'लगान','चक दे इंडिया' तसेच 'अंदाज अपना-अपना'मध्ये भूमिका बजावलेले ज्येष्ठ अभिनेते जावेद खान अमरोही यांचे आज निधन झाले. त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी आत्तापर्यंत जवळपास १५० चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लगान' मध्ये साकारलेली राम सिंगची भूमिका असो किंवा 'चक दे इंडिया'मध्ये त्यांनी निभावलेली सुखलालची भूमिका असो, यामुळे त्यांना विशेष लोकप्रिता मिळाली. तसेच 'अंदाज अपना-अपना'मध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केली आहे.
चित्रपटांसोबतच जावेद खान अमरोही यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. मिर्झा गालिब,कुछ भी हो सक्ता है, नुक्कड या मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्यांच्या विनोदाच्या शैलीमुळे प्रेक्षकांचे लक्ष त्यांच्याकडे वळले. त्यांनी फक्त विनोदीच नव्हे तर अनेक प्रकारच्या भूमिका साकारलेल्या आहेत. चक दे इंडियामधील त्यांची भूमिका खास गाजली होती. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. ते मागील १ वर्षांपासून आजारी होते. सांताक्रूझ येथील सूर्य नर्सिंग होममध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते अखिलेश मिश्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन जावेद खान अमरोही यांना श्रद्धांजली वाहिली.
Edited by : Ratnadeep Ranshoor