भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक असलेल्या 'कौन बनेगा करोडपती'च्या चौदाव्या सीझनला पहिला करोडपती मिळाला आहे. कोल्हापूरच्या राहणाऱ्या 45 वर्षांच्या कविता चावला या कौन बनेगा करोडपतीच्या 14व्या सीझनच्या पहिल्या करोडपती बनल्या आहेत.
2000 साली जेव्हा कौन बनेगा करोडपतिची सुरुवात झाली होती. तेव्हापासून कविता या शोमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करत होत्या. अखेरीस 21 वर्षं, 10 महिने प्रयत्न केल्यानंतर त्यांना अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली.
कविता चावला यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना म्हटलं की, "इतक्या प्रयत्नांनंतर माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. प्रत्येकवेळी मनात विचार यायचा की इतके लोक इथपर्यंत पोहोचले आहेत, मी कधी पोहोचणार? माझा नंबर कधी येईल? जे लोक शोमध्ये यायचे त्यांच्या कहाण्या ऐकून मी स्वतः भावूक व्हायचे. शो सुरू असताना त्या लोकांच्या डोळ्यातून पाणी यायचं आणि मी इकडे घरी बसून रडायचे. प्रत्येक वर्षी मी प्रयत्न करायचे, पण हाती निराशाच यायची."
2021 साली कविता यांना फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंडपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. पण त्या तिथून पुढे जाऊ शकल्या नाहीत. पण तरीही त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि मेहनत करत राहिल्या. अमिताभ बच्चन यांनीच आपल्याला प्रयत्न सुरू ठेवण्याची प्रेरणा दिली, असं कविता सांगतात.
12वी पर्यंत शिक्षण, तरीही शिकणं थांबवलं नाही
आपल्या शालेय शिक्षणाबद्दल कविता सांगतात, "जेव्हा मी दहावीची परीक्षा पास झाले, तेव्हा आमच्या इथे मुलींनी एवढं शिकणंही खूप समजलं जायचं. पण मग घरच्यांनी मला बारावीपर्यंत शिकू दिलं."
"घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. आम्हा चार मुलांचं पालनपोषण करण्यासाठी आई शिवणकाम करायची. तिला पाहून मीसुद्धा शिवणकाम शिकले आणि तिला मदत करायला लागले. त्यामुळे पुढचं शिक्षण सोडून मी कामाला लागले. नंतर माझं लग्न झालं, मी गृहिणी बनले. पण मी शिकणं थांबवलं नाही."
कविता यांनी आपल्या या विजयाबद्दल केवळ आपले पती आणि आपल्या मुलालाच सांगितलं आहे. कुटुंबातील इतर लोकांना याबद्दल माहिती नाही. कुटुंबातील इतर सदस्यांनी, नातेवाईकांनी आपल्याला टीव्हीच्या पडद्यावरच जिंकताना पाहावं अशी त्यांची इच्छा आहे.
केबीसीसाठी तयारी कशी केली?
'कौन बनेगा करोडपती' मधला कोणता प्रश्न सर्वांत अवघड होता, याबद्दल कविता सांगतात, "तीन लाख 20 हजारच्या वरचे सर्वच प्रश्न अतिशय अवघड असतात."
"काही गोष्टी मी वाचल्या होत्या आणि बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी विचार करून, डोकं चालवून दिली. मी केबीसी सुरूवातीपासून फॉलो करत होते, त्यामुळे त्यांनी काठिण्यपातळी किती वाढवली आहे, हे मला माहीत होतं. त्यानुसार मी स्वतःला अपडेट करत राहिले."
जिंकलेल्या एक करोडच्या रकमेचं काय करणार? असा प्रश्न आम्ही कविता यांना विचारला.
"जिंकलेल्या पैशांचा काही भाग मी माझ्या 22 वर्षांच्या मुलाच्या शिक्षणावर खर्च करेन."
त्या पुढे सांगतात, "मला पूर्ण भारत फिरायचा आहे. मला मेघालयला जायचं आहे. चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल पाहायचा आहे. मी आतापर्यंत तो फक्त टीव्हीवरच पाहिला आहे." या पैशांचं काय करणार?
सात कोटी पन्नास लाखांचं रेकॉर्ड होणार की नाही?
केबीसीचा यावेळेचा सीझन वेगळा कसा आहे, हे सांगताना कविता म्हणतात, " यावेळी शोमध्ये जो बदल करण्यात आलाय, तो खूप चांगला आहे. हे आपल्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी (75) वर्षं आहे. त्यामुळे यावेळी केबीसीमध्ये धन अमृत प्रश्न आणण्यात आला आहे. तो 75 लाखांवर आहे. त्यामुळे जो कोणी एक कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत जाईल, त्याला कोणताही धोका नसेल. म्हणजे तो स्पर्धक एक कोटींचा प्रश्न चुकला तरी त्याच्या बक्षीसाची रक्कम तीन लाख 20 हज़ार पर्यंत खाली येणार नाही. तो किमान 75 लाख रुपये तरी घरी घेऊन जाणारच."
"मला या गोष्टीचा खूप फायदा झाला. मी प्रयत्न करू शकले, कारण त्यात कोणताही धोका नव्हता. मी आता सात कोटी 50 लाखांच्या प्रश्नाला सामोरी जाणार आहे. मला याची कल्पना आहे की, या प्रश्नाचं उत्तर देणं इतकं सोपं असणार नाही. कारण खूप मोठ्या रकमेचा प्रश्न आहे."
कविता सांगतात, " हे सोपं नसेल. मी या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर पुन्हा 75 लाखांच्या टप्प्यावर येईन, क्विट करतेय की साडेसात कोटी जिंकून रेकॉर्ड बनवेन हे पाहावं लागेल."
गृहिणींना कमी समजू नका
कविता सांगतात की, त्यांचं आतापर्यंतचं आयुष्य हे नवरा आणि मुलांची देखभाल करण्यात, काळजी घेण्यातच गेलं आहे.
त्या सांगतात, "गृहिणीचं काम हे कोणत्याही सरकारी नोकरीपेक्षा कमी नाहीये. गृहिणीचं काम हे मल्टि टास्किंगचं आहे. नवऱ्याप्रती जबाबदारी असते, मुलांची काळजी घ्यावी लागते, सासू-सासरे आणि घरातील इतर लोकांचीही जबाबदारी असते. त्याशिवाय बाहेरचं सगळं सांभाळावं लागतं, मग अगदी ते बाजारातून सामान आणण्यापासून सगळ्या गोष्टी असतात."
"एक गृहिणीच या सगळ्या गोष्टी समजू शकते. गृहिणीच्या कामाला कमी लेखलं नाही पाहिजे. हाऊसवाइफ किंवा गृहिणी तर आहे ना...असं समजू नये. मी पण या सगळ्या गोष्टी सांभाळत सगळी तयारी सुरू ठेवली. अमिताभ यांनीही माझी प्रशंसा केली होती आणि गृहिणी असूनही मला ज्ञानाची शक्ती ही उपाधी दिली."
पदवी नसल्याची सुरुवातीला खंत वाटायची, पण...
कविता सांगतात, "आपल्या सामाजिक मानसिकतेप्रमाणेच मलाही सुरुवातीलाच वाटायचं की, मी 12 पर्यंतच शिकले आहे, माझ्याकडे पदवी नाहीये. मी पुढे काय करणार?"
कौन बनेगा करोडपती पाहिल्यानंतर माझा हा विचार बदलला आणि मी विचार केला की, डिग्री नसली तरी मी आपल्या ज्ञानाच्या जोरावर पैसे कमावेन.
कविता सांगतात, "जर माझ्या मेहनतीच्या जोरावर मी करोडपती बनले तर हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी पदवी असेल असा विचार मी केला- करोडपति कविता ही. आता मला खरंच दुसऱ्या कोणत्याही पदवीची आवश्यकता नाहीये.