बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने तिच्या करिअरची सुरुवात 'धडक' या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात तिचा सहकलाकार होता ईशान खट्टर.
'धडक' हा मराठी सुपरहिट चित्रपट 'सैराट'चा हिंदी रिमेक आहे. मराठी चित्रपट असलेल्या 'सैराट'ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं, पण 'धडक'ला मिळालेला रिस्पॉन्स तसा थंडच होता.
विशेष म्हणजे लोकांनी जान्हवीची तुलना तिच्या आईशी केली. तिचा लूक असो, तिचे डायलॉग डिलिव्हर करण्याची स्टाईल आणि अभिनय या सगळ्याचं गोष्टींची तुलना झाली.
यानंतर लोकांनी जान्हवीला तिच्या अभिनयावरून ट्रोल करायला सुरुवात केली. पण ती हिंमत हरली नाही, तिने तिचं काम पुढे सुरूच ठेवलं.
जान्हवीच्या बाबतीत सर्वात चांगली गोष्ट काय असेल, तर तिने अनेक वेगवेगळी पात्रं साकारली. तिने भूमिकांशी संबंधित बरेच प्रयोग केले.
तिने प्रत्येकवेळी एक नवी भूमिका निवडली. मग गुंजन सक्सेनाच्या फ्लाइट-गर्लची भूमिका असो की त्याउलट शॉर्ट मूव्ही असलेल्या घोस्ट-स्टोरीजमधील भूमिका असो तिने आपल्या भूमिका चांगल्या पद्धतीने वठवल्या. रुही आणि गुड लक जेरीमध्ये तिने साकारलेल्या भूमिका या वेगळ्या पठडीतल्या आणि दोन टोकाच्या होत्या.
येत्या 4 नोव्हेंबरला जान्हवीचा 'मिली' नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तिचे वडील आणि निर्माते बोनी कपूर यांच्यासोबत केलेला हा तिचा पहिलाच चित्रपट आहे.
जान्हवीचं आत्तापर्यंतच करिअर आणि तिच्या कुटुंबाविषयी तिने बीबीसी हिंदीशी गप्पा मारल्या. नयनदीप रक्षित यांनी जान्हवीची मुलाखत घेतली.
चित्रपट कारकीर्दीचा सुरुवातीचा काळ कठीण असल्याचं जान्हवी सांगते. लोक तिच्याविषयी जे बोलायचे त्याचंही तिला वाईट वाटायचं. पण लोक जज करायचे म्हणून तिला वाईट वाटायचं असं नव्हतं.
जान्हवी सांगते की, तिच्या आईच्या (श्रीदेवीच्या) मृत्यूनंतर बऱ्याच गोष्टी तिच्यासाठी त्रासदायक ठरल्या. आईच्या मृत्यूनंतरचं तिची अभिनय कारकीर्द सुरू झाली होती, त्या काळात तिला लोकांकडून प्रेम आणि आपुलकीची अपेक्षा होती. मात्र ते तिला मिळालंच नाही.
ती सांगते की, "लोक जज करतायत म्हणून मला वाईट वाटलं नव्हतं. पण मी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नव्हते याचं वाईट वाटलं होतं. माझ्या पहिल्याच चित्रपटात मी लोकांना आश्वस्त करू शकले नाही. आणि हे एकप्रकारचं ओझं माझ्यावर होतं."
"मी काय करायला हवं आणि काय नको हे मला लवकर समजलं नाही. मला खूप गोष्टी करायच्या होत्या. मात्र त्या करता आल्या नाहीत. पण एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मी फक्त आणि फक्त मेहनत करते आहे."
जान्हवीला वाटतं की वेळेनुसार आता लोकही बदलले आहेत. ती सांगते, "लोकांना आता माझी मेहनत दिसते, माझं काम दिसतंय. त्यांना आता माझं काम आवडू लागलंय आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट अनुभवणं खूप भारी असतं."
