Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वातंत्र्य दिन : भारताच्या फाळणीवर बनलेले 'हे' 5 चित्रपट तुम्ही पाहायलाच हवेत..

Webdunia
सोमवार, 15 ऑगस्ट 2022 (08:43 IST)
प्रदीप सरदाना
भारताची फाळणी, त्यानंतर उसळलेली दंगल आणि त्यानंतर झालेलं लाखो लोकांचं विस्थापन ही मानवी इतिहासातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. या विषयावर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच चित्रपट बनलेत.
 
आज असे पाच खास चित्रपट बघू, ज्यात फाळणीच्या भीषणतेचं चित्रण अगदी मार्मिक पद्धतीने करण्यात आलंय.
 
1. गरम हवा
देशाच्या फाळणी होत असताना परिस्थिती अचानक बदलली. यावर भारतासोबतच पाकिस्तानी चित्रपट निर्मात्यांनीही काही चित्रपटांची निर्मिती केली. गरम हवा हा चित्रपट सुद्धा याच पठडीतला.
 
देशाची फाळणी होऊन 25 वर्ष लोटली होती. याच दरम्यान इस्मत चुगताई यांच्या लघुकथेवर आधारित गरम हवा हा चित्रपट बनवण्यात आला. 1973 मध्ये रिलीज झालेला या चित्रपटाची पटकथा कैफी आझमी आणि शमा झैदी यांनी लिहिली होती. तर एमएस सथ्यू हे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि सहनिर्माते होते.
 
या चित्रपटात देशाची फाळणी, महात्मा गांधींच्या हत्येनंतर बदललेली परिस्थिती या दरम्यानचं चित्रण करण्यात आलंय. मात्र चित्रपटाची कथा फिरते ती मुख्य पात्र असलेला सलीम मिर्झा आणि उत्तर भारतातील मुस्लिम व्यापाऱ्यांच्या भोवती. सलीम मिर्झा हा आग्र्याचा बूट व्यापारी असतो.
 
फाळणीनंतर जेव्हा बरेच मुस्लिम पाकिस्तानात जात होते तेव्हा सलीम मिर्झा आणि त्याचा धाकटा मुलगा सिकंदर भारतातचं राहायचं असं ठरवतात. पण बदलत्या परिस्थितीत निभाव लागणार नाही असं म्हणत मिर्झा कुटुंबातील काही सदस्य पाकिस्तानात जातात. सलीम मात्र भारतातच राहायचा निर्णय घेतो.
 
या चित्रपटात सलीमची मुलगी अमिनाच्या माध्यमातून त्याकाळात बहरणाऱ्या प्रेमकथांचही चित्रण करण्यात आलंय. फाळणीमुळे बऱ्याचशा जोडप्यांना विरह सहन करावा लागला होता. पुढे या अधुऱ्या प्रेमकथा अशा धाटणीच्या चित्रपटांचा महत्त्वाचा भाग बनत राहिल्या.
 
अमिना पहिल्यांदा कासिमच्या प्रेमात पडते पण फाळणी दरम्यान तो पाकिस्तानात जातो आणि तिच्या स्वप्नांचा चुराडा होतो. पुढे शमशाद नावाचा तरुण तिच्या आयुष्यात येतो. पण जेव्हा शमशादचं कुटुंबही पाकिस्तानला जातं तेव्हा मात्र ती मनातून तुटलेली असते.
 
एकीकडे मिर्झा त्याच्यासोबत झालेल्या गैरवर्तनामुळे बेघर होतो. तर दुसरीकडे त्याला आपल्या मुलीची काळजी लागलेली असते. शेवटी चांगलं आयुष्य जगू या विचारात मिर्झा पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतो.
 
गरम हवा या चित्रपटात बलराज साहनी, गीता सिद्धार्थ, फारुख शेख, शौकत आझमी, जलाल आगा आणि ए के हंगल यांनी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. प्रत्येकजण आपापल्या भूमिकेत एकदम फिट बसलेत. बलराज साहनी यांच्या 'दो बिघा जमीन' चित्रपटानंतर 'गरम हवा' हा दुसरा असा चित्रपट असेल ज्यामुळे त्यांचं कायम स्मरण राहील.
 
साहनी यांना त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट पाहता आला नाही. चित्रपटाच्या डबिंग दरम्यान त्यांनी जेवढे सीन पाहिले असतील तेवढेच. संपूर्ण चित्रपट पाहणं त्यांच्या नशिबी नव्हतं.
 
