Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

चंदू चॅम्पियन: भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण विजेते मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट

Chandu Champion
, शुक्रवार, 14 जून 2024 (19:28 IST)
ही आहे 1965 च्या भारत आणि पाकिस्तानच्या युद्धातील गोष्ट.युद्धभूमीवर लढणाऱ्या एका तरुणाला गोळ्या लागल्या आणि तो कोमात गेला. शुद्धीवर आला पण त्याला कायमचा अर्धांगवायू झाला होता.
बरोबर सात वर्षांनंतर म्हणजेच 1972 मध्ये, त्याच तरुणानं पॅरालिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं.
पॅरालिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत प्रथमच त्यानं भारतासाठी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आणि विश्वविजेता बनला.
दिग्दर्शक कबीर खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट भारतासाठी इतिहास रचणाऱ्या यात मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे.
'पाठीच्या कण्यात आजही गोळी'
जगज्जेता होण्यापूर्वीच पेटकरांच्या गोष्टीला सुरुवात होते. भारतीय लष्करात शिपाई म्हणून लागल्यावर ते ब्यॉज बटालियनमध्ये होते.
 
1 नोव्हेंबर 1944 रोजी महाराष्ट्रात जन्मलेले मुरलीकांत पेटकर आता 82 वर्षांचे आहेत आणि पुण्यात राहातात.
 
कुस्ती, हॉकी, अॅथलेटिक्स या खेळांमध्ये ते नेहमीच अव्वल होते.
 
ते सांगतात, "1965 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होतं त्यावेळी आम्ही काश्मीरमध्ये होतो. अचानक शिट्टीचा आवाज आला. आम्ही सगळे नवीन होतो आणि आम्हाला वाटलं कदाचित चहाची सुट्टी म्हणून शिट्टी वाजवली असेल. पण हवाई हल्ला झाल्याची ती शिट्टी होती."
 
"माझ्यासोबत असलेले सैनिक बंकरमधून गेले होते. तेवढ्यातच हल्ला झाला. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. मलाही गोळ्या लागल्या. एक गोळी पाठीच्या कण्याला लागली. ती गोळी अजूनही माझ्या पाठीच्या कण्यामध्ये आहे."
 
"गोळी लागल्यावर मी कड्यावरून खाली पडलो. मी खाली पडल्यावर मागून येणारा लष्कराचा टँकर माझ्या अंगावरुन गेला. मी बराच काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. मला माझं नावही आठवत नव्हतं. कंबरेपासून खाली अर्धांगवायू झाला होता."
 
18 महिने कोमात, स्मृतीही गेली
जखमी झाल्यानंतर आपण शुद्धीवर कसे आलो? याविषयी सांगताना ते म्हणाले, "मी 18 महिने हॉस्पिटलमध्ये कोमात होतो आणि माझी स्मृती गेली होती. एके दिवशी मी हॉस्पिटलमध्ये माझ्या बेडवरून पडलो. तेव्हा जवळचे लोक आले, मला उचलू लागले. त्यादिवशी मला टेकडीवरून पडलेला दिवस आठवला."
 
"सर्व काही आठवलं. मला वाटलं की मी पाकिस्तानी हद्दीत पकडलो गेलोय आणि म्हणून मी समोर बसलेल्या जनरल साहेबांचा गळा दाबून धरला. सैन्यात आम्हाला आधी शत्रूला मारायचं आणि मग मरायचं असं शिकवलं जातं. जनरल साहेब म्हणाले, आम्ही भारतीय आहोत. पण सैनिक असल्याने माझं मन ते मानायला तयार नव्हतं."
"मी म्हणालो आयडी दाखवा. मग मला एक नर्स दिसली. ती भारतीय लष्कराची नर्स होती. मग मी जनरलला सोडलं आणि माफी मागितली. पण त्यानंतर मला खूप मार खावा लागला पण जनरल साहेबांनी सगळ्यांना थांबवलं."
 