जान्हवी सांगते की, तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पण एकवेळ अशी आली होती की लोकांच्या प्रश्नांमुळे तिने या क्षेत्रात न येण्याचा विचार केला होता."
जान्हवी सांगते, "सिनेमा माझ्या रक्तात आहे. लोकांना असं वाटतं की, ती तर श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी आहे. तिला आयुष्यात सगळं काही सहज मिळालं असेल. मग त्यांना असंही वाटायला हवं की, या कलेसाठी प्रामाणिकपणे काम करणं आणि मेहनत करणं सुद्धा माझ्या रक्तात आहे."
ऑडिशन दिली मात्र रोल दुसरीला मिळाला...
फिल्मी कुटुंबातून आल्याचं जान्हवी मान्य करते. तिच्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या होत्या. मात्र यासाठी मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करावं लागतं असं तिचं म्हणणं आहे.
ती म्हणते, "फिल्मी कुटुंबातून आल्यामुळे मुंबईत सर्व्हाईव्ह करण्यासाठी मला त्रास सहन करावा लागला नाही. मुंबईत मी कसं राहीन, माझ्या डोक्यावर छत असेल का? मी काय खाईन, या गोष्टींचं टेन्शन मला ऑडिशनला जाताना नसायचं. हा बेसिक स्ट्रगल मला करावा लागला नाही. कोणाला भेटायचंय कोणाला नाही याची सुद्धा मला काळजी नव्हती. कारण चित्रपटांच्या दिग्दर्शकांना मी भेटू शकत होते. ट्रेन मध्ये धक्के खात मला ऑडिशनला जावं लागतं नव्हतं, मी माझ्या गाडीतून कम्फर्टेबली जात होते. मला दिग्गज अभिनेत्यांचा सल्ला मिळत होता आणि या गोष्टी माझ्यासाठी प्रिविलेज होत्या."
जान्हवी सांगते की, तिने बऱ्याच ऑडिशन्स दिल्या. तिला 'धडक'साठीही ऑडिशन द्यावी लागली होती. तिने एकदा एका चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती, पण नंतर तिच्याऐवजी दुसरीलाचं हा रोल मिळाला.
जान्हवीला सांगते की, लोकांना असं वाटतं की स्टारकिड्सना सर्व गोष्टी सहज मिळतात. पण तसं नसतं.
ती तिच्या लहानपणी घडलेला एक किस्सा सांगते, "माझ्यासोबत हे लहानपणापासूनचं घडतंय. मी शाळेत असताना हुशार होते, मला चांगले मार्क्स मिळायचे. पण तिच्या टीचर श्री देवीच्या फॅन आहेत म्हणून तिला चांगले मार्क्स मिळत असतील असं म्हटलं जायचं."
अर्जुन कपूर आणि बहीण अंशुलाने आधार दिला
जान्हवी सांगते की, तिचे वडील बोनी कपूर यांनी तिला आधीच सांगितलं होतं की, तुला तुझ्यासाठी काम शोधावं लागेल. तिच्यासोबत ते पहिला चित्रपट करणार नव्हते.
श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अर्जुन कपूर आणि बहीण अंशुलाने जान्हवी आणि धाकट्या खुशीला ज्याप्रकारे आधार दिला, जान्हवी याला ब्लेसिंग्स मानते.
ती म्हणते, "त्यांच्यामुळे मला सपोर्ट सिस्टीम मिळाली. माझ्यावर जे प्रेम करतात आणि मलाही ज्यांच्यावर प्रेम करू वाटतं असे सर्वजण मला मिळाले."
जान्हवी म्हणते की कुटुंबातील प्रत्येकाकडून तिला जर एखादा गुण घ्यायचा असेल तर ती अंशुलाकडून समंजसपणा, अर्जुनकडून सेंस ऑफ ह्यूमर, बोनी कपूरकडून पॉजिटिव्हिटी आणि खुशीकडून खरेपणा घेईल.