12 एप्रिल 1973 ला बलराज साहनी यांनी 'गरम हवा'चं शेवटचं डबिंग शेड्युल संपवलं आणि दुसऱ्या दिवशी तर त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
 
सर्वोत्तम चित्रपट म्हणून हा चित्रपट फक्त नावाजला गेला नाही, तर या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले. 1974 मध्ये 'गरम हवा'ला राष्ट्रीय एकतेवर आधारित सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
 
तसेच या चित्रपटाला परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर नामांकन मिळालं. कान्स फिल्म फेस्टिव्हलसह इतर काही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.
 
या चित्रपटाला कथा, पटकथा आणि संवाद यासाठी तीन फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले. यानंतर सथ्यूने बरेच चित्रपट केलं. मात्र, ज्यामुळे त्यांची आठवण राहील असा फक्त 'गरम हवा' चित्रपटच म्हणावा लागेल.
2. तमस
बलराज साहनी यांची आठवण राहील असा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणजे गरम हवा. अगदी तसंच त्यांचे बंधू भीष्म साहनी आठवणीत राहतात त्यांच्या 'तमस' या कादंबरीसाठी. ही त्यांची सर्वाधिक लोकप्रिय कादंबरी आहे, ज्यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला.
 
पुढे या कादंबरीवर आधारित 'तमस' नावाचाचं चित्रपट ही काढण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या कारकीर्दीतला हा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. राष्ट्रीय एकतेवर आधारित या चित्रपटाला 1988 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गिस दत्त पुरस्कारही मिळाला.
 
याचसोबत सुरेखा सिक्री यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून तर वनराज भाटिया यांना संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
 
या चित्रपटात लेखक भीष्म साहनी यांच्यासह ओम पुरी, अमरीश पुरी, दिना पाठक, दीपा साही, उत्तरा बाओकर, ए के हंगल, मनोहर सिंग, सईद जाफरी, इफ्ताखार, केके रैना, बेरी जॉन आणि हरीश पटेल यांच्या भूमिका आहेत.
 
1947 च्या फाळणीवेळी ज्या दंगली घडल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर बनलेला हा चित्रपट जातीय दंगलींपासून राजकारणापर्यंतची विदारकता दाखवून देतो.
 
चित्रपटाची सुरुवात होते एक डुक्कर मारण्यापासून. पुढं त्याचं पर्यावसन जातीय दंगलीत होतं. नत्थू नावाच्या एका इसमाला खोटं बोलून डुक्कर मारायला लावलं जातं. दरम्यान तिथले मोठे नेते असणारे बक्षीजी मुस्लीम मोहोल्ल्यात जाऊन देशभक्तीपर गीत गायला सुरुवात करतात. पण तिथले लोक त्यांच्यावर दगडफेक करतात कारण मशिदीत डुकराचं मांस पडलेलं आढळतं.
 
पुढाऱ्यांच्या ध्येयधोरणांमध्ये अडकलेला सामान्य माणूस त्याच्या दुर्दशेला स्वत:ला जबाबदार समजायला लागतो. आणि याच मुद्द्याला धरून कथा पुढं सरकते.
 
मुस्लिम समाजाच्या अत्याचारातून वाचण्यासाठी हिंदू आणि शीख लोक भारतात आश्रय घेतात. कथेच्या शेवटी एका निर्वासित छावणीत एका मुलाचा जन्म होतो. एका बाजूने 'अल्ला हू अकबर' आणि दुसऱ्या बाजूने 'हर हर महादेव'च्या घोषणा ऐकू येत असतात.
 
कादंबरीत ही कथा फक्त पाच दिवसांची आहे. पण या पाच दिवसांत अशा काही गोष्टी दाखवल्यात की, संपूर्ण घटना डोळ्यांच्या पटलांवरून पुढं सरकतात. 'तमस' या चित्रपटासोबतच दूरदर्शनवरही मालिका प्रसारित करण्यात आली होती.
3. ट्रेन टू पाकिस्तान
'ट्रेन टू पाकिस्तान' हा चित्रपट खुशवंत सिंग यांच्या ट्रेन टू पाकिस्तान या कादंबरीवर आधारित आहे. 1956 मध्ये लिहिलेली ही कादंबरी भारत-पाक सीमेवर वसलेल्या मनो माजरा या काल्पनिक गावाची कथा सांगते. या गावात शांतता नांदत असते जिथं शीख आणि मुस्लिम लोक गुण्यागोविंदाने राहत असतात. तिथल्या सतलज नदीवर रेल्वे मार्गही असतो.
 
गावातील बहुतांश जमिनी या शिखांची ताब्यात असतात. तर त्या जमिनीत राबणारे मजूर हे मुस्लिम असतात. पण देशाची जेव्हा फाळणी होते, तेव्हा जातीय दंगली होतात, गाव उद्ध्वस्त होतं.
 
