाजली.
 
आशा पारेख अनेक भूमिका या खोडकर, चंचल असायच्या. मात्र शक्ती सामंत यांनी 'कटी पतंग'मध्ये त्यांना धीरगंभीर भूमिका देऊन त्यांच्या कारकिर्दीला एक नवा आयाम दिला.
 
आशा पारेख यांना 'कटी पतंग'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. कटी पतंग मध्ये विधवेची भूमिका करून आशा पारेख यांनी आपलं करिअर संपवलं अशी चर्चा रंगली होती. मात्र चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्यांनी वठवलेली भूमिका बघून लोकांनी त्यांचं खूपच कौतुक केलं. हा चित्रपट गुलशन नंदा यांच्या कादंबरीवर आधारित होता.
याआधी राज खोसला यांनी 'दो बदन' आणि 'चिराग' या दोन चित्रपटांमध्ये त्यांना गंभीर भूमिका देऊ केली होती. आणि विशेष म्हणजे आशाजींनी सुद्धा यात आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं होतं.
 
पण 1978 मध्ये आलेल्या 'मैं तुलसी तेरे आंगन की' मुळे त्यांच्या कारकीर्दीला एका उंचीवर नेऊन ठेवलं. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीसाठी एक मैलाचा दगड ठरला
 
आशा पारेख यांनी 1952 मध्ये बाल कलाकार म्हणून पदार्पण केलं होतं. त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी 'सर आँखों पर' हा शेवटचा चित्रपट केला. म्हणजे त्यांची अभिनयाची कारकीर्द ही जवळपास 47 वर्षांची म्हणावी लागेल.
 
पण अभिनेत्री म्हणून बघायला गेलं तर त्यांनी 1959 मध्ये पहिला चित्रपट केला आणि 1995 मध्ये आलेल्या आंदोलन चित्रपटानंतर काम करणं बंद केलं. त्यामुळे त्यांची मुख्य अभिनेत्री म्हणून कारकीर्द मोजायची झाली तर ती 36 वर्ष इतकी लांबलचक आहे. या काळात त्यांनी एकूण 75 चित्रपटांमध्ये काम केलं आणि यातले बरेच चित्रपट हिट ठरले होते.
 
आशा पारेख यांनी घराना, मेरी सूरत तेरी आँखे, भरोसा, मेरे सनम, ज्वाला, राखी और हथकडी, हीरा, रानी और लाल पारी, जख्मी, बिन फेरे हम तेरे, सौ दिन सास के, कालिया, हमारा खानदान, लावा, बंटवारा आणि प्रोफेसर की पडोसन या चित्रपटात काम केलं आहे.
 
त्यांनी गुजराती, पंजाबी आणि कन्नड या तिन्ही भाषांमधील चित्रपटांमध्येही काम केलंय.
 
सिरियल्स आणि समाज सेवा
आशा पारेख यांनी 1990 च्या दशकात डेली सोप्स म्हणजेच सिरियल्सच्या जगात पाऊल ठेवलं. 'ज्योती' ही गुजराती मालिका त्यांनी प्रोड्युस केली होती. त्यानंतर त्यांनी हिंदीत बाजे पायल, दाल में काला, कोरा कागज आणि कंगन यांसारख्या हिट सिरियल्स आणल्या.
 
आशा पारेख एकदा म्हणाल्या होत्या की, नृत्य हे त्यांचं पहिले प्रेम आहे. त्या डान्सिंग स्टार म्हणून प्रसिद्ध होत्या. तिने बऱ्याचदा स्टेज शो केले आहेत. मात्र पाठदुखीच्या त्रासामुळे त्यांनी सध्या नृत्य करणं बंद केलं आहे.
नृत्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी आशा पारेख यांनी मुंबईतील मलबार हिल इथे 'गुरुकुल' नावाची नृत्यशाळाही सुरू केली आहे. फारच कमी लोकांना याची माहिती आहे.
 
आता एवढंच नाही तर समाजसेवेतही त्या अग्रेसर राहिल्या आहेत. मुंबईतील सांताक्रूझ या ठिकाणी 'आशा पारेख हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर' ची स्थापना करण्यात आली. पण अनुदान मिळत नसल्यामुळे हे हॉस्पिटल चालवणं कठीण झाल्याचं त्या सांगतात.
 
चित्रपट कलाकारांसाठी मुंबईत सिंटा नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली आहे. त्यांनी या संस्थेत पदाधिकारी म्हणूनही काम केलं आहे.
 
सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा
आशा पारेख यांनी 1998 ते 2001 या कालावधीत सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिलं. चित्रपट पास करताना त्यांच वर्तन अतिशय कठोर होतं. त्यामुळे शेखर कपूर, देव आनंद, सावन कुमार आणि फिरोज खान या चित्रपट निर्मात्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती.
यावर आशा पारेख म्हणाल्या होत्या की, "जर सरकारने माझ्यावर काही जबाबदारी सोपवली असेल तर मी त्या नियमांचं पालन करीन. बऱ्याच चित्रपट दिग्दर्शकांसोबत माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. म्हणून मी डोळे झाकून त्यांचे चित्रपट पास करीन असं अजिबात नाही."
 
आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भारतीय सिनेसृष्टीतल्या अगदी लहानातल्या लहान ते मोठ्यातला मोठा फिल्मी स्टारला हा मानाचा पुरस्कार मिळवण्याची इच्छा असते.
 
Published By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

सर्व पहा

नवीन

सलमान खानला धमकीचे मेसेज पाठवल्या प्रकरणी गीतकाराला अटक

'महावतार' चित्रपटात विकी कौशल चिरंजीवी परशुरामच्या भूमिकेत,चित्रपट या दिवशी प्रदर्शित होणार

छत्रपती संभाजी महाराजांवर जवजवळ दोन चित्रपट रिलीज, कोणाला नुकसान?

भारतातील सात पवित्र नद्यांना अवश्य भेट द्या

चित्रपट रामायणमध्ये या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीची एन्ट्री

पुढील लेख
Show comments