कमरेखाली शरीर निकामी झाल्यानं पोहणं, हा मुरलीकांत यांच्या जीवनातला नित्यक्रम ठरला आणि यामुळंच आयुष्याला कलाटणी देखील मिळाली. सैन्यातील फिजिओथेरपिस्टनं त्यांना बरं वाटावं म्हणून पोहण्याचा सल्ला दिला होता.
 
बरं होण्यासाठी सुरू झालेल्या पोहण्यानं मुरलीकांत पेटकर यांना पॅरालिम्पिकमध्ये नेलं आणि त्यांनी 1972 मध्ये जर्मनीमध्ये सुवर्णपदक जिंकलं.
 
एक पैसा जिंकला अन्..
मुरलीकांत पेटकर सांगतात की, त्यावेळी त्यांना भारतीय सैन्यदल आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू विजय मर्चंट यांनी पाठिंबा दिला होता, ते अपंग खेळाडूंसाठी अतिशय तन्मयतेने काम करायचे.
 
मुरलीकांत पेटकर यांनी खेळायला कधी सुरुवात केली याचा ते रंजक किस्सा सांगतात, "मी जेव्हा गावात शाळेत जायचो, तेव्हा वाटेत कुस्तीचा आखाडा असायचा. तिथे मला मोठ्या घरातील पैलवान दिसायचे. त्यांच्यासाठी दूध, तूप वगैरे यायचे, पैलवानांसाठी थंडाई केली जायची, म्हणून एके दिवशी मला मदत करायला सांगितली.
 
"त्याच्या बदल्यात मला बदामाची थंडाईही मिळाली. मी ती घरीही नेली. दुसऱ्या दिवशीही तेच घडलं. हे करत असताना मी कुस्तीही खेळू लागलो. जेव्हा कोणी नसायचं तेव्हा ते मला छोटू पैलवान म्हणून खेळायला बोलवायचे."
"ज्या पैलवानाची थंडाई उरायची, ती मला मिळायची. असं मी माझं शरीर कमावलं. एकदा जवळच्या गावात कुस्ती सुरू होती. कुस्ती जिंकण्यासाठी एक पैसा मिळायचा, जी 60 च्या दशकात गावात खूप मोठी गोष्ट होती. साधारणपणे पण जिंकल्यानंतर आम्हाला नारळ आणि बत्तासा मिळायचा."
 
संभाषणादरम्यान, मुरलीकांत पेटकर कॅमेऱ्यासमोर एक पैशाचं नाणं दाखवून म्हणतात "तुम्ही कधी एक पैसा पाहिलाय का? त्या दिवशी मी कुस्तीत हा एक पैसा जिंकला. ते नाणं अजूनही माझ्याकडे आहे. इथूनच सगळं प्रकरण सुरू झालं. पुढे मला सैन्यात पाठवण्यात आलं.
 
आपल्या कठोर परिश्रम, समर्पण आणि इतरांच्या मदतीने, मुरलीकांत अशा टप्प्यावर पोहोचले जे कोणत्याही खेळाडूसाठी सर्वात मोठं ध्येय असतं, ते म्हणजे पॅरालिम्पिक.
 
युद्धभूमीपासून सुरुवात
मुरलीकांत यांनी 1972 च्या त्या काही दिवसांबद्दल सांगितलं, "जेव्हा आम्ही जर्मनीला पोहोचलो, तेव्हा तिथे राहणारे अनेक भारतीय तिथे आले, त्यांनी मला फुलं दिली. मला तेव्हाच विजयी झाल्यासारखं वाटलं. फायनलमध्ये मी अजिबात घाबरलो नाही. त्यावेळी मी विश्वविक्रमाचा विचार केला नव्हता."
 
"मला नंतर कळलं की गोल्ड मिळवण्यासोबत मी विश्वविक्रमही केला होता. तिथे अनेक शीख बांधव होते, ज्यांनी खूप टाळ्या वाजवल्या. "
ते म्हणतात, "जेव्हा आम्ही इंडियन एअरपोर्टवर पोहोचलो तेव्हा बरेच लोक उतरले पण मला माझ्या व्हीलचेअरसाठी थांबावं लागलं. तिथे एक मुलगी आली. ती कोण होती मला माहीत नाही. ती म्हणाली, पेटकर काका, मला तुमचं पदक दाखवा."
 
मुरलीकांत पेटकर यांची कथा रणांगणापासून सुरू होते आणि पॅरालिम्पिकमध्ये क्रीडाक्षेत्रात शिखरावर पोहोचते.
 
पॅरालिम्पिक खेळांबद्दल बोलायचं झालं तर ते थेट युद्धाशी संबंधित आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक सैनिक जखमी झाले आणि अनेक सैनिक अपंगही झाले.
 
त्यांच्या पुनर्वसनासाठीच खेळ सुरू झाले, त्यानं हळूहळू स्पर्धात्मक रूप धारण केलं.
1948 मध्ये जेव्हा लंडनमध्ये ऑलिम्पिक खेळ आयोजित करण्यात आले होते, तेव्हा स्टोक मँडेविले हॉस्पिटलशी संबंधित लुडविग गुटमन यांनी व्हीलचेअर खेळाडूंसाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. पुढे त्याला पॅरालिम्पिक खेळाचे स्वरूप आले.
 
मुरलीकांत म्हणतात की, खेळामुळे आनंद आणि सकारात्मकता येते तर युद्धामुळे विनाश आणि दुःख मिळते.
 
कार्तिक आर्यनची प्रतिक्रिया
1968 मध्ये झालेल्या पॅरालिम्पिक गेम्समध्ये त्यांनी पोहण्याव्यतिरिक्त टेबल टेनिसमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं.
 
1967 मध्ये ते महाराष्ट्र स्तरावर गोळाफेक, भालाफेक, डिस्कस थ्रो, वेटलिफ्टिंग, टेबल टेनिस आणि तिरंदाजीमध्ये चॅम्पियन बनले.
 
बॉक्सिंगसाठी त्यांना भारतातून टोकियोला पाठवण्यात आलं.
आपल्या चित्रपट बनतोय हे ऐकून मुरलीकांत यांना खूप आनंद झाला. कारण एका दिव्यांग खेळाडूच्या जीवनाला यात खूप महत्त्व दिलं गेलं आहे.
 
अभिनेता कार्तिक आर्यन म्हणतो की, जेव्हा त्याने मुरलीकांत यांची कथा ऐकली तेव्हा त्याला विश्वासच बसला नाही. असं काही घडू शकतं याचा त्याने विचार देखील केला नव्हता.
 
चंदू चॅम्पियन या चित्रपटात म्हटल्याप्रमाणं, चॅम्पियन पडतो पण थांबत नाही. मुरलीकांत अजूनही खेळाडूंसोबत सक्रिय आहेत. 1972 मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या मुरलीकांत यांना 2021 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
तसं तर ऑलिम्पिकमधील वैयक्तिक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकण्यासाठी भारताला 21 व्या शतकाची वाट पाहावी लागली. 2008 मध्ये अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक जिंकलं आणि 2021 मध्ये नीरज चोप्राने दुसरं सुवर्ण पदक जिंकलं.
 
पण जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांनी 52 वर्षांपूर्वी पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.
 
हा तो काळ होता जेव्हा भारतात पॅरालिम्पिकबद्दल फारशी चर्चा नसायची.
 
शारीरिकदृष्ट्या अपंग खेळाडूंसाठी विशेष सुविधा नव्हत्या. आणि आजपर्यंत भारताला जलतरणासारख्या खेळात ऑलिम्पिकमध्ये एकही पदक जिंकता आलेलं नाही.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवभक्त सुशांत सिंह राजपूतला होती महाग वस्तूंची आवड, जाणून घ्या त्यांच्याजवळ किती पैसे होते