पाकिस्तानात राहणारे शीख भारताची सीमा पार करून येत असताना पाकिस्तानातून एक ट्रेन भारतात पोहोचते. या ट्रेनचा डब्बा शीख, हिंदू पुरुष, महिला आणि लहान मुलांच्या मृतदेहांने खचाखच भरलेला असतो.
 
या चित्रपटाची कथा लोकांना मनातून चांगलंच हादरवते. शिवाय कलाकारांचा अभिनय पाहून हे सगळं आपल्यासमोर घडतंय असंच वाटत राहतं.
 
या चित्रपटाच्या दिग्दर्शक पामेला जुनेजाने (नंतर पामेला रुक्स) ही कादंबरी 1975 मध्येच वाचली होती. आणि तेव्हा ती अवघ्या 17 वर्षांची होती. पामेला लहानपणापासूनचं फाळणीबद्दलच्या कथा ऐकत ऐकत मोठी होत होती. नाटकात रस घेणाऱ्या पामेलाने तेव्हाच यावर चित्रपट बनवू असं मनोमन ठरवलं होतं.
 
पामेलाचं हे स्वप्न 23 वर्षांनी पूर्ण झालं. आणि त्या दरम्यान तिचं वय चाळीसच्या आसपास होतं. पामेला पाच वर्षे कोमात होती. 2010 मध्ये वयाच्या 52 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला, मात्र ती ट्रेन टू पाकिस्तान चित्रपटाच्या माध्यमातून ती कायम स्मरणात राहील.
 
या चित्रपटात मोहन आगाशे, निर्मल पांडे, स्मृती मिश्रा, दिव्या दत्ता, रजित कपूर आणि मंगल ढिल्लो यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
4. पिंजर
हिंदू - मुस्लिम समस्या सुद्धा सामंजस्याने सोडवता येऊ शकतात, याचं उदाहरण म्हणजे 2003 साली प्रदर्शित झालेला 'पिंजर' हा चित्रपट.
 
चित्रपटात फाळणीचे प्रसंग, हिंदू -मुस्लिम वैर दाखवण्यात आलंय. मात्र चित्रपटाचा शेवट प्रेमाने होतो.
 
'पिंजर' ही अमृता प्रीतम लिखित प्रसिद्ध पंजाबी कादंबरी आहे. आणि हा चित्रपट देखील याचं कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि पटकथा लेखन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलंय. 'चाणक्य' या मालिकेतून आपली प्रतिभा सिद्ध केल्यानंतर 10 वर्षांनी त्यांनी 'पिंजर' या चित्रपटाची निर्मिती केली.
 
हा चित्रपट सीमा भागात राहणाऱ्या पुरो आणि रशीदच्या कथेभोवती फिरतो. सुरुवात होते चीड, द्वेष आणि सुडाने मात्र चित्रपटाचा शेवट प्रेमाने होतो.
 
पुरोच्या भूमिकेत उर्मिला मातोंडकर तर रशीदच्या भूमिकेत मनोज वाजपेयी आहेत.
 
रंगीला गर्लची ग्लॅमरस भूमिका करणाऱ्या उर्मिलाने या चित्रपटात पुरोची भूमिका वठवून आपलं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून दिलंय.
 
दुसरीकडे मनोज वाजपेयीला 'पिंजर' चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. या पीरियड ड्रामाचं वैशिष्ट्य काय असेल तर ते त्याचे सुंदर सेट्स. कला दिग्दर्शक असलेल्या मुनीश सप्पल यांनी मुंबई फिल्मसिटीमध्ये 1947 सालातलं लाहोर आणि अमृतसर दाखवण्याची किमया साधली होती. त्यांच्या या कामासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
 
'पिंजर' मध्ये संदली सिन्हा, प्रियांशू चॅटर्जी, ईशा कोपीकर, संजय सुरी, कुलभूषण खरबंदा, दिना पाठक, फरीदा जलाल, सीमा बिस्वास आणि सुधा शिवपुरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
चित्रपटात दाखवलेली पुरो जमीनदाराची मुलगी असते. तिचं लग्न रामचंदशी ठरलेलं असतं. याच दरम्यान पुरोचं अपहरण होतं. अपहरण करणारा रशीद जुन्या वैमनस्याचा राग पुरोवर काढतो. द्वेष आणि सूडाच्या आगीत धुमसत असलेला रशीद पुरोच्या प्रेमात कधी पडतो हे त्याचं त्याला देखील समजत नाही.
 
पुढे पुरो रशीदच्या तावडीतून सुटून आपल्या घरी जाते, पण तिचं कुटुंब तिला स्वीकारत नाही. मग ती रशीदकडे परत येते. या काळात देशाची फाळणी होते. अशा परिस्थितीत रशीद पुरोला मदत करतो. पूरोचं कुटुंब भारतातचं राहतं पण पुरो रशीदसोबत पाकिस्तानात निघून जाते.
 
अतिशय उत्कृष्ट कथानक असूनही हा चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही. कारण लोकांना चित्रपटाचा शेवट आवडला नव्हता.
 
5. गदर - एक प्रेमकथा
'गरम हवा', 'तमस', 'ट्रेन टू पाकिस्तान' आणि 'पिंजर' हे चारही चित्रपट साहित्यकृतींवर आधारित आहेत. या चित्रपटात फाळणीशी निगडित विषयांच चित्रण गांभीर्य आणि संवेदनशीलतेने केल्याचं दिसतं.
 
तेच दुसरीकडे फाळणीचा संदर्भ घेऊन बनवलेला 'गदर' - एक प्रेम कथा' हा मसाला चित्रपट आहे. प्रेक्षकांची दाद मिळावी या हेतूने बनवलेला चित्रपट त्यात यशस्वीही झालाय.
 
गरम हवा', 'तमस', 'ट्रेन टू पाकिस्तान' आणि 'पिंजर' हे फाळणीवर आधारित चित्रपट बॉक्स ऑफिसवर तशी फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. मात्र याच कॅटेगरीमधला 'गदर' लोकप्रिय झाला.
 
2001 मध्ये रिलीज झालेला 'गदर' चं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं होतं तर चित्रपटाची निर्मिती झी टेली फिल्म्सने केली होती.
 
या चित्रपटात सनी देओल, अमिषा पटेल, अमरीश पुरी आणि सुरेश ओबेरॉय यांच्या मुख्य भूमिका आहेत. उत्तम सिंग यांनी दिलेलं संगीत ही तेव्हा तुफान हिट झालं. आजही हा चित्रपट मीम मटेरियलसाठी फेमस आहे.
 
'गदर' सिनेमा सनी देओल, अमिषा पटेल आणि अमरिश पुरी या तिघांभोवतीच फिरतो. अमिषा पटेलच्या संपूर्ण कारकिर्दीतला हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. या चित्रपटासाठी अमिषाला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
 
चित्रपट सुरू होतो तारा आणि सकिनाच्या लव्हस्टोरीपासून. सकिना शिमल्याच्या कॉलेजमध्ये शिकत असते. तिथंच तिची ओळख तारा या शीख तरुणाबरोबर होते. दरम्यानच्या काळात देशात दंगलीचं वार वाहत असतं. देशांची फाळणी होते आणि सकिना पाकिस्तानला जात असताना दंगलीत सापडते.
 
योगायोगाने तिथं तारा असतो तो मुस्लिम असलेल्या सकिनाला दंगलखोरांपासून वाचवतो. तारा सकिनाला तिच्या घरी पाठवण्यासाठी प्रयत्न करतो. तेव्हा कळतं की, तिचे वडील अशरफ अली दंगलीत मरण पावले. शेवटी सकिना ताराशी लग्न करते. त्यांना एक मुलगा होतो ज्याचं नाव जीत असतं.
 
पुढे अशरफ जिवंत असल्याचं सकिनाला समजतं. ती त्यांना भेटण्यासाठी लाहोरला जाते. पण अशरफ तिला भारतात परत न पाठवता तिचं दुसरं लग्न लावून द्यायला जातो.
 
त्यानंतर तारा आणि जीतही नाट्यमय पद्धतीने लाहोरला पोहोचतात. चित्रपटाच्या शेवटी सुरू होते अस्सल सनी देओल स्टाईल हाणामारी. सन्नी देओलचे ते डायलॉग आणि हँडपम्प उपसून काढलेला तो सीन, गदर - एक प्रेम कथेच्या नावे आजही लोकांच्या लक्षात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

सर्व पहा

नवीन

'द ग्रेट इंडियन कपिल शो' वादात अडकला,कायदेशीर नोटीस मिळाली

अद्भुत असा चंदेरी किल्ला

बिग बॉस 18 च्या घरात हिंसाचार,दोन स्पर्धकांमध्ये जोरदार हाणामारी

सलमान खानला धमकीचे मेसेज पाठवल्या प्रकरणी गीतकाराला अटक

'महावतार' चित्रपटात विकी कौशल चिरंजीवी परशुरामच्या भूमिकेत,चित्रपट या दिवशी प्रदर्शित होणार

पुढील लेख
Show comments