Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज कुंदरा : बस कंडक्टरचा मुलगा, यशस्वी व्यावसायिक ते पॉर्नच्या निर्मितीचे आरोप

Raj Kundra: Son of a bus conductor
, मंगळवार, 20 जुलै 2021 (14:52 IST)
पॉर्न चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंदरांना अटक करण्यात आली आहे.
 
मुंबई पोलिसांनी कुंदरा यांना आज (20 जुलै) न्यायालयात हजर केलं होतं.न्यायालयानं याप्रकरणी राज कुंदरा यांना 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
 
मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सात ते आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली होती.त्यानंतर पोलिसांनी कुंद्राला अटक केली. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली.
 
पोलिसांनी कोर्टात काय म्हटलं?
पोलिसांनी कोर्टात राज कुंद्राच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.
 
राज कुंद्रा पॅार्नोग्राफीतून खूप पैसे कमवत होता.राज कुंद्राच्या वियान कंपनीत मोठ्या प्रमाणावर परकीय चलन आहे. राज कुंद्रा आणि इतर आरोपींना समोरा- समोर बसवून चौकशी करायची आहे.
 
हॉटशॅाट या app बाबत वॅाट्सएप चॅट ग्रुप राज कुंदरा चालवत होता. राज कुंद्रा प्लॅनिंगमध्ये सहभागी होता. त्याला सर्व स्टोरी माहिती असायच्या, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
 
राज कुंदराचा व्यावसायिक म्हणून प्रवास
पश्मीना शाली, हिरे व्यापारी,आयपीएल संघाचे सहमालक अशा विविध भूमिकांमध्ये दिसणारे राज कुंदरा हे याआधीही वादविवादांमध्ये अडकले आहेत.
 
राज कुंदरा यांच्यावर सट्टेबाजीच्या प्रकरणातही आरोप झाल्याचं म्हटलं आहे.
 
राज कुंदरा यांचे वडील हे लुधियानामधून ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्यानंतर लंडनमध्ये राज यांचा जन्म झाल्याने ते ब्रिटिश नागरिक आहेत.
 
राज कुंदरा यांचे वडील बस कंडक्टर होते. नंतर त्यांनी एक छोटा उद्योग सुरू केला. राज यांची आई दुकानामध्ये सहाय्यक म्हणून काम करायची. कुंदरा यांनी महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडलं.
 
नेपाळ भेटीनंतर आपलं आयुष्य बदलल्याचं राज कुंदरा सांगतात. नेपाळ भेटीदरम्यान त्यांनी पश्मीना शाली विकत घेऊन त्या युकेत विकण्यास सुरुवात केली आणि तिथूनच त्यांच्याउद्योगपती म्हणून प्रवासाला सुरुवात झाली.
 
हळूहळू राज यांनी हिरे व्यापार सुरु केला. त्यांनी बेल्जियम, रशिया यासारख्या देशांमध्ये व्यापार सुरू केला. त्यांनी आरके कलेक्शन्स लिमिटेड नावाची कंपनी सुरु केली.या कंपनीच्या माध्यमातून ते लंडनमधील फॅशन हाऊसेसला महागडे कपडे विकू लागले. या उद्योगातून त्यांची भरभराट झाली.
 
मेटल, बांधकाम, खाण, पर्यावरणपूरक ऊर्जा प्रकल्प अशा विविध क्षेत्रात कुंदरा यांची इशेन्शियल जनरल ट्रेडिंग कंपनी काम करते.
 
वैयक्तिक आयुष्य
कुंदरा यांचं कविता यांच्याशी लग्न झालं होतं, 2009 मध्ये राज कुंदरा आणि कविता यांचा घटस्फोट झाला. या दोघांना डिलीना नावाची एक मुलगी आहे.
 
कुंदरा आणि शिल्पा शेट्टी हे सेलिब्रेटी कपल म्हणून लोकप्रिय आहे. दरवर्षी कुंदरा यांच्या घरी गणपतीचं आगमन होतं. गणपतीच्या आगमानावेळी आणि विसर्जनावेळी कुंदरा कुटुंबीयांच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा असते.
 
राज आणि शिल्पाची पहिली भेट 2007 साली झाली. याच वर्षी शिल्पाने सेलिब्रिटी बिग बॉस हा शो जिंकला होता. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हे दोघे पहिल्यांदा भेटले.
 
शिल्पा शेट्टी फाऊंडेशनशीही कुंदरा संलग्न आहेत. 'हाऊ नॉट टू मेक मनी' या नावाचं त्यांचं पुस्तक 2013मध्ये प्रकाशित झालं होतं.
 
शिल्पा आणि राजने 22 नोव्हेंबर 2009 रोजी लग्न केलं. 21 मे 2012 रोजी त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव विवान असं आहे. 2020 साली राज आणि शिल्पाला एक मुलगी झाली. तिचं नाव समीक्षा असं ठेवलं आहे.
 
घटस्फोटासाठी शिल्पा कारणीभूत असल्याचा आरोप कविता यांनी केला होता.
 
अनेक उद्योग, नानाविध वाद
कुंदरा यांनी ऑनलाइन टीव्ही प्लॅटफॉर्ममध्येही गुंतवणूक केलेली. बेस्ट डिल टीव्ही असं या प्लॅटफॉर्मचं नाव होतं. नंतर कुंद्रा यांचा हा उद्योग सुद्धा कायदेशीर प्रकरणांमध्ये अडकला.
 
2012 मध्ये कुंदरा यांनी सुपर फाइट लीग लॉन्च केली होती. अभिनेता संजय दत्त हा कुंदरा यांचा बिझनेस पार्टनर होता. मात्र या लीगने बस्तान बसवण्याआधीच गाशा गुंडाळला. कुंद्रा हे युकेमधील ट्रेडक्रॉप लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अध्यक्षही आहेत.
 
बिटकॉईन घोटाळा
बिटकॉईन घोटाळ्यात राज कुंदरांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने 2018 साली समन्स बजावले होतं. 2 हजार कोटींचा हा बिटकॉईन घोटाळा असण्याचं सांगण्यात आलेलं.
 
समन्स जारी केल्यानंतर 5 जून 2018 रोजी राज कुंद्रांनी इडीचे कार्यालय गाठले होते. या कार्यालयात इडीच्या अधिकाऱ्यांकडून राज कुंदरांची कसून चौकशी करण्यात आली.
 
2017 मध्येही घोटाळ्यासंदर्भात राज कुंदरांचे नाव चर्चेत आले होते.कारण ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांना गंडा घातल्या प्रकरणात त्यांचे आणि शिल्पा शेट्टीचे नाव चर्चेत आले होते.
 
शिल्पा शेट्टी, राज कुंदरा आणि त्यांच्या तीन साथीदारांविरोधात या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
 
बेस्ट डील?
बेस्ट डील टीव्ही कंपनीच्या माध्यमातून विविध कंपनीचे प्रोडक्ट विक्रीचा ऑनलाइन शॉपिंगचा व्यवसाय उद्योगपती राज कुंदरा यांनी पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावाने सुरु केला होता. व्यवसायात नफा व्हावा,यासाठी रवी मोहनलाल भालेरीया या व्यापाऱ्याने बेस्ट डील टीव्ही कंपनी मार्फत 5 कोटी रुपयांच्या बेडशीटची ऑर्डर घेतली होती.
 
या व्यवहारात 23 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे, असा आरोप भालेरीया यांनी केला होता. याप्रकरणी शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंदरा, दर्शित शाह, उदय कोठारी, वेदांत विकास बल्ली यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
शिल्पा शेट्टी आणि राज कुंदरा यांच्याविरुद्ध एका उद्योगपतीने मार्च 2020 मध्ये तक्रार केली होती. मुंबईतील एक नॉन-रेसिडेन्शिअल इंडियन उद्योगपती सचिन जे. जोशी यांनी पोलिसात तक्रारीत केली होती. हे प्रकरण सोन्याचा व्यापार करणारी कंपनी 'सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड'शी (एसजीपीएल) संबंधित होतं.
 
राज कुंदरा हा यापूर्वी या कंपनीचे माजी संचालक होता.मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये जोशी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंदरा, गणपती चौधरी, मोहम्मद सैफीसह एसजीपीएलच्या इतर अधिकाऱ्यांवर फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. सचिन जोशी आणि राज कुंदरा-शिल्पा शेट्टी यांच्यात 2014 रोजी देवाण-घेवाणीवरुन वाद झाला होता.
 
गुन्हेगारी जगताशी संबंधाचे आरोप
अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची यांच्यासोबत राज कुंदरांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला आहे. ईडीने यासंबंधी कुंदरा यांना नोटीसही दिली होती.पण कुंदरा यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते.
 
आयपीएल बेटिंग प्रकरणी आजीवन बंदी आणि क्लिनचिट
राज कुंदरा आणि शिल्पा शेट्टी इंडियन प्रीमिअरलीग स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स संघाचे सहमालक होते. 2009मध्ये या जोडप्याने राजस्थान रॉयल्स संघात गुंतवणूक केली होती.
 
2013 आयपीएल हंगामादरम्यान सट्टेबाजीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी राज यांची चौकशी केली होती.
 
जुलै 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयातर्फे गठित झालेल्या तीन सदस्यीस समितीने राज कुंदरा यांच्यासह बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.श्रीनिवास यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांना आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याप्रकरणी आजीवन बंदी घातली होती.
 
कुंदरा सहमालक असलेल्या राजस्थान रॉयल्स संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. दरम्यान दिल्ली पोलिसांनी पुराव्याअभावी कुंदरा यांना क्लिनचिट दिली.
 
"माझ्यावरील आजीवन बंदी हटवण्यात यावी. न्यायालयीन यंत्रणेवर माझा विश्वास आहे. दिल्ली पोलिसांनी माहिती अधिकाराला उत्तर देताना जे म्हटलं आहे ते आम्ही न्यायालयाला सादर केलं आहे. पोलिसांनी मला क्लिनचिट दिली आहे तर मग माझ्यावर बंदीची कारवाई का? जे कृत्य मी केलेलं नाही त्याची शिक्षा मी का भोगू?" असा सवाल कुंदरा यांनी केला होता.
 
"बंदीच्या कारवाईने माझी प्रतिमा मलिन झाली आहे.आयपीएलमधील सर्व संघमालकांमध्ये सगळ्यात कमी पैसा माझ्याकडे होता. माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नसतानाही कारवाई झाली.हे सगळं अत्यंत वेदनादायी होतं. राजस्थान रॉयल्स संघाशी माझी नाळ किती जुळलेली आहे हे तुम्ही पाहिलं आहे. माझ्या भावना खोट्या नाहीत", असं कुंदरा म्हणाले होते.
 
"सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता मिळावी असं मला वाटतं. सट्टेबाजी होत नाही असं मानणं मूर्खपणाचं आहे. सट्टेबाजी नसेल तर अनेक चाहते क्रिकेट पाहणं सोडून देतील.प्रत्येक सामन्यावेळी 4000-5000 कोटींची उलाढाल होते. सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देण्याची वेळ आली आहे", असं कुंदरा म्हणाले होते.
 